कृतज्ञतेचा सिद्धांत – Gratitude turns what we have into enough.

Law of attraction Gratitude turns what we have into enough आकर्षणाचा सिद्धांत मराठी

एका मध्यमवर्गीय भारतीय व्यक्तीला विचारलं की तुला काय हवं आहे, तर त्याचं उत्तर काय असेल?

१) मला खूप खूप पैसे हवे आहेत. (काही कोटी रुपये)

२) मला छान सुंदर, भव्य आणि प्रशस्त घर हवं आहे.

३) मला एक हाय एंड कार पाहिजे. (ऑडी, मर्सिडीज, बी एम डब्लू)

४) अविवाहीत असेल त्याला आकर्षक जोडीदार हवा. विवाहित व्यक्तीला आपल्या साथीदारासोबत कमी कमी होतचाललेला रोमान्स पुन्हा फुलवायचा आहे.

५) माझा व्यवसाय खूप मोठा व्हावा. माझ्या हाताखाली पन्नास/पाचशे माणसे काम करावीत.

६) मनसोक्त भटकंती, फॉरेन ट्रीप्स, जीवापाड प्रेम करणारी माणसं, नातेवाईक आणि समाजामध्ये सन्मान

७) मानसिक शांती

बस्स! इतनासा ख्वाब है।

पण वास्तविकता काय आहे? सध्या तुमच्या आयुष्यात काय सुरु आहे. पैशाची चणचण आहे. इतक्या महिन्यांच्या लॉकडाऊनमुळे सगळ्या योजना बारगळल्या आहेत. अविवाहीत मुलामुलींची लग्न जुळत नाहीत. लग्न झालेल्यांचे छोट्या छोट्या गोष्टींवरुन खटके उडत आहेत. आपल्या बरोबरीचे पुढे गेले. आपण मात्र मागे राहीलो अशी भावना मनात घर करत आहे.

कोरोनामूळे रोज कोणाच्या ना कोणाच्या मृत्यूच्या बातम्या कानावर पडत होत्या आणि वाईट बातम्यांनी मन विषण्ण होत होते, गेल्या एका वर्षात आपण प्रत्येकाने कूठल्यातरी जवळच्या किंवा ओळखीच्या व्यक्तीला गमावले आहे.

आपल्या मनात विचार कोणते येतात? मला कोरोना झाला तर, मी नापास झालो तर, माझा व्यवसाय बंद पडला तर, माझी नौकरी गेली तर अशा नको नको त्या शंकाकुशंकानी आपले मन वेळीअवेळी चिंतित होते. आकर्षणाचा सिद्धांत सांगतो की आपण ज्या गोष्टीवर चित्त एकाग्र करतो ती गोष्ट प्रत्यक्षात येते.

आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सुप्त मनाला हवं किंवा नको हे समजत नाही. त्याला फक्त वस्तू किंवा दृश्य दिसतात.

तुम्हाला मी सांगितले की समुद्रकिनाऱ्याचे चित्र डोळ्यासमोर आणा तर एका सेकंदात तुम्ही समुद्राचे चित्र आपल्या डोळ्यासमोर
आणाल. पण जर तुम्हाला मी सांगितले की माकडाचे चित्र डोळ्यासमोर आणू नका. तर कितीही प्रयत्न केला तरी थोड्या वेळासाठी का होईना माकड नजरेसमोर दिसेलच.

ही आपल्या अंतर्मनाची जडणघडण आहे. त्याला नको, नाही हे शब्द कळत नाहीत. त्याला फक्त चित्र आणि भावना कळतात.

आपण आपले मन समस्यांवर एकाग्र केले तर समस्यांमध्ये वाढ होईल. त्याऐवजी आपण आपल्याला मिळालेल्या वरदानांवर आपले मन खिळवले पाहिजे.

मी जर तुम्हाला सांगितले की आयुष्यातील समस्यांची यादी बनवा तर किती तक्रारींची यादी बनवाल? अपूरे पैसे, नात्यांमधील तणाव, आरोग्याच्या तक्रारी, योग्य संधींचा अभाव, मुलांच्या शिक्षणाचा लॉस, भविष्याची अनिश्चितता, किंवा काहींसाठी तर अगदी ‘जेलमध्ये बंद असल्याची भावना’… अशा पाच दहा तक्रारी आपल्या सर्वांच्या मनात असतील.

पण मी जर सांगितले की एक पेन आणि पेपर घ्या आणि तुम्हाला मिळालेल्या वरदानांची यादी बनवा. तक्रारींच्या यादीच्या तूलनेत ती यादी कितीतरी मोठी असेल. तुम्हाला शेकडो वरदाने मिळाली आहेत. फक्त तुम्हाला त्याची जाणीव आहे की नाही हाच खरा प्रश्ण आहे.

तुम्ही जिवंत आहात हेच सर्वात मोठे वरदान आहे. जगामध्ये रोज पन्नास हजार लोकांचा मृत्यु होतो. पण त्या मृतांच्या यादीत आपला क्रमांक अजून आला नाही ही आनंदाची गोष्ट नाही का?

एखादा म्हणेल, मला खूप मोठ्या आर्थिक समस्या आहेत. मी त्यांना एकच गोष्ट विचारेन. कोणी तुम्हाला एक कोटी दिले तर आपले डोळे द्याल का? तुम्हाला लाखमोलाचे शरीर मिळाले आहे त्याची तुम्हाला किंमत का नाही?

एखाद्या गर्भश्रीमंत व्यक्तीने पन्नास कोटी रुपये देऊ केले तर त्याला आपल्या किडन्या द्याल का? आपले हात, आपले पाय, शरीराचा एखादा अवयव द्याल का? नाही.

आपल्याला धडधाकट, निर्दोष आणि सुदृढ शरीर मिळाले हे सुद्धा कितीतरी मोठे वरदान आहे. संस्कृतमध्ये एक श्लोक आहे. कराग्रे वसते लक्ष्मी, करमुले सरस्वती!

आपल्या दोन हातांमध्ये लक्ष्मी आणि सरस्वती दोघीही वसलेल्या आहेत. शरीराने तंदूरुस्त आणि मनाने प्रसन्न असलेली व्यक्ती स्वतःसाठी संधी निर्माण करु शकते. भौतीक सुखे मिळवण्याची तुमची खरोखर तीव्र इच्छा असेल तर तुम्ही डोकं चालवून आणि कष्ट करुन हव्या तितक्या संपत्तीला आकर्षित करु शकता.

आपली स्वप्नं पूर्ण करण्यासाठी आपल्या समस्यांना अवाजवी महत्व न देता आपल्याला आशिर्वादरुपामध्ये मिळालेल्या उपहारांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. मिळालेल्या प्रत्येक गोष्टीसाठी या ब्रम्हांडाला मनापासून धन्यवाद देण्यास सुरु करा. आज हा लेख वाचल्याबरोबर पेन पेपर हातात घ्या आणि एक छोटीशी यादी बनवा.

त्या यादीत तुम्हाला मिळालेली वरदाने लिहा. समस्यांचा पाढा लवकर संपतो पण वरदाने कधीही संपत नाहीत. माझा दावा आहे की
तुम्ही लिहता लिहता थकून जाल पण ब्लेसिंग्जची यादी कधीही संपणार नाहीत.

जगामध्ये एकशे पन्नास कोटी लोक असे आहेत ज्यांच्या डोक्यावर छत नाही. आपण बातम्या वाचतो की फूटपाथवरील लोक थंडीने कुडकुडून किंवा उन्हाची तीव्रता सहन न झाल्याने मृत पावले.

ते थंडी, पाऊस आणि उन्हामूळे गेले नाही तर बेघर असल्यामूळे गेले. तुम्हाला एक सुरक्षित निवारा भेटला आहे त्याबद्द्ल त्या विधात्याचे मनापासून आभार माना.

सकाळ संध्याकाळ जेव्हा तुम्ही डायनिंग टेबलवर जेवायला बसता तेव्हा तुमचा टेबल विविध चवदार खाद्यपदार्थांनी, वेगवेगळ्या मिष्ठान्नांनी भरलेला असतो की नाही?

जगामध्ये कोट्यावधी लोकांना रोज दोन वेळेला पोटभर जेवण मिळत नाही. मग अन्न मिळाल्याबद्दल आपण परमपित्याचे मनापासून आभार का मानत नाही? कृतज्ञता व्यक्त केल्याने आपल्याकडून ब्रम्हांडाला सकारात्मक चुंबकीय तरंगे पाठवली जातात. जो कृतज्ञ असतो, त्याला आणखी भरभरून दिले जाते.

तुमच्या आजूबाजूला तुमच्यावर प्रेम करणारी माणसं आहेत ही किती आनंदाची आणि भाग्याची गोष्ट आहे. आपले कुटूंबिय, आपला जोडीदार, आपली मुले यांच्याकडून मिळणाऱ्या प्रेमाची उब किती मौल्यवान आहे. आपल्याकडे जोपर्यंत माणूस मरत नाहीत तोपर्यंत त्याची वाहवा होत नाही.

पण जिवंतपणी आपण माणसांची किंमत करायला शिकलं पाहिजे. आपल्याला छान आणि प्रेमळ कुटूंबिय लाभले यासाठी आपण ब्रम्हांडाला कोटी कोटी धन्यवाद दिले तरी ते कमी पडतील.

तुम्ही ज्या गोष्टीबद्द्ल वारंवार मनापासून धन्यवाद द्याल ती गोष्ट तुमच्याकडे आकर्षित व्हायला लागेल. अनेक पटींनी वाढू लागेल. सध्या कमी पगाराची नौकरी असेल तरी त्याला धन्यवाद द्या.

लवकरच मोठ्या पगाराची नौकरी करण्याची संधी चालून येईल. तुम्हाला आयुष्यात कधीनाकधी यश आणि अपयश दोन्ही मिळाली असतील.

अपयशांना सोडा. यश मिळाले ते आठवा आणि मनापासून त्या क्षणांना धन्यवाद द्या. भुतकाळात घडलेल्या कडवट घटनांना, आठवणीना सोडून द्या.

चांगल्या आनंददायी आठवणींबद्द्ल ब्रम्हांडाला मनापासून धन्यवाद द्या. छोट्या छोट्या यशाचे सोहळेसुद्धा जल्लोषात साजरे करा. यश, आनंद, सुख, वैभव इतरांसोबत वाटायला सुरु करा. आनंद द्विगुणित होईल. अपयशांवरच लक्ष द्याल, वारंवार अपयशाचेच विचार मनात आणाल तर आणखी मोठी अपयशे पदरात पडतील.

लोक म्हणतात, श्रीमंत लोक श्रीमंत होतात. गरीब लोक गरीब होत जातात. पण हे पुर्ण सत्य नाही. जो कृतज्ञ आहे, त्याच्यामध्ये सकारात्मक उर्जा निर्माण झाल्यामूळे तो जगाला आवश्यक असलेली सेवा देण्यासाठी सक्षम होतो. त्याबदल्यात त्याला संपत्ती मळते.

जो तक्रारखोर आहे, कृतज्ञ नाही त्याच्यामध्ये पैसे खेचून घेण्याची ताकत तयारच होत नाही. परिणामी तो रखडत रखडत जीवन ढकलतो आणि प्रत्येक गोष्टीमध्ये दोष शोधतो.

जर तुम्ही दहा जणांना घरी जेवायला बोलवले आणि त्यातील फक्त दोन जणांनी आपल्याला मनापासून धन्यवाद दिले तर आपण त्या दोघांना आयुष्यभर विसरणार नाही, अगदी त्याचप्रमाणे हे ब्रम्हांडसूद्धा जे लोक त्याचे मनापासून आभार मानतात त्यांना आणखी द्यायला कधीही विसरत नाही.

कृतज्ञता दोन प्रकारे व्यक्त केली जाते. एक तोंडाने बोलून आणि दुसरी हृदयापासून अंतःकरणपुर्वक आभारतरंगे पाठवून. दुसरा प्रकार अधिक प्रभावी आहे. आभार इतके सच्चे आणि मनापासून मानावेत की शरीरात रोमांच उत्पन्न व्हावेत. आतमध्ये गुदगूल्या व्हाव्यात.

एकदा तरी ही कृतज्ञतेची जादू अनुभवून बघा. पुढचे चोवीस तास डोळ्याला दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद द्या. ज्या लोकांमूळे तुम्हाला किंचितही काही मिळाले असेल, त्यांना फोन करुन धन्यवाद द्या.

तुमच्या आयुष्यात पुढे जाण्यासाठी सहाय्यक बनले असतील त्यांना धन्यवाद द्या.

मनाला कृतज्ञतेच्या भावनांनी भिजवून टाका. आभार आणि धन्यवाद या शब्दांनी हृदयाला ओथंबून टाका. कोणी किंचितही प्रेरणा दिली असेल, प्रोत्साहन दिले असेल, मदत केली असेल त्या प्रत्येक व्यक्तीचे मनापासून आभार माना.

आकर्षणाचा सिद्धांत कृतज्ञतेपासून सुरु होतो आणि कृतज्ञतेपाशीच येऊन थांबतो.

आभार आणि शुभेच्छा!

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.