यश कोण कोण मिळवणार…..

bill-gates-prernadayi-vichar-marathi

दरवर्षी एखादं नियतकालिक जगातल्या सर्वाधिक श्रीमंतांची यादी जाहीर करतं. यशस्वी उद्योजकांच्या बातम्या जगासमोर येतात.

मग तो श्रीमंत आहे म्हणून त्याला यशस्वी म्हणायचं की त्याचा बिझनेस जोरात चालला म्हणून त्याला यशस्वी म्हणायचं?? बरं यालाच यश म्हणायचं तर ते त्याचं एकट्याचंच कर्तृत्व असणार का??

अशा व्यक्तींची काही गुणवैशिष्टयं असतात. त्या गुणांच्या आधारे माणसं स्वतः मोठी होतात आणि इतरांनाही मोठं व्हायला मदत करतात.

केवळ कागदोपत्री मिळणारे गुण महत्वाचे नसतात. आपलं शिक्षण, आपले अनुभव परिस्थितीनुसार वापरता येणं महत्वाचं. ते कोणत्या वेळी कसे वापरायचे याचं चातुर्य हवं.

जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये गणले जाणारे यशस्वी उद्योजक बिल गेट्स यांनी त्यांच्या निरीक्षणातून आणि अनुभवातून नेमकी कशी माणसं यश खेचून आणतात ते सांगितलं आहे.

त्यासाठी त्यांनी आजूबाजूला असलेल्या माणसांचा अभ्यास केला. उद्योगाला सहकार्य करणारे, त्यात व्यत्यय आणणारे, समाजासाठी मिळणारे निधी, त्यांचे कृती आराखडे यांचा सांगोपांग विचार बिल गेट्स करतात.

वेगवेगळी पुस्तकं वाचून, माणसं वाचून भविष्यात मानवतावाद कसा टिकवता येईल याचं नेमकं विश्लेषण बिल गेट्स करतात.

बिल गेट्स यांच्या मते, तीन क्षेत्रातल्या व्यक्तींमध्ये क्रांती घडवून आणण्याची ताकद असते, विज्ञान, अभियांत्रिकी आणि अर्थशास्त्र.

या क्षेत्रात केवळ कागदोपत्री गुण मिळणं महत्वाचं नसतं. मिळवलेलं ज्ञान प्रत्यक्षात कसं वापरता येईल ते महत्वाचं असतं.

पाढे तोंडपाठ असले तरीही ते व्यवहारात चपखल वापरता आले पाहिजेत. जगाबरोबर चालताना त्यात अद्ययावतपणा आला पाहिजे.
प्राचीन भारतीय गणित तज्ज्ञांनी जगाला शून्याची ओळख करून दिली तेव्हा व्यवहारात आमूलाग्र बदल झाले.

मानवाने चाकाचा शोध लावला आणि यांत्रिक ज्ञान जगाला मिळालं. झाडावरून खाली पडणारं सफरचंद पाहून न्यूटनने गुरुत्वाकर्षण म्हणजे काय ते अभ्यासलं आणि विज्ञानात आमूलाग्र बदल घडून आले.

हा सगळा अभ्यास जेव्हा व्यवहारात मांडता येऊ लागला तेव्हा क्रांती घडायला लागली.

बिल गेट्स यांच्या मते गणित, विज्ञान, अर्थशास्त्र यातील मूलभूत ज्ञान महत्वाचं आहेच. ते माहीत असेल तरच त्यांचा व्यवहारात उपयोग कसा करता येईल ते ठरवता येतं.

गणितातले पाढे, रसायन शास्त्रातले तक्ते माहीत असले पाहिजेत. व्यवहारात त्याचा उपयोग करताना मात्र कौशल्य असावं लागतं.

असं कौशल्य असणारी माणसं एखाद्या उद्योगासाठी, समाजासाठी उत्तम सल्लागार होऊ शकतात. इतकंच काय एखाद्या नेत्याचे निर्णय अशा सल्लागारांच्या मतांवर अवलंबून असतात.

समाजासाठी कोणताही मोठा निर्णय घेताना अशा तज्ज्ञ व्यक्तीचा सल्ला महत्त्वाचा ठरतो. लोकसंख्या विचारात घेऊन निर्णय घेताना एखाद्या गणित तज्ज्ञाची मदत घेता येते. अन्न आणि औषध प्रशासन निर्णय घेत असेल तर रसायन शास्त्रातल्या तज्ज्ञांची मदत होते.

देशाचा आर्थिक व्यवहार सुरळीत ठेवण्यासाठी अर्थ तज्ज्ञ महत्वाची भूमिका बजावतो.

थोडक्यात काय तर कोणतही ज्ञान हे कधीच निरुपयोगी नसतं. त्याचा वापर कधी आणि कसा करता येईल ते महत्वाचं ठरतं.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.