आपले घर चोरांपासून सुरक्षित कसे ठेवाल? जाणून घ्या या लेखात

आपले घर चोरांपासून सुरक्षित कसे ठेवाल

आपण आणि आपले कुटुंबीय जिथे आनंदाने आणि आरामात राहतो ते म्हणजे आपले घर.

प्रत्येक व्यक्तीला आपले घर अतिशय प्रिय असते.

घरात आपल्याला जो आराम, कम्फर्ट मिळतो तो इतरत्र कुठेही मिळत नाही.

म्हणून तर कुठेही बाहेर गेलो तरी २, ४ दिवसात आपल्याला आपल्या घराची ओढ लागतेच.

आपले घर आपल्याला ऊन, पाऊस, वारा ह्यापासून सुरक्षित ठेवतेच, पण आणखी एका बाबतीत आपण खबरदारी घेतली पाहिजे आणि ती म्हणजे चोरांपासून आपले घर सुरक्षित ठेवणे.

आपल्याला व आपल्या कुटुंबाला एक सुरक्षित घर मिळावे हे प्रत्येकालाच वाटते.

चला तर मग आज पाहूया आपले घर सुरक्षित कसे ठेवता येईल

१. अनेक पदरी सुरक्षा

आपल्या घराची सुरक्षा ही अनेक पदरी असावी.

उदाहरण द्यायचं झालं तर ही सुरक्षा कांदयाप्रमाणे असावी, अनेक पदर असलेली.

म्हणजेच काय तर घराच्या मुख्य दरवाज्याला केवळ एकच कुलूप असू नये, त्यामुळे चोराला ते सहजपणे तोडून आत प्रवेश मिळवता येईल.

त्याऐवजी मुख्य दरवाज्याला कडी कोयंडा असावा, त्याला भक्कम कुलूप असावेच आणि शिवाय दरवाज्याला अंगचे कुलूप (लॅच) असावे.

तसेच मुख्य दरवाज्याच्या बाहेर अजून एक दरवाजा असावा (सेफ्टी डोर) आणि त्याला देखील अंगचे व कडी कोयंडयाचे कुलूप असावे.

इतके पदर किंवा अडथळे असणारी सुरक्षा व्यवस्था असली की चोराला ती तोडून प्रवेश करणे अवघड जाईल, त्याला वेळ लागेल आणि तेवढ्या वेळात तुम्ही किंवा तुमचे शेजारी सावध होऊ शकाल.

२. घरातील इतर दरवाजे

मुख्य दरवाज्याची सुरक्षा तर आपण पाहिली पण बरेचदा घराच्या इतर दरवाज्यांच्या सुरक्षेकडे आपले दुर्लक्ष होते.

विशेषतः जर बैठे घर असेल तर मागच्या अंगणातला दरवाजा देखील तितकाच सुरक्षित हवा.

तसेच घरातील इतर खोल्यांचे दरवाजे देखील भक्कम कुलूपाने बंद करण्याची सोय हवी.

म्हणजे चोर आत शिरलाच तरी त्याला पुढे काही हालचाल करणे शक्य होणार नाही.

३. खिडक्या

घरात प्रवेश करण्याचा आणखी एक मार्ग असतो तो म्हणजे खिडक्या.

विशेषतः जर घर तळमजल्यावर असेल किंवा बैठे घर असेल तर, अशा वेळी खिडक्यांची सुरक्षा देखील महत्वाची ठरते.

आपल्या घराच्या खिडक्या आतून घट्ट बंद करून घेता येतील, सहजपणे उघडता येणार नाहीत अशी सोय करून घ्या.

तसेच खिडक्यांना बाहेरून मजबूत लोखंडी जाळी (ग्रिल) बसवून घ्या म्हणजे कोणालाही तेथून आत प्रवेश करता येणार नाही.

४. चोर कुठून आत येऊ शकेल ह्याचा विचार करा 

आपल्या घराची बाहेरून पाहणी करा.

चोर नक्की कुठून आत प्रवेश करू शकेल त्या शक्यता पडताळून पहा.

मग त्या जागांची सुरक्षा व्यवस्था चोख करा.

घराच्या आतील भागातील मौल्यवान वस्तु, इलेक्ट्रोनिक वस्तु बाहेरून दिसणार नाहीत ह्याची खबरदारी घ्या.

५. घरात तिजोरी बसवा 

आपल्या घरात मौल्यवान असे फक्त दागदागिने किंवा रोकड च नव्हे तर महत्वाची कागदपत्रे देखील असतात.

अशा वेळी ह्या सर्व मौल्यवान वस्तु सुरक्षित ठेवण्यासाठी घरात एक भक्कम अशी तिजोरी बसवून घ्या.

हल्ली अत्याधुनिक प्रकारच्या इलेक्ट्रोनिक लॉक असणाऱ्या अनेक तिजोऱ्या मिळतात.

त्यापैकी एकाची निवड आपल्या घराच्या सुरक्षेकरीता करा.

आणि तिजोरीच्या किल्ल्या सुरक्षित गोपनीय जागी ठेवायला विसरू नका.

६. सुरक्षा रक्षक 

इतके सगळे करूनही जर तुम्हाला तुमचे घर सुरक्षित वाटत नसेल तर घराच्या बाहेर पहारा देण्याकरता सुरक्षा रक्षकाची नेमणूक करा.

शिवाय जर तुम्ही सोसायटीतील इमारतीमध्ये रहात असाल तर सोसायटीच्या प्रत्येक गेटवर सुरक्षा रक्षकाची नेमणूक करा.

येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक बाहेरील व्यक्ति ची नोंद करा.

अर्थात सुरक्षा रक्षक हे विश्वासू असणे गरजेचे आहे.

तसेच हल्ली सगळीकडे cctv कॅमेरे बसवण्याची सोय झाली आहे, त्यामुळे देखील आपल्या परिसराच्या सुरक्षेत वाढ करता येते.

७. कुत्रा पाळा

डॅाबरमन किंवा जर्मन शेफर्ड ह्या प्रजातीचे कुत्रे हे घराच्या सुरक्षेसाठी उत्तम मानले जातात.

त्यामुळे तुम्ही एक कुत्रा पाळण्याचा विचार नक्की करू शकता.

पाळीव प्राणी घरात असणे हे आनंददायक तर आहेच पण शिवाय आपल्या घराच्या सुरक्षेसाठी उपयोगी पण आहे.

८. गोपनीयता

आपल्या घरात असण्या नसण्याबाबत गोपनीयता पाळा.

अनेक वेळा लोकांना बाहेरगावी किंवा ट्रीप ला जात असताना त्याची माहिती सोशल मिडियावर देण्याची सवय असते.

परंतु ह्यामुळे आपण आपल्या घरात केव्हा असणार नाही ह्याची माहिती चोरांना सहज मिळते. त्यामुळे आपल्या सहली किंवा कामानिमित्त केले जाणारे प्रवास ह्याबद्दल फक्त जवळचे काही लोक सोडून इतर कोणालाही माहिती देणे टाळा.

तसेच सोशल मिडियावर देखील माहिती देणे टाळा.

तर अशा प्रकारे आपण आपले घर चोरांपासून सुरक्षित ठेवू शकतो.

लेखात दिलेल्या सर्व मार्गांचा अवलंब करा आणि आपले घर सुरक्षित ठेवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!