ती एकटी राहाते…

ती एकटी राहाते...

‘अगं तिकडे जाऊ नकोस हं… भोकडी असते तिकडे घेऊन जाईल तुला….’ लहानपणी या वाक्याची इतकी भीती असायची कि तिकडे चुकून सुद्धा पाऊल वळायचं नाही. अगदी तोंडून नाव देखील यायचे नाही. मग कधीतरी आईच सांगायची अगं असं काही नसतं तू लहानपणी एकटी कुठे जाऊ नये म्हणून असं सांगायचे!! एकटी असताना उगाच काही झाले तर?

त्यांनतर काही वर्षांनी, ‘पण कोण कोण चाललंय?? मैत्रिणी नाहीत का बरोबर?’ थांब मी तिकडेच चाललोय सोडतो तुला!!’ अशा प्रकारची असंख्य वाक्य वेळोवेळी ऐकायला मिळतात. गंमत आहे, आपल्याला पण हळूहळू या सोबतीची इतकी सवय होऊन जाते कि आपणही म्हणतो… आज माझ्या बरोबर कोणी नाही, मी नाही येत..

मग हो सोबत हवीहवीशी वाटायला लागते वयाच्या एका टप्प्यावर. एकदा का ती सापडली कि जन्माची सोबत गवसल्याचा आनन्द घरादारासकट आपल्याला पण होतो. हा इथपर्यंचा प्रवास सगळ्यांचा सारखाच होतो…. म्हणजे कुठलाही जेंडर असो डिफरन्स नाही….

मला नाही लग्न करायचं मला करियर करायचे आहे!! किंवा मला ना एकटंच राहायचं आहे! हि वाक्य आई वडिलांचे घर सोडून जाण्या आधी बऱ्याच जणी बोलतात आणि आई वडील देखील त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात… नन्तर मुलींसाठी सुयोग्य वर शोधून तिला अगदी साता जन्माची सोबत शोधून दिला जाते. पण हाय रे नशीब!! काही वेळेला हि सोबत अर्ध्यावर सुटते… तर काही वेळेला सोडली जाते. आपल्याकडे हे सगळे नशिबाचे भोग असतात आणि ‘प्रत्येकाला’ नाही तर ‘प्रत्येकीला’ ते भोगावेच लागतात. अश्या वेळी ‘आपल्या समाजाच्या दृष्टीने’ नशिबाचे भोग भोगणारी हि एकटी राहणारी स्त्री समाजातील सगळ्या स्त्रियांच्या, पुरुषांच्या दृष्टीने कुतूहलाचा विषय होते.

त्यातही नवऱ्याचे निधन झालेले असेल तर त्या स्त्रीच्या स्थितीबद्दल समाज नरमाईची भूमिका घेताना दिसतो. जोडीदार गेल्याने आलेला तिचा एकटेपणा समाज सन्मानाने स्वीकारतो. अशा परिस्थितीत तिने जर एकटेपणावर मात करत स्वतःचे स्थान निर्माण केले तर ती करुणेची आणि कौतुकाची पात्र नक्की ठरते.

परंतु आजही नवऱ्याने सोडलेली किंवा नवऱ्याला सोडलेली या दोन्ही स्त्रियांकडे वेगळ्या प्रकारे बघितले जाते. आधुनिकतेचा बुरखा पांघरलेले काहीजण आजही हे मान्य करत नाहीत. नवऱ्याशी पटत नसतांना त्याच्या बरोबर राहणारी स्त्री ग्रेट आणि याच कारणांनी त्याला सोडणारी कॅरॅक्टरलेस. हि समीकरणं तोंडावर नाही तर पाठीमागे मांडली जातात. जोडीदार व्यसनी असतांना तिला कोणताही सन्मान देत नसतांना त्याच्याबरोबर हाल सोसत राहायचे मगच समाज तिला चांगले म्हणेल, हि कुठली समाजव्यवस्था? सोडलेली म्हणजे काय? असा साधा विचार आपण करत नाही!! ती काही वस्तू नाही तर जिवंत हाडामांसाची व्यक्ती आहे. ते वेगळे झाले अशी सभ्य भाषा वापरायला आपल्याला जड जाते हे विशेष. काही निर्णय हे दोघांचे असतात हे मान्य करायला आपण सरळ सरळ नाकारतो. तेव्हा एखादा निर्णय ती स्वतः घेऊ शकते हे स्वीकारणं तर सोडाच. तरीही स्त्रिया एकट्या राहतात. त्यांना आपल्यापैकी कितीजण सन्मानाने वागवतात?

विभक्तीने एकटेपणा आलेल्या स्त्रिया वेगळ्या तर स्वतःहून जबाबदारीने एकटेपणा स्वीकारलेल्या वेगळ्या. त्यांनी आपापल्या क्षेत्रात गाठलेल्या उंचीबद्दल कॊतुक समाजात नसते. “संसार सांभाळून सारे काही केले हो…” या एका वाक्यातच आपल्याकडे धन्यता वाटते. संसार न करता कोणीपण करेल हो… त्यात काय विशेष?? स्वभाव नडला असेल जमवून घ्यायची वृत्ती असेल तर संसार करेल ना?

बरं तीने काही वर्षांच्या स्वकष्टाच्या जोरावर स्वतःचे अस्तित्व निर्माण केले तरी संधी मिळेल तेव्हा तिच्या जखमा ओरबाडायला सुशिक्षित आणि सज्जन म्हणवणारे सुद्धा मागे पुढे पाहत नाहीत. हो, सरसकट अशीच विचारसरणी नसते. तिच्या कर्तृत्वाचा सन्मान करणारे सुद्धा असतात पण ते विरळाच..

हेच एकटा पुरुष त्याच्या कामाप्रती किती समर्पित आहे असे उद्गार काढले जातात. ‘हि काय एकटीच आहे आमच्यासारखा थोडीच.’ सासर, मुलं, घरचं, दारच सगळं करावं लागतं आम्हाला असे म्हणून आम्हीच आमच्यातल्या तिला बाजूला काढत असतो.

एकटी राहणारी तीहि बरेचदा आपल्या आईवडिलांसाठी, हुंडा द्यायचा नाही म्हणून, लग्न करायला योग्य जोडीदारंच मिळाला नाही म्हणून, तर कधी आपल्या कामावरील निष्ठा म्हणून एकटी राहत असते. संसार केला नाही तर ती वेगळी आहे असे नाही! मुळात समाजातील कुठल्याही समाजघटकांच्या निर्णयात आपण का ढवळाढवळ करावी? तिचे म्हातारपणी कसे होईल अशा निरर्थक चर्चेपेक्षा असे विषय टाळून तिचे आताचे दिवस कसे चांगले जातील असा विचार करावा.

एकट्या राहणाऱ्या अनेक स्त्रिया स्वतःमधील संयम, बुद्धिमत्ता, सर्जनशीलता, मातृत्वभावना योग्य ठिकाणी वापरून अनेक क्षेत्रात भरीव योगदान देत आहेत. तेव्हा काय करणार एवढे पैसे कमवून? कोणाला देणार? त्यापेक्षा लग्न कर म्हणजे वारसदार तरी मिळेल! अरे ज्यांच्याकडे वारसदार आहेत अशे कित्येकजण आज एकटे आहेत मग त्यांनी काय करावे.

एकटी राहणारी प्रत्येक स्त्री नावाजलेलीच असते असे नाही. एखादी घरकाम करून पोट भरत असेल एखादी कामाच्या शोधात असेल. अशा स्त्रियांकडे सतत शंकेने बघून त्यांची अवहेलना करणं, त्यांची खिल्ली उडवणं हे आपण थांबवू शकलो तर आपण सम्पूर्ण स्त्रियांना समान वागणूक देतो असे म्हणू शकतो. मुख्य म्हणजे स्त्रियांना समान वागणूक नक्की कोणाकडून हवी आहे? खरंतर उत्तर आहे स्वतःकडून! तिने अगदी स्वतःपासून सगळ्या स्त्रियांना समान वागणूक द्यायला सुरुवात केली तरच समानता येईल. जिथे एक स्त्री दुसऱ्या स्त्रीला समान वागणूक देत नाही, हीन लेखते तुच्या एकट्या किंवा दुकट्या असण्यावरून तिचे चारित्र्य ठरविते तिथे स्वातंत्र्य मिळाले तरी नांदेल का? स्त्रीबरोबर तिचा नवरा असणं हेच तीच हाय्य्यर क्वालिफिकेशन हा भाबडा समज स्त्रिया स्वतः जेव्हा काढून टाकतील तेव्हाच त्या स्वतःला ओळखू शकतील.

आपल्या संस्कृतीत खरेतर एकटेपणाला किती महत्व आहे. अगदी संसार झाल्यावर वानप्रस्थाश्रम सुद्धा सांगितला आहे. अशा समृद्ध संस्कृतीत वाढलो असतांना, आपण का आजही चुकीच्या विचारात गुरफटलेली आहोत. एकटे राहून, मग ते एकटेपण कुठल्याही टप्प्यावर आलेले अथवा स्वतःहून स्वीकारलेले असो. त्यासाठी मोठे धैर्य, कष्ट, बळ लागते हे विसरून कसे चालेल? एखाद्या व्यक्तीवर आशा लावून जगणारे आपण आपल्या ध्येयासाठी जगणारीला कसे कमी लेखू शकतो?

पिकू मधील दीपिका बघून अभिमानाने उर भरून येणाऱ्या, मदर तेरेसा सारख्या व्यक्तीच्या कार्याने भारावलेल्या आपण पिकू जन्मावी ती दुसऱ्याच्या घरी असे तर मनोमन म्हणत नाही ना!? आपली जीवनमूल्ये आपण कशाच्या आधारावर ठरवत आहोत?… गेल्या काही दिवसांपूर्वीच आपण वुमन्स डे साजरा केला तर या वुमन्स डेला ड्रेस कोड फॉलो करून किंवा नवरात्रीच्या नऊ दिवसात नवरंगाच्या साड्या घालून अमुक एखादीबद्दल गॉसिप करणे हेच आपले का सेलिब्रेशन आहे?

मनाचेTalks च्या वाचकांचे अभिप्राय:

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!