इच्छेचे दृढ संकल्पामध्ये आणि प्रखर ज्वलंत इच्छाशक्तीमध्ये रुपांतर कसे करावे?

Winners must have two things. Definite goals & Burning desire to achieve them.

Banner

आकर्षणासाठी अत्यावश्यक असणारं इंधन – ज्वलंत इच्छाशक्ती

बरेच जणांची खंत असते. जेव्हा केव्हा आम्ही प्रेरणादायी लेख वाचतो, आम्हाला ते विचार पटतात. लेख वाचून त्यामध्ये सांगितलेल्या कृती करुन आम्हाला स्वतःमध्ये एक उच्च प्रकारची सकारात्मक उर्जा जाणवायला लागते. पण नंतर हळूहळू पुन्हा आमची गाडी मुळपदावर येते.

सगळे काही माहीत असुनही आम्ही आधीसारखेच वागू लागतो. ‘कळते पण वळत नाही’, ही अशी आमची अवस्था बदलता येणे शक्य आहे का?

तुम्ही प्रत्येकाने तुमची ध्येय ठरवली असतील, तुम्हाला काय आकर्षित करायचे आहे हे लिहुन काढले असेल. पण ते फक्त दिवास्वप्न आहे, का ती तुमची ज्वलंत इच्छाशक्ती आहे यावरच तुमचे भविष्य अवलंबून असणार आहे.

नुसत्या इच्छा माणसाला यश मिळवून देत नाहीत. संकल्प माणसाला उर्जा देतो. आलेल्या अडचणींवर मात करण्याचं बळ देतो.

कुठल्याही मोठ्या आणि असामान्य कामाचा उगम एका छानशा कल्पनेतूनच होतो. कल्पना येणं फारसं आव्हानात्मक आणि अवघड नसतं. पण त्या कल्पनेला वास्तवात साकारण्यासाठी न थकता प्रयत्न करत राहणं यासाठी एक अत्यावश्यक गोष्ट म्हणजे ज्वलंत इच्छाशक्ती.

ज्याच्याकडे ज्वलंत इच्छाशक्ती नसते ती व्यक्ती खूप लवकर विचलित होते. थोडीशी अडचण आली की कूठलेही काम अर्ध्यातून सोडून देते. असे का होते? कूठल्याही कामाची जेव्हा सुरुवात केली तेव्हा माणूस प्रचंड उत्साही असतो. मात्र काळ हळूहळू त्यातला रस पिऊन टाकतो.

सुरुवातीला प्रचंड एक्सायटेड वाटणारी गोष्ट थोड्या काळानंतर रटाळ आणि कंटाळवाणी वाटायला लागते. म्हणून आपले संकल्प
दिर्घकाळ टिकत नाहीत. म्हणून आपल्यात ही धरसोड वृत्ती जन्माला येते.

कुठलेही नवे ध्येय समोर ठेवले, एखादे नवे काम हाती घेतले की अडथळे हे येणारच. कधी आर्थिक समस्या, कधी शारीरिक तर कधी मानसिक समस्या. समस्यांची काहीच कमतरता नसते. त्या तर येतच राहणार. ज्यांच्याकडे पुरेशी इच्छाशक्ती नसते असे लोक हा ताण झेलू शकत नाहीत आणि शेवटी हार मानून अडथळ्यांना शरण जातात.

पण ज्या व्यक्तीने स्वतःशी दृढ संकल्प केलेला असतो, ज्याची इच्छाशक्ती कायम प्रज्वलित असते, तो माणूस कितीही मोठे
अडथळे आले तरी त्यांना भीक घालत नाही आणि आपल्याला हवे आहे ते मिळवूनच उसंत घेतो.

जे त्या लोकांना जमते ते आपल्याला का जमू नये? इच्छा आणि ज्वलंत इच्छा यांच्यामध्ये नेमका काय फरक काय? इच्छेचे दृढ संकल्पामध्ये आणि प्रखर ज्वलंत इच्छाशक्तीमध्ये रुपांतर कसे करावे? याविषयी आजच्या लेखात मी तुम्हाला तीन प्रभावी मार्ग सांगणार आहे.

माझा दावा आहे की या साध्या सोप्या युक्त्या तुम्ही दररोज वापरल्या तर तुम्हाला हवे असलेली प्रत्येक गोष्ट आकर्षित करण्याची सिद्धी तुम्हाला प्राप्त होईल.

१) ज्वलंत कारण

कारणे माणसाला शक्ती आणि बळ देतात. एखाद्या माणसाची आर्थिक परिस्थिती खराब आहे. त्याला त्याच्या आई वडीलांना, पत्नीला आणि मुलांना कसेबसे गरीबीत दिवस ढकलावे लागतात.

आता त्याला इतर कुठल्या मोटीव्हेशनची गरजच नाही. त्याचे जर त्याच्या आईवडीलांवर मनापासून प्रेम असेल, पत्नीच्या आणि मुलांच्या हालअपेष्टा पाहून त्याचे ह्रदय तिळतिळ तुटत असेल तर तो कधीही आळशीपणा करणार नाही. कामात चालढकल करणार नाही. याउलट आपल्या कूटुंबियांना चांगल्यात चांगल्या सुखसुविधा पुरवता याव्यात म्हणून तो आकाशपाताळ एक करील.

एखाद्या माणसाचे घर खराब आहे. खराब वास्तूमूळे त्याला अपमान झेलावे लागतात तो माणूस नवी सुंदर देखणी आणि आकर्षक वास्तू बांधेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. तो रोज झटून काम करेल कारण त्याच्याजवळ मेहनत आणि कष्ट करण्याचे एक सबळ कारण आहे.

आईवडीलांना सुखाचे दिवस दिसावेत अशी इच्छा असणारा मुलगा मन लावून अभ्यास करील. पेपरमध्ये बातम्या येतात. ऑटोवाल्याचा मुलगा कलेक्टर झाला. भाजीवाल्याची मुलगी समाजात गरीबीमुळे ज्यांना किंमत दिली जात नाही, अपमान केला जातो, तीच मुलेमुली पुढे ज्वलंत इच्छाशक्तीच्या बळावर नेत्रदिपक प्रगती करतात. एकदा हृदयात आग लागली की पैशाचा अभाव, साधनांची कमतरता किंवा संधींचा अभाव त्यांना रोखू शकत नाही.

अनेक लठ्ठ आणि दिसायला कुरूप अशा तरुणींना मी स्वतःचे आकर्षक, सुंदर व्यक्तिमत्वामंध्ये रुपांतर करताना बघितले आहे.

त्या सर्वांपाशी एक प्रखर आणि ज्वलंत कारण होते. ज्वलंत कारण ज्वलंत इच्छाशक्तीला जन्म देते. प्रगती करायची असेल तर तुमच्यापाशी एक ज्वलंत कारण असले पाहिजे. आपल्या ज्वलंत कारणांची एक यादी बनवा.

२) नेमकं काय हवय?

मी थोड्या काळामध्ये खूप श्रीमंत होणार आहे असं म्हणणारा कधीही श्रीमंत होत नाही. कारण किती काळ आणि किती पैसे याची माहिती त्याने आपल्या अंतर्मनाला पुरवलेली नसते. अनेक वर्ष निघून जातात पण हे थोडे दिवस काही संपत नाहीत.

आपल्या मेंदुला एकदम नेमकी आणि बारीकसारीक माहिती पुरवा. मला सप्टेंबर २०२२ पर्यंत पन्नास लाख रुपये कमवायचे आहेत.
मला जून २०२२ पर्यंत दहा किलो वजन कमी करायचे आहे.

अशी वाक्ये तुमच्यासाठी पुढील दरवाजे उघडतील. तुमच्या पुढच्या योजनांचा मार्ग प्रशस्त करतील. जोपर्यंत स्वप्नांना वेळेच्या सीमांमध्ये बांधले जाणार नाही, त्यांचे ध्येयांमध्ये परावर्तन होणार नाही.

३) किंमत चूकवण्याची तयारी आहे का?

या जगात काहीही फूकट मिळत नाही. कशाच्यातरी बदल्यात काहीतरी द्यावे लागते. तुमचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी, तुम्ही मनाशी बाळगलेले ध्येय साध्य करण्यासाठी आवश्यक किंमत चुकवण्याची तुमची तयारी आहे का? त्यासाठी आवश्यक तो त्याग करण्याची तुमची तयारी आहे का? लोकांना सगळं काही हवं असतं पण त्याबदल्यात काहीही सोडण्याची त्यांची तयारी नसते, म्हणून ते जिथल्या तिथे रखडत राहतात.

विराट कोहलीसाठी बटर चिकन म्हणजे जीव की प्राण होते. पण ज्या दिवशी त्याला कोचने सांगितले की हे सोडावे लागेल, त्याने आजपर्यंत बटरचिकनला स्पर्शही केलेला नाही.

लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी गायला लागल्यापासून एकदाही आईस्क्रीम खाल्ले नाही. काहीतरी मिळवण्यासाठी कशाचा तरी त्याग करावा लागतो हे त्यांना माहीत होते.

आपली स्वप्ने पुर्ण करण्यासाठी आपल्यालाही कशाचा ना कशाचा त्याग करावा लागेल. जर तुम्हाला एखाद्या क्षेत्रात अद्वितीय बनायचे आहे, झोपेचा त्याग करण्याची तुमची तयारी आहे का?.

जर तुम्हाला वजन कमी करुन स्वतःचे शरीर पिळदार आणि आकर्षक बनवायचे असेल त्याबदल्यात चरबीयुक्त आणि गोडधोड पदार्थांचा त्याग करुन अंगदुखेपर्यंत व्यायाम करण्याची तुमची तयारी आहे का?

अभ्यास करुन मोठा आधिकारी बघण्याची स्वप्ने असतील तर युट्युब, वेबसिरीज आणि मुव्हीज यांचा त्याग करण्याची तयारी आहे का?

मोठा उद्योगपती बनून स्वतःचं साम्राज्य उभा करण्याची इच्छा असेल तर चैनीचं आणि मौजमजेच्या आयूष्याचा त्याग करण्याची तयारी आहे का?

अटलबिहारी वाजपेयी एका कवितेत म्हणतात, ‘शत शत अरमानोंको दलना होगा, कदम मिलाकर चलना होगा’.

असं समजा हा एक यज्ञ आहे. यज्ञ पुर्ण झाल्यावर नक्कीच यश मिळते पण त्याबदल्यात यज्ञात कशाची ना कशाची आहूती
द्यावी लागते.

तसेच कार्यसिद्धी करण्यासाठीही कसले ना कसलेतरी बलिदान द्यावे लागते. सिद्धार्थ नावाच्या युवकाने स्वतःच्या घराचा, पत्नीचा आणि मुलाचा त्याग केला नसता तर गौतम बुद्ध जगाला मार्गदर्शन करु शकले नसते.

आवश्यक असलेल्या गोष्टी करायच्या आणि अनावश्यक गोष्टींचा त्याग करायचा हे खूप सोपे आहे. आज आत्ता हा लेख वाचून झाल्याक्षणी एक यादी बनवा की तुमच्या मार्गात अडथळा बनणाऱ्या कोणकोणत्या गोष्टींचा तुम्ही त्याग करणार आहात?

एखादी आवडती गोष्ट सोडून दिली त्याचा जास्त विचार करु नका. त्याबदल्यात जी उच्च गोष्ट साध्य होणार आहे आपले संपुर्ण लक्ष तिकडे वारंवार घेऊन जा.

आपले उच्च करीअर, आपल्याला मिळालेली धन संपत्ती, आपले सुबक, आकर्षक शरीर, आपले आर्थिक साम्राज्य यांची चित्रे आपल्या मनात घोळवा म्हणजे त्यासाठी सोडून दिलेल्या गोष्टी तुम्हाला अजिबात छळणार नाहीत. उलट आत्मनियंत्रण केल्याबद्द्ल तुम्हाला स्वतःचा गर्व वाटू लागेल.

आभार आणि शुभेच्छा!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय