तिची मुलगी

daughter

आसावरीच्या बारा वर्षाच्या मुलीच्या अपघाती मृत्यूची बातमी ऐकून आम्ही हादरून गेलो.

आसावरी ….आमच्या ऑफिसमधील सहकारी. तिच्या नवऱ्याचा दीर्घ आजाराने मृत्यू झाला म्हणून त्याच्या जागेवर तिला घेतले होते. अतिशय शांत बाई. खाली मान घालून काम करणारी आणि प्रामाणिक. तिच्या नवऱ्याच्या ओळखीमुळे कोणी तिच्या वाटेलाही जात नव्हते. तिला निधी नावाची गोड मुलगी होती. आसावरी कधी कधी माझ्याशी बोलायची. बोलण्यावरून कळायचे ती आणि तिची मुलगी हेच त्यांचे जग. दोघीही एकमेकात खुश असायच्या. कुठेतरी पिकनिकला गेली आणि अपघातात मृत्यू झाला. बातमी ऐकताच सर्व ऑफिस सुन्न झाले होते. सांत्वन करायला तिच्या घरी कसे जायचे..? ती कशी रिऍक्ट होईल..? काय तिची अवस्था झाली असेल ..?? याची चर्चा ऑफिसमध्ये चालू झाली. काहीजणांनी तिचे दुःख पहावणार नाही म्हणून घरी जाण्याचे टाळले.

मी ऑफिस सुटल्यावर तिच्या घरी गेलो. मनाशी काय बोलावे कसा आधार दयावा हे निश्चित करून गेलो होतो. बेल वाजवली तेव्हा दार तिनेच उघडले. तिचा शांत चेहरा पाहून मी चमकलो. मला पाहून क्षीणपणे हसून तिने आत बोलावले. मी शांतपणे चटईवर बसलो. तिने पाणी आणून दिले आणि समोर बसली. वातावरणात तो नेहमीचा तणाव जाणवत होता.

धीर एकटवून मी म्हटले …”झाले ते वाईट झाले”.  तशी ती उत्तरली नाही “जे झाले ते चांगलेच झाले”….तिच्याकडून आलेले उत्तर ऐकून मी चमकलो “काय बोलतेस तू हे “??

“बरोबर बोलतेय भाऊ ” किती दिवस मुलीचे टेन्शन सहन करीत जगायचे ?? जेव्हा झाली तेव्हा मी सोडून सर्व दुःखी झाले. त्यानंतर घरातल्यांचे टोमणे खावे लागले. दुसऱ्या मुलाची तयारी करायची ठरवली तेव्हा हे आजारी आणि त्यातच ते गेले. मुलगी मोठी होऊ लागली तशी तिची काळजी वाटू लागली. माझ्याशिवाय कोण आहे तिला ?? मी कामावर गेल्यावर ती कशी रहात असेल. शाळेत तिच्याबरोबरीचे कसे वागत असतील??? याचीच सारखी काळजी वाटत असते. क्लासला गेली आणि पाच मिनिटे जरी यायला उशीर झाला तरी जीव घाबरा व्हायचा. रस्त्यावरून चालताना ती सोबत असली तरी नजर आजूबाजूला भिरभिरायची. बसमध्ये तिच्या शेजारी कोण पुरुष बसला तरी जीवाची घालमेल व्हायची. त्या दिवशी सोसायटीच्या वॉचमनने तिच्या डोक्यावर टपली मारली तेव्हा किती चिडले होते मी त्याच्यावर. पेपर आणि बातम्यांमध्ये लहान मुलींवरचे अत्याचार ऐकून जीव अजून घुसमटायचा”.

“मान्य आहे मला. पण काही गोष्टीमुळे सर्व जगाला दोषी ठरवून कसे चालेल. नकारात्मक गोष्टीच आपल्या आयुष्यात घडणार हे ठरवून चालायचे का” ?? मी हळू आवाजात म्हटले.

“हो भाऊ ….मी नकारात्मक विचार करतेय. पण हल्ली काय चालू आहे पाहिलेत ना. हिला पुरेसा वेळ देता येत नव्हता मला. मीच आई, मीच बाप तिचा. एकटी कुठे कुठे पुरी पडणार ?? उद्या कॉलेजला जॉबला गेल्यावर तिचे काय होईल. किती जणांच्या नजरेपासून तिला वाचवू. ती गेली तेव्हा प्रचंड आघात झाला माझ्यावर. माझे पिलू होते हो ते. पण उद्यापासून तिची काळजी करायची गरज नाही ह्या विचारानेच मला शांत झोप लागली. तुम्हाला विचित्र वाटत असेल पण खूप मोकळे वाटते आहे मला”.

तिचे बोलणे ऐकून मनात कुठेतरी हललो मी. मला माहित होते ती स्वतःच्या मनाचे समाधान करतेय. पण आता या क्षणाला तिचे हे वागणेच योग्य वाटले मला.

वाचण्यासारखे आणखी काही…..

आमचा हरी
सिझरिंग
रेल रोको इन ‘आमची मुंबई’….

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!