डायबिटीसचे अचूक निदान करण्यासाठी Hba1c टेस्ट करणे गरजेचे का आहे?

Hba1c टेस्ट

मधुमेह किंवा डायबीटीस हे नाव आता जवळजवळ सगळ्यांना ओळखीचे झाले आहे. भारत हि जगभरात मधुमेहाची राजधानी म्हणून ओळखली जाऊ लागली आहे.

आपल्या सर्वांसाठी ही चिंतेची बाब आहे की सध्या भारतातील १२ ते १५ % जनता मधुमेहाने ग्रासलेली आहे.

मधुमेहाचे प्रमाण शहरात राहणाऱ्या लोकांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येते. तसेच आता तरुण लोकांमध्ये मधूमेह होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे.

त्याला अर्थातच बैठी जीवनशैली, जंक फूडचा अतिरेक, व्यायामाचा अभाव अशी अनेक निरनिराळी कारणे आहेत.

मधुमेह हा असा आजार आहे की त्याचे तात्पुरते परिणाम तर दिसतात परंतु मुख्यत्वे दूरगामी परिणाम जास्त असतात. मधुमेहाला ‘सायलंट किलर’ असे म्हटले जाते. कारण रक्तातील साखरेचे प्रमाण जर नियंत्रणात नसेल तर त्याचा शरीरातील अवयवांवर हळूहळू परिणाम होऊन पुढे ते निकामी होऊ लागतात आणि तरुण वयातच जर मधुमेह झाला तर हा त्रास लवकर सुरु होऊ शकतो.

मधुमेह न होऊ देणे हा ह्यावरील सर्वोत्तम उपाय आहे. त्यासाठी डायट कंट्रोल, नियमित व्यायाम, पुरेशी झोप घेणे हे करता येईल.

त्याचबरोबर आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण योग्य आहे ना हे तपासून पाहणे आवश्यक ठरते.

रक्तातील साखरेचे प्रमाण (ब्लड शुगर लेव्हल) प्रयोगशाळेतून तपासून घेता येते किंवा हल्ली चांगल्या प्रतीची ग्लुकोमीटर मिळत असल्यामुळे घरच्या घरी देखील तपासता येते.

बहुतेक वेळा लोक ‘रँडम’ म्हणजे अचानक मोजली जाणारी रक्तातील साखर बघतात. आणि त्यावरून आपल्याला डायबीटीस आहे किंवा नाही हे ठरवून मोकळे होतात.

किंवा जास्त काटेकोरपणे तपासणी करायची झाल्यास ‘फास्टींग’ म्हणजे उपाशी पोटी मोजली जाणारी ब्लड शुगर लेव्हल आणि ‘पीपी’ म्हणजेच जेवणानंतर २ तासांनी मोजली जाणारी ब्लड शुगर लेव्हल बघितली जाते.

डॉक्टर देखील अशा पद्धतीने रक्त तपासणी करून मधुमेहाचे निदान करतात आणि योग्य औषधे सुचवतात.

परंतु काही वेळा अशा पद्धतीने ब्लड शुगर लेव्हल तपासणे फसवे असू शकते. कसे ते आपण पाहूया.

१. जेव्हा रक्ततपासणी करायची असते फक्त तेवढ्याच काळात रुग्ण जाणूनबुजून किंवा नकळतपणे पथ्य पाळणे, कमी जेवणे असे उपाय करतो आणि त्याची ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात आहे असे दिसून येते. खरे तर ती त्या दिवसापूरती नियंत्रणात असते. एरवी वाढलेली असू शकते.

२. दुसरी शक्यता अशी की एखादा रुग्ण एरवी काटेकोरपणे पथ्य पाळत असेल परंतु काही कारणाने नेमके रक्ततपासणीच्या आधी त्याच्याकडून काही कुपथ्य झाल्यास त्याची ब्लड शुगर वाढलेली दिसून येते जी एरवी खरे तर नियंत्रणात असते.

ह्या दोन्ही परिस्थितीत मिळणारे रीपोर्ट फसवे असू शकतात आणि अशा वेळी ह्या दोन्ही रिपोर्टनुसार दिली जाणारी औषधे योग्य ठरणार नाहीत.

काय आहे Hba1c ही रक्त तपासणी?

ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन म्हणजेच Hba1c ही अशी रक्ततपासणी आहे ज्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण तर मोजले जातेच पण मुख्य म्हणजे ते प्रमाण हे तात्पुरते नसून ३ महिन्यांच्या ब्लड शुगर लेव्हलच्या प्रमाणाची सरासरी असते.

म्हणजेच गेल्या ३ महिन्यात रुग्णाच्या रक्तातील साखरेचे सरासरी प्रमाण नक्की किती होते हे ह्या तपासणीमुळे कळते. ही तपासणी मधुमेहाचे निदान करण्यासाठी जास्त विश्वसनीय आहे.

ही तपासणी करण्यासाठी रुग्णाला ‘उपाशीपोटी’ अथवा ‘जेवणानंतर २ तासांनी’ अशी वेळ पाळण्याची गरज नाही. ही तपासणी दिवसातील कोणत्याही वेळी करता येते. रुग्ण आपल्या सोयीने ती केव्हाही करू शकतो.

ही तपासणी कोणी करावी ?

Hba1c ची तपासणी करणे सर्वांसाठी हितकारक आहे. ह्या तपासणीमुळे आपल्याला मधुमेह आहे का ही शंका दूर होऊ शकते. तसेच जर आधीपासून मधुमेह असेल तर तो नियंत्रणात आहे का हे ठरवता येऊ शकेल. त्यामुळे ३५ वर्षावरील सर्व लोकांनी दर ६ महिन्यांनी एकदा ही तपासणी जरूर करावी.

परंतु ही तपासणी घरच्या घरी मात्र करता येत नाही. ती लॅबमधूनच करावी लागते. ही तपासणी करणे फारसे खर्चीक मात्र नाही. अतिशय नाममात्र खर्चात ही तपासणी करून मधुमेहाचे अचूक निदान होऊ शकते.

Hba1c ह्या तपासणीचे निकष काय आहेत?

१. सर्वसाधारण व्यक्तींमध्ये Hba1c ची लेव्हल ४ ते ५.७ इतकी असते. तपासणीत ही लेव्हल आल्यास त्या व्यक्तीला मधुमेह नाही हे सिद्ध होते.

२. जर तपासणीची लेव्हल ५.७ ते ६.४ इतकी आली तर सदर व्यक्ती प्रीडायबेटीक म्हणजेच भविष्यात मधुमेह होऊ शकणारी आहे असे समजते. अशा लोकांनी वेळेवर व्यायाम आणि डायट कंट्रोल करून स्वतःला मधुमेह होण्यापासून रोखावे.

३. मात्र आधीपासून मधुमेह असलेल्या व्यक्तीचे Hba1c चे प्रमाण ५.७ ते ६.४ दरम्यान आले तर त्या व्यक्तीचे मधुमेहावर चांगले नियंत्रण आहे असे समजते. सदर व्यक्तीने आपले रुटीन आहे तसे चालू ठेवून डायबेटीस कंट्रोलमध्ये ठेवावा.

४. जर Hba1c ची लेव्हल ६.५ किंवा त्यापेक्षा जास्त आली तर तुमच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढलेले असून त्यावर तुमचे काहीच नियंत्रण नाही असे समजून येते. अशा लोकांना डायबीटीस आणि त्यापासून होणाऱ्या सर्व त्रासांचा धोका असतो. ह्या लोकांनी त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधे, व्यायाम व डायट सुरु करावे.

५. गरोदर महिला, गंभीर आजाराने ग्रस्त असलेले रुग्ण (हृदयविकार, मूत्रपिंडाचा विकार, कॅन्सर) ह्यांचे Hba1c चे प्रमाण जास्त असू शकते. त्यासाठी अशा महिलानी अथवा रुग्णांनी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

तर मित्र मैत्रीणींनो, इतक्या सोप्या पद्धतीने आपण आपल्याला डायबीटीस आहे की नाही आणि असेल तर तो नियंत्रणात आहे की नाही हे तपासून पाहू शकतो.

नेहेमीच्या रक्ततपासणीबरोबर ही तपासणी देखील अवश्य करून घ्यावी.

परंतु नुसती ही तपासणी करून काही साध्य होणार नाही तर त्या तपासणीच्या रिपोर्टप्रमाणे योग्य उपचार करून घ्यावे कारण मधुमेहाचे जेवढ्या लवकर निदान होईल तेवढ्या लवकर त्यावर नियंत्रण ठेवणे आणि त्यापासून होणाऱ्या आजारांपासून स्वतःला वाचवणे शक्य होते.

तेव्हा सर्वांनी ही तपासणी जरूर करून घ्या. स्वतःच्या तब्येतीबाबत जागरूक रहा.

Manachetalks

लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

2 Responses

  1. PANKAJ GANGADHAR JADHAV says:

    Pre diabetic लोकांसाठी काय पथ्य असावेत आणि रुटीन कस असाव?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!