जाणून घ्या लवंगांचा चहा कसा करायचा? काय आहेत त्याचे औषधी गुणधर्म?

lavang tea benefits marathi

भारतीय स्वयंपाकात मसाल्याच्या पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो हे तर आपण सगळे जाणतोच. त्या मसाल्याचा पदार्थांपैकी एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजे लवंग.

परंतु लवंगेचा उपयोग फक्त मसाल्याचा पदार्थ म्हणून स्वयंपाकातच होत नाही तर लवंग ही अतिशय औषधी देखील असते. आयुर्वेदात अनेक प्रकारची औषधे तयार करताना लवंगांचा वापर होतो. दातदुखीवर लवंग आणि लवंगांचे तेल अतिशय गुणकारी आहे हे तर सर्वश्रुतच आहे.

आज आपण लवंगांचा चहा कसा करायचा आणि त्याचे औषधी गुणधर्म नक्की कोणते आहेत हे जाणून घेणार आहोत.

लवंगांचा चहा करायला लागणारे साहित्य आणि त्याची कृती 

लवंगांचा चहा बनवण्याच्या निरनिराळ्या कृती आहेत. काही लोक आपल्या नेहमीच्या चहा लवंग घालून त्याचे सेवन करतात. तर काही लोक हर्बल टी मध्ये लवंग घालून त्याचे सेवन करतात.

आज आपण मधाचा वापर करून केलेली लवंगांच्या चहाची कृती पाहणार आहोत.

साहित्य 

लवंगा – ४ ते ५

पाणी – १ ग्लास

मध – १ ते २ चमचे

कृती 

४ ते ५ लवंगा किंचित भाजून त्यांची पावडर करून घ्या. बाजारात तयार लवंगाची पावडर मिळते परंतु त्यात भेसळ असण्याची शक्यता असल्यामुळे घरच्या घरी अशी पावडर करावी. ही पावडर करणे अगदी सोपे असल्यामुळे ती घरीच सहज करता येऊ शकते.

जास्त प्रमाणात पावडर करून ठेवून ती दररोज वापरल्यास वेळ वाचतो. अशी पावडर करून ठेवल्यास ती फ्रीजमध्ये ठेवावी. तसेच साधारण ८ ते १० दिवस पुरेल एवढी पावडर एकावेळी बनवावी.

एका पातेल्यात एक ग्लास पाणी घेऊन ते उकळायला ठेवा. त्यामध्ये तयार केलेली लवंगाची पावडर घाला. कमीत कमी तीन ते पाच मिनिटे पाणी उकळा. आता हा तयार झालेला चहा गाळून घ्या. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मध मिसळून गरम चहाचे सेवन करा.

लवंगांच्या चहाचे फायदे आणि त्याचे औषधी गुणधर्म 

१. प्रतिकारशक्ती वाढते 

लवंगांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असतात. त्यामुळे शरीरातील फ्री रॅडिकल्समुळे होणारे नुकसान कमी होते तसेच शरीरातील टाकाऊ पदार्थ (टॉक्सिन्स) कमी होतात. त्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.

२. पचन सुधारते 

दुपारच्या अगर रात्रीच्या जेवणाच्या एक तास आधी असा लवंगांचा चहा प्यायल्यास शरीरातील रक्ताभिसरण वाढते तसेच लाळ निर्माण होण्याची क्रिया वाढते. त्यामुळे शरीराची अन्नपचन करण्याची क्षमता वाढुन खाल्लेले अन्न सहजपणाने पचते. पोट फुगल्यामुळे होणारी पोट दुखी, ऍसिडिटी यावरदेखील लवंगांच्या चहाचे सेवन गुणकारी आहे.

३. वजन कमी होण्यास मदत होते 

लवंगांचा चहाच्या नियमित सेवनाने शरीराची पचनशक्ती सुधारल्यामुळे चयापचयाचा दर देखील वाढतो. त्यामुळे शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होऊन वजन कमी करण्यास मदत होते. स्थूल लोकांनी दररोज लवंगांच्या चहाचे सेवन करावे.

४. दातदुखी वर आरामदायक 

लवंगांमध्ये इन्फेक्शन कमी करणारे तसेच सूज कमी करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे दातांना अथवा हिरड्यांना झालेले इन्फेक्शन कमी करण्यास तसेच हिरड्यांना आलेली सूज कमी करण्यास लवंगांच्या चहाचे नियमित सेवन उपयोगी ठरते. तोंडाला येणारा दुर्गंध कमी करण्यास देखील या चहाचे सेवन फायदेशीर ठरते. दात दुखी असेल तर लवंगांच्या गरम चहाचे सेवन करावे तसेच दुखणाऱ्या दातावर कापसात गुंडाळून एक लवंग ठेवावी. खूप फायदा होतो.

५. सायनसवर गुणकारी 

लवंगांमध्ये युजेनॉल नावाचा एक घटक असतो. या घटकामुळे कफ कमी होण्यास मदत होते. तसेच शरीरातील उष्णता देखील वाढते. त्यामुळे लवंगांच्या चहाचे नियमित सेवन सायनस, श्वसनमार्गातील इन्फेक्शन, छातीत साठणारा कफ यासारख्या समस्यांवर अतिशय गुणकारी आहे.

६. सर्दी वर गुणकारी 

लवंगांचा चहा पिण्यामुळे सर्दी, ताप, खोकला, कफ अशा सर्व व्हायरल इन्फेक्शन मुळे होणाऱ्या आजारांवर औषधी उपयोग होतो. लवंगांचा चहा पिण्यामुळे ताप लवकर उतरतो.

७. त्वचा विकारावर गुणकारी 

लवंगांच्या चहामध्ये अँटिसेप्टिक गुणधर्म देखील असतात. त्यामुळे निरनिराळ्या त्वचाविकारांवर लवंगांचा चहा पिणे गुणकारी ठरते. अशा चहामुळे वेगवेगळी फंगल इन्फेक्शन कमी होण्यास देखील मदत होते.

८. स्ट्रेस कमी होतो 

नवीन संशोधना नुसार असे समोर आले आहे की लवंगांचा चहा पिण्यामुळे स्ट्रेसची पातळी कमी होण्यास मदत होते. असा चहा पिण्यामुळे शरीरातील उत्साह वाढवणारे हॉर्मोन्स वाढतात आणि त्यामुळे ताणतणाव कमी होऊन मन आनंदी होते.

९. संधिवात 

लवंगांच्या चहाचे नियमित सेवन संधीवातावर देखील अतिशय गुणकारी आहे. असा चहा पिण्यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते.

तर हे आहेत लवंगांचा चहा पिण्याचे औषधी गुणधर्म आणि त्याचे फायदे. इतक्या सोप्या पद्धतीने घरच्या घरी असा चहा करून पिणे अगदी सहज शक्य आहे.

तेव्हा मित्र-मैत्रिणींनो घरच्या घरी सहजपणे लवंगांचा चहा तयार करून त्याचे नियमित सेवन करा आणि त्याच्या गुणधर्मांचा लाभ घ्या. तसेच ही माहिती आपल्या नातेवाईक आणि मित्रमंडळी पर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.