मालिका लेखन….

TV-serial

नवीन सुरू झालेल्या सिरियलमध्ये संतोष दिघेचे नाव वाचून मी चक्रावूनच गेलो. “च्यामारी….! हा कधीपासून लेखक झाला. परीक्षेत आमचे पेपर पाहून पास होणारा आज लेखक म्हणवून घेतोय याचेच आश्चर्य वाटले “.  न राहवून त्याला फोन केला.

तेव्हा “भाऊ.. तुझ्याच फोनची वाट पाहत होतो मी. तू फोन करणार याची खात्री होतीच मला. संध्याकाळी भेटू . पण त्या विक्रमला घेऊन येऊ नकोस. सरळपणे बोलणार नाही तो “.

म्हटले ठीक आहे. संध्याकाळी त्याच्या नेहमीच्या अड्ड्यावर जाऊन बसलो. अड्डा म्हणजे एक इराण्याचे हॉटेल, जिथे तो पडलेला असायचा. मला पाहताच जोरदार मिठी मारली. ख्याली खुशाली विचारल्यावर मी त्याच्या लेखनाचा विषय काढला “भोxxxxxच्या …तू कधीपासून लेखक झालास ???

तसा हसून म्हणाला” कसला रे लेखक … मनात आणलेस तर तुही छान लेखक बनशील”.

“ते कसे ….”मी उत्सुकतेने विचारले.

“बघ भाऊ… हल्ली लिहायला काही फारसे डोके लागत नाही. हा! रहस्यकथा किंवा गूढकथा लिहायला थोडा विचार करावा लागतो. पण कौटुंबिक कथा लिहायला अजिबात विचार करावा लागत नाही. एक सुंदर दिसणारी नायिका पाहिजे आणि तिला छळणारे सासू, किंवा सासरे आणि दीर, नणंद, पाहिजेत. तिला लग्नाआधी खूप बिनधास्त, निडर दाखवायचे घोडयावर बसणारी, नदीत पोहणारी, गुंडांचा हात पकडणारी मग तिचे लग्न करून दयायचे. एकतर तिच्या मर्जीने होतेय असे दाखवायचे किंवा तिच्या मर्जीविरुद्ध. पण कसेही झाले तरी तिला लग्नानंतर आदर्श सून, पत्नी, वहिनी दाखवायचे आणि नंतर तुला पाहिजे तेव्हडे दिवस तिच्यावर होणारे अत्याचार, मानसिक छळ दाखवायचे”

“अरे पण त्याला काही लिमिट असेल ना ..”?मी चिडून म्हणालो.

” नाही त्याला लिमिट नाही. छळाचे अनेक प्रकार आहेत जसे भाजीत भरपूर मसाला टाकणे. रात्री फॅन बंद ठेवणे. सासूचे खोटे खोटे डोके दुखणे आणि सुनेने रात्रभर तिची सेवा करणे. असे अनेक प्रकार दाखवू शकतो. नवरा दुसऱ्या बाईकडे गेला की तिच्या घरी जाऊन तिच्या हातापाया पडून नवऱ्याला घरी आणणे त्यासाठी ती सांगेल ती शिक्षा सहन करणे यावरच तीन एपिसोड जातील” संतोषकडे उत्तरे तयार होती.

” पण लोक किती दिवस सहन करतील हे …?” मी वैतागून म्हणालो.

“अरे करतात ..त्या एका सिरियालमध्ये नाही का नायिकेला मूल होण्यासाठीच पन्नास एपिसोड लागले. पूर्ण महाराष्ट्रात तिच्या गरोदरपणाची चर्चा होती आणि नायिका जितकी सोशिक तितके भाग वाढत जाणार. नायिका शिकलेली असेल तर तिचा नवरा गावंढळ दाखवायचा, ती शिकलेली नसेल चाळीत राहणारी असेल तर तिचा नवरा खूप शिकलेला श्रीमंत दाखवायचा. ती उद्योगधंद्यात हुशार असेल तर घरात बिनडोक दाखवायची. ती जितकी साधीभोळी असेल त्याच्याविरुद्ध तिचा नवरा, सासू हुशार दाखवायचे” संतोष डोळे मिचकावत म्हणाला.

“लोकांना कंटाळा नाही का येणार तेच तेच बघून …??मी म्हटले.

” कोण म्हणतो लोकांना कंटाळा येईल. दर पन्नास एपिसोड नंतर नायिका बदलायची, नाहीतर तिचा नवरा, नंतर तिची सासू. म्हणजे नवीन कलाकारांना संधी मिळेल आणि कथेचे आणखी चार एपिसोड वाढतील” संतोषकडे प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तयार होते.

“पण समजा लोकांना कंटाळा आला तर ??? मी ठामपणे बोललो.

“हरकत नाही.. शेवटच्या सात एपिसोडमध्ये नायिका सर्वांना वठणीवर आणते असे दाखवायचे आणि सिरीयल संपवायची. तोपर्यंत पाचशे भाग झालेले असतात. अरे.. माझी पुढची सिरीयल चालू होण्याआधीच मी पन्नास भाग लिहून ठेवले आहेत. नुसत्या नायिकेच्या लग्नावरच दहा एपिसोड लिहिले आहेत. सत्तर एपिसोड नंतर तिचा नवरा किंवा ती एकमेकांवर प्रेम करू लागतील. ते फक्त तीस एपिसोड पर्यंत राहील मग त्याचा किंवा तिचा अपघात होईल त्यात त्यांचा चेहरा बिघडेल ,स्मृती जाईल. मग नवा चेहरा ,नवीन कथा. जशी निर्माता, डायरेक्टर सांगेल तसे. दर पन्नास् एपिसोडनंतर नवीन पात्राची एन्ट्री, कोणतरी नायिकेच्या बाजूने तर बहुतेक तिच्या विरुद्ध. माझी सिरीयल पाहणाऱ्या बायका दरवेळी पुढचा एपिसोड उत्सुकतेने बघतील बघ तू”. संतोष चा तो आत्मविश्वास पाहून मी हादरून गेलो.

वाचण्यासारखे आणखी काही…..

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!