सकाळच्या रुटीनमध्ये ह्या ५ चुका तुम्ही करता का?

सकाळच्या रुटीनमध्ये ह्या ५ चुका तुम्ही करता का?

वर्क फ्रॉम होम असो किंवा ऑफिसला जायचे असो सकाळची वेळ ही कायमच घाईची वेळ असते.

त्यातून मुलांची शाळादेखील सकाळची असेल तर त्या वेळात होणाऱ्या धुमश्चक्रीला सीमाच नसते.

आपल्यापैकी अनेकांसाठी सकाळची वेळ म्हणजे घाईगडबड, धावपळ आणि चिडचिड हे समीकरण जणू ठरूनच गेलेलं असतं.

आणि दिवसाची सुरुवातच अशी चिडचिड होऊन झाली की सगळा दिवसच खराब जातो.

सकाळच्या वेळी काही चांगल्या गोष्टी कराव्या, चांगल्या सवयी लावून घ्याव्या, त्यामुळे दिवस चांगला जातो हे आपल्याला सगळे सांगत असतातच.

पण काय करावे हे सांगतानाच काय करू नये हे सांगणे देखील आवश्यक आहे.

म्हणूनच आज आम्ही तुम्हाला विचारणार आहोत की सकाळच्या रुटीनमध्ये ह्या चुका तर तुम्ही करत नाही ना?

कोणत्या ते पाहूया…

१. आपल्याला गैरसोयीच्या असणाऱ्या सवयी केवळ इतर म्हणतात म्हणून लावून घेणे

सकाळचे रुटीन कसे असावे ह्याबद्दल अनेकवेळा बरीच चर्चा केली जाते, तसेच बरेच लेखही लिहिलेले असतात.

अनेक यशस्वी व्यक्ती सकाळी काय करतात ते सांगून तुम्ही पण तसे करा असे आपल्याला सांगितले जाते.

परंतु, अशा सवयी कितीही चांगल्या असल्या तरी त्या आपल्या सोयीच्या असल्या तरच लावून घेणे योग्य ठरेल.

अन्यथा आपल्याला त्या सवयींचा त्रासच होणार.

उदाहरणार्थ – सकाळी लवकर उठून व्यायाम करावा, किंवा फिरायला जावे ही खरंतर अगदी चांगली सवय आहे.

परंतु एखादी गृहिणी जिला सकाळी लवकर उठून सगळ्यांचे डबे, नाश्ता तयार करायचा असतो किंवा एखादा नोकरदार माणूस ज्याला सकाळी २ तास प्रवास करून वेळेत ऑफिसला पोचायचे असते ते ही सवय लावून घेऊ शकतील का?

त्यांनी केवळ इतर करतात म्हणून सकाळी व्यायाम करत बसायचं ठरवलं तर त्यांच्या रुटीनचा बोजवारा उडेल.

त्यांनी त्याऐवजी दिवसातली त्यांना सूट होणारी दुसरी एखादी वेळ व्यायामासाठी निवडली पाहिजे.

म्हणजेच आपल्याला सुयोग्य असणाऱ्या गोष्टीच आपल्या मॉर्निंग रुटीनमध्ये असल्या पाहिजेत.

२. सकाळच्या रुटीनचे वेळापत्रक न ठरवणे

बरेचदा आपण सकाळी लवकर तर उठतो परंतु त्यानंतर आपल्याला काय काय करायचं आहे त्याचं वेळापत्रक ठरवत नाही.

त्याऐवजी आपण उठून आपला फोन हातात घेतो, मग सोशल मिडियावर आपलं लक्ष केंद्रित होतं आणि आपण स्वतःला विसरून जातो.

आपण स्वतःसाठी ज्या गोष्टी करायच्या ठरवल्या असतील मग ते व्यायाम करणे असो, चांगला पदार्थ बनवणे असो, एखादा छंद जोपासणे असो तिकडे आपले दुर्लक्ष होते.

सकाळी उठून काय काय करायचे हे नीट न ठरवल्यामुळे आपल्या हातातला वेळ वाया जातो.

त्याऐवजी आपण आपल्याला संपूर्ण दिवसभरात काय काय करायचे आहे ह्याचा विचार करून त्या अनुषंगाने आपले सकाळचे रुटीन ठरवले पाहिजे.

३. सकाळच्या वेळात खूप जास्त काम करण्याचा प्रयत्न करणे

हे अगदी खरे आहे की आपण सर्वात जास्त उत्साही सकाळच्या वेळी असतो आणि आपण त्या वेळात जे जे काही करतो त्याचा आपल्याला खूप फायदा होतो.

सकाळी केलेला व्यायाम सर्वात जास्त उपयोगी असतो.

सकाळी मेडिटेशन करणे चांगले असते, सकाळी हेल्दी नाश्ता केलेला चांगला असतो.

आणि अशा अनेक गोष्टी, यादी संपणार नाही.

परंतु सगळ्याच गोष्टी साध्य करणे तितकेसे सोपे नसते.

दुसऱ्या कोणालातरी जमते म्हणून आपल्यालाही सकाळच्या वेळेत सर्व काही करणे जमेल असा अट्टहास करू नका.

आपल्याला बेस्ट सूट होईल असे रुटीन ठेवण्याचा प्रयत्न करा.

सकाळी करायच्या कामांबाबत आपली प्रायोरिटी ठरवा. आणि नियोजन करून तीच कामे पार पाडा. सर्व काही एकदम करण्याचा अट्टहास करू नका.

४. खूप जास्त सवयी लावून घेणे

सर्वसाधारणपणे जी मॉर्निंग रुटीन्स चांगली म्हणून गणली जातात, ज्यांच्याबद्दल खूप लिहिले जाते त्यात अनेक अगदी १२/१५ सवयींचा समावेश असतो.

परंतु प्रत्येकाला त्या सगळ्या सवयी स्वतःला लावून घेणे शक्य नसते.

त्यामुळे नेहेमी आपल्याला सूट होतील आणि आवश्यक असतील अशा थोड्या चांगल्या सवयी आधी लावून घ्याव्यात.

त्यांची नीट प्रकारे सवय झाली की आपल्याला आणखी काही करणे शक्य आहे का हे पहावे आणि मग त्या सवयी लावून घेण्याचा प्रयत्न करावा.

एकदम सगळं काही आपल्याला जमेल असे वाटून स्वतःला त्रास करून घेऊ नये. जमेल तशी आपल्या रुटीनमध्ये सुधारणा करावी.

५. मॉर्निंग रुटीनमध्ये सातत्य न ठेवणे

ही एक महत्वाची चूक बहुतेक वेळा आपल्या सगळ्यांकडून होते.

ती म्हणजे आपण आपले रुटीन ठरवतो, चांगल्या सवयी लावून घेतो परंतु त्यांचे पालन करण्यात सातत्य ठेवत नाही.

शिस्तीने आपण आपल्या रुटीनचे पालन करत नाही. आपल्यापैकी बहुतेक लोक हे आरंभशूर असतात.

काही दिवस झाले की आपल्या जुन्याच रुटीनवर येतात.

पण असे होऊ देऊ नका. आपल्या रुटीनमध्ये सातत्य राखण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी एफर्टस् घ्या.

उदाहरण द्यायचे झाले तर समजा आपण सकाळी लवकर उठून फिरायला जायचे ठरवले असेल त्यासाठी आपल्याला रात्री वेळेवर झोपणे आवश्यक आहे.

मग त्यासाठी रात्रीची जागरणे टाळणे, उशिरापर्यंत टीव्ही, मोबाईल न बघणे हे केले पाहिजे. किंवा आपण एखादा वेट लॉस प्रोग्रॅम करत असलो तर काही झाले तरी आपल्या डायटसाठी चुकीचे असणारे पदार्थ न खाणे हे तत्व आपण पाळले पाहिजे.

अशा रीतीने दीर्घकाळ आपले रुटीन नीट सांभाळण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे.

तर मित्रांनो, ह्या आहेत अशा काही चुका ज्या सकाळच्या वेळी आपल्याकडून होत नाहीत ना हे पाहणे गरजेचे आहे.

आपण जर ह्या चुका टाळल्या तर सकाळच्या वेळी आपण जास्त आनंदी आणि उत्साही राहू शकू. दिवसाची सुरुवात जर चांगल्या रीतीने झाली तर अर्थातच दिवस चांगला जातो आणि हळूहळू ह्या रुटीनची इतकी सवय होते की ती आपली जीवनशैलीच बनून जाते.

तुम्हीही ह्या चुका टाळा आणि तुमची सकाळ आनंदी आणि उत्साही बनवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

You may also like...

1 Response

  1. प्रमोद रा. नाईक says:

    छान माहिती.
    धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!