जाणून घ्या फणसाचे गरे खाण्याचे फायदे आणि नुकसान

health benefits of jackfruit marathi

भटो भटो, कोकणातून काय आणलं? कोकणातून आणला फणस….

हे बडबडगीत न ऐकता लहानाची मोठी झालेली व्यक्ति विरळाच.

ह्या गाण्यातला कोकणातून आणलेला जो फणस आहे त्याचे गुणधर्म आपण आज जाणून घेणार आहोत.

मुख्यतः कोकणात पिकत असला तरी आजकाल फणस सगळीकडे सहजपणे उपलब्ध असतो. अनेकांच्या घरी फणसाची झाडे असतात आणि नाहीतर मार्केटमध्ये देखील तो सहज उपलब्ध असतो.

बाहेरून काटेरी पण आत गोड, रसाळ गरे असणारे फळ म्हणजे फणस. फणस जसा आकाराने मोठा असतो तसाच तो गुणधर्माने देखील खूप मोठा आहे.

फणसामध्ये विटामीन्स, खनिजे, क्षार आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात.

अश्या ह्या फणसाचे गुणधर्म, फणस खाण्याचे विविध फायदे आज आपण जाणून घेणार आहोत.

फणस अतिशय पौष्टिक असतो. फणसाच्या गऱ्यांमध्ये विटामीन ए, विटामीन बी-६ आणि विटामीन-सी भरपूर प्रमाणात असते.

ह्याशिवाय फणसाच्या गऱ्यांमध्ये कॅल्शियम, आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉलिक ऍसिड अशी अनेक पोषकद्रव्ये असतात.

हल्ली जरी फणस बाराही महिने मिळू लागला असला तरी मुख्यत्वे फणसाचा सीजन म्हणजे उन्हाळा.

फणसाचे गरे नुसते खायला तर अतिशय गोड लागतातच पण ते तळूनही छान लागतात.

तसेच कच्च्या फणसाची भाजी करता येते आणि ती देखील अतिशय रुचकर लागते आणि पौष्टिकही असते.

फणसाच्या गऱ्यांचे आरोग्यदायी गुणधर्म काय आहेत ते आता आपण जाणून घेऊया.

फणसाच्या नियमित सेवनामुळे खालील फायदे होतात. 

१. मधुमेहावर गुणकारी

फणसाचे गरे हे गोड आणि रसाळ असले तरीही फणस हा मधुमेहावर गुणकारी आहे.

त्याचे महत्वाचे कारण असे की फणसाचा ग्लायसेमिक इंडेक्स हा अतिशय कमी असतो.

तसेच फणस पचायला इतर फळांच्या तुलनेत जास्त वेळ लागतो त्यामुळे रक्तातील साखर एकाएकी वाढत नाही.

तसेच फणसामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे रक्तातील साखर आटोक्यात राहण्यास मदत होते.

२. रक्तदाब आटोक्यात ठेवण्यास मदत होते 

ज्यांच्या रक्तदाब जास्त आहे अशा रुग्णांना फणस खाणे फायदेशीर आहे, कारण फणसामध्ये असणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते.

तसेच फणसातील फायबर आणि अँटी ऑक्सिडंट्समुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत होते. त्यामुळे हृदयविकाराचा धोका देखील कमी होतो.

३. हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते

रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यास फणस मदत करतो. फणसामध्ये आयर्न भरपूर प्रमाणात असल्यामुळे ऍनिमिया, अशक्तपणा आणि थकवा कमी होण्यास मदत होते.

४. हाडांना बळकटी येते 

फणसामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे नियमित स्वरूपात फणस खाणे हाडांना बळकटी देते तसेच सांधेदुखी कमी होण्यास मदत होते.

५. स्नायूंना बळकटी मिळते

फणसाच्या गऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असल्यामुळे स्नायूंच्या आरोग्यासाठी फणस उपयुक्त आहे.

स्नायू आणि मासपेशी मजबूत होण्यासाठी त्याचा उपयोग होतो.

६. भरपूर अँटीऑक्सिडंट्स मिळतात 

फणसामध्ये भरपूर अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे त्याच्या सेवनामुळे कॅन्सर, हृदयविकार, टाइप २ मधुमेह आणि मोतीबिंदू ह्यासारख्या समस्यांवर फणस गुणकारी आहे.

७. मुबलक प्रमाणात फायबर मिळते

फणसामुळे आपल्याला मुबलक प्रमाणात फायबर मिळते. त्यामुळे अन्न पचनास आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होते.

बद्धकोष्ठ असणाऱ्या लोकांनी फणसाची भाजी अथवा गरे जरूर खावेत.

८. अल्सरवर गुणकारी

फणसात असणाऱ्या घटकांमुळे जठरातील अल्सरचा त्रास कमी होतो.

तसेच आतडयाना झालेल्या जखमा भरुन येण्यास मदत होते.

तर हे आहेत बहुउपयोगी असणाऱ्या फणसाचे गुणधर्म. अशा प्रकारे फणस वेगवेगळ्या आजारांवर गुणकारी आहे.

परंतु इतक्या सर्व प्रकारे फणस उपयुक्त असला तरी कोणतीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तरच ती खऱ्या अर्थाने उपयोगी ठरते. नाहीतर त्यामुळे नुकसान देखील होऊ शकते.

फणसाचे देखील खूप अतिरिक्त सेवन केल्यास पोट दुखणे, पोट फुगणे, जुलाब अशा समस्या होऊ शकतात. त्यामुळे फणसाचे गरे हे प्रमाणातच खावे.

तसेच खूप जेवण झाल्यावर फणस खाऊ नये, त्यामुळे पोटाला तड लागू शकते. फणस खीर अथवा दुधाबरोबर देखील खाऊ नये. जुलाब होऊ शकतात.

तर हे आहेत फणसाचे गरे खाण्याचे वेगवेगळे फायदे आणि नुकसान.

आपल्या पूर्वजांना देखील ह्या फायद्यांची कल्पना असणार, त्यामुळेच तर ह्या सीजन दरम्यान येणाऱ्या वटपौर्णिमेला दिल्या जाणाऱ्या वाणात फणसाचा देखील समावेश असतो, जेणेकरून आवर्जून फणस खाल्ला जाईल…

चला तर मग, आपणही आता नियमित गरे खाऊन फणसाच्या गुणधर्मांचा लाभ घेऊया.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.