ताप आला असताना काय काळजी घ्यावी, आहार कसा असावा? पूर्ण माहिती

ताप येण्याची कारणं ताप आला तर काय करावे ताप आला असताना काय काळजी घ्यावी आहार कसा असावा?

ऋतु बदलला की आपल्या शरीराला हवेशी जुळवून घ्यायला वेळ लागतोच. ही अगदी स्वाभाविक गोष्ट आहे.

तेवढा वेळ आपल्या शरीराला द्यावाच लागतो. अशा वेळी ताप येणं, सर्दी होणं, थकवा येणं, अशक्तपणा जाणवणं या गोष्टी होतच असतात.

अशा वेळी घाबरून न जाता केवळ डॉक्टरांनी दिलेल्या औषधांवर अवलंबून न राहता आपण काही घरगुती उपाय करून हे आजार पळवून लावू शकतो. त्यासाठी खात्रीचा इलाज म्हणजे योग्य आहार पद्धती.

सध्याच्या ऋतुमधे हवेतील उष्णता अचानक वाढू लागते. त्यामुळे शरीराचं तापमान वाढून ताप येणं हा सामान्य आजार होतोच.

इतरवेळी सुद्धा काही कारणांनी ताप येतो. मानवी शरीराचं साधारण तापमान ९८.६० फॅरनहाईट इतकं असतं. शरीराचं हे तापमान जेव्हा वाढतं तेव्हा त्याला ताप येणं असं म्हणतात.

काही घरगुती औषधं घेऊन ताप कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. पण तापाचा मुख्य इलाज योग्य आहारात आहे. आयुर्वेद शास्त्रानुसार ताप कमी होण्यासाठी औषधांबरोबरच योग्य आहार महत्वाचा आहे.

तर या लेखात जाणून घेऊ की तापाचे किती प्रकार आहेत आणि त्यानुसार आहारात कसे आणि काय बदल करावे…

ताप येणं म्हणजे काय…

हवेतील बदल, चुकीचं खाणं पिणं, अशा काही कारणांनी शरीरातील वात, पित्त, कफ यांच संतुलन बिघडून ते प्रकुपित होतात.

ते शरीरातील रसधातूत मिसळून शरीराचं सामान्य तापमान वाढवतात. यालाच ताप येणं असं म्हणतात. अशा तापावर नियंत्रण ठेवण्यासाठी योग्य आहार महत्वाचा असतो.

ताप येण्याची कारणं

हवेतील बदलाशी जुळवून घेताना ताप येणं ही सामान्य स्थिती आहे. त्यामुळे तापाला संक्रमणाचं लक्षण असही म्हणतात.

अशा संक्रमणाशी जुळवून घेताना शरीरातील रक्त पांढऱ्या रक्त पेशींचं प्रमाण वाढवतं. ज्यामुळे हवेतील बदलाशी जुळवून घेणं शक्य होतं.

अशा वेळी ताप येणं ही सामान्य स्थिती आहे. याशिवाय व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन यामुळेही ताप येऊ शकतो.

थोडक्यात शरीराबाहेरील कारणांमुळे ताप येण्याची शक्यता असते. याशिवायही ताप येण्याची पुढील काही कारणं आहेत…

 • विशिष्ट प्रकारची जखम होणं
 • कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणं
 • एखादी लस घेतल्यामुळे ताप येऊ शकतो
 • एखादा जुना आजार असल्यास ताप येऊ शकतो
 • एखाद्या औषधाचा दुष्परिणाम होणं
 • एखाद्या सौंदर्य प्रसाधनाच्या वापरामुळेही ताप येऊ शकतो
 • एखादी साथ सुरू असल्यास ताप येतो
 • ऋतु बदलला की ताप येतो
 • ट्युमर सारख्या आजारामुळे ताप येतो
तापाची लक्षणं 
 • ताप असताना आजारी माणसाचा श्वासोच्छ्वास वाढतो आणि तो गरम असतो
 • शरीर थकलेलं असतं
 • अंगदुखी सुरू असते
 • सर्दीपडसं, खोकला होऊ शकतो
 • पाय दुखायला लागतात
 • त्वचेवर लाल चट्टे येतात
 • घशात खवखव होऊन घसा दुखणं
 • डोकेदुखी सुरू होणं
 • डोळे लाल होणं
 • तोंड कडवट होणं
 • डोकं गरम होणं
 • तहान भूक न लागणं
ताप आलेला असताना काय खावं 

आयुर्वेद शास्त्रानुसार ताप आलेला असताना सात्विक आहार घ्यावा.

 • सकाळी नाश्त्याला ताज्या फळांचा रस किंवा हिरव्या पालेभाज्यांचं सूप प्यावं.
 • आहारात हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करावा
 • चहा कॉफी घेणं कमी करावं
 • उकडलेल्या भाज्या खाव्या
 • पौष्टिक सूप प्यावं
 • प्रथिनयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा
 • आहारात अंड्याचा समावेश जरूर करावा
 • डाळ तांदुळाची खिचडी, दलिया असा हलका आहार घ्यावा
 • ताप आलेला असताना शरीरातील पाणी कमी होतं. त्यामुळे शरीरात जीवाणूंचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी पुरेसं पाणी प्यावं.
 • शक्यतो द्रव पदार्थांचं सेवन करावं. चिकन सूप प्यायल्याने जीवाणूंची संख्या नियंत्रित करता येते
 • ताप आलेल्या व्यक्तिला नारळपाणी जरूर द्यावं
 • रात्रीच्या जेवणासाठी हलका आहार असावा. हिरव्या पालेभाज्यांचं सॅलड खावं, सूप प्यावं.
 • केळं आणि सफरचंदाचं सेवन करावं. यामधे पोटॅशियमचं प्रमाण जास्त असल्याने त्याचा शरीराला फायदा होतो.
ताप आलेला असताना काय खाऊ नये 

ताप आलेला असताना औषध सुरू असल्यास काही पदार्थ खाऊच नयेत.

१. आंबट पदार्थ टाळावेत 

ताप आलेला असताना आंबटगोड पदार्थ, भात, थंड पदार्थ खाऊ पिऊ नयेत. कारण अशा वेळी शरीराचं तापमान वाढलेलं असतं. त्याबरोबरच पचनशक्ती मंदावलेली असते. म्हणून भाताऐवजी पोळी किंवा भाकरी खावी.

२. मसालेदार पदार्थ टाळावेत 

ताप आलेला असताना चमचमीत, मसालेदार, तेलकट पदार्थ, फास्टफूड खाऊ नये. त्यामुळे पोट जास्त वेळ भरल्यासारखं वाटतं. पाणी पिण्याच प्रमाणही कमी होतं. त्यामुळे डिहायड्रेशन होऊ शकतं.

यासाठी उकडलेल्या भाज्या, हिरव्या पालेभाज्यांचं सूप हे पदार्थ घ्यावे. लहान मुलं, गर्भवती महिलांना ताप आला असल्यास त्यांनी लसूण खाणं टाळावं. तसेच ताप असताना दूध पिऊ नये.

ताप आलेला असताना हे घरगुती उपाय करावेत 

ताप आलेला असताना आयुर्वेदिक औषध सुरू असल्यास लंघन करणे हा उत्तम उपाय आहे. ताप उतरायला लागल्यावर योग्य आहार घेण्यास सुरुवात करावी. याशिवाय तापासाठी काही घरगुती उपायही करता येतात.

१. दालचिनीचं सेवन करावं : दालचिनीच्या काढ्यात काळी मिरी आणि मध घालून त्याचं सेवन करावं.

२. आल्याचं सेवन करावं : एक कप पाण्यात २०-२५ तुळशीची पानं आणि एक चमचा आलं घालून ते पाणी निम्मं होईपर्यंत उकळावं. मग त्यात थोडा मध घालावा. असा काढा दिवसातून दोन ते तीन वेळा घ्यावा. असं सलग तीन दिवस करावं. आल्यामुळे तापाचं प्रमाण कमी व्हायला मदत होते.

३. किशमिश : किशमिश खाल्ल्याने ताप असताना प्रतिकार शक्ती टिकवायला मदत होते.

४. पुदिन्याचं सेवन करावं : एक कप गरम पाण्यात पुदिन्याची चिरलेली पानं एक चमचा घालावी. ५-७ मिनीटं हे पाणी उकळून गाळून घ्यावं. त्यात थोडासा मध मिसळावा.

५. हळदीचं सेवन करावं : तापाच्या उतारासाठी हळद गुणकारी आहे. एक कप गरम दुधात अर्धा चमचा हळद आणि पाव चमचा काळी मिरी घालावी. असं दूध दिवसातून दोन वेळा घ्यावं.

६. मोहरीचं सेवन करावं : दोन चमचे मोहरीचं तेल गरम करून त्यात दोन चार लसूण पाकळ्या घालाव्या. तेल व्यवस्थित गरम झाल्यावर ते अंगावर, विशेषतः हातापायांच्या तळव्यांवर चोळावं. त्यामुळे अंगदुखी कमी होऊन तापही कमी होतो.

७. लसणाचं सेवन करावं : लसणामुळे ताप कमी व्हायला मदत होते. एक कप गरम पाण्यात एक लसूण पाकळी बारीक चिरून घालावी. हे पाणी दहा मिनीटं गरम करून गाळून प्यावं.

ताप असताना जीवनशैली कशी असावी

चुकीची आहारपद्धती आणि जीवनशैली यामुळेही ताप येऊ शकतो. या मूळ कारणातच बदल केले तर ताप कमी होऊ शकतो.

 • दररोज कमीतकमी सात ते आठ ग्लास पाणी प्यावं.
 • आहारात भाज्यांच सूप जरूर असावं.
 • कोमट पाण्याने आंघोळ करावी.
 • आहारात लसणाचा वापर जरूर करावा.
लक्षात ठेवण्याजोग्या गोष्टी 
 • हिवाळ्यात ताप आला असल्यास थंडीपासून बचाव करावा.
 • उबदार कपडे वापरावे.
 • डासांपासून वाचण्यासाठी अंगभर कपडे वापरावे.
 • एक स्वच्छ कापड थंड पाण्यात भिजवून, नीट पिळून ते ताप आलेल्या व्यक्तीच्या कपाळावर मानेवर ठेवावे.
 • व्हायरल इन्फेक्शन असल्यास गाजराचा आहारात समावेश करावा. त्यामुळे प्रतिकार शक्ती चांगली वाढते.
डॉक्टरांकडे जाण्याची वेळ कधी येते

ताप येणं हा सामान्य आजार आहे. पण तापाचे बरेच प्रकारही असतात. वर दिलेल्या लक्षणांव्यतिरीक्त काही त्रास होत असेल तर डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे.

 • ताप १०३ फॅरनहाईटपेक्षा जास्त असल्यास.
 • खूप डोकं दुखत असल्यास.
 • ताप एक आठवड्यांपेक्षा जास्त दिवस असल्यास
 • त्वचेवर लाल चट्टे येत असल्यास.
 • छातीत दुखत असल्यास.
 • मान आणि पोट दुखत असल्यास.
 • वारंवार उलटी होत असल्यास.
 • घसा दुखून गिळायला त्रास होत असल्यास.
 • कॅन्सर, एच आय व्ही यासारखे गंभीर आजार असताना ताप आल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे.

त्यामुळे ताप आला आहे म्हटल्यावर घाबरून न जाता पुरेशी काळजी घेऊन आपण आपल्याला तंदुरुस्त ठेवू शकतो.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!