जाणून घ्या डायपर रॅश वरील घरगुती उपाय

baby skin allergy home remedy

“आई, हे बघ, बाळाच्या नाजुक त्वचेवर कसं पुरळ आलंय, अगदी लाल झालीये त्वचा. आणि बाळ रडतंय गं सारखं!”

नुकतीच एक महिन्यापूर्वी आई झालेली नेहा घाबरून आपल्या आईला सांगत होती.

“अगं नेहा, हे डायपरमुळे आलेले रॅशेस आहेत. घाबरून जाऊ नकोस. मी तुला ह्यावरचे घरगुती उपाय सांगते.” नेहाची आई नेहाला म्हणाली.

नेहाच्या आईने तिला जे घरगुती उपाय सांगितले तेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. त्यामुळे घरोघरच्या नव्या आई बाबांना त्या उपायांचा उपयोग होईल. त्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

नवजात बालकांची त्वचा अतिशय नाजूक असते. बरेचदा खूप काळजी घेऊनही रॅश येणे ही समस्या उद्भवते. अगदी नवजात बालकापासून दीड वर्षापर्यंतच्या मुलांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळून येते.

डायपर रॅश त्वचा ओलसर राहिल्यामुळे बॅक्टेरियल किंवा फंगल इन्फेक्शन होऊन येतात.

बाजारात मिळणाऱ्या डिस्पोजेबल डायपर्स मध्ये काही रसायनांचा वापर केलेला असतो. तसेच काही प्रमाणात प्लास्टिकचा ही वापर असतो. त्यामुळे ओलसरपणा जाणवला नाही तरी हवा देखील आत येत नाही.

त्यामुळे डायपरच्या आतील त्वचेला इन्फेक्शन होऊ शकते. हे इन्फेक्शन लाल रंगाच्या बारीक पुरळाच्या स्वरूपात असते. असे इन्फेक्शन झाले की लहान मुले चिडचिडी बनतात, सारखी रडतात.

डायपर रॅश का होतात?

१. आईला असे वाटते की डायपर घातल्यामुळे बाळाची त्वचा कोरडी राहिल. परंतु जास्त वेळ डायपर घातल्यामुळे तेथील भागाचा दमटपणा वाढतो. तसेच आतील त्वचेला घाम देखील येऊ शकतो. त्यामुळे बाळाला रॅश येतात.

२. बाळाच्या नाजूक त्वचेवर डायपर वारंवार घासले जाऊन रॅश येतात. त्यामुळे सुती, तलम कापडाचे डायपर वापरणे योग्य आहे.

३. बाळाच्या शी, शू करण्याच्या वेळा बदलल्या तरी डायपर रॅश होऊ शकतात. स्तनपान करणाऱ्या मातांच्या खाण्यात होणाऱ्या बदलांमुळे देखील डायपर रॅश होऊ शकतात.

४. काही विशिष्ट औषधांमुळे देखील असे रॅश येऊ शकतात.

५. अति नाजूक आणि संवेदनशील त्वचा असणाऱ्या बाळांमध्ये ही समस्या जास्त प्रमाणात आढळते.

डायपर रॅशची लक्षणे 

१. डायपर रॅश बाळाच्या डायपर लावलेल्या त्वचेवर येतात. असे रॅश बाळाच्या जांघा, कुले आणि शी, शू करण्याच्या जागांवर येतात.

२. त्या जागेवर लाल पुरळ, बारिक फोड येणे, सगळी त्वचा लाल होणे अशी लक्षणे दिसतात.

३. डायपर बदलताना रॅश आलेल्या जागेवर स्पर्श झाला की बाळ खूप रडते.

४. रॅश आलेल्या जागेवर खाज येते.

५. बाळ खूप चिडचिड करते.

बाळांना डायपर रॅश होऊ नयेत म्हणून काय काळजी घ्यावी?

हल्लीच्या धावपळीच्या आणि व्यस्त लाईफस्टाईलमध्ये बाळांसाठी डायपर वापरणे आवश्यक झाले आहे. वारंवार कपड्याचे लंगोट बदलणे, ते स्वच्छ धुणे वेळेअभावी शक्य होत नाही.

अशा वेळी आधुनिक आया डायपरला पसंती देतात. परंतु डायपर वापरताना खालील प्रकारे काळजी घेतली तर बाळाला रॅश येण्याचा त्रास होणार नाही.

१. ओल्या राहिलेल्या डायपरमुळे रॅश येतात. बाळाने डायपर खराब केल्यावर तो ताबडतोब बदलावा, तेथील त्वचा कोरडी ठेवावी.

२. डायपर बदलण्यापूर्वी आणि नंतर साबणाने हात स्वच्छ धुवावेत.

३. बाळासाठी योग्य मापाचेच डायपर वापरावे.

४. बाळाचे सर्व कपडे अगदी सौम्य साबणाने अथवा डिटर्जंटने धुवावे. म्हणजे त्वचेवर रॅश किंवा खाज येणार नाही.

बाळाचे डायपर बदलताना काय करावे? कोणत्या चुका टाळाव्यात?

१. खराब डायपर बदलताना त्याचा स्पर्श बाळाच्या इतर अंगाला होणार नाही ह्याची काळीज घ्यावी.

२. डायपर काढले की नवे डायपर घालण्याआधी तेथील त्वचा मऊ, ओल्या कापडाने स्वच्छ पुसून घ्यावी व पूर्णपणे कोरडी करून घ्यावी.
१० ते १५ मिनिटे थांबून मगच बाळाला नवे डायपर घालावे.

३. डायपर फार घट्ट बांधू नये.

४. डायपर बदलताना बाळाचे लक्ष दुसरीकडे वळवावे.

डायपर रॅश आले असतील तर करायचे घरगुती उपाय 

१. खोबरेल तेल 

चांगल्या प्रतीचे खोबरेल तेल रॅश आलेल्या जागेवर लावावे. त्यामुळे आग होणे कमी होते तसेच इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते.

२. टी ट्री ऑइल 

डायपर रॅशवर टी ट्री ऑइल खूप गुणकारी आहे. टी ट्री ऑईलमध्ये थोडे पाणी मिसळून त्याने बाळाला रॅश आलेल्या ठिकाणी मसाज करावा. बराच फायदा होतो.

३. पेट्रोलियम जेली 

चांगल्या प्रतीची पेट्रोलियम जेली बाळाच्या रॅशेस वर चोळून लावावी. रॅश कमी होतात तसेच आग होणे आणि खाज येणे कमी होते.

४. कोरफडीचा गर 

रॅश आलेल्या ठिकाणी कोरफडीचा गर लावल्यामुळे थंड वाटते, आग होणे आणि लालसरपणा कमी होतो.

५. आईचे दूध

बाळाच्या पोषणासाठी तर आईचे दूध महत्वाचे असतेच. परंतु डायपरमुळे आलेल्या रॅशवर देखील ते औषधाप्रमाणे काम करते. बाळाच्या रॅशवर आईचे दूध चोळून लावावे आणि ते तसेच उघडे ठेवून वाळू द्यावे. रॅश खूप कमी होतात.

६. व्हिनेगर 

बाळाचे कपडे धुताना ते व्हिनेगरमध्ये बुडवून धुवावेत. त्यामुळे फंगल आणि बॅक्टरीयल इन्फेक्शनचा धोका कमी होतो.

तर हे आहेत डायपर रॅश वर करायचे घरगुती उपाय. हे उपाय वापरून तुम्ही तुमच्या बाळाला रॅश होऊ न देणे किंवा झाल्यास ते लगेच बरे करणे असे करू शकता.

परंतु ह्या उपायांनी आठवड्याभरात रॅश कमी झाले नाहीत, बाळाला ताप येत असेल, रॅश शरीरावर जास्त पसरत असेल तर त्वरित बाळाच्या डॉक्टरांना दाखवा.

सहसा सर्व प्रकारच्या रॅश वर घरगुती उपाय उपयोगी पडतात. त्यांचा अवश्य वापर करा आणि आपल्या बाळाला निरोगी ठेवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.