डिजिटल पेमेंट करताय, घ्या ही काळजी.

डिजिटल पेमेंट करतना कोणती काळजी घ्यावी

मागच्या वर्षीच्या आणि ह्या वर्षीच्या लॉकडाऊनमुळे आपणा सर्वांचे घराबाहेर पडणे जवळजवळ बंद झाले आहे.

परंतु गरजेच्या वस्तु जसे की किराणासामान, भाजी आणि इतरही काही गोष्टी तर लागतातच. सध्या ह्या गोष्टी घरपोच मिळतही आहेत.

परंतु प्रश्न येतो पेमेन्टचा. बाहेर न पडण्यामुळे, बँक/एटीएम इथे जाता न आल्यामुळे बहुतेकांकडे रोख रक्कम नसते.

अशा वेळी आधुनिक टेक्नॉलजीच्या मदतीने आपण सगळे हल्ली डिजिटल पेमेंट करू लागलो आहोत.

डिजिटल पेमेंट म्हणजे नक्की काय? तर कोणालाही रोख रक्कम देण्याऐवजी मोबाइल, इंटेरनेटच्या मदतीने त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये डायरेक्ट पैसे जमा करणे.

ह्यासाठी यू. पी. आय. पेमेंट, क्रेडिट/डेबिट कार्डस आणि गुगलपे, पेटीएम सारखी वेगवेगळी पेमेंट ऍप्स वापरली जातात.

आता सर्वचजण ह्या डिजिटल पेमेंटचा वापर करू लागले आहेत. परंतु अशी ऍप्स वापरताना सुरक्षेची खबरदारी घेतली पाहिजे नाहीतर आपण फसवले जाण्याचा धोका असतो.

सध्या ऑनलाइन फसवणूक होण्याची खूप प्रकरणे समोर येत आहेत. पण हे टाळणे देखील आपल्याच हातात आहे.

त्यासाठी आपण स्वतः सतत जागरूक राहिले पाहिजे. ऑनलाइन, डिजिटल पेमेंटची माहिती नीट करून घेतली पाहिजे.
तेच आपण आज ह्या लेखात विस्ताराने पाहणार आहोत.

१. ओटीपी 

ऑनलाइन पेमेंट करताना ते डेबिट/क्रेडिट कार्डद्वारे असो किंवा कुठल्या ऍप्सद्वारे असो, सर्वात महत्वाचा असतो तो म्हणजे ओटीपी. ओटीपी म्हणजेच ‘वन टाइम पासवर्ड’….

कोणतेही डिजिटल व्यवहार पूर्ण करण्यासाठी आपल्या मोबाइलवर हा ओटीपी संबंधित बँक किंवा ऍप्स कडून पाठवला जातो. तो ओटीपी दिल्यानंतरच व्यवहार पूर्ण होतो.

इथे आपण, ही खबरदारी घेतली पाहिजे की आपला ओटीपी आपण कोणालाही सांगायचा नाही.

बरेचवेळा असे फसवणूक करणारे आपल्या वतीने व्यवहार करतात आणि फोनवर आपल्याला बोलण्यात गुंतवून आपल्याकडून ओटीपी काढून घेतात व आपल्या पैशांचा अपहार करतात.

म्हणून कोणत्याही परिस्थितीत आपल्याला आलेला ओटीपी कोणालाही सांगू नये.

२. क्यु. आर. कोड स्कॅन करणे 

दूसरा महत्वाचा फसवणूक होऊ शकणारा प्रकार म्हणजे क्यु. आर. कोड स्कॅन करणे. क्यु. आर. कोड स्कॅन करून फक्त पेमेंट करता येतं.

आपल्याला कोणाकडून पैसे येणार असतील तर क्यु आर कोड स्कॅन करण्याची गरज नसते. उलट समोरच्या व्यक्तीने डायरेक्ट पैसे जमा करणे अपेक्षित असते.

पण ह्याबाबतीत फसवणूक करणारे आपल्याला पैसे पाठवतो असे सांगून क्यु आर कोड स्कॅन करायला सांगतात आणि आपल्याच अकाऊंटमधले पैसे कट होतात.

त्यामुळे अनोळखी लोकांशी व्यवहार करताना सावध राहून कोणताही क्यु आर कोड विनाकारण स्कॅन करणे टाळावे.

३. सोशल मीडिया 

हल्ली फेसबुक, इनस्टाग्राम आणि व्हाट्सऍप्सचा वापर खूप वाढला आहे. ह्या सोशल मीडिया ऍपद्वारे आपण बऱ्याच लोकांच्या संपर्कात येतो.

परंतु त्यांच्याशी गप्पा मारताना आपली फार जास्त वैयक्तिक माहिती शेयर केली जाणार नाही ह्याची काळजी घ्या. कारण हयातूनच मग ऑनलाइन फसवणुकीचे प्रकार वाढतात.

कोणाशीही संपर्क करताना सावध राहणे फार आवश्यक आहे.

४. ऑनलाइन शॉपिंग 

सध्या लोकांचा वस्तु ऑनलाइन घरपोच मागवण्याकडे कल आहे. नावाजलेल्या ई-कॉमर्स वेबसाइट त्यासाठी तत्पर आहेत.

परंतु अशा वेबसाइटची पॉलिसी, त्यांच्या अटी, ग्राहकाची कोणती माहिती ते वापरणार ह्या सगळ्याची शहानिशा अशा वेबसाइट वापरण्यापूर्वी जरूर करा.

तसेच वस्तु खराब असेल तर परत करण्यासाठी काय नियम आहेत ह्याचीही माहिती करून घ्या. अन्यथा आपले पैसे अडकून फसवणूक होण्याची शक्यता असते.

५. अधिकृत फोन नंबर 

कोणत्याही बँकेचा किंवा ऍप्सचा नंबर गुगल करून शोधू नका. अशा सर्च इंजिनवर कोणीतरी मुद्दाम खोटे नंबर देऊन फसवणूक करण्याची शक्यता असते. बँक किंवा ऍप्सच्या अधिकृत वेबसाइटवरूनच नंबर मिळवून संपर्क करा.

इंटनेट बँकिंगचा उपयोग करताना सुद्धा गुगल सर्च करून आलेली वेबसाईट न वापरता बँकेच्या अधिकृत वेबसाईटच्या ऍड्रेसची URL टाईप करून वेबसाईटला बेत द्या.

६. खोटे फोन कॉल 

बँकेकडून कधीही ग्राहकाला कुठलाही ओटीपी विचारला जात नाही किंवा कार्ड ब्लॉक करून ते सुरु करण्यासाठी फोन येत नाही.

त्यामुळे बँकेतून बोलतोय असे सांगणारा फोन आला तरी पूर्ण शहानिशा केल्याशिवाय आपली कोणतीही माहिती त्या व्यक्तीला देऊ नका.

खरंतर अशा फोनवर काही बोलायचीच गरज नाही. बँक असे व्यवहार फोनवर करत नाही. त्यामुळे असे कॉल्स हे फ्रॉड असतात हे समजून घ्या.

७. सुरक्षित वेबसाइट

डिजिटल पेमेंटसाठी असणारी वेबसाइट विजिट करताना ती https नी सुरु होते आहे ह्याची खात्री करून घ्या. शेवटी s असेल किंवा नावाआधी कुलूपाचे चिन्ह असेल तर ती वेबसाइट सुरक्षित आहे. अन्यथा अशा वेबसाइट आर्थिक व्यवहारांसाठी वापरू नका.

८. फसव्या योजना 

अत्यंत कमी कालावधीत पैसे दामदुप्पट करून देतो असे दावे करणाऱ्या योजना अधूनमधून येत असतात. त्यावर विश्वास ठेवू नका. सरकारी योजना, किंवा बँक, म्युच्युअल फंड, अधिकृत डिमॅट अकाउंट यात पैसे गुंतवणे हे खात्रीशीर आणि सुरक्षित आहे.

९. अधिकृत ऍप्स 

आपल्या फोनमध्ये एखादे ऍप डाउनलोड करताना ते नेहेमी प्लेस्टोअर सारख्या अधिकृत ठिकाणावरून करा. इतर कुठल्या लिंकद्वारे ऍप घेणे टाळा. तसे करणे सुरक्षित नाही.

तर ह्या आहेत १० टिप्स ज्यामुळे आपण आपले डिजिटल पेमेंट सुरक्षितपणे करू शकतो. घरबसल्या पेमेंट करण्याचा लाभ कोणतीही भीती न बाळगता घेऊ शकतो.

ह्या लेखात दिलेल्या सूचनांचा जरूर लाभ घ्या आणि आपले पैसे सुरक्षित ठेवा.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.