मुलांना चांगल्या आहाराचे, व्यायामाचे महत्त्व पटवण्याचे ५ उपाय

“अगं सोनू, किती वेळ झाला टीव्हीपुढे बसली आहेस” किंवा “अरे पिंटु, केव्हाचा गेम खेळतो आहेस मोबाईलवर, जरा बाजूला ठेव तो फोन”

घरोघरच्या आई-बाबांचा असा ओरडण्याचा आवाज आपल्याला ऐकू येत असतो.

मुले ऐकत नाहीत, चांगल्या सवयी लावून घेत नाहीत अशा तक्रारी पालक नेहेमीच करत असतात.

मुले टीव्हीसमोर बसून वेळ घालवतात, व्यायाम करत नाहीत, तसेच जंक फुडचं प्रमाण फार आहे, पौष्टिक खाणे नको असते ह्या अगदी कॉमन तक्रारी आहेत.

त्यातून सध्याचा लॉकडाऊनचा काळ, म्हणजे मुलांना बाहेर जायची, खेळायची पण परवानगी नाही. त्यामुळे मुले हट्टी आणि चिडचिडी नाही झाली तरच नवल.

त्यातून आई बाबा दोघेही कामात बिझी.

मुलांसमोर टीव्ही, मोबाइल, विडिओ गेम शिवाय पर्याय तरी काय उरणार मग.

पण थांबा, आपल्याकडे ह्यावर उपाय आहे, मुलांना चांगल्या, हेल्दी सवयी लावण्यासाठी काय करता येईल ते आपण आज ह्या लेखात पाहूया.

लहान मुले अनुकरणप्रिय असतात हे तर आपल्याला माहीत आहेच.

एखादा खेळाडू किंवा एखादा सुपरहिरो हाच बहुतेक मुलांचा रोल मॉडेल असतो.

त्याचा फायदा घेऊन आपण मुलांशी त्या व्यक्तीच्या चांगल्या सवयी, त्यांचा फिटनेस, आहार, व्यायाम हयाबद्दल बोलू शकतो.

मुख्य म्हणजे मुलांसमोर पालकांचे उदाहरण असेल तर त्याचा जास्त उपयोग होतो.

त्यामुळे स्वतःच्या उदाहरणाने देखील मुलांना चांगल्या आहाराचे, व्यायामाचे महत्व आपण पटवून देऊ शकतो. कसे ते पाहूया.

१. संपूर्ण कुटुंबाने मिळून चांगल्या सवयी लावून घ्या

मुलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर कुटुंबाचा खूप प्रभाव असतो.

तसेच पालक म्हणून मुलांच्या मतांचा आदर करणे, त्यांचे म्हणणे ऐकून घेणे, त्यांना पुरेसा वेळ देणे हे केले पाहिजे.

त्यामुळे मुले देखील पालकांच्या चांगल्या सवयी स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न करतील.

२. दिवसाचे रुटीन ठरवताना मुलांना सहभागी करून घ्या 

दिवसभरातील जेवणाचे पदार्थ ठरवताना मुलांना सहभागी करून घ्या.

पौष्टिक तरीही चविष्ट आणि आवडीचे पदार्थ कसे बनवता येतात ते मुलांना समजावून सांगा, तसेच एखादा पदार्थ बनवताना लागणारी पूर्वतयारी करायला मुलांची मदत घ्या.

त्यामुळे चांगला आहार घेण्यासाठी मुलांचा उत्साह वाढेल.

तीच गोष्ट व्यायामाची, नुसते व्यायामाचे महत्व सांगून ते पटणार नाही, रोज काय व्यायाम करायचा ह्याचे वेळापत्रक मुलांना करायला द्या.

तुम्ही मुलांबरोबर त्यांनी निवडलेले व्यायाम करा. त्यामुळे खुश होऊन मुले उत्साहाने व्यायाम करू लागतील.

३. मुलांना खाऊचे आमिष दाखवू नका

कोणत्याही कामासाठी मुलांना चॉकलेट किंवा बिस्किटाचे आमिष दाखवू नका.

तसेच कोणतेही पदार्थ हे चांगले किंवा वाईट ह्या प्रकारात टाकू नका.

तसेच गोड किंवा तत्सम पदार्थ मुलांना अजिबात द्यायचे नाहीत असे देखील करू नका.

त्यामुळे मुलांना त्या पदार्थांची जास्तच ओढ वाटते आणि ते पदार्थ गुपचुप घेऊन खाण्याकडे त्यांचा कल वाढतो.

त्यामुळे मुलांचे वजन वाढण्याचा धोका असतो. थोड्या प्रमाणात सर्व पदार्थ खाणे हे सर्वात चांगले आहे.

४. मुलांना खूप खाण्याचा आग्रह करू नका 

प्रत्येक मूल हे निराळे असते आणि प्रत्येक मुलाची भूक वेगवेगळी असते.

तसेच वाढीच्या प्रत्येक टप्प्यावर मुलांमध्ये बदल होत जातात त्यामुळे त्यांचे खाण्याचे पॅटर्न, सवयी बदलत जातात.

त्यामुळे पोट भरल्यानंतरही आणखी खाण्याचा आग्रह मुलांना करू नका.

तसेच इतर मुलांच्या खाण्याशी त्यांची तुलना करू नका.

एखादी नावडती भाजी मुलांना बळेच खायला लावू नका.

त्यामुळे मुलांच्या मनात त्या भाजीबद्दल कायमची नावड उत्पन्न होईल.

त्याऐवजी वेगळ्या स्वरूपात ती भाजी खाऊ घालण्याचा प्रयत्न करा.

मुलांना संपूर्ण पोषण मिळत आहे ना याकडे लक्ष द्या पण त्यांना आवडू शकतील असे पदार्थ देऊन.

५. संपूर्ण कुटुंबाचा सहभाग महत्वाचा 

मुलांच्या जडणघडणीत आई, बाबा, आजी आजोबा, मोठी भावंडे ह्या सगळ्यांचाच मोठा वाटा असतो.

त्यामुळे सगळ्या कुटुंबाची मिळून एखादी ऍक्टिव्हिटी ठरवणे, सगळ्यांनी मिळून व्यायाम करणे किंवा शक्य असेल तेव्हा (सर्व नियम पाळून ) बागेत जाणे, फिरायला, पळायला जाणे ह्याचा मुलांना चांगल्या सवयी लागण्यावर खूप सकरात्मक परिणाम होतो.

सगळेच करत आहेत असे दिसल्यावर मुलांनाही ते काम करण्याचा उत्साह येतो.

तर असे सगळे प्रयत्न करून आपण आपल्या मुलांना आरोग्यपूर्ण सवयी लावू शकतो.

त्यांच्याबरोबर वेळ घालवून त्यांना आनंद देऊ शकतो.

त्यांचा मोबाइल, टीव्ही पुढे वाया जाणारा वेळ काही चांगल्या ऍक्टिव्हिटीमध्ये सत्कारणी लावू शकतो.

मुलांना चांगल्या सवयी लावू शकतात तेच चांगले पालक, नाहीत का? चला तर मग आपणही असे पालक बनूया.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!