गृहकर्ज फेडले नाही तर, काय आणि कशी कारवाई होते? वाचा या लेखात

गृहकर्ज फेडले नाही तर काय आणि कशी कारवाई होते

आपले स्वतःचे घर असावे हे जवळजवळ प्रत्येकाचे स्वप्न असते.

नोकरी मिळाली की प्रत्येकजण घर घेण्याचे स्वप्न पाहू लागतो.

परंतु भारतात, महानगरात घरांच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत.

अगदी लहानसे घर घ्यायचे म्हटले तरी मध्यमवर्गीय लोकांच्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे.

अशा वेळी मदतीला येते ते विविध बँका देत असलेले गृहकर्ज.

हे गृहकर्ज आपली घर घेण्यासाठीची आर्थिक गरज भागवते.

पण अर्थातच त्या कर्जाची परतफेड करण्याची जबाबदारी ही आपली असते.

ह्यासाठी बँक दर महिन्याला काही ठराविक रकमेचा हप्ता निश्चित करून देते. त्यास ईएमआय असे म्हटले जाते.

दर महिन्याला नियमितपणे ईएमआय बँकेत भरून आपण दिलेल्या मुदतीत गृहकर्ज फेडणे अपेक्षित असते.

आपल्या स्वप्नातील घर जेव्हा गृहकर्जाच्या मदतीने खरेदी करणे शक्य होते तेव्हा आपला उत्साह द्विगुणित होतो, कारण घराचे मालक झाल्याचा आनंद तर असतोच शिवाय भविष्य आश्वासक झाल्याची भावना निर्माण होते.

जोवर नियमित ईएमआय भरला जातो तोवर सर्व छान असते परंतु नोकरी गमावल्यामुळे, अपघात झाल्यामुळे, व्यवसायातील नुकसानामुळे किंवा शारीरिक आजारामुळे अनेक लोकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आणि अशा परिस्थितीत कित्येक महिने गृहकर्जाचा ईएमआय भरणे शक्य होत नाही आणि परिणामतः गृहकर्जाची परतफेड करणे अशक्य होऊन बसते.

अशा वेळी काय घडते? बँक आपली मालमत्ता म्हणजेच आपले घर जप्त करू शकते का?

किती ईएमआय भरायचे राहिले की बँक आपल्या घराचा ताबा घेऊन आपल्याला घराबाहेर काढू शकते?

एक ग्राहक म्हणून आपले काय अधिकार आहेत आणि मुदतपूर्व कर्ज फेडायचे असल्यास ते कसे फेडता येते?

अशा सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या ह्या लेखात सविस्तरपणे जाणून घेऊया..

१. जर सलग ३ महीने आपण ईएमआय भरू शकलो नाही तर,

जर आपण १-२ महिन्यांचे ईएमआय भरले नाहीत तर बँक आपल्याला स्मरणपत्र पाठवते आणि न भरलेले ईएमआय पुढील महिन्यात भरण्याची नोटिस देते.

पण सलग ३ महिने आपण ईएमआय भरला नाहीत तर मग मात्र ही मोठी समस्या होऊन बसते.

बँकेच्या दृष्टीने आपले गृहकर्ज खाते हे परतफेड न करणारे (डिफॉल्टर) खाते बनते आणि ते आपल्या गृहकर्ज खात्याला लाल शाईने मार्क करतात.

आता बँक आपल्याला त्वरित ईएमआय भरण्याची नोटिस पाठवते.

ह्या नोटीशीकडे दुर्लक्ष करण्याची चूक करू नका.

ईएमआय भरणे शक्य असेल तर तो ताबडतोब भरा आणि शक्य नसेल तर तसे सांगणारे आणि तुमची आर्थिक परिस्थिति आणि अडचण सांगणारे पत्र ताबडतोब बँकेला पाठवा.

जर तुम्ही ह्याआधी नियमित ईएमआय भरत असाल आणि तुमचे ईएमआय भरू न शकण्याचे कारण खरे आणि योग्य असेल तर बँक तुम्हाला ईएमआय भरण्याची मुदत वाढवून देखील देऊ शकेल.

२. फायनल ६० दिवसांची मुदत नोटिस 

जर बँकेच्या असं लक्षात आलं की तुम्ही ईएमआय भरूच शकत नाही तर मग बँक तुम्हाला ईएमआय भरण्यासाठी ६० दिवसांच्या मुदतीची फायनल नोटिस पाठवते.

ही नोटिस अशा कायद्याअंतर्गत येते की ज्यायोगे बँक तुमच्या घराचा लिलाव करू शकते.

बँकेने दिलेल्या ६० दिवसांच्या मुदतीत जर तुम्ही ईएमआय भरला नाही तर ती मुदत संपल्यानंतर तुम्ही बँकेचे कर्ज बुडवले आहे असे गृहीत धरून बँक तुमची मालमत्ता म्हणजेच तुमचे घर लिलाव करून विकू शकते आणि त्यातून कर्जाची रक्कम वसूल करू शकते.

तसे अधिकार बँकेला असतात. ह्या ६० दिवसांच्या मुदतीत तुम्ही बँक अधिकाऱ्याना तुमची अडचण समजावून सांगून काही मुदत वाढवून घेण्याचा प्रयत्न करू शकता.

तसेच काही वेळा बँकेचे वसूली करणारे लोक तुमच्या घरी येऊन पैसे वसूल करू शकतात.

परंतु त्यांना पैसे देण्यापूर्वी ते परवानाधारक वसूली अधिकारी आहेत ह्याची खात्री करून घेणे आवश्यक आहे.

कारण अशा पद्धतीने खोटे वसूली अधिकारी बनून लोकांना लुबाडण्याच्या घटनाही घडत असतात.

३. ३० दिवसांची पेपर मधील लिलावाची नोटिस

बँकेने दिलेल्या ६० दिवसांच्या फायनल मुदतीत जर तुम्ही काहीच ईएमआय भरू शकला नाहीत तर मग ही पुढची स्टेप बँक घेते.

बँक सर्वप्रथम तज्ञांच्या मदतीने तुमच्या घराचे चालू बाजारभावाप्रमाणे मूल्यमापन करते.

त्यानंतर घराचा लिलाव करण्याच्या दृष्टीने वर्तमानपत्रात जाहिरात दिली जाते.

ह्या जाहिरातीत घराची किंमत, घराचे वर्णन, पत्ता आणि लिलाव करण्याची तारीख आणि वेळ दिलेली असते.

जर तुम्हाला बँकेनी ठरवलेली तुमच्या घराची किंमत कमी अथवा अयोग्य वाटली तर तुम्ही त्यावर हरकत घेऊन बँकेला तसे कळवू शकता.

४. घराचा लिलाव आणि अतिरिक्त रकमेचा परतावा

ह्या प्रोसेस मधील शेवटची स्टेप म्हणजे घराचा प्रत्यक्ष लिलाव.

बँक घराचा लिलाव करते आणि मिळणाऱ्या रकमेतून तुमच्या नावावर असलेल्या कर्जाची वसूली करते.

इथे एक अत्यंत महत्वाची गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बँक घराच्या एकूण किमतीपैकी तेवढीच रक्कम ताब्यात घेऊ शकते जेवढे तुमच्या नावे थकीत कर्ज असते.

घराची किंमत त्यापेक्षा जास्त असेल तर बँकेने ती जास्तीची रक्कम घरमालकाला म्हणजेच तुम्हाला परत दिली पाहिजे.

तसे करणे बँकेवर बंधनकारक आहे. म्हणून घराचा लिलाव होत असताना लिलावाच्या रकमेवर नीट लक्ष ठेवा.

तो तुमचा अधिकार आहे.

तर ही झाली तुम्ही ईएमआय भरू शकला नाहीत तर बँकेकडून होणाऱ्या कारवाईची माहिती.

परंतु तज्ञ मात्र अशा बाबतीत हा सल्ला देतात की जर तुमच्या असे लक्षात आले की पुढील ईएमआय भरणे तुम्हाला अजिबात शक्य होणार नाही तर अशा वेळी तुम्ही स्वतःच तुमचे घर विकून येणाऱ्या रकमेतून बँकेचे कर्ज फेडून टाका.

असे करण्याचे ३ फायदे आहेत.

१. लिलावात घराची रक्कम नेहेमी कमीच येते. कारण बँकेला फक्त कर्ज वसूली पुरती रक्कम मिळाली तरी पुरेसं असतं.

त्याऐवजी तुम्ही स्वतः घर विकले तर तुम्ही घराची योग्य किंमत मिळवू शकता ज्यामुळे कर्ज फेडूनही तुमच्याजवळ एक ठोस रक्कम राहते.

२. दूसरा फायदा असा की बँकेकडून लिलाव होण्याच्या कारवाईला बराच वेळ लागतो.

तोपर्यंत विनाकारण तुमची मालमत्ता म्हणजेच तुमचे घर हे बँकेच्या ताब्यात रहाते.

जे तुम्ही स्वतःच घर विकून टाळू शकता.

३. तिसरा फायदा असा की ईएमआय न भरल्यामुळे बँक तुमचे नाव डिफॉल्टर्स च्या यादीत घालते ज्यामुळे तुमची मार्केट मधील पत कमी होते.

स्वतः प्रॉपर्टी विकून वेळेत कर्ज फेडल्यामुळे तुम्ही तुमची पत राखू शकता.

पण मुळात आपल्यावर ईएमआय भरता न येण्याची, आपले घर विकले जाण्याची वेळच येऊ नये ह्यासाठी काही करता येईल का ह्याचा विचार करूया.

त्यासाठी खालील गोष्टी अमलात आणता येतील.

१. तुमचा ईएमआय तुमच्या पगाराच्या ४०% रकमेपेक्षा जास्त असू नये.

२. कर्ज घेताना जास्तीत जास्त डाऊन पेमेंट करून कमीत कमी कर्ज घ्या.

३. वेळोवेळी ईएमआय भरता येणे शक्य आहे ना हे तपासून पहा.

शक्य होणार नाही अस वाटल्यास बँकेकडून कर्जाची मुदत वाढवून ईएमआय कमी करून घ्या.

४. जर तुमच्याकडे इतर काही रोख स्वरूपात रक्कम असेल तर ती भरुन मुदतीपूर्वी तुमचे कर्ज फेडण्याचा प्रयत्न करा.

तर मित्रांनो, अशी आहे गृहकर्ज आणि त्याच्या परतफेडीची प्रोसेस.

सध्याच्या कोविड महामारीच्या काळात अनेक जणांना आर्थिक अडचणी येत आहेत.

अशा वेळी लेखात दिलेल्या माहितीचा नीट विचार करा.

मुदतीत तुमचे गृहकर्ज फेडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या घराबाबत होऊ शकणारी कारवाई टाळा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!