डोळ्याभोवतीची काळी वर्तुळे आणि सुरकुत्या घालवण्याचे घरगुती उपाय 

काळे डाग घरगुती उपाय

आपल्या चेहऱ्यावरील पटकन लक्ष वेधून घेणारा अवयव म्हणजे आपले डोळे. परंतु ह्याच डोळ्यांभोवती जर सुरकुत्या आणि काळी वर्तुळे असतील तर त्या व्यक्तीचे वय जास्त वाटते तसेच ती व्यक्ती खूप थकलेली अथवा दमलेली आहे असे वाटते.

वाढत्या वयाबरोबर डोळ्याभोवती काळी वर्तुळे आणि सुरकुत्या येऊ लागतात. वय वाढणे ही नॅचरल प्रोसेस आहे. परंतु कोणीच आनंदाने वाढत्या वयाचा स्वीकार करत नाही. आपण तरुण सुंदर दिसावे असे प्रत्येकालाच वाटते.

परंतु मग अश्या पडणाऱ्या सुरकुत्यांचे काय?

म्हणून आपण आज ह्या लेखात अशा सुरकुत्या आणि काळी वर्तुळे घालवण्याचे घरगुती उपाय पाहणार आहोत. हे उपाय वापरून आपण घरच्या घरी अशा सुरकुत्या घालवून सुंदर दिसू शकतो.

डोळ्यांखालील त्वचा अतिशय नाजूक असते. त्यामुळे त्या त्वचेवर सगळ्यात आधी आणि सगळ्यात जास्त परिणाम होतो. कोणत्याही कारणाने सुरकुत्या पडू लागल्या की त्या सर्वप्रथम डोळ्याखाली दिसतात. खरे तर ही समस्या जसजसे वय वाढेल तसतशी दिसून येते. परंतु अनुवंशिकता किंवा सध्याची धावपळीची लाईफस्टाईल यामुळे हल्ली ही समस्या तरुणांमध्ये सुद्धा दिसून येऊ लागली आहे.

डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि सुरकुत्या का येतात?

वाढते वय हे सुरकुत्यांचे प्रमुख कारण आहे हे तर निश्चित. परंतु तेवढे एकच कारण नाही. इतरही कारणांमुळे तरुण वयातच या समस्येचा सामना करावा लागू शकतो. ती कारणे आपण आज जाणून घेऊया

१. अपुरी झोप 

डोळ्यांभोवती काळी वर्तुळे आणि सुरकुत्या दिसण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे अपुरी झोप. हल्ली धावपळीचे आणि व्यस्त जीवन झाल्यामुळे किंवा तरुणाईची लाईफस्टाईल आधुनिक बनल्यामुळे रात्रीचे जागरण ही एक फॅशनच बनली आहे. परंतु असे जागरण करण्यामुळे पुरेशी झोप मिळत नाही. त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात तसेच तेथील नाजूक त्वचेवर सुरकुत्याही पडू लागतात. दररोज रात्री किमान आठ तास शांत झोप घ्यावी. जागरण मुळीच करू नये.

२. पाणी कमी पिणे 

पाणी कमी प्रमाणात प्यायल्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होते. त्यामुळे त्वचा कोरडी पडणे आणि त्यावर सुरकुत्या पडणे ही समस्या उद्भवते. दिवसाला कमीत कमी मी सात ते आठ ग्लास पाणी पिऊन स्वत:ला हायड्रेटेड ठेवावे.

३. ऊन 

कडक उन्हामुळे त्वचेचा पोत बिघडतो. त्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे दिसू लागतात. खूप जास्त वेळ उन्हात जावे लागणार असेल तर चेहरा झाकणारा रुमाल आणि चांगल्या प्रतीचा गॉगल अवश्‍य वापरावा.

४. टेन्शन, स्ट्रेस 

टेन्शन आणि स्ट्रेस हे देखील सुरकुत्या पडण्याचे हे एक प्रमुख कारण आहे. शक्यतो स्वतःला स्ट्रेस फ्री ठेवण्याचा प्रयत्न करावा. नेहमी आनंदी आणि उत्साही राहावे. चेहरा आपोआप प्रफुल्लित दिसतो.

५. कॉम्प्युटर मोबाईल इत्यादीचा जास्त वापर 

डोळ्यांभोवती काळी वर्तुळे नको असतील तर आपला स्क्रीन टाइम कमी करणे खूप आवश्यक आहे. वर्क फ्रॉम होम करण्यामुळे अनेकांचा बराचसा काय कॉम्प्युटर लॅपटॉप किंवा मोबाइलच्या स्क्रीनसमोर जातो. परंतु याची परिणीती डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्यात आणि सुरकुत्या पडण्यात होते. स्क्रीन टाइम कमी करण्याचा प्रयत्न करावा तसेच डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी.

६. धूम्रपान 

हल्ली पुरुषच नव्हे तर महिलाही सर्रास धूम्रपान करू लागल्या आहेत. परंतु स्त्री असो अथवा पुरुष कोणालाही ही सवय घातकच आहे. धूम्रपान करण्यामुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येण्याचे प्रमाण वाढते.

७. संतुलित आहार 

असंतुलित आहार घेण्यामुळे डोळ्याखालील सुरकुत्या आणि काळी वर्तुळे ह्यांचे प्रमाण वाढते.

डोळ्यांखाली काळी वर्तुळे आणि सुरकुत्या येऊ नयेत यासाठी काय करावे?

सध्याच्या धावपळीच्या जीवनात खालील उपायांनी आपण डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सुरकुत्या येऊ नयेत याचे प्रयत्न करू शकतो.

१. आवश्यक प्रमाणात झोप घ्या. दररोज रात्री किमान आठ तास झोपल्यामुळे संपूर्ण शरीराला तसेच डोळ्यांना विश्रांती मिळते. झोप पूर्ण झाली की डोळ्यांखाली काळी वर्तुळे येत नाहीत. डोळ्यांना आराम मिळून त्यांचे आरोग्य चांगले राहते.

२. धूम्रपानाची सवय असेल तर ती सवय सोडून द्या. धूम्रपान करणे एकूणच आरोग्यासाठी अतिशय घातक आहे. शिवाय त्यामुळे डोळ्याखाली सुरकुत्या येऊन वाढलेले दिसते.

३. भरपूर पाणी प्या. दररोज सात ते आठ ग्लास पाणी पिणे अतिशय आवश्यक आहे. हे डोळ्यांखालील काळ्या वर्तुळांवर करण्याचा हा अगदी साधा आणि अतिशय उपयोगी उपाय आहे.

४. तीव्र उन्हात जाताना चांगल्या प्रतीचा गॉगल अवश्य वापरा. दुचाकी अथवा चारचाकी चालवताना गॉगल लावा. दुचाकी चालवताना ऊन, वारा आणि प्रदूषण ह्यामुळे डोळे खराब होतात. नियमित गॉगल वापरावा. तसेच घरी आल्यावर गार पाण्याने डोळे धुवावेत.

५. सुयोग्य आणि संतुलित आहार घ्या. अशा आहारामुळे शरीराला योग्य पोषण मिळून डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच सुरकुत्या येण्याचे प्रमाण कमी होते.

६. शक्‍यतो पाठीवर झोपा. किंवा झोपताना अधून मधून कुस बदला. एकाच कुशीवर जास्त वेळ झोपल्यास त्या बाजूचा गाल आणि डोळ्यांच्या त्वचेवर सुरकुत्या पडू शकतात.

चेहऱ्यावर आणि डोळ्याखाली सुरकुत्या नको असतील तर खालील दिनचर्या पाळावी.

धकाधकीचे आणि व्यस्त जीवन हेच चेहऱ्यावरील सुरकूत्यांचे प्रमुख कारण होत चालले आहे. असे होऊ नये म्हणून खालील दिनचर्या पाळावी.

१. दररोज नियमित व्यायाम करावा. व्यायामामुळे त्वचा घट्ट राहून त्यावर सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते.

२. दररोज दोन वेळा चेहरा आणि मुख्यत्वे डोळे गार पाण्याने स्वच्छ धुवावे.

३. चेहऱ्याला बदामाच्या तेलाने हलका मसाज करावा.

४. काकडीचे काप डोळ्यांवर ठेवून डोळ्यांना थंडावा द्यावा. गुलाब पाण्याचा वापर देखील करता येऊ शकतो.

डोळ्यांखालील काळी वर्तुळे आणि सुरकुत्या घालवण्याचे घरगुती उपाय 

खालील उपायांनी घरच्याघरी डोळ्यांखालील वर्तुळं वर उपचार करता येतील. बाजारात मिळणारी कृत्रिम मलमे वापरण्यापेक्षा हे घरगुती उपाय जास्त खात्रीशीर सुरक्षित आणि कमी खर्चात होणारे आहेत.

१. पपई 

पपईमध्ये ब्रोमिलिन नावाचे द्रव्य असते. त्यामुळे त्वचेचा पोत सुधारतो. डोळ्याखालील वर्तुळांवर आणि सुरकुत्यांवर पिकलेल्या पपईचा गर लावून ठेवावा. सुकल्यानंतर गार पाण्याने धुऊन टाकावा. हा उपाय अतिशय उपयुक्त आहे.

२. एरंडेल तेल 

रोज रात्री झोपताना डोळ्यांखाली एरंडेल तेलाने हलक्या हाताने मसाज करावा. नियमित स्वरूपात हा उपाय केल्यास काळी वर्तुळे आणि सुरकुत्या दिसेनाशा होतात.

३. खोबरेल तेल 

डोळ्यांखालील त्वचेवर हलक्या हाताने खोबरेल तेल लावल्यास तेथील त्वचा मऊ आणि आर्द्र होते. त्वचेचा कोरडेपणा कमी झाल्यामुळे सुरकुत्या कमी होतात.

४. टोमॅटो 

टोमॅटोचा गर आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण डोळ्यांखाली लावून ठेवावे. त्यामुळे काळी वर्तुळे आणि सुरकुत्या कमी होऊन त्वचा तेजस्वी दिसते.

५. गुलाब पाणी 

मध आणि हळद गुलाब पाण्यात मिसळून पेस्ट तयार करावी. ही पेस्ट चेहऱ्यावर आणि डोळ्यांभोवती काळजीपूर्वक लावावी. साधारण अर्धा तास ठेवून धुऊन टाकावी. हा उपाय दर आठवड्याला एकदा करावा. अतिशय उपयुक्त आहे.

६. काकडी 

काकडीमध्ये अँटी एजिंग तत्वे असतात. काकडी खाणे त्वचेच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी आहे. त्याशिवाय काकडी किसल्यावर निघणारे पाणी किंवा काकडीचा कीस चेहऱ्यावर डोळ्यांभोवती लावून ठेवावा. त्याचा फेस मास्कसारखा उपयोग होतो. काळी वर्तुळे आणि सुरकुत्या खूप कमी होतात.

७. बेसन आणि हळद 

बेसन आणि हळदीचे मिश्रण कोमट पाण्यात भिजवून त्यात थोडासा मध घालावा. हे मिश्रण फेस पॅक प्रमाणे चेहऱ्याला लावावे. चेहऱ्याला ग्लो येऊन सुरकुत्या दिसण्याचे प्रमाण खूप कमी होते.

तर हे आहेत काळी वर्तुळे आणि सुरकुत्यांवर घरच्या घरी करण्याचे सुरक्षित उपाय. त्यांचा जरूर वापर करा आणि तुम्हाला त्यांचा कसा उपयोग झाला ते आम्हाला कॉमेंट करून नक्की कळवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.