महिन्याच्या ५ तारखेआधी P.P.F. मधील गुंतवणूक फायदेशीर

Public Provident Fund

गुंतवणुकीचा P.P.F. हा पर्याय सगळ्यांनाच माहिती असतो. त्याचे फायदेही माहितीच असतात. पी.पी.एफ. म्हणजेच पब्लिक प्रॉव्हिडंट फंड हा असा निधी आहे ज्यात गुंतवणूक केल्याने दीर्घकालीन बचत तर होतेच, परंतु आयकर कायद्याच्या कलम ८० अंतर्गत सवलतही मिळते. शिवाय आजकाल इंरटनेट बँकिंगमुळे बँकखात्याचे सगळेच व्यवहार पार पाडणे अगदी सोपे झाले आहे. बसल्या जागी एका क्लिकद्वारे कोणत्याही खात्यातून रक्कम कोणत्याही खात्यात पाठवता येते. त्यामुळे  इतर व्यवहारांसारखेच पी.पी.एफ.च्या खात्यात पैसे ट्रान्सफर करणेही सोपे झाले आहे. मग (बँकेचे नियम पाळून) त्याला वेळ-काळ असे कोणतेच बंधन उरत नाही.

पी.पी.एफ.मध्ये दर वर्षी दीड लाखांपर्यंतची गुंतवणूक करमुक्त असते. ही रक्कम वर्षातून एकदाच एकत्रित गुंतवता येते किंवा दर महिन्याला ठराविक रक्कम गुंतवूनही करता येते. एकत्रित रक्कम जमा केल्याने व्याज अर्थातच जास्त मिळते, परंतु सगळ्यांनाच एवढी रक्कम एकत्र गुंतवणे शक्य नसते. त्यामुळे दर महिन्याला थोडी-थोडी रक्कम गुंतवणेही चालते. पण, ह्यासाठी पी.पी.एफ. खात्याची कार्यपद्धती जाणून घेणे आवश्यक आहे.

पी.पी.एफ. खात्यावर मिळणारे व्याज हे दर महिन्याला खात्यात उपलब्ध असलेल्या कमीतकमी रकमेवर दिले जाते. ही रक्कम ठरवण्यासाठी दर महिन्याला ५ तारखेपासून महिनासंपेपर्यंतचा कालावधी ग्राह्य धरला जातो.  प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेपासून महिनाअखेरीपर्यंतच्या कालावधीत खात्यात जेव्हा केव्हा कमीतकमी रक्कम असेल, ती रक्कम अंकीत करून महिना संपल्यावर त्या रकमेवर मासिक व्याज दिले जाते.

उदाः

समजा, तुमच्या खात्यावर दि. ०६ जून रोजी रू. १०,००० इतकी रक्कम शिल्लक होती. मासिक गुंतवणूक म्हणून दि. २२ जून रोजी तुम्ही रू. ५,००० इतकी रक्कम ट्रान्सफर केली. दि. २३ जून रोजी तुमच्या खात्यावर एकूण रू.१५,००० इतकी रक्कम शिल्लक होती. महिनाअखेरीसही तुमच्या खात्यात एकूण रू.१५,००० इतकी रक्कम शिल्लक होती. व्याज देण्यासाठी बँकेने दि. ०५ जून ते दि. ३० जून ह्या कालावधीतील तुमच्या खात्याचे आणि त्यात झालेल्या व्यवहारांचे अवलोकन केले. तुमच्या खात्यात जून महिन्यात २२ तारखेला १ व्यवहार सापडला.

आता, व्याजाची गणना त्या महिन्याच्या दि. ५ ते महिनाअखेरीपर्यंतच्या कालावधीत खात्यात असलेल्या कमीतकमी रकमेवर होते. जून महिन्यात तुमच्या खात्यावरील कमीतकमी रक्कम ही रू. १०,००० इतकी होती. म्हणजेच, तुम्हाला जून महिन्याचे व्याज रू.१०,००० ह्या रकमेवर मिळेल.

याचाच अर्थ तुम्ही जून महिन्यात केलेल्या रू.५,००० च्या गुंतवणुकीचा काहीही फायदा झाला नाही. पी.पी.एफ.मध्ये हे पैसै गुंतवूनही त्यावर तुम्हाला व्याज मिळाले नाही.

असे का झाले?

जर हीच गुंतवणूक दि. २२ जून ऐवजी दि. ०४ जूनला केली असती, तर दि. ०५ जून नंतरही तुमच्या खात्यावर एकूण रू. १५,००० शिल्लक असते आणि कमीतकमी रक्कम म्हणून हीच रक्कम ग्राह्य धरली गेली असती. त्यामुळे जून महिन्याचे व्याज हे रू.१०,००० ऐवजी रू. १५,००० वर मिळाले असते.

दुसऱ्या बाजूला, ज्यांना रू. १,५०,००० इतकी गुंतवणूक एकत्रितपणे करणे शक्य असते त्यांनीही हा नियम पाळला तर त्यांनाही अधिक लाभ होतो. दीड लाखांची रक्कम एकत्रित भरणे शक्य असल्यास केवळ आयकरातून सूट मिळवण्यासाठी आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत ही रक्कम भरणे ह्याला गुंतवणूक म्हणता येणार नाही. त्याऐवजी हीच रक्कम आर्थिक वर्षाच्या सुरूवातीला जमा केली तर ही रक्कम (त्यापुढे आणखी रक्कम न गुंतवल्यास) संपूर्ण वर्षातली कमीतकमी रक्कम म्हणून ग्राह्य धरली जाईल आणि वर्षभर व्याज अधिक मिळेल.

पी.पी.एफ. हा गुंतवणुकीचा एक उत्तम पर्याय आहे. त्यात संपूर्ण आर्थिक वर्षात कधीही एकूण दीड लाखांइतकी गुंतवणूक केल्यास आयकर कायद्यातील सवलत घेता येतेच, परंतु अधिक सजग राहून दर महिन्याच्या ५ तारखेआधी मासिक/वार्षिक गुंतवणूक केल्यास आणखी फायदा होतो.

वाचण्यासारखे आणखी काही…..

शेअरबाजार- आक्षेप आणि गैरसमज
‘द साऊथ सी बबल’…एका जागतिक महाघोटाळ्याची कथा
पैशाचा उड्डाणपूल बांधूया

1 COMMENT

  1. निवृत्त झाल्यानंतर किती दिवसात pf मिळतो?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.