तुम्हाला पाठदुखी किंवा मानदुखीचा त्रास होतो का?
त्यावर अनेक उपाय करून सुद्धा फरक पडत नाही?
तपासण्या सुद्धा झाल्या आहेत? मग या मागे एक कारण असायची शक्यता आहे..
तुम्हाला कसल्या गोष्टीचा मानसिक ताण/स्ट्रेस आहे का?
आता स्ट्रेस व पाठदुखी याचा काय संबंध?
स्ट्रेसचा तुमच्या शरीरावर, आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होत असतो.
स्ट्रेस घेणे, टेंशन घेणे हे जरी तुमच्या मानसिक आरोग्याशी निगडित असले, तरीही त्याचा परिणाम मात्र तुमच्या शरीरावर होतो.
म्हणूनच अनेकांच्या बाबतीत स्ट्रेसमुळे वजन वाढणे, जास्त भूक लागणे, डोके दुखणे, मूड स्विंग होणे यासारखे त्रास होऊ शकतात.
स्ट्रेस घेण्यामुळे असाच एक शरीरावर होणार परिणाम म्हणजे डोकेदुखी व मानदुखी.
अनेकांना हे खरे वाटणार नाही किंवा कदाचित नुसतीच वरवरची कारणे सुद्धा वाटू शकतात.
कारण याबद्दल जास्त लिहिले-वाचले जात नाही.
पण स्ट्रेसचा आपल्या शरीरावर सुद्धा विपरीत परिणाम होतोच.
तो कशामुळे होतो, स्ट्रेसमुळे शरीरात नेमके काय बदल होतात, हे तुम्ही जाणून घेतलेत तर तुम्हाला सुद्धा आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही.
आज या लेखात आपण स्ट्रेसमुळे शारीरिक त्रास काय होतात, स्ट्रेसमुळे पाठदुखीला कशी सुरुवात होते व त्यावर काय उपाय करायचे हेच जाणून घेणार आहोत.
मनावर कसला तणाव आला, म्हणजेच स्ट्रेस जास्त झाला, तर शरीरात काही हार्मोन जास्त प्रमाणात स्त्रवले जातात.
या हार्मोन्सचाच परिणाम होऊन वेगवेगळ्या व्याधींची सुरुवात व्हायला सुरु होते.
अद्रेनालीन (Adrenaline) हे असेच एक हार्मोन आहे. कसली तरी भीती वाटून, मनावर ताण आला की हे हार्मोन स्त्रवले जाते.
यामुळे आपल्या शरीराला ‘fight or flight’ सिग्नल मिळतो.
म्हणजे समोर दिसत असलेल्या संकटाशी एकतर लढायचे किंवा ते शक्य नसल्यास तिथून पळ काढायचा निर्णय आपल्याला हा हार्मोनमुळे घेता येतो.
अर्थातच या हार्मोनचा शरीरावर परिणाम होतोच.
यामुळे ब्लड प्रेशर जास्त वाढते, शरीरातील, विशेषतः मानेमधील स्नायू आखडतात.
थोडक्यात हे हार्मोन fight or flight साठी शरीराला तयार करते.
मानेतील स्न्यायु आखडल्याने मान दुखीचा त्रास सुरु होऊ शकतो.
यामुळे मानेचा मागचा भाग, डोके हे दुखते.
डोकेदुखी हा सुद्धा स्ट्रेसमुळे आपल्या शरीरावर होणारा विपरीत परिणामच असतो.
कॉर्टीसोल (Cortisol) हे अजून एक स्ट्रेस हार्मोन आहे.
याचा सुद्धा शरीरावर वेगवेगळ्या पद्धतीने परिणाम होतो.
या हार्मोनचे रक्तातील प्रमाण वाढल्याने शरीरातील मसल मास कमी होऊन फॅटमध्ये वाढ होते.
शरीरातील मसल कमी झाल्याने सुद्धा अशक्तपणा येऊन दुखणी सुरु होतात.
स्ट्रेसमुळे होणाऱ्या पाठदुखीमागे पण अशीच कारणे आहेत.
पाठदुखीचे प्रामुख्याने दोन प्रकार असतात. एक म्हणजे पाठदुखी आणि दुसरी म्हणजे कंबरदुखी किंवा लोवर बॅक पेन.
स्ट्रेस जास्त झाला असेल, खूप दिवस मनावर काहीतरी ताण असेल तर श्वास घ्यायच्या प्रक्रियेत हळूहळू बदल व्हायला लागतात.
याचा परिणाम पाठीच्या स्नायुंवर होतो यामुळे पाठीचे स्नायू आखडतात व त्यावर ताण येतो.
या स्नायूवरच्या ताणामुळे पाठदुखीच्या समस्येला सुरुवात होते.
स्ट्रेसमुळे होणाऱ्या कंबरदुखी किंवा लोवर बॅक पेन मागे मात्र कारण थोडे वेगळे आहे.
अतिरिक्त स्ट्रेस घेतल्यावर थोडे डिप्रेशन वाटणे साहजिक आहे.
अशा मनस्थितीमध्ये माणूस थोडा आळसावतो.
बाहेर जाणे नको वाटतेच पण इतर वेळेस सुद्धा उभी राहायची पद्धत, बसायची पद्धत बदलते.
व्यायामाचे प्रमाण सुद्धा कमी होते. काम करताना सुद्धा एका जागी जास्त वेळासाठी बसून केले जाते.
यामुळे साहजिकच कंबर व मज्जारज्जूवर ताण येऊन त्याचे दुखणे सुरु होते.
खरेतर स्ट्रेसचे आपल्या मनावर आणि शरीरावर जितके परिणाम होतात त्यापैकी हे परिणाम त्या मानाने दुर्लक्षित आहेत.
ताण जास्त झाल्याने, टेन्शन येऊन त्याचा संबंध डोकेदुखीशी सहज जोडला जातो.
पण इतक्या सगळ्या बाजूंचा विचार करून, सोप्या शब्दात समजून घेऊन पाठदुखीमागे सुद्धा स्ट्रेस हे कारण असू शकते हे तुम्हाला पटले असेल.
स्ट्रेस आणि मान, डोके, पाठ व कंबरदुखी याचा काय संबंध आहे हे आपण सोप्या शब्दात पाहिले पण यावर उपाय काय?
खरेतर स्ट्रेस हा आपल्या सगळ्यांच्याच जीवनाचा अनिवार्य भाग झाला आहे.
सतत प्रगती करायची, आपले ध्येय गाठायचे यासाठी अनेक प्रयत्न करावे लागतात.
सतत आयुष्यात काहीतरी नवीन शिकून ते आत्मसात करायची धडपड करावी लागते.
या सगळ्यामुळे शरीराबरोबर मनावर सुद्धा ताण येणे साहजिकच आहे.
कितीही प्रयत्न केले तरी काही प्रमाणात हा ताण मनावर राहणारच.
हे बरोबर आहे की अतिरिक्त ताण घेणे धोकादायक असते.
त्यामुळे शारीरिक व मानसिक व्याधी ओढवतात.
पण त्याचबरोबर हा ताण पूर्णपणे घालवणे सुद्धा शक्य नाही.
त्यामुळे तुमचे स्वास्थ्य जपण्यासाठी तुम्ही तो जास्तीतजास्त कमी कसा होईल ते बघितले पाहिजे.
यासाठी अनेक उपाय करता येतील. त्याकरता मनाचेTalks वर वेगवेगळे लेख सुद्धा उपलब्ध आहेत.
पण जो काही स्ट्रेस तुमच्या जीवनात अपरिहार्य असेल त्याचे काय?
त्या स्ट्रेसचा परिणाम होऊन स्नायूंवर आणि मज्जारज्जूवर ताण येऊन पाठीदुखी, कंबरदुखी यासारखे त्रास सुरु होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?
१. व्यायाम
पाठदुखी व कंबरदुखी कमी व्हावी यासाठी नियमितपणे व्यायाम करण्याची गरज असते.
यामध्ये जास्त करून स्ट्रेचिंग व्यायामप्रकारांवर जोर दिला पाहिजे यामुळे आखडलेले स्नायू मोकळे होण्यासाठी मदत होते.
व्यायामाचे अजून एक महत्व असे की व्यायामामुळे शरीरात एनडोरफिन्स हे हार्मोन्स स्त्रवले जातात.
या हार्मोन्समुळे स्ट्रेस हार्मोन्सचा प्रभाव कमी होतो.
म्हणजेच पाठदुखीचे कारण मुळापासून कमी करण्यासाठी व्यायाम हा एक चांगला पर्याय आहे.
यामुळे स्ट्रेस कमी व्हायला मदत होते.
तुमचे काम जर एका जागी बून करायचे असेल तर दर तासाने किंवा दीड तासाने उठून थोडे चालले पाहिजे.
जागेवरच उठून हात पाय, कंबर ताणायचे व्यायाम सुद्धा तुम्ही करू शकता.
एका जागी जास्त वेळ बसल्याने पाठदुखीचा त्रास सुरु होतो.
म्हणूनच शक्यतो ऑफिसमध्ये असताना दर थोड्या वेळाने शरीराची हालचाल केली पाहिजे.
मानेचे व्यायाम, कंबरेचे स्ट्रेच, पाठीचे स्ट्रेच हे घरच्याघरी नियमितपणे केले पाहिजेत जेणेकरून त्या भागातील स्नायू अखडणार नाहीत.
२. आहार
आहाराचा साहजिकच तुमच्या आरोग्यावर परिणाम होतो.
आहारात काही बदल केल्याने स्ट्रेसचे प्रमाण कमी होते.
खरेतर आहारात योग्य ते बदल केल्याने एकूण आरोग्यच सुधारायला मदत होते.
चौरस आहार घेतल्याने शरीरात उर्जा योग्य प्रकारे निर्माण होते.
यामुळे आळशीपणा जाणवत नाही. साहजिकच शरीराची हालचाल जास्त चांगल्या प्रकारे होते.
यामुळे दुखणी कमी व्हायला मदत होते. सकस आहार केल्याने वजन कमी व्हायला सुद्धा मदत होते.
वजन कमी असेल तर मज्जारज्जूवरचा ताण अपोआप कमी होऊ पाठदुखी पासून सुटका होते.
३. आराम
सततच्या धकाधकीच्या आयुष्यात आरामाला जागा नसते.
प्रगती करायची असेल तर थकून चालत नाही असे म्हणतात.
पण न थकण्यासाठी गरज असते ती आरामाची.
शरीर आणि मन, दोन्ही अतिरिक्त ताणाने थकून जाते.
यामुळेच मग वेगवेगळ्या दुखण्यांना सुरुवात होते.
तुमचे आयुष्य कितीही व्यस्त असले तरी तुम्ही दिवसातील काही वेळ हा आरामासाठी राखून ठेवायलाच हवा.
या तुमच्या खास अशा वेळात तुम्ही एखादे पुस्तक वाचू शकता, टीव्ही बघू शकता किंवा चक्क एखादी डुलकी काढू शकता.
ऑफिसमधून घरी आल्यावर इतर कामांना सुरुवात करण्यापूर्वी १५ मिनिटे हा होईना आराम केलाच पाहिजे.
यामुळे संपूर्ण शरीरातील मसल्स रीलॅक्स व्हायला मदत होते.
४. जीवनशैली
स्ट्रेस विषयी एक गैरसमज पसरलेला दिसतो.
तो म्हणजे दारू किवा सिगारेटमुळे स्ट्रेस कमी व्हायला मदत होते.
अनेक जण स्ट्रेसमुळे या गोष्टींकडे वळताना सुद्धा दिसतात.
पण खरेतर या गोष्टी स्ट्रेसमध्ये भरच घालत असतात.
यामुळे स्ट्रेस कमी होण्याऐवजी तो वाढत असतो.
याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो व यामुळे अनेक दुखणी सुरु होतात.
त्यामुळे स्ट्रेस कमी करायला अशा पर्यायांचा स्वीकार न करता मेडीटेशन, योग हे पर्याय स्वीकारावेत.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.