तुमच्या नोकरीला कंटाळला असाल तर हा लेख जरूर वाचा

तुमच्या नोकरीला कंटाळला असाल तर हा लेख जरूर वाचा

तुमच्या नोकरीला कंटाळला असाल तर हा लेख जरूर वाचा आणि तुमच्या नोकरीकडे बघण्यासाठी नवीन दृष्टीकोन मिळवा 

करिअरच्या सुरुवातीलाच बऱ्याच जणांना अनेक कारणांमुळे नोकरी करावी का स्वतंत्र व्यवसाय करावा हे पर्याय उपलब्ध नसतात.

परिस्थितीमुळे किंवा अन्य काही कारणांमुळे व्यवसाय करण्याची इच्छा असूनही करिअरच्या सुरुवातीला नाईलाजाने नोकरी स्वीकारावी लागते.

काही वर्षे निघून गेल्यावर, आयुष्यात व कामात स्थैर्य आल्यावर त्या न केलेल्या व्यवसायाची चुटपूट लागून राहते.

काहीजण नोकरीच्या स्थैर्याचा विचार न करता व्यवसायाला सुरुवात देखील करतात.

पण काही जण मात्र नोकरी की व्यवसाय या द्विधा मनस्थितीतच अडकून पडलेले असतात. 

दोन्ही पैकी काय करावे हे समजत नाही. करत असलेली नोकरी चालू ठेवावी का मनात असलेल्या व्यवसाय क्षेत्रात पाय रोवायचा प्रयत्न करावा, हा प्रश्न काही वेळा तुम्हाला सुद्धा पडला असेल.

नोकरी का व्यवसाय, दोन्ही मध्ये काय चांगले आहे याबद्दल गोंधळ देखील झाला असेल. 

नोकरी काय किंवा तुमचा स्वतःचा बिझिनेस काय, दोन्हीचे काही तोटे काही फायदे असतातच.

पण आज या लेखात आपण याबद्दल चर्चा करणार नाही. या लेखाचा विषय नोकरी का व्यवसाय याच्याशी संबंधित असला तरी तो थोडा वेगळा आहे. 

तो कसा ते बघूया. 

वर म्हटल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा जर वारंवार नोकरी का व्यवसाय या गोंधळात अडकून पडत असाल तर तुम्हाला मदत व्हावी हाच या लेखाचा हेतू आहे.

नोकरी का व्यवसाय यातील काय निवडावे, कसे निवडावे व का निवडावे हा निर्णय सर्वस्वी तुमचा असायला हवा.

पण तो निर्णय घेण्यासाठी या लेखाची तुम्हाला मदत होईल. 

दोन गोष्टींमधून एकाची निवड करताना तुम्ही नेहमी दोन्ही गोष्टींच्या चांगल्या आणि वाईट भागांची तुलना केली पाहिजे.

बऱ्याचदा मात्र असे करताना एका बाजूला जास्त महत्व दिले जाते. त्यामुळे दुसऱ्या बाजूचे गुण अधोरेखित केले जात नाहीत.

याचा निर्णयावर परिणाम होऊच शकतो पण त्याचा तुमच्या सध्याच्या कामावर सुद्धा परिणाम होऊ शकते. 

समजा जर तुम्ही सध्या नोकरी करत असाल पण मनात व्यवसायाविषयी विचार सुरु असतील तर कदाचित असे होण्याची शक्यता असते की तुम्हाला तुमच्या नोकरीतील फक्त वाईटच गोष्टी दिसायला लागतात व चांगल्या गोष्टींकडे दुर्लक्ष होते.

यामुळे नोकरीचा कंटाळा आल्या सारखे वाटते.

बिझनेस किंवा नोकरी याचे फायदे व्यक्तीसापेक्ष आहेत.

त्यामुळे या लेखात त्याबद्दल सांगितले नसून तुमच्या नोकरीकडे बघण्याचा तुमचा दृष्टीकोन कसा असायला हवा, जेणेकरून तुमच्या द्विधा मनस्थितीचा तुमच्या कामावर परिणाम होणार नाही हे सांगितले आहे.

नोकरी करताना मनात सकारात्मकता कशी बाळगावी हे आज आपण बघणार आहोत. 

नोकरीत तुम्ही खुश आहात कि नाही हे तुमच्या दृष्टिकोनावर अवलंबून असते आणि तुम्ही हा दृष्टीकोन जाणीवपूर्वक बदलू शकता. कसे ते बघूया या लेखात. 

१. परिस्थितीचा स्वीकार सकारात्मकतेने करा

तुम्ही नोकरी करण्याचा निर्णय काही कारणाने घेतला असला तरी तो तुमचा स्वतःचा निर्णय होता हे नेहमी लक्षात ठेऊन त्याचा स्वीकार केला पाहिजे.

मी सुद्धा सुरुवातीला काही अपरिहार्य कारणामुळे अभियंता असून, विमा विभागात नोकरी करायला सुरुवात केली होती. आणि मुख्य म्हणजे तिथल्या विक्रीचे मोड्यूल मला तितकेसे आवडत नसल्याने त्या नोकरीत रस वाटत नव्हता.

पण ते करताना वेगवेगळी माणसं भेटत गेली, त्यातून नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, या सगळ्यातून आय. टी. रिटर्न्स भरण्यापासून शेअर मार्केट, कमोडिटी मार्केट इथपर्यंत सर्व गोष्टी स्वतः करता येऊ लागल्या.

नियमित असा उत्पन्नाचा स्रोत सुरु झाला आणि या सकारात्मक गोष्टींवर लक्ष द्यायला सुरुवात जेव्हा केली, तेव्हा तेच काम आवडू लागले आणि त्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स सुद्धा मिळू लागले.

तुम्ही आणि तुमची नोकरी हे एक अतूट नाते आहे असे समजून तुम्ही तुमच्या निर्णयाचा स्वीकार करा.

आणि तुम्ही स्वीकार केलेली ही गोष्ट तुम्ही काळजीपूर्वक, नीटनेटकेपणाने निभावली पाहिजे.

तुमच्या निर्णयाचा तुम्ही मनापासून स्वीकार केला तर हे सहज शक्य होईल. तुम्ही तुमच्या नोकरीच्या ठिकाणी काय देता यापेक्षा महत्व तुमची नोकरी तुम्हाला काय देते याला द्या.

पगार, नवीन काम शिकण्याची संधी, उत्तम मार्गदर्शन.. अशा कितीतरी गोष्टी असतील ज्या तुमच्या नोकरीमुळे तुम्हाला मिळाल्या असतील.

या सगळ्यातून शिकून तुम्ही व्यावसायिकदृष्ट्या आणि वैयक्तिकरित्या सुद्धा प्रगत होत असता.

असा विचार केल्याने तुमच्यामध्ये तुमच्या नोकरीकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टीकोन अपोआप निर्माण होईल आणि तुम्हाला तुमच्या परिस्थितीचा स्वीकार करणे सोपे जाईल. 

नोकरीमध्ये तुम्हाला रिस्क नसते. तुम्हाला फक्त मन लाऊन काम करायचे असते ज्याबद्दल तुम्हाला मोबदला दिला जातो.

या सोप्या गोष्टीचा स्वीकार करून तुम्ही तुमच्या नोकरीकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलू शकता. 

२. कामाबद्दल विचार करण्याची पद्धत बदला

कामाचा कंटाळा, काम उरकून टाकण्याची सवय ही नोकरी आणि व्यवसाय दोन्ही साठी घातक असते.

तुमचे काम म्हणजे तुमच्या व्यक्तिमत्वाचा पैलू दाखवण्याची संधी असते.

कामाकडे काम म्हणून न बघता एक संधी म्हणून बघितले बघा. तुमच्या काम करण्याच्या पद्धतीमुळे तुमची ओळख होणार असते हे लक्षात घेतले पाहिजे.

तुमची कामाची पद्धत, कामाचा दर्जा, कामाच्या प्रती तुमची निष्ठा या सगळ्यामुळे बढती, कौतुक हे तर होतेच.

पण या सगळ्याच्या आधी आणि या सगळ्यापेक्षा महत्वाचे म्हणजे तुमच्या कामातून तुमच्या वक्तीमत्वाची ओळख होते.

तुम्हाला जर तुमच्या नोकरीच्या ठिकाणी खूप काम आहे असे वाटत असेल, कामाचे प्रेशर वाढले असेल किंवा तुम्हाला कामाचा कंटाळा आला असेल तर या पद्धतीने विचार केल्यास नक्की बदल होईल. 

तुमचे काम तुमच्या स्वभावाची ओळख करून देत असते.

ऑफिसचे प्रेशर घेऊन टार्गेट पूर्ण करणे, दिलेले काम पूर्ण करून घरी पळणे म्हणजे नोकरी नव्हे.

तर दिलेल्या कामातून समोरच्याला तुमच्या व्यक्तिमत्वाची ओळख पटवून देणे असा तुमचा दृष्टीकोन हवा.

यामुळे तुमची कार्यक्षमता वाढेलच. कामाबद्दलचा तुमचा दृष्टीकोन तुम्ही अशा पद्धतीने बदलण्याचा प्रयत्न केलात तर तुम्हाला कामाचे प्रेशर येणार नाही, उलट प्रत्येक टार्गेट म्हणजे तुम्हाला एक संधी वाटेल.

या संधीचे सोने करण्यासाठी तुम्ही मनापासून प्रयत्न कराल.

असे केल्याने टार्गेट हा कामाच्या संदर्भात वापरला जाणारा फक्त शब्द उरेल, प्रत्यक्षात मात्र या टार्गेटसाठी काम न करता तुम्ही स्वतःसाठी काम करायला शिकाल. 

३. काम हे तुमच्या वैयक्तिक विकासाचे माध्यम आहे 

ऑफिसमध्ये तुम्हाला दिली गेलेली जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडणे, तुम्हाला दिले गेलेले टार्गेट्स पूर्ण करणे, काम करून बढती मिळवणे व बढती मिळाल्यावर परत हेच सगळे करून अजून वरच्या बढतीसाठी प्रयत्न करणे. त्यासाठी प्रेशर घेणे, स्ट्रेस व टेन्शन वाढवून घेणे. आणि आयुष्यभर हे सगळे करून रिटायर होणे.

हे सगळे करणे म्हणजे नोकरी करणे असा सर्वसाधारणपणे समज झालेला असतो.

पण नोकरी फक्त इतक्या पुरतीच मर्यादित नसते. किंबहुना नोकरी या पेक्षा वेगळी असते. 

तुम्ही नोकरीच्या ठिकाणी काय साध्य करता आहात हे महत्वाचे आहेच पण त्याचबरोबर तुम्ही तुमच्या नोकरीमधून काय शिकता आहात हे देखील तितकेच महत्वाचे आहे.

तुमची नोकरी, काम, नोकरीच्या ठिकाणी भेटलेली माणसे, अनुभव हे तुम्हाला प्रगल्भ करत असतात.

तुमच्या व्यक्तिमत्व विकासासाठी हे महत्वाचे असते. पुढे जाऊन तुम्हाला अगदी तुमचा स्वतःचा व्यवसाय जरी सुरु करायचा असेल तरी तुम्ही नोकरीमध्ये गिरवलेले हे धडे, तुम्हाला आलेले अनुभव तुमच्या कामी येणार असतात.

यामुळे तुम्ही फक्त व्यावसायिकच नाही तर वैयक्तिक अनुभवांनी सुद्धा समृद्ध होत असता.

तुमच्या नोकरीमुळे  रोज नवनवीन आव्हाने तुमच्या समोर येत असतात. या आव्हानांचा योग्य प्रमाणात स्ट्रेस घेणे तुमच्या प्रोफेशनल आयुष्याच्या, प्रगतीच्या दृष्टीने गरजेचे आहेच.

पण याचबरोबर या आव्हानांमुळे जास्त प्रमाणात स्ट्रेस येऊ नये, कामाचे प्रेशर वाढू नये यासाठी त्यांच्याकडे एक अनुभव म्हणून बघता आले पाहिजे.

रोज कामावर जाताना जर तुम्ही या रोजच्या अनुभवांबद्दल आतुरता दाखवली तर तुमची या आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वाढेल.

या सगळ्यामुळे तुमचा व्यावसयिक विकास तर होईलच पण एक व्यक्ती म्हणून देखील तुम्ही प्रगल्भ व्हाल. हेच तुमचे ध्येय ठरवून तुम्ही काम केले पाहिजे. 

नोकरी, बिझिनेस या दोन्हीमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत तशा काही वाईट गोष्टी सुद्धा आहेत.

पण जर तुमच्याकडे इतर काहीच पर्याय नसेल तर योग्य पद्धतीने विचार करून, तुमचा दृष्टीकोन बदलून तुम्ही आहे त्या परिस्थितीचा स्वीकार केलात तर तुम्हाला स्ट्रेस, टेन्शन, प्रेशर याचा विचार न करता काम करणे सोयीस्कर वाटू लागेल. 

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Rohi says:

    Khup Chan

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!