अपयशाचे ११ फायदे घेऊन यशस्वी होण्याचा मूलमंत्र

marathi prernadayi

एखादा प्रयत्न आपण करायचं ठरवलं की त्यात यश मिळावं असं प्रत्येकालाच वाटतं. मग ती रोजची सामान्य गोष्ट असो किंवा एखादं महत्वाचं असाधारण काम असो.

अपेक्षित यश मिळालं की, आपल्या कष्टाचं चीज झालं, आपला फायदा झाला असं तर वाटणारच.

पण पहिल्याच प्रयत्नात सगळेच यशस्वी होतात असं नाही. कित्येक वेळा आपलं काम फसतं सुद्धा.

पण म्हणून काही प्रयत्न करणं सोडून द्यायचं का?? ‘अपयश ही यशाची पहिली पायरी असते’ हा सुविचार आपण लहानपणापासून वाचला आहे.

मग तो आयुष्यात प्रत्यक्ष अनुभवायला काय हरकत आहे. अपयशाची पायरी आपण चढलोच नाही तर, यशाचा डोंगर आपण पार करू हा आत्मविश्वास कधी येणार.

एखाद्या प्रयत्नात अपयश आलं म्हणजे आपलं कुठेतरी काहीतरी चुकलं, हे नक्की. नेमकी ती चूक कोणती हे समजायलाच हवं.

त्याशिवाय सुधारणा कशी होणार. ‘आपलं काहीतरी चुकेल, आपण फेल झालो तर?? ‘ या भीतीनेच कित्येकजण प्रयत्न करणंच सोडून देतात. ते काही बरोबर नाही.

अपयश मिळालं तर सिंहावलोकन करून, चूक सुधारून पुढे जाता आलं पाहिजे. अपयश आलं तरी पचवता आलं पाहिजे.

एखादी मुलगी पोळ्या करायला शिकत असेल तर सुरूवातीच्या पोळ्या जाड, कच्च्या, करपलेल्या होतीलही. पण प्रयत्न करत राहिल्यावर काही दिवसांनी चांगल्या पोळ्या जमतील.

एखादा विद्यार्थी शाळेच्या अभ्यासात कमी हुशार असेल. पण जमत नाही म्हणून शिक्षण सोडून देण्यात काहीच अर्थ नाही. प्रयत्नपूर्वक ते पूर्ण केलं पाहीजे.

डॉ. अब्दुल कलामांनी त्यांच्या आयुष्यातल्या अशाच काही अपयशाच्या गोष्टी अग्निपंख पुस्तकात सांगितल्या आहेत. त्यांना भारतीय हवाई दलात काम करायचं होतं. काही कारणांमुळे त्यांची निवड होऊ शकली नाही. म्हणून ते निराश झाले नाही. पुढे जाऊन त्यांनी इस्रो संस्थेत अंतराळ संशोधनात भरीव कामगिरी केली.

एवढंच काय, अहो! आपण चालायला शिकलो तरी कसं? पडत, अडखळतंच ना! लहान बाळ नाही का, पडलं तरी पुन्हा हसत-हसत उठतंच…

अशीच अपयशाची पायरी चढून यश कसं मिळवायचं याची अकरा गुपितं पाहुया..

१. आपण कधी ना कधी अयशस्वी होतोच 

कोणतही ध्येय गाठताना शंभर टक्के आपल्याला हवं तसंच यश मिळेल असं नसतं. एखाद्या टप्प्यावर आपण चुकणार अशी मनाची तयारी करायचीच.

आपण जर चुकलो तर त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही. ती अत्यंत स्वाभाविक गोष्ट आहे. फक्त त्यात सुधारणा करून आपल्याला पुढं जायचं असतं. आणि अपयश मिळाल्याशिवाय यशाची किंमत कळत नाही हे नक्की.

३. अपयश पचवता आलं तर आपणच खंबीर होतो 

अपयश मिळालं तर आपला वेळ आणि प्रयत्न वाया गेले असं अजिबात समजू नये. उलट आपल्याला सुधारायला अजून एक संधी मिळाली असंच समजावं.

मिळालेल्या संधीचं मात्र सोनं करता आलं पाहिजे. मिळालेलं यश कोणीही पचवतो. पण अपयश पचवायला खंबीरच असावं लागतं.

४. अपयशामुळे अनुभव मिळतो 

कोणताही प्रयत्न यश देईलच असं नाही. पण अपयश मिळालं तर त्याबरोबर प्रयत्नांचा अनुभव नक्कीच मिळतो. त्यातूनच एखाद्या कामात कौशल्य मिळवायला मदत होते. वेळ आणि संधी यांचा नेमका उपयोग कसा करायचा ते समजतं.

५. अपयश आपल्याला धाडस करायला शिकवतं

सतत यश मिळत गेलं तर आपण एखादं क्षुल्लक काम केलं तरी चालतं असं वाटू शकतं. पण अपयश मिळालं तर आपण दोन पावलं मागे पडतो. हीच संधी असते स्वतःमध्ये चांगले बदल करण्याची. एखादं मोठं ध्येय गाठायचं असेल तर धाडस केलं पाहिजे, धोका पत्करला पाहिजे, प्रयत्न केले पाहिजेत हे लक्षात येतं. कामाची नेमकी दिशा सापडते.

६. अपयशातून आपल्याला सुधारण्याची संधी मिळते 

अपयशाला आपला गुरुच मानावं. कारण अपयशातून आपण काही ना काही शिकतो हे नक्की. त्यातूनच आपल्याला आपले गुण अवगुण ओळखता येतात. बलस्थानं, वैगुण्य लक्षात येतात. म्हणून अपयशाने खचून न जाता, अपयशाला स्वीकारावं.

७. अपयशाच्या खिंडीत यशाचा मार्ग सापडतो

ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करताना अपयश आलं तर आपला प्रयत्नांचा मार्ग चुकला हे समजतं. मग आपोआपच आपण वेगळ्या प्रयत्नांची सुरूवात करतो. थोडक्यात न थांबता मार्ग शोधत राहतो. आणि शोधत राहिलं तर सापडतच. अपयशाने खिंडीत गाठलं म्हणून हरण्यापेक्षा यशाचा मार्ग शोधावा.

८. अपयश स्वतःचा शोध घ्यायला शिकवतं 

एकदा ध्येय गाठून आपण यशस्वी झालो की आपले प्रयत्न तिथेच थांबतात. पण अपयश मिळालं तर प्रयत्नांचे अनेक मार्ग दिसायला लागतात. त्यात आपल्याला नेमकं काय करता येईल याचा शोध सुरू होतो. आपल्याला काय जमतंय काय नाही हे समजतं. यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू असतात. दोन्हीचाही स्विकार करता आला पाहिजे.

९. अपयश आपल्याला विचार करायला लावतं 

अपयश मिळालं म्हणजे आपण नेमकं काय आणि कुठे चुकलो याचा शोध सुरू होतो. झालेली चूक पुन्हा होणार नाही किंवा कशी टाळता येईल याचा विचार आपोआप सुरू होतो. आणि इथूनच ध्येय गाठण्यासाठी यशाचा मार्ग सुरू होतो.

१०. सतत यश मिळाल्यामुळे फाजील आत्मविश्वास वाढू शकतो 

ज्या माणसाने कधीही अपयश पाहिलं नाही त्याचा फाजील आत्मविश्वास वाढून स्वतःच्या बाबतीत भ्रम होण्याची शक्यता असते. मी जे करेन ते कायम बरोबरच असतं, मी कधीच चुकत नाही, मला कोणाचा विरोध होऊच शकत नाही अशी गर्व भावना निर्माण होते. त्यामुळे यशस्वी झाल्यावर हुरळून न जाता संयमाने त्याचा स्वीकार केला पाहिजे. कितीही मोठं झालं तरी ‘डाऊन टू अर्थ’ रहावं.

११. अपयश मिळालं तर यशाची किंमत कळते 

कुठलंही काम सहजपणे झालं तर त्याची किंमत कळत नाही. पण तेच करताना कधी अपयश आलं, अडचणी आल्या, प्रयत्न करावे लागले, जास्त मेहनत घ्यावी लागली तर त्याची आठवण राहते. आपल्याला यश का आणि कसं मिळालं याचा हिशेब करता येतो.

हरिवंशराय बच्चन त्यांच्या कवितेतून सांगतात, ‘लहरोंसे डरकर नौका कभी पार नही होती, कोशिश करनेवालोंकी कभी हार नही होती!’

मुंगीचा तो इतकासा जीव. अन्नाच्या शोधात इतकी धडपडते. भिंतीवरही चढते. चढताना कितीवेळा पडते. पण प्रयत्न सोडत नाही.

मग आपण तर बुद्धिवान माणसं. अपयशानं खचून कसं चालेल. यशस्वीपणे ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करायलाच पाहिजेत.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. प्रमोद रा नाईक says:

    अपयशाचे ११ फायदे खूप सुरेख रीतीने या लेखात मांडले आहेत ज्यामुळे आज भरपूर वेळेला जीवनात प्रत्येकाला प्रत्येक क्षेत्रात अपयशाचा सामाना करावा लागतो त्या वेळेला नक्कीच याचा फायदा होईल असे माझे मत आहे. या बद्दल मनाचे talks टीम व लेखकाचे मनापासून आभार, धन्यवाद व खुप साऱ्या शुभेच्छा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!