ध्येयांच्या दिशेने पावलं टाकण्याचं धाडस करा

आत्मविश्वास सुविचार मराठी

लहानपणी आपण सगळेच किती स्वप्नाळू असतो? कळायला लागल्यापासून आपल्या मनात मोठमोठे विचार यायला लागतात. मी भव्य दिव्य जीवन जगेन. मी माझ्या आई वडीलांची सगळी स्वप्नं पुर्ण करीन. जगामध्ये माझं नाव सन्मानानं घेतलं जाईल असं काहीतरी मोठं काम मी करुन दाखवेन.

माझ्या नातेवाईकांमध्ये, पाहूण्यांमध्ये, समाजामध्ये माझ्या कुटूंबाची मान ताठ होईल, माझं कौतूक होईल असं काहीतरी माझ्या हातून घडावं असं आपल्या प्रत्येकाला वाटतं.

पण जसेजसे आपण मोठे होत जातो आपल्या या उत्साहाला आणि कल्पनाशक्तीला मर्यादा पडत जातात. एकदोन अपयशं आली की आपल्याला कळतं की हे तितकं सोपं नाही. पाच दहा वेळा अपयशे आली की मनामध्ये रचलेले मनोरे ध्वस्त झालेच म्हणून समजा.

हे अपेक्षाभंगाचं दुःख फार प्रखर असतं. त्यानंतर आपण स्वतःशीच एक तडजोड करतो. मनाशी एक समझौता करतो. मी तुला फार मोठी स्वप्नं दाखवणार नाही त्याबदल्यात तू मला अपेक्षाभंगाची टोचणी देऊ नको असा एक अलिखित करार जन्माला येतो.

कधी आपले कुटूंबीय, कधी आपल्या अवतीभवतीचे लोक आणि कधी आपण स्वतःच आपल्यालाकमी लेखतो म्हणून आपली स्वप्ने, आपल्या इच्छा, आपल्या कल्पना, आपल्या अपेक्षा मनातल्या मनात दबलेल्या राहतात. त्या पूर्णत्वाला येण्याच्या आधीच त्यांचा गळा घोटला जातो.

“अंथरुण पाहून पाय पसरावे.” हा सुविचार ऐकून ऐकून ज्याची स्वप्नाळू आणि धाडसी वृत्ती मरुन जाते त्याच्यापेक्षा अभागी जीव या जगात दुसरा कोणी नाही.

आकर्षणाचा सिद्धांत वापरायला शिकणं म्हणजे स्वतःची चादर मोठी करायला शिकणं. स्वतःच्या उत्साहाची आणि उर्जेची पातळी वाढवली की आपोआपच चादर मोठी होत जाते.

तुमच्या उर्जेची पातळी दहा आहे आणि तुमचं स्वप्नातलं घर बांधण्यासाठी तुम्हाला पन्नास हजार एकक उर्जा हवी असेल तर तुमचे स्वप्न तुम्हाला अशक्यच वाटेल.

पण जर तुम्ही वाढवत वाढवत तुमच्या उर्जेची पातळी एक लाख युनिटवर घेऊन गेलात तर उर्जेच्या समप्रमाणात पैसा आकर्षित करत राहील्यामूळे तुम्ही सहज तुमचे ड्रीम हाऊस साकार करु शकाल.

तुम्हाला पुण्याहून मुंबईला जायचे असेल तर आपल्याला लोणावळा, खंडाळा, खोपोली, पनवेल अशा क्रमाक्रमाने प्रवास करावा लागेल.

मुंबईपासून दुर गेल्याने मुंबई येणार नाही पण आकर्षणाच्या नियमाचा सराव करणारे बहूतांश लोक इथेच चुकतात आणि म्हणून त्यांची स्वप्नं पुर्ण होत नाहीत.

एक उदाहरण सांगतो. तुम्हाला एका कार्यक्रमासाठी एक ब्लेझर कोट घेण्याची आवश्यकता भासते. तुम्ही एका चकचकीत शोरुममध्ये जाता. एक शानदार ब्लेझर तुमचे लक्ष वेधून घेतो. तुम्ही तात्काळ त्याच्यावर चिटकवलेला टॅग शोधायला लागता. किंमत आहे पंधरा हजार रुपये. मनात विचार येतो. “हा ब्लेझर खूप महाग आहे. हा कोट मला परवडणार नाही. हा कोट माझ्या बजेटच्या बाहेर आहे.”

तुम्ही निराश आणि जड मनाने तो तसाच वापस जागेवर ठेऊन देता. जेव्हा केव्हा आपण आपल्या मेंदुला संदेश देतो की एखादी वस्तू मला परवडणार नाही तेव्हा आपण त्या वस्तुला आपल्याकडे आकर्षित करण्याचे मार्ग बंद करुन टाकतो. असा संदेश आपल्या मेंदुला वारंवार दिल्यावर आपला आत्मविश्वास खच्ची होतो. सेल्फ इमेज कमजोर होते. अंतर्मन दुबळं आणि खिळखिळं होतं.

ज्याप्रमाणे मुंबईला जाणे हेच आपले ध्येय असेल तर नगरला, औरंगाबादला किंवा कोल्हापूरला जाऊन मुंबईची मजा अनुभवाता येणार नाही त्याचप्रमाणे टुमदार घर, देखणी अलिशान गाडी आणि कोट्यावधी रुपयांची संपत्ती ही आपली ध्येय असतील तर त्यांच्यापासून दुर जाऊन ही स्वप्नं पुर्णत्वास येणार नाहीत.

करोडपती माणूस बनायचे असेल तर करोडपती माणसासारखं वागावं लागेल. ‘मी श्रीमंत आहे’ ‘मी हवं ते साध्य करु शकतो” हा संदेश आपल्या अंतर्मनाला द्यावा लागेल.

आपल्या येण्याजाण्याच्या रस्त्यावर ‘ली मेरेडीयन’ नावाचे एक फाईव्ह स्टार हॉटेल लागते. आपल्याला त्या हॉटेलमध्ये जाण्याची, तिथल्या सुविधा अनुभवण्याची खूप खूप इच्छा आहे पण त्या हॉटेलला रोज बाहेरुनच बघतो आणि हे खूप महाग हॉटेल असेल असं म्हणून त्यासमोरुन तसेच निघून जातो.

आकर्षणाचा सिद्धांत सांगतो की जर तुम्हाला त्या हॉटेलमध्ये काही दिवसांचा स्टे करण्याची इच्छा असेल तर खिशात पैसे असतील किंवा नसतील, मनातली भीती काढून टाका आणि काचेचा दरवाजा ढकलून त्या चकचकीत अलिशान हॉटेलमध्ये प्रवेश करा. त्या हॉटेलच्या लॉबीमधील एकेका वस्तूचे निरीक्षण करा.

तिथल्या आल्हाददायक वातावरणाचा आस्वाद घ्या. जाऊन त्या रेस्टॉरंटमध्ये बसा. तुम्हाला शक्य असेल तर एक कप कॉफीची ऑर्डर द्या. ते ही जमले नाही तर थोड्या वेळात माझा मित्र येत आहे, त्याची वाट बघतोय असे त्या वेटरला सांगा. त्या हॉटेलच्या वातावरणाचा आनंद घ्या.

मी या हॉटेलची सेवा घेऊ शकतो असा आपल्या अंतर्मनाला संदेश द्या. तुम्हाला तेथील रुम्स पहायच्या असतील तर काऊंटरला जाऊन खोली दाखवण्याची विनंती करा.

लक्षात ठेवा, प्रत्येक गोष्ट तुमच्या सुप्त मेंदुमध्ये रेकॉर्ड होत आहे. तुमची तीव्र इच्छा तिथे रुजली की ती पुर्ण करण्याचे जबाबदारी अंतर्मन स्वतःच्या खांद्यावर घेईल.

तुम्हाला नवी कार घ्यायची असेल किंवा नवे घर बांधायचे असेल तर उठता बसता मनात सतत तो एकच विचार मनात घोळवा. आपली ऐपत नाही असा विचार न करता संधी मिळेल तिथे जाऊन कारची टेस्ट ड्राईव्ह घ्या. आपल्या बजेटमध्ये बसेल की नाही याचा विचार न करता प्रॉपर्टीचा शोध घ्या.

अनेकांना कार हवी असते, नवी वास्तू बांधायची असते पण ते कधीही तिकडे आपली पावलं वळवत नाहीत. नुसतेच मनातले मांडे खात बसतात.

एखाद्याकडे अलिशान कार दिसली, कुणाचा शानदार बंगला दिसला की त्यांचा जळफळाट होतो. त्यांचे मन अशांत होते. मनात मत्सराच्या भावना अशी काही पेट घेते की आनंद, समाधान, प्रसन्नता सगळे काही क्षणात जळून खाक होते. असे काही घडले की आपल्या ध्येयाच्या नेमक्या विरुद्ध दिशेने आपला प्रवास सुरु होतो.

हे खरे आहे की आपल्या आजूबाजूच्या व्यक्ती आपल्या पुढे जात आहेत हे कोणालाही सहन होत नाही. आपण मागे राहीलो ही जाणीव वेदनादायक आहे.

एखादी वस्तू आपल्या बजेटच्या बाहेर असल्यामूळे आपण ती खरेदी करु शकलो नाही तर माणूस विषण्ण होतो. पण अशाने दुःखी न होता आपण या प्रखर उर्जेचा इंधन म्हणून वापर करायला शिकलं पाहिजे. तो ब्लेझरचा कोट परवडला नाही म्हणून उदास न होता ‘हाऊ वंडरफुल, हॅव फन’ असे म्हणून मी लवकरच हा कोट खरेदी करायला येईन असे प्रॉमीस करुन शोरुममधून बाहेर पडल्याने काम करण्याची, आणखीन पैसे कमवण्याची एक तडफ आतमध्ये तयार होते.

आकर्षणाचा सिद्धांत वापरणाऱ्या व्यक्तीने चोवीस तास जागरुक आणि सजग राहीलं पाहिजे. “मी गरीब आहे, हे मला कधीही परवडणार नाही, असे विचार मनात न आणता सदैव ‘मी श्रीमंत आहे’, ‘मी समृद्ध आहे’, ‘संपत्तीला आकर्षित करण्याचे नवे नवे मार्ग मला सुचत आहेत’, ‘मी परिश्रम करुन संपत्तीला आणि मला हव्या असलेल्या सुखसुविधांना, साधनांना आकर्षित करुन घेतो, असा विचार वारंवार आपल्या मनात घोळवला पाहिजे. मी तुम्हाला खोट्या स्वप्नरंजनात किंवा कल्पनाविलासात रहायला सांगत नाहीये,

कृतिशुन्य बनून निष्क्रीयपणे जगा असेही सांगत नाहीये तर आपल्या ध्येयांच्या दिशेने पावलं टाकण्याचं धाडस करा, एवढंच सांगत आहे.

गेल्या दहा वर्षात अनेकदा माझ्यावर आर्थिक संकटे आली. पण कधीही मी स्वतःला गरीब मानले नाही. संधी मिळेल तेव्हा मी अंतर्मनाला ‘मी श्रीमंत आहे’ ‘मी शक्तिशाली आहे’ हाच संदेश देत राहीलो. मनाने भित्री आणि दुबळी असलेली माणसं लढण्याआधीच हार स्वीकार करतात.

शस्त्र खाली ठेऊन लढाईआधीच शरणागती पत्कारतात. आकर्षणाचा सिद्धांत आपल्याला धाडसाने स्वप्नं बघायला सांगतो. जिद्दीने ती पुर्णत्वास न्यायला शिकवतो.

आभार आणि शुभेच्छा!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.