कोरोनाकाळात चोहुबाजूंनी होणारे आघात पळवून लावून मजेत राहण्यासाठी खास उपाय

कोरोनाकाळात चोहुबाजूंनी होणारे आघात पळवून लावून मजेत राहण्यासाठी काही खास उपाय marathi prernadayi vichar

या कोरोनाकाळातले चोहुबाजूंनी होणारे आघात पळवून लावण्यासाठी ‘उच्च ध्येय ठेवणं’ हाच एकमेव उपाय आहे हे आधी स्वतःला समजावून सांगा.

मित्रांनो, हे जमवून कसं आणता येईल यासाठी खास हा लेख वाचा…

सतत घरात बसून राहणं, नोकरी धंद्यावर गदा, आर्थिक चणचण, कुणाची आजारपणं आणि गेल्या काही दिवसांपासून महामारीने घेतलेलं अक्राळविक्राळ रूप… थोडक्यात काय तर प्रत्येक जण कुठेतरी हरवलेला.

आयुष्यात, अपेक्षा अगदी क्षीण होऊन गेलेल्या….

मग कधीतरी आठवतं, अरे आपण असेही जगत होतो का?… उत्साहानं, आनंदानं. कारण असं जगण्याला आता तब्बल वर्ष सव्वा वर्ष होत आलं…

कारण ही अवस्था खूपच वेगळी आहे. सतत चिडचिड, त्रागा, सतत मनाविरुद्ध होतय असं वाटणं, कामातला उत्साह संपून जाणं, आवडीचं काम करण्याची इच्छा न होणं, केवळ नकारात्मक विचार हे तुमच्या सवयीचं होत चालेललं असेल तर वेळीच हे समजून घेऊन यातून सावरणं हे तितकंच गरजेचं आहे.

एकंदर वावरत असताना सुस्तपणा आला आहे. आळशीपणा, कामात अडथळे, धोका आल्यावर काम सोडून देणं, जिद्द, चिकाटी यांचा अभाव….

थोडक्यात काय तर कामातला उत्स्फूर्तपणा, रस निघून जाऊ लागलाय…

तुमचीही अवस्था अशी होत असेल तर या लेखातली चर्चा नक्की वाचा.

सुरुवातीला असं वाटण्याची कारणं काय ते पाहू
१. दिवसाच्या ठरवलेल्या ढाच्यात अडकून राहणं

प्रत्येकाचं आपापलं वेळापत्रक ठरलेलं असतं. त्यानुसार कामं पार पडतातही.

पण तो एक ढाचाच तयार होतो म्हणा ना.

सकाळी उठलं, ठरवलेली कामं उरकली, वेळ झाली म्हणून खाऊन घेतलं, फावल्या वेळेत मोबाईल, टीव्ही, कॉम्प्युटर समोर टाईमपास केला, दिवस संपला म्हणून अंथरुणावर पाठ टेकली.

असा प्रत्येकाचा ढाचा ठरलेला असतो.

वेळेनुसार सगळं होतं पण उत्साहानं होतच असं नाही.

हे सगळं ठरलंय म्हणून होत राहतं, तुम्हाला हवय म्हणून नाही….

यातून बाहेर पडायला आवडेल?? मग काही गोष्टी नक्की करून बघा

A) कम्फर्ट झोन मधून स्वतःला हळूहळू बाहेर काढा.

दडलेल्या उत्साहाला बाहेर येता येईल असं काहीतरी करा.

व्यायाम करा, फिरायला जा, छंद जोपासण्यासाठी वेळ काढा. चांगल्या लोकांच्या ओळखी वाढवा.

B) स्वतःमधले नकारात्मक विचार झटकून द्या.

‘आऊट ऑफ द वे’ जाऊन काहीतरी चांगलं करण्याची हिंमत बाळगा.

प्रत्येक वेळी यश मिळेलच असं नाही, अपयशही पचवा.

C) मन ताजंतवानं राहील अशा कामात स्वतःला गुंतवा

D) मनात जे असेल ते जवळच्या माणसांशी बोला. निदान लिहून तरी काढा. खूप मोकळं वाटेल.

E) कुठलंही काम करताना आधी सोप्या गोष्टीपासून सुरुवात करा. जेणेकरून दडपण येणार नाही.

F) नवीन काही करण्याचा जरूर प्रयत्न करा. उत्साह नक्कीच वाढेल.

G) कामात केवळ हट्टीपणा न करता इतरांचीही मदत घ्या आणि त्यांचा आदर राखा.

२. स्वतःच्या बलस्थानांकडे पाठ फिरवणं

ठरवलेल्या कामात अडकल्यावर एक वेळ अशी येते की दिवसाचं चक्र फिरतं तसं आपण ठराविक कामात गुंतून जातो.

मग इच्छा असो वा नसो ठरलेलं रुटीन पार पडणं… हाच पर्याय समोर राहतो!!.

या सगळ्या गराड्यात, मी कोण, मला काय हवंय, काय आवडतं, तसं मी घडवू शकेन का, माझ्या आवडीची कामं कोणती या सगळ्याचा विसरच पडतो.

इच्छा म्हणून नाही तर गरज म्हणून काम होत राहतं.

आणि हळूहळू सगळंच निरस वाटायला लागतं.

अशा वेळी काही प्रश्न एकदा स्वतःला जरुर विचारा

A) माझा नक्की कोणत्या गोष्टीत हातखंडा आहे? जेणेकरून ती गोष्ट मी सहज करू शकेन.

B) माझ्या इच्छेनुसार मला काय करता येईल? त्यामुळे माझी कामातील गती आणि रस वाढेल.

C) मी असं काय केलं म्हणजे इतरांनाही त्याचा उपयोग होईल?

आनंद वाटल्याने वाढतो, असं काही मला जमेल का?

तर या सगळ्याच उत्तर ‘हो’ असं मिळावं. यासाठी आधी स्वतःमध्ये दडलेली बलस्थानं ओळखा.

नवनवीन गोष्टी करण्यासाठी जरूर प्रयत्न करा.

हार जीत किती होईल यापेक्षा प्रयत्न किती करता येईल हे बघा.

मला जमेल की नाही हा विचार बाजूला ठेवा.

कासवाच्या गतीने काम केले तरी चालेल पण सातत्य कायम असू दे.

३. तुमचे पूर्वग्रह – तुमचा अडथळा

कित्येकदा असं होतं की हे काम माझं नाही म्हणून मी ते करणार नाही.

स्वयंपाक हा बायकांचा प्रांत. पुरुषांनी तिथे लुडबूड करु नये.

घराबाहेर व्यवहार पुरुषांनी सांभाळावे तो बायकांचा प्रांत नाही.

या लक्ष्मण रेषा आखल्या कोणी? आपल्या पूर्वग्रहांनी.

तेच जर आपल्याला तोडता आले तर चित्र नक्कीच बदलेल.

कोणताही पूर्वग्रह न ठेवता नवीन कौशल्य खुल्या मनाने आत्मसात करता आलं पाहिजे.

त्यासाठी थोडी हिंमत नक्कीच करावी लागते. ही अडथळा शर्यत पार करायची असेल तर काही गोष्टी नक्की करून बघा.

A) सगळे गैरसमज झटकून आपल्या आवडीच्या कामात स्वतःला झोकून द्या.

यश अपयशाच्या कचाट्यात न अडकता केवळ हौस म्हणून करत रहा.

B) केलेल्या कामाचा आनंद घ्या. इतर कोणी शाबासकी देण्याची वाट बघू नका.

एकच लक्षात ठेवा ‘ तुझे आहे तुजपाशी’.

४. उच्च ध्येयाचा अभाव

काहीजणांना असं वाटतं की आपण खूप सामान्य आहोत तर आपली उद्दिष्ट पण साधीच असणार.

चारचौघांसारखंच आपण जगावं. अशी धारणा खरंतर आपला अडथळा ठरते.

आपला उत्स्फूर्तपणा तिथेच खुंटतो.

असाच विचार सगळ्यांनी केला असता तर डॉ. अब्दुल कलाम, लता मंगेशकर, मिल्खा सिंग यांना आपण पाहिलं असतं का?

या कोरोनाकाळातले चोहुबाजूंनी होणारे आघात पळवून लावण्यासाठी ‘उच्च ध्येय ठेवणं’ हाच एकमेव उपाय आहे हे आधी स्वतःला समजावून सांगा.

आयुष्य खूप मोठं आहे. खूप काही शिकायला, करायला वेळही आहे. मग फक्त जुजबी गोष्टीत का अडकून पडावे.

पुढे चालत राहता आलं पाहिजे. मग एका लक्ष्मण रेषेत न अडकता, पुढचं ध्येय गाठायला काय हरकत आहे. त्यासाठी काही उपायही आहेत.

A) जुजबी ध्येय आपल्या कुवतीला मर्यादित ठेवतात.

त्यासाठी उच्च ध्येयाचा पाठपुरावा करा. वेळ लागला तरी प्रयत्न सोडू नका

B) आपल्यातल्या सुप्त गुणांना वाव देऊन पूर्ण ताकदीनिशी स्पर्धेत उतरा.

शारिरीक मानसिक तयारी ठेऊन ध्येय गाठा. पण नंतर थांबून राहू नका. स्वतःला झोकून देऊन काम करत रहा.

हीच तर सगळी गुपितं आहेत कठीण काळात सुद्धा स्वतःचा उत्सफूर्तपणा आणि आयुष्यातला रस टिकवून ठेवण्याची.

मुख्य म्हणजे ती तुमच्यात आहेत. फक्त एकदाच ही चावी घेऊन कुलुप उघडा, मग बघा काय जादू होईल ते.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

2 COMMENTS

  1. खुप चांगली माहीती आपण लोकास पूर्वत आहात त्याबद्दल धन्यवाद / तुम्ही आमचा ब्लॉग ही पाहू शकतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.