बहुगुणी लिंबाचे फायदे… बघा काय आहेत…

health benefits of lemon marathi लिंबाचे फायदे

उन्हाळा सुरू झाला आहे. अशावेळी तब्येत टिकवून ठेवण्यासाठी नाना प्रकारची खाद्यपेयं घराघरात साठवलेली दिसतात.

उन्हाळा बाधू नये म्हणून आलेल्या पाहुण्यांना सरबत देणं हा शिष्टाचारच असतो. या सगळ्यात लिंबू किंवा लिंबाचा वापर केलेले पदार्थ अग्रक्रमाने असतात.

फक्त उन्हाळाच काय इतर वेळी सुद्धा बहुगुणी लिंबू कोणत्याही आजारावर किंवा तब्येत ठणठणीत ठेवण्यासाठी उपयुक्त आहे.

जेवणाचं ताट वाढतानासुद्धा ताटात वरच्या बाजूला मीठ आणि लिंबाची जागा असते. म्हणजे रोजच्या आहारातसुद्धा लिंबाचं महत्त्व किती आहे ते यावरूनच कळेल.

या लेखात आपण जाणून घेऊ की लिंबाचे आपल्याला किती आणि कसे फायदे आहेत..

लिंबाचं सरबत तर सगळ्यांनाच माहीत असतं. लिंबाचं लोणचं सगळ्यांना हवं असतं. पण लिंबापासून इतरही अनेक पदार्थ बनवता येतात.

एखाद्या पदार्थात लिंबाचा रस घातला तर त्या पदार्थाची चव तर वाढतेच आणि आरोग्याच्या दृष्टीने फायदेही मिळतात.

इतर फळं पिकल्यावर गोड होतात. पण लिंबाची चव मात्र पिकल्यावरही आंबटच राहते. हेच तर खरं गुपीत आहे लिंबाचं.

लिंबात ‘क’ जीवनसत्त्व मुबलक प्रमाणात असतं. त्यामुळे लिंबाचा औषधासारखा वापर केल्यास अनेक आजारांवर नियंत्रण ठेवता येतं.

त्यामुळे आयुर्वेद शास्त्रात लिंबाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पोटातील जंत कमी करण्यासाठी, पोटदुखी कमी करण्यासाठी, भूक वाढवण्यासाठी, कफ आणि पित्तामुळे होणारे आजार कमी करण्यासाठी लिंबाचा जरूर वापर करावा.

लिंबू म्हणजे काय??

लिंबाच्या वेगवेगळ्या जाती आहेत. कागदी लिंबू, ईडलिंबू, जवारी लिंबू. औषधी गुणांसाठी कागदी लिंबाचा वापर करावा.

हे थोडसं छोटं किंवा मध्यम आकाराचं असतं. लिंबाचं झाड साधारणपणे काटेरी आणि झुडुपासारखं असतं. त्याची फुलं लहानसर, पांढरी किंवा गुलाबी रंगाची असतात. त्यांना विशिष्ट प्रकारचा वास असतो.

लिंबाचं फळ कच्चं असताना हिरवं आणि पिकल्यावर पिवळं होतं.

लिंबाचे फायदे 

आयुर्वेदानुसार लिंबाला औषध म्हणून खूप महत्त्व आहे. कोणत्याही आजारावर, व्याधीवर लिंबाचा औषध म्हणून चांगला उपयोग होतो.

१. रक्तस्त्राव होत असल्यास लिंबाचा उपयोग 

एक कप कोमट दुधात अर्ध्या लिंबाचा रस घालावा. दूध फाटण्यापूर्वी ताबडतोब ते प्यावं. यामुळे रक्तस्त्राव लगेच थांबतो. हा प्रयोग एक किंवा दोन वेळा करावा. त्यापेक्षा जास्त करू नये.

२. खूप तहान लागत असल्यास लिंबाचे फायदे 

खूप तहान लागत असल्यास लिंबाचं सरबत आवर्जून प्यावं. त्यामुळे तहान शमते.

३. तोंड आल्यास लिंबाचे फायदे 

जीभ किंवा हिरडीच्या भागात तोंड आल्यास त्यावर लिंबाची साल चोळावी. त्याचा नक्कीच फायदा होतो.

४. चेहऱ्यावर मुरूमं, सुरकुत्या असल्यास लिंबाचा उपयोग 

लिंबाच्या रसात मध मिसळून तो चेहऱ्यावर लावावा. त्यामुळे मुरुमं, सुरकुत्या कमी होतात.

५. केसात कोंडा झाल्यामुळे केस गळत असतील तर लिंबाचा उपयोग 

लिंबाच्या रसात आवळा किसून घालावा. ते मिश्रण केसांना लावावं. त्यामुळे केसातील कोंडा कमी होऊन केस गळण्याचं प्रमाण कमी होतं.

६. त्वचारोग असेल तर लिंबाचा उपयोग 

 • त्वचेवर काळे डाग येणं, खाज येणं अशा वेळी त्या भागात लिंबू चोळावे. रोजच्या आहारात लिंबाचा रस वापरल्यास त्वचा विकार कमी होतात.
 • त्वचा खाजत असल्यास लिंबाच्या रसात करवंद वाटून घालावे. त्याचा लेप खाज येत असलेल्या भागात लावावा. त्यामुळे खाज लवकर कमी होते.
 • एक ग्लास उकळलेल्या दुधात लिंबाचा रस आणि ग्लिसरीन घालावे. अर्ध्या तासाने त्वचा कोरडी होणं किंवा इतर त्वचेचे आजार असलेल्या भागात ते मिश्रण लावल्यामुळे लवकर उपयोग होतो.

७. स्थूलपणा कमी करण्यासाठी लिंबाचा उपयोग 

सकाळी अनुषापोटी एक कप कोमट पाण्यात दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालून प्यावं. त्यामुळे नक्कीच शरीरातील चरबी कमी होऊन स्थूलपणा कमी होतो.

८. डोळे दुखत असल्यास लिंबाचा उपयोग 

लोखंडी भांड्यात लिंबाचा रस घोटून घ्यायचा. त्याचा पातळ लेप डोळ्यांभोवती लावायचा. त्यामुळे डोळेदुखी कमी होते.

९. टायफॉइड झाला असल्यास लिंबाच्या रसाचा उपयोग 

लिंबाचे दोन भाग करायचे. एका भागात काळी मिरी पावडर आणि सैंधव मीठ लावायचं आणि दुसऱ्या भागाला मिश्री लावायची. लिंबाचे दोन्ही भाग गरम करून शोषायचे. त्यामुळे टायफॉइड कमी व्हायला नक्की मदत होते.

१०. मानसिक स्वास्थ्य राखण्यासाठी लिंबाचा उपयोग 

ताणतणाव असल्यास मानसिक शांतता मिळण्यासाठी लिंबाचा रस कपाळावर लावावा. त्यामुळे नक्कीच फायदा होतो.

११. पित्त होत असल्यास लिंबाचा उपयोग 

एक चमचा लिंबाच्या रसात मध आणि मीठ घालून त्याचं सेवन करावं. त्यामुळे पित्त कमी होतं. खूप तहान लागत असल्यास याचा नक्कीच उपयोग होतो.

१२. भूक वाढवण्यासाठी लिंबाचा उपयोग 

 • ३ मिली लिंबाचा रस, १० मिली चुन्याचं पाणी आणि मध एकत्र करावं. याचे २०-२० थेंब रोज घेतल्याने भूक वाढायला मदत होते.
 • रोजच्या आहारात लिंबाचा रस वापरल्यास योग्य प्रमाणात भूक लागते.
 • लिंबाच्या सरबतात नेहमीपेक्षा दुप्पट पाणी घालून दोन लवंगा आणि काळी मिरी घालून प्यायल्याने भूक वाढायला मदत होते.
 • भूक चांगली लागत नसल्यास चिरलेल्या लिंबाला काळं मीठ लावून ते चाटावं. भूक वाढायला मदत होते.
 • एका लिंबाच्या रसात किसलेलं आलं आणि मीठ घालून खाल्ल्यास भूक वाढायला मदत होते.

१३. पोट दुखत असल्यास लिंबाचा उपयोग 

 • १-२ ग्रॅम कच्च्या लिंबाच्या साली किसून खाल्ल्याने पोटदुखी कमी होते.
 • ३ मिली लिंबाचा रस, १० मिली चुन्याचं पाणी आणि मध एकत्र करून २०-२० थेंब घेतल्यास पोटदुखी कमी होते.

१४. उलटी होत असल्यास लिंबाचा उपयोग 

जेवणानंतर उलटी होत असल्यास ५-१० मिली लिंबाचा रस घ्यावा.

१५. पोटात जंत झाले असल्यास लिंबाचा उपयोग 

 • रोजच्या आहारात लिंबू वापरल्यास पोटातील जंत कमी होतात.
 • लिंबाच्या पानांचा रस काढून त्यात मध घालून त्याचं सेवन केल्याने पोटातील जंत कमी होतात.

१६. जुलाब होत असल्यास लिंबाचा उपयोग 

जुलाब होत असल्यास कागदी लिंबाचा ३० मिली रस दिवसातून २-३ वेळा घ्यावा. त्यामुळे जुलाब होणं कमी होतं.

१७. कॉलरा झाल्यास लिंबाचे फायदे 

कॉलरा झाला असल्यास दोन लिंबांच्या रसात मिश्री घालून त्याचं सेवन करावं.

१८. काविळीवर लिंबाचा उपयोग 

कावीळ झाली असल्यास डोळ्यांभोवती लिंबाचा रस लावावा.

१९. आतड्याचे विकार असल्यास लिंबाचा उपयोग 

५ मिली लिंबाच्या रसात मध आणि मीठ घालून त्याचं सेवन केल्याने आतड्याचे विकार दूर करण्यासाठी मदत होते.

२०. मूत्ररोग असल्यास लिंबाचा उपयोग 

 • उकळलेल्या पाण्यात लिंबाचा रस घालून प्यायल्याने मूत्राशयाची सूज किंवा जळजळ कमी होते.
 • मूत्राचं प्रमाण कमी झालं असल्यास लिंबाच्या रसात गाजराचा रस मिसळून घ्यावा. त्यामुळे किडनीचे विकारही कमी होतात.

२१. यकृतासंबंधी आजार असल्यास लिंबाचा उपयोग 

 • यकृतासंबंधी आजार असल्यास कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मिश्री घालून प्यावं.
 • ५-१० मिली लिंबाच्या रसात ५०० मिग्रॅ भाजलेला ओवा आणि चवीप्रमाणे सैंधव मीठ घालावं. याचं सेवन केल्याने यकृताचे आजार कमी होतात.

२२. प्लीहा रोग असल्यास लिंबाचा उपयोग 

 • लिंबाचं लोणचं खाल्ल्याने प्लीहा रोग बरा होतो.
 • तसेच ५-१० मिली लिंबाच्या रसात ५०० मिग्रॅ भाजलेला ओवा आणि चवीप्रमाणे सैंधव मीठ घालून त्याचं सेवन केल्याने प्लीहा रोग बरा होतो.

२३. डिप्रेशन आल्यास लिंबाचा उपयोग 

शरीरातील वाताचं प्रमाण बिघडल्यास डिप्रेशन येण्याची शक्यता असते. रोजच्या आहारात लिंबाचा उपयोग केल्यास शरीरातील वातावर नियंत्रण येऊन डिप्रेशनची समस्या कमी होते.

२४. मुतखड्याचा त्रास असल्यास लिंबाचा उपयोग 

रोजच्या आहारात लिंबाचा वापर केल्याने मुतखडा तयार होण्याची प्रक्रिया कमी होते.

२५. हृदयासाठी लिंबू फायदेशीर 

लिंबामध्ये क जीवनसत्त्व आणि अँटिऑक्सिडण्ट्स असल्याने हृदयाचे कार्य सुरळीत ठेवण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

२६. पंडुरोग असल्यास लिंबाचा उपयोग 

लिंबामध्ये ‘क’ जीवनसत्त्व असल्याने रक्तात लोहाचं प्रमाण शोषून घेण्यासाठी याची मदत होते. म्हणून पंडुरोग असल्यास लिंबाचा आहारात समावेश करावा.

२७. रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी लिंबाचा फायदा 

लिंबातील क जीवनसत्त्व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त आहे.

२८. प्रदूषणापासून वाचण्यासाठी लिंबाचा उपयोग 

कोणत्याही प्रदूषणामुळे होणारे विकार टाळायचे असतील तर आहारात लिंबाचा उपयोग हवाच.

२९. संधिवात असल्यास लिंबाचा फायदा 

 • १-२ मिली लिंबाचा रस दर चार तासांनी घेतल्यास संधिवाताचा त्रास कमी होतो.
 • संधिवाताचा त्रास होत असेल तर एका लिंबाच्या रसात आलं आणि काळ मीठ मिसळून घेतल्यास त्याचा नक्कीच फायदा होतो.

३०. किडा चावला असेल तर लिंबाचा उपयोग 

विषारी किडा किंवा डास चावला असेल तर त्या जागी लिंबाचा रस लावावा.

३१. विंचू चावला असल्यास लिंबाचा उपयोग 

९ ग्रॅम लिंबाच्या बियांची पावडर आणि ८ ग्रॅम सैंधव मीठ एकत्र करून घेतल्याने विंचवाच्या दंशाचा दाह कमी होतो.

लिंबाच्या झाडाची पानं, फळं आणि फळातील बिया अत्यंत औषधी असतात. विविध आजारांवर लिंबू कितीही उपयुक्त असलं तरी स्वतःच्या तब्येतीचा विचार करून डॉक्टरांच्या सल्ल्याने याचा उपयोग करावा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.