मला आवडलेली मालिका- ‘नांदा सौख्य भरे’

Nanda Saukhya Bhare

‘नांदा सौख्य भरे’ हि झी मराठीवरची मालिका माझी सर्वात आवडती मालिका .या मालिकेमधील सर्वच पात्रे खूप सुंदर होते. त्या सगळ्यांनीच आपापली कामे खूप छान बजावली. विशेषतः एका सामान्य कुटुंबाची गोष्ट यामध्ये दाखवली गेली. सुशिक्षित ,संस्कारी आणि जीव लावणारी व्यक्तिमत्व यामध्ये साकारले गेले. एकत्र कुटुंबपद्धती खूप सुंदर प्रकारे दाखवली गेली. कुठल्याही प्रकारची अतिशयोक्ती त्यात दाखवली गेली नाही किंवा काही घाणेरडे प्रकारही त्यात दाखवले गेले नाही.संपूर्ण कुटुंबाने एकत्रित बसून बघण्यासारखी हि मालिका होती.

स्वानंदी आणि नील हे दोन मुख्य पात्रे. आजच्या पिढीला दाखवण्यासारखी हि दोन पात्रे. दोघेही उच्चशिक्षित असूनही खूप संस्कारी,प्रेमळ. खूपच मनमोकळेपणाने त्यांनी आपल्या भूमिका बजावल्या. दोघेही देखणे रुबाबदार पण त्याचबरोबर त्यांचं वागणं बोलणं मनाला भिडणारं होतं. मला तर जणू स्वानंदी हि माझ्या जवळची कोणीतरी आहे असं वाटत होतं. तिचा साधेपणा खूप साजेसा वाटायचा. स्वानंदीचं घर खूप छान आणि त्या घराची रचना देखील खूप आवडायची. तिचे आई-बाबा, काका-काकू, आजी हे सगळेजण खूप साधे. सगळे जणू आपल्या कुटुंबातीलच माणसे आहेत असे वाटायचे. एका मध्यमवर्गीय पण सुशिक्षित, सुसंस्कृत घरातील हुबेहूब व्यक्तिरेखा साकारल्या गेल्या होत्या. काकांची मस्करी करण्याची सवय छान वाटायची. काकूंचा साधेपणा खरा वाटायचा.

nanda saukhy bhre स्वानंदीची आई खूपच शिस्तप्रिय. त्यांचं ते समजावून सांगणं पण किती छान वाटायचं. खरं तर ते पात्र जरा अवघड होते पण तिच्या आईने छान बजावले कारण असं समजावून सांगणे प्रत्येकालाच जमत नाही. (विशेषतः इतर मालिकांमधील कलाकारांमध्ये) पण ते काम त्यांनी छान बजावले. स्वानंदीच्या बहिणीची भूमिका नकारात्मक असली तरी चोख होतं कारण, असे एक तरी पात्र असावेच. त्याशिवाय मजाही येत नाही. स्वानंदीच्या घरातील माणसे खूप साधी आणि सरळ होती. त्यामुळे ती जणू आपल्याच जवळची आहे असं वाटत होतं. त्या घराचा रोजचा दिनक्रम,घरातले प्रत्येक कानेकोपरे दाखवले जायचे. अगदी सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंतचा प्रवास बघायला खूप छान वाटायचं. एका सामान्य घरात जे काही होतं अगदी तसेच दाखवले जायचे. त्यामुळे हि मालिका अगदी खरी वाटायची. या लोकांनी आपली मने जिंकली होती. हे कुटुंब इथेच आपल्या जवळ राहतंय असे वाटायला लागल होतं. कधीकधी तर मनात यायचं कि हि नक्की मालिकाच आहे ना? कि कुठे हे असच घर आहे आणि हि लोकं अशीच कायमची तिथेच राहतायत आणि हेच खरं जीवन आहे. त्यामुळेच हि माणसे आपलीशी वाटायची.

अजून एक महत्वाचं पात्र म्हणजे वच्छी मावशी. यांच्याबद्दल तर काय बोलायचं. अतिशय सुंदर भूमिका त्यांनी साकारली. खूप मनमिळाऊ प्रेमळ आणि मजेशीर असे व्यक्तिमत्व. त्या तर आपल्याच घरातील होऊन गेल्या होत्या. मावशीच्या छोट्याश्या घरात आनंदाने राहणे आणि आपल्याकडे काहीही नसताना दुसऱ्याची मदत करणे या दोन सवयी मनाला भिडणाऱ्या. त्यांनी देखील कधी अतिशयोक्ती दाखवली नाही. बऱ्याच स्त्रियांनी त्यांचा आदर्श घ्यावा अश्या त्या वच्छी मावशी. कदाचित मावशी नसत्या तर मजाच आली नसती. अशी मैत्रीण मलाही हवीशी वाटायची.

इकडे नीलच्या घरातील माणसेही मजेशीर. नीलची आई व्वा काय काम केलंय त्यांनी. आतापर्यंत विनोदी भुमिका साकारताना बघितलं होतं. पण नकारात्मक विनोदी भूमिका खूप छान बजावली. त्यांचं वागणही खूप विनोदी असायचे. बरीच विनोदी संभाषणे त्यांना दिली गेली होती. त्यामुळे वेगळीच छाप त्यांनी पाडली. मला तर अजूनही काही मजेशीर किस्से आठवतात. उदा. त्यांची सून सारखी त्यांना विचारायला यायची. ‘आई आज स्वयंपाकात काय करू?’ आणि त्यावर त्या बोलायच्या यांना तर नुसतं गिळायचंच पडलेलं असतं. आणि नीलची मैत्रीण आल्यावर बिसलेरीच पाणी उकळून ठेवतात. अशे खूप मजेशीर किस्से दाखवले गेले. खरंच,मला तर या मालिकेतील लोकांनी आपलेसे केले होते. मालिकेतील दोन्ही घरे खूप छान. कथा खूप सुंदर आणि कपडेपण छान वापरले गेले. सगळे सण हि या मालिकेमध्ये दाखवले गेले. स्वानंदीच्या काकूने बऱ्याच पाककृती सांगितल्या. असं वाटायचं कि हे आपल्या ओळखीचे पाहिजे होते. त्यानिमित्ताने नवीन काही खायलाही मिळाले असते.

अशा प्रकारे,मजेशीर कधी संवेदन शील तर कधी हळवे प्रसंग या मालिकेत दाखवले गेले. आणि वेळेत याचा निरोप घेतला. त्यामुळे हि मालिका कधी कंटाळवाणी वाटली नाही. शेवट चांगला दाखवला त्यामुळे हि मालिका छान वाटली. सुरुवातीपासून बघत असल्यामुळे कधी कंटाळा नाही आला. या मालिकेतील पात्रांनी खूप सुंदर काम केल्यामुळे हि मालिका विशेष वाटली.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!