वेगवेगळी कारणे देऊन कामे टाळण्याची सवय मोडण्यासाठी ९ टिप्स

वेगवेगळी कारणे देऊन कामे टाळण्याची सवय मोडण्यासाठी ९ टिप्स

एखादे काम करण्यास टाळाटाळ करणे, ते काम जमत नाही म्हणून वेगवेगळी कारणे देणे हा मानवी स्वभाव आहे. परंतु वारंवार अशी कारणे देऊन कामे करणे टाळले तर आपण आपली स्वप्ने पूर्ण करू शकणार नाही.

बरेचदा असे होते की एखादी अवघड परिस्थिती निर्माण होते. तेव्हा आपण त्या परिस्थितीला तोंड देण्या ऐवजी कारणे देऊन ती टाळण्याचा प्रयत्न करतो.

परंतु असे करण्यामुळे आपली तात्पुरती सुटका तर होते पण पुढे मात्र काही अडचण निर्माण होऊ शकते. त्याऐवजी प्राप्त परिस्थितीला तोंड देऊन त्यातून मार्ग काढणे श्रेयस्कर ठरते.

नेटाने कामे पूर्ण करण्याऐवजी वेगवेगळी कारणे देऊन ती कामे टाळणे हे बऱ्याच स्तरावर घडताना दिसून येते. ऑफिसमध्ये, व्यवसायात अगदी घरात सुद्धा असे वागण्याकडे लोकांचा कल असतो.

आज आपण लोक अशी कारणे देऊन कामे का टाळतात ते पाहणार आहोत.

१. अपयशाची भीती 

काहीतरी कारण काढून काम टाळण्यामागे त्या कामात येऊ शकणाऱ्या अपयशाची भीती असते. आपल्याला हे काम जमेल की नाही ही अशी भीती वाटून लोक ते काम करतच नाहीत आणि मग त्यासाठी काहीतरी कारणे देतात. अपयश येण्यापेक्षा प्रयत्नच न करणे बरे अशी साधारण मानसिकता असते.

२. अस्थिरता 

सर्वसाधारणपणे मनुष्य स्वभाव असा असतो की कोणालाच आपल्या कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काम करणे आवडत नाही. ही एखादी परिस्थिती अस्थिरता निर्माण करणारी असेल तर ती टाळणे याकडे लोकांचा कल असतो. ठराविक पद्धतीचे काम नसेल तर काहीतरी कारण देऊन ते टाळणे असे सहजपणे केले जाते. एखाद्या कामासाठी आउट ऑफ द वे जाऊन काही प्रयत्न करावे लागणार असतील तर कोणी सहसा ते काम करायला तयार होत नाही.

३. काम करण्याची ऊर्मी न वाटणे

काही लोक आहे त्या परिस्थितीत खुश राहतात. ‘असेल माझ्या हरी तर देईल खाटल्यावरी’ अशी त्यांची मानसिकता असते. नवीन काही करावे अशी उर्मी त्यांना वाटत नाही. त्यासाठी काही प्रयत्न करायची त्यांची इच्छा नसते. नवीन संधी मिळवण्याचा ते काहीच प्रयत्न करत नाहीत. असे लोक कारणे देऊन कामे टाळतात.

अशी कारणे देणे कसे टाळावे?

काही वेळा काम न करण्यासाठी काहीतरी कारणे देणे स्वाभाविक असले तरी ते जर आपल्या प्रगतीच्या आड येत असेल तर तसे करू नये. आज आपण कारणे देणे टाळून कामे पूर्ण करून आपली स्वप्ने कशी पूर्ण करावीत ते पाहणार आहोत.

१. जबाबदारी घ्यायला शिका 

एखादे काम पूर्ण करण्यासाठी त्या कामाची संपूर्ण जबाबदारी घ्यायला शिका. जेव्हा आपल्यालाच हे काम पूर्ण करायचे आहे अशी जाणीव होते तेव्हा आपोआपच कारणे देऊन ते काम टाळणे बंद होते. जबाबदारीने एखादे काम पूर्ण करणे हे प्रगतीकडे टाकलेले पहिले पाऊल असते.

२. दृष्टिकोन बदला

एखाद्या परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन नकारात्मक असू शकतो परंतु त्याच परिस्थितीकडे आपण एक संधी म्हणून बघितले तर ते काम टाळण्याचा प्रश्न उरणार नाही उलट ते काम पूर्ण करून काहीतरी नवीन शिकण्याची संधी मिळाली आहे असा दृष्टिकोन बाळगला तर आपण प्रगतीकडे दुसरे पाऊल टाकू शकतो.

३. आपली क्षमता ओळखा 

बरेच वेळा लोकांना आपल्या क्षमतेची जाणीव झालेली नसते. अशावेळी ते एखादे काम आपल्याला जमणारच नाही अशी समजूत करून घेऊन कारणे देऊन ते काम करणे टाळतात. परंतु आपल्यातील क्षमता वेळीच ओळखा. असे केल्याने आपण आत्मविश्वास पूर्वक कामे पूर्ण करू शकतो. तसेच स्वतःची क्षमता वाढवण्याचा प्रयत्न करणे देखील आपल्याला प्रगतीकडे नेते.

४. स्वतःशी सकारात्मक पद्धतीने वागा 

जर तुम्हाला स्वतःबाबत निगेटिव बोलायची सवय असेल तर असे करणे टाळा. असे निगेटिव्ह बोलण्यामुळे आपण काही करू शकू हा आत्मविश्वास रहात नाही आणि मग कामे टाळण्यासाठी कारणे दिली जातात. तसे न करता स्वतः बाबत सकारात्मक राहा आणि आपली कामे उत्साहाने पूर्ण करा. स्वतःला दोष न देता उलट प्रोत्साहन द्या.

५. केलेल्या चुकांमधून शिका 

आपणच केलेल्या चुकांमधून आपल्याला सर्वात जास्त शिकायला मिळते. आपल्या हातून झालेल्या चुका ओळखून त्यातून योग्य तो धडा वेळीच घ्या. असे करण्यामुळे कोणतेही कारण न देता आपण आपले काम आधीच्या चुका सुधारून पूर्ण करू शकू.

६. अति विचार करू नका 

कोणतेही काम करताना त्या कामाचा अथवा त्यामुळे होणाऱ्या परिणामांचा अति विचार करू नका. योग्य प्रमाणात विचार करणे ठीक आहे. परंतु अति विचार केल्यामुळे काहीवेळा नकारात्मक भावना निर्माण होतात आणि काम करणे टाळण्याकडे माणसाचा कल होतो. त्यामुळे अति विचार न करता लगेच ते काम करायला घेऊन पूर्ण करा.

७. दूरदृष्टी ठेवा 

आपल्याला आयुष्यात काय मिळवायचे आहे ह्याबाबत दूरदृष्टी ठेवा. त्यामुळे आज हातात असलेले काम पूर्ण करण्यासाठी प्रेरणा मिळते. पुढे जाऊन आपल्याला काय काय अचिव्ह करता येईल याचा विचार आजच केला तर हातातील काम सहजपणे पूर्ण होऊ शकते ते टाळण्यासाठी कोणतीही कारणे देण्याची गरज उरत नाही.

८. आपले ध्येय ठरवा 

कोणतेही काम वेळेत आणि योग्य प्रकारे पूर्ण करण्यासाठी समोर काहीतरी ध्येय असणे आवश्यक असते. कोणतेच ध्येय नसेल तर काम टाळण्याकडे कल होतो. तेच जर आपल्या समोर आपले ध्येय असेल तर उत्साहाने काम पूर्ण करता येते. त्यासाठी वेळोवेळी आपल्याला पूर्ण करण्याची ध्येये ठरवून घ्या आणि ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा.

९. वेळोवेळी योग्य मदत मिळवा 

कोणतेही काम स्वतः एकट्याने पूर्ण करण्याचा अट्टाहास करू नका अशावेळी अवघड काम असेल किंवा कंटाळवाणे काम असेल तर ते टाळण्याकडे कल होतो. त्याऐवजी सहकारी किंवा मित्रांची योग्य ती मदत मिळवा आणि कामे पूर्ण कर. असे करण्यामुळे तुमची कामे योग्य वेळेत पूर्ण होतीलच. शिवाय सहकारी आणि मित्रांची चांगले संबंध टिकून राहतील.

तर हे आहेत असे नऊ उपाय ज्यांच्या मदतीने आपण आपली कामे कोणतीही कारणे न देता यशस्वीपणे पूर्ण करू शकतो. या उपायांचा जरूर लाभ घ्या आणि आपली स्वप्ने पूर्ण करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.