‘रिग्रेट्स ऑफ डाईंग’ या बेस्ट सेलर पुस्तकाचा मराठी सारांश

Regrets of the Dying marathi

मृत्यू हे जीवनाचे चिरंतन सत्य आहे. जन्ममरणाचा फेरा कोणालाच चुकला नाहीये. जो जन्माला येतो तो एक ना एक दिवस मरणार हेच शाश्वत आहे.

पण ह्या जन्म आणि मृत्यूच्या मध्ये जे जीवन आहे ते मात्र कोण कसे जगले हे महत्वाचे आहे.

आपले जीवन कसे जगायचे ते आपल्याच हातात असते असे सहजपणे म्हटले जाते खरे, पण खरंच तसं आहे का?

“ब्रोंनी वेर” ह्यांनी एक खूपच इंटरेस्टिंग पुस्तक लिहिले आहे,‘रिग्रेट्स ऑफ डाईंग’ ‘Regrets of the Dying’ त्या पुस्तकात त्या काय म्हणतात ते आपण पाहूया.

ब्रोंनी पेशाने नर्स आहेत त्यामुळे त्यांच्या कामाच्या ठिकाणी त्यांचा मरणाऱ्या व्यक्तींशी खूपच जवळून संबंध आला आहे. त्यांचे तेच अनुभव त्यांनी ह्या पुस्तकात मांडले आहेत.

लेखिका आपल्या पुस्तकात म्हणतात की जवळपास सर्वच लोक मरताना आपल्या जीवनात घडलेल्या घटना, घेतलेले निर्णय ह्यांच्या बाबतीत पश्चाताप करताना दिसतात. काही अपूर्ण राहिलेली स्वप्ने आणि इच्छा त्यांना मरणशय्येवर असताना आठवतात आणि त्याबद्दल वाईट वाटते. पश्चाताप होतो.

त्यातील काही निवडक दुःख, पश्चाताप आपण समजून घेऊया

१. मी माझे जीवन माझ्या इच्छेप्रमाणे का जगलो नाही? इतरांच्या हाती माझे जीवन का सोपवले?

मनुष्य शेवटच्या घटका मोजत असताना त्याचे किंवा तिचे संपूर्ण आयुष्य त्यांच्या डोळ्यासमोरून एखाद्या सिनेमाप्रमाणे जाते असे म्हणतात.

असे होत असताना काही प्रसंग सुखद असतात आणि काही दुःखद. अशा वेळी त्या व्यक्तिला ही जाणीव तीव्रतेने होते की आपण आपले आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगलो नाही. इतरांचा विचार करून, त्यांच्या मर्जीने आपण आयुष्य जगलो.

काही वेळा विद्यार्थीदशेत असताना कोणाला स्वतःच्या मनाप्रमाणे शिक्षण घेता आलेले नसते. काही वेळा नोकरीचा निर्णय घेताना कुटुंबाचा विचार करून मनाविरुद्ध निर्णय घ्यावा लागलेला असतो, एखाद्या हुशार स्त्रीला कुटुंबासाठी नोकरी सोडावी लागलेली असते, अश्या अनेक तडजोडी करून देखील जर आयुष्यात सुख मिळाले नसेल तर त्या व्यक्तीला आपण स्वतःच्या इच्छेने न जगता इतरांसाठी जगलो ह्याचा शेवटी पश्चाताप होतो.

२. मी आयुष्यभर इतके कष्ट का केले? पैश्यांमागे का धावत राहिलो?

बरेचदा अधिकाधिक पैसा मिळवण्याच्या नादात मनुष्य कष्ट करत राहतो. भरपूर पैसे मिळाले म्हणजे सर्व सुखे मिळाली असे तो वाटून घेतो. परंतु ह्या पैश्यामागे धावताना, नोकरी धंदा करताना आपण आपल्या कुटुंबाकडे लक्ष दिले नाही, जोडीदारासमवेत जास्त वेळ घालवला नाही, म्हाताऱ्या आई वडिलांना जास्त वेळ दिला नाही ही सगळी खंत मात्र त्याला शेवटच्या क्षणी जाणवते.

आपल्या मुलांचे बालपण आपण गमावले, त्यांच्या वाढीच्या वयात त्यांच्याबरोबर नव्हतो असे विचार शेवटी मनात येतात. सततची धावपळ करण्यापेक्षा काही काळ घरच्यांना दिला असता तर जास्त सुखी झालो असतो असा पश्चाताप शेवटच्या घटका मोजताना लोकांना वाटतो.

३. मी माझ्या मनातले विचार बोलून का दाखवले नाही? का गप्प राहिलो?

माणसात आणि प्राण्यात हाच फरक आहे की माणसांना त्यांच्या भावना व्यक्त करता येतात. आपल्याला एखाद्या बद्दल वाटणाऱ्या भावना आपण शब्दातून व्यक्त करू शकतो.

भावना चांगल्या असोत अथवा वाईट त्या व्यक्त होणे फार आवश्यक असते. एखाद्या बद्दल वाटणारे प्रेम व्यक्त केले की ते प्रेम वाढते, आणखी द्विगुणित होते.

तसेच एखाद्या विषयी नकारात्मक भावना मनात असतील आणि त्या सांगितल्या नाहीत तर मनात एक प्रकारचा कडवटपणा येतो. चिडचिड वाढते. तेच जर भावना बोलून दाखवल्या तर मन शांत होते.

आपण सगळे समाजाचा एक भाग आहोत आणि समाजात राहताना आपल्या मनातील भावनांचा निचरा होणे आवश्यक ठरते. बऱ्याच लोकांना शेवटी ही खंत वाटते की त्यांनी त्यांच्या मनातील भावना व्यक्त केल्या नाहीत अन्यथा त्यांचे आयुष्य वेगळे असले असते.

कडवटपणावर आधारलेली नाती सांभाळत बसण्यापेक्षा व्यक्त होऊन सुखाने जगलो असतो असा पश्चाताप त्यांना शेवटच्या घटका मोजत असताना होतो.

४. मी माझ्या मित्र मैत्रिणींशी जास्त संपर्क ठेवायला हवा होता

माणसाच्या आयुष्यात मित्रमंडळीचे स्थान फार महत्वाचे असते. परंतु लहानपणापासून असणारी मैत्री पुढे मात्र काम आणि इतर जबाबदाऱ्या सांभाळताना मागे पडत जाते. मित्रांना नियमित भेटणे शक्य होत नाही.

अनेक मित्र मैत्रिणींशी साधा संपर्क ठेवणे, नियमित फोनवर बोलणे अशा गोष्टी केल्या जात नाहीत. मग नंतर मात्र ह्या गोष्टीची खंत वाटत राहते. आपले मित्र फक्त सुखातच नव्हे तर दुःखात, अडचणीत देखील आपल्याला साथ देतात.

परंतु आपणच जर त्यांच्याशी संपर्क ठेवला नसेल तर ते तरी का आपल्याला येऊन भेटतील. मग हा पश्चाताप शेवटच्या घटका मोजताना होतो.

५. मी जीवनाचा जास्त आनंद लुटायला हवा होता

बरेचदा आपण आनंदी आहोत हे इतरांना भासवण्याच्या नादात आपण आपला आनंद कशात आहे हे विसरून जातो. इतरांच्या कलाने वागताना स्वतःचा आनंद, आपले जीवन आपण विसरून जातो. शिवाय आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन काहीच करत नाही.

ह्या गोष्टीचा पश्चाताप नंतर होतो पण तेव्हा उशीर झालेला असतो. हातातून वेळ निघून गेलेली असते. आणि पश्चाताप करण्यापलीकडे हातात काही उरत नाही.

तर हे आहेत काही पश्चाताप जे लेखिकेला तिच्या हॉस्पिटलमधील रुग्णांच्या बाबतीत आढळले. त्याबद्दल पुस्तकात त्यांनी सविस्तर लिहिले आहे.

ह्या गोष्टीचा वेळीच विचार करा आणि पश्चाताप होण्याआधी आयुष्य भरभरून जगा.

तुम्ही आहात तोपर्यंत तुम्हाला काय काय करावेसे वाटते ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा.

मनाचे श्लोक

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

2 Responses

  1. Pramod R Naik says:

    रिग्रेट्स ऑफ डाईंग’ या बेस्ट सेलर पुस्तकाचा मराठी सारांश अतिशय सुरेख पद्धतीने या लेखात मांडला आहे. मरणाच्या जवळ असलेल्या माणसांनी आपल्या जीवनात जगताना काही गोष्टी राहून गेल्याची खंत, अनुभव यात वर्णन केलेले आहेत मला वाटत आपल्या ला त्याचा विचार करून आपल्या प्रत्येकाच्या जीवनात पुढील वाटचाल करताना त्या गोष्टीचा नीट विचार केला व त्या आचरणात आणल्या तर नक्कीच खुप फायदा होईल पुढील जीवन आनंदी व सुखकारक होईल.
    मनाचे talks टीम च्या अश्या नवनवीन, अनोख्या उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा व मनापासून धन्यवाद.

  2. प्रमोद रा. नाईक says:

    रिग्रेट्स ऑफ डाईंग’ या बेस्ट सेलर पुस्तकाचा मराठी सारांश अतिशय सुरेख पद्धतीने या लेखात मांडला आहे. मरणाच्या जवळ असलेल्या माणसांनी आपल्या जीवनात जगताना काही गोष्टी राहून गेल्याची खंत, अनुभव यात वर्णन केलेले आहेत मला वाटत आपल्या ला त्याचा विचार करून आपल्या प्रत्येकाच्या जीवनात पुढील वाटचाल करताना त्या गोष्टीचा नीट विचार केला व त्या आचरणात आणल्या तर नक्कीच खुप फायदा होईल पुढील जीवन आनंदी व सुखकारक होईल.
    मनाचे talks टीम च्या अश्या नवनवीन, अनोख्या उपक्रमाला खुप खुप शुभेच्छा व मनापासून धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!