एक लाख रुपये गुंतवून दररोज दहा हजार रुपये कमावणाऱ्या कर्तृत्ववान महिलेची यशोगाथा

Aanand Mahindra help bangluru shilpa

सुखदुःखाचे दुसरे नाव म्हणजेच आयुष्य. प्रत्येकाच्या आयुष्यात जसे चांगले क्षण येतात तसे वाईट क्षणही येतात. परंतु अशावेळी खचून न जाता जिद्दीने प्रयत्न करून आलेल्या संकटांवर मात करता येते. चिकाटीने प्रयत्न केले की यश दिसू लागते हे नक्की.

संकटात असताना हार मानून गप्प बसण्यापेक्षा संकटावर मात करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणारे लोक आपल्याला आजूबाजूला दिसतात. त्यापैकीच एक आहे मंगलोरची शिल्पा.

आज आपण शिल्पाच्या जिद्दीची कहाणी जाणून घेणार आहोत. एखाद्या सिनेमातील वाटावी अशी तिची गोष्ट आहे. तिने कष्ट करून कशाप्रकारे संकटावर मात केली ते आपण पाहूया आणि त्यापासून प्रेरणा घेऊया.

उद्योगशील महिलांसाठी प्रेरणा असणारी शिल्पा 

अगदी सर्वसामान्य मुलींसारखं बालपण घालवलेली शिल्पा लग्नाआधी केवळ हौस म्हणून स्वयंपाक करत असे. पुढे जाऊन हेच आपल्या कमाईचे साधन बनणार आहे अशी तिला कल्पना देखील नव्हती.

शिल्पा सांगते की २००५ मध्ये लग्न होऊन जेव्हा ती मंगलोरला आली तेव्हा तिला अशी कल्पना देखील नव्हती की पुढे फुड ट्रक सुरू करून त्यावर तिला गुजराण करावी लागणार आहे.

ती पुढे सांगते की ह्या व्यवसायात ती आनंदाने नव्हे तर नाईलाजाने आली आहे. समोर आलेल्या संकटावर मात करण्यासाठी तिने तो मार्ग स्वीकारला. परंतु नंतर मात्र कष्टाने आणि जिद्दीने तिने हा व्यवसाय पुढे नेला आहे. आता ती मंगलोर मधील एक प्रसिद्ध व्यक्ती बनली आहे. मागे वळून पाहताना तिचा हा प्रवास थक्क करणारा वाटतो.

९ वर्षांपूर्वी नवरा सोडून गेला परंतु तिने हार मानली नाही 

आपली कहाणी सांगताना भावूक झालेली शिल्पा म्हणते “२००८ मध्ये अचानक माझे पती व्यवसायाची सुरुवातीची सामग्री आणायला बंगलोरला जातो असे सांगून जे गेले ते परत आलेच नाहीत. त्यांनी माझ्याशी सर्व संबंध तोडून टाकले.” पदरी ३ वर्षाचे लहान मुल असलेली शिल्पा एकदम खचुन गेली.

तिच्या लहानग्या मुलाच्या पालनपोषणाची आणि भविष्याची सर्व जबाबदारी अचानकपणे तिच्या अंगावर येऊन पडली. परंतु खचून न जाता यातून मार्ग काढण्याचे शिल्पाने ठरवले. तिच्या डोक्यात फूड ट्रक सुरू करण्याची आयडिया आली. त्यावेळी हा व्यवसाय चालेल किंवा नाही ह्याची काहीही कल्पना नसताना शिल्पाने जिद्दीने पाऊल पुढे टाकले. हळूहळू तिच्या कष्टांना यश येत गेले आणि लोक तिला ओळखू लागले, तिच्या फूड ट्रक मधून खाण्याचे पदार्थ घेऊ लागले .

केवळ एक लाख रुपये गुंतवून व्यवसाय सुरू केला 

शिल्पाचे पती तिला सोडून जाताना सर्व पैसा-अडका बरोबर घेऊन गेले होते. तिच्यासाठी त्यांनी काहीही रक्कम मागे ठेवली नव्हती. परंतु मुलाच्या उज्वल भवितव्याच्या दृष्टीने शिल्पा आधीपासूनच काही रक्कम साठवत होती.

असे साठवलेले एक लाख रुपये तिच्याजवळ होते. एक लाख रुपयांमध्ये दुकान खरेदी करून अथवा भाड्याने घेऊन कोणताही व्यवसाय सुरू करणे तिला शक्य वाटत नव्हते. इतक्या कमी भांडवलात कोणताही व्यवसाय फार काळ सुरू ठेवणे शक्य होणार नव्हते. शिल्पासमोर उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न उभा राहिला. पण काहीही करून स्वतःच्या पायांवर उभे राहायचे असे तिने ठरवले होते.

घरासमोरील महिंद्रा कंपनीचे शोरूम पाहून अचानक शिल्पाच्या डोक्यात ट्रक घेऊन त्याचे फूड ट्रकमध्ये रूपांतर करून पदार्थ बनवून विकण्याची कल्पना आली.

तिने त्यादृष्टीने चौकशी केली असता नवीन ट्रक खरेदी करण्यासाठी कर्ज हवे असेल तर एक लाख १८ हजार रुपयांचे डाऊन पेमेंट करणे आवश्यक असल्याचे तिला कळले. तिच्याजवळ केवळ एक लाख रुपये होते. डाऊन पेमेंट व्यतिरिक्त पदार्थ बनवण्यासाठी लागणारा कच्चामाल, भांडी, गॅस इत्यादीचा खर्च देखील तिला करायचा होता.

शिल्पा समोर भांडवलाचा मोठा अडथळा उभा असताना सरकारच्या ‘महिला उद्योजक रोजगार’ योजनेबद्दलची माहिती तिला समजली. या योजनेअंतर्गत गरजू, होतकरू महिलांना उद्योगधंदा सुरु करण्यासाठी भांडवल पुरवले जाते. ह्या योजनेअंतर्गत असे भांडवल मिळवून त्यात स्वतःकडचे एक लाख रुपये गुंतवून शिल्पाने नवीन ट्रक खरेदी केला.

तसेच व्यवसायासाठी लागणारी इतर सामग्री देखील खरेदी केली. तिच्या जवळचे साठवलेले सर्व पैसे असे गुंतवणे हे मोठे धाडसाचे काम होते. परंतु शिल्पाने न डगमगता व्यवसाय सुरु केला.

सुरुवातीला नगण्य नफा, परंतु आता मिळतात दिवसाला दहा हजार रुपये 

अतिशय कष्टाने सुरू केलेल्या ह्या व्यवसायात अगदी सुरुवातीला शिल्पाला नगण्य नफा मिळत असे. कोणत्याही नवीन व्यवसायात असेच होत असते. तेथे गरज असते ती शांतपणे पेशन्स ठेवून कष्ट करत राहण्याची.

shilpa-food-truck

शिल्पाने तेच केले. चिकाटी न सोडता तिने व्यवसाय सुरू ठेवला. तिच्या कष्टांना हळूहळू यश येऊन आता ती मंगलोर मधील फूड ट्रक असणारी एक प्रसिद्ध व्यक्ती बनली आहे. आता तिला दिवसाला जवळजवळ दहा हजार रुपये इतका नफा होतो. ती सांगते की आता मी माझ्या मुलाचे उज्वल भविष्य घडवू शकते असा विश्वास मला आहे.

प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्र यांनीदेखील शिल्पाच्या या कष्टांची दखल घेतली आहे. त्यांनी ट्विट करून शिल्पा बद्दल माहिती तर सांगितली शिवाय तिला सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही दिले आहे.

शिल्पा सांगते की आनंद महिंद्र यांच्या ट्विट नंतर तिच्याकडे येणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत वाढ झाली आहे. आवर्जून तिच्याकडे ऑर्डर देऊन तिला मदत करण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. त्यामुळे तिचा उत्साह आणि उमेद देखील कैक पटींनी वाढली आहे.

या ट्विट नंतर महिन्याभरात आनंद महिंद्रांनी त्यांचा शब्द पाळला आणि शिल्पाच्या दुसऱ्या आउटलेटसाठी बोलेरो ट्र्क चावी तिला सुपूर्द केली.

 शिल्पा तिच्या नवीन Bolero Maxi Truck Plus ची चावी घेताना

शिल्पा तिच्या नवीन Bolero Maxi Truck Plus ची चावी घेताना

तर अशी ही महिला उद्योजिका शिल्पाची प्रेरणादायी कहाणी. जीवनात संघर्षाचा काळ आला तर त्यावर मात करून पुढे जात राहावे असे ही आपल्याला सांगते. कोणे एकेकाळी पतीने साथ सोडल्यावर शिल्पाच्या मनात जीवन संपवण्याचे विचार देखील आले होते.

परंतु त्यावर मात करून, जिद्दीने उभी राहून तिने यशस्वी होण्याकडे वाटचाल केली. स्वतःचा तसेच आपल्या मुलाचा उदरनिर्वाह उत्तमपणे चालवता येईल, मुलाला चांगले उच्च शिक्षण देता येईल इतकी कमाई करून दाखवली.

आपणही या कहाणीतून प्रेरणा घेऊन जिद्दीने आयुष्यातील संकटांवर मात करूया.

शिल्पाची ही संघर्षमय परंतु यशस्वी कहाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हा लेख आपल्या मित्र आणि नातेवाईक मंडळींना जरूर शेअर करा.

Manachetalksसदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!