प्रॉपर्टी खरेदी करताय? मग ह्या १० चुका टाळा 

प्रॉपर्टी खरेदी करताय? मग ह्या १० चुका टाळा 

प्रॉपर्टी खरेदी करणे मग ती रेसिडेंशीयल असो कमर्शियल असो किंवा शेतजमीन असो, तो आयुष्यातला एक मोठा निर्णय असतो.

प्रॉपर्टीचे खरेदी विक्री व्यवहार म्हणजे एक प्रकारे मोठी उलाढालच असते. आपण जेव्हा प्रॉपर्टी खरेदी करणार असतो तेव्हा आपली मोठी रक्कम गुंतवली जाणार असल्यामुळे आपल्याला अतिशय काळजीपूर्वक सर्व व्यवहार करणे गरजेचे असते.

प्रॉपर्टीच्या व्यवहारात टायटल क्लियर असणे, होम लोन, ब्लॅकने देण्याची रक्कम अशा सर्व बाबी महत्वाच्या असतात. हयात एखादी जरी चूक आपल्याकडून झाली तर ती आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला महागात पडू शकते.

नुकतीच अशी एक घटना घडून गेली ज्यामध्ये एका व्यक्तीला अगदी कमी किमतीत फ्लॅट मिळाला म्हणून त्याने तो व्यवहार केला परंतु नंतर असे लक्षात आले की त्या फ्लॅटची सर्व मूळ कागदपत्रे क्लियर नव्हती. त्यामुळे सदर व्यक्तीला त्या व्यवहारात होम लोन मिळू शकले नाही आणि तो व्यवहार पूर्ण झाला नाही. त्यांना बरीच आर्थिक झळ सोसावी लागली,

ह्यासाठीच आम्ही सांगतोय की कोणतेही प्रॉपर्टीशी संबंधित व्यवहार करताना काळजी घ्या. खाली दिलेल्या चुका आपल्याकडून होणार नाहीत ह्याची काळजी घ्या 

१. प्रॉपर्टी खरेदीसाठी लागणारी संपूर्ण रक्कम विचारात न घेणे 

कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना लोकांकडून होणारी ही सर्वात कॉमन चूक आहे. एखादी प्रॉपर्टी खरेदी करताना केवळ प्रॉपर्टीची मूळ मालकाला देण्याची रक्कम विचारात घेऊन चालत नाही. त्याबरोबरच प्रॉपर्टी खरेदी करणाऱ्याला प्रॉपर्टीवर लागणारे खालील खर्च देखील विचारात घ्यावे लागतात –

• खरेदीखत तयार करताना भरावी लागणारी स्टॅम्प ड्यूटी / रजिस्ट्रेशन चार्जेस

• वकिलाला द्यायची लीगल फी

• सोसायटी ट्रान्सफर फी

• सोसायटीला किंवा बिल्डरला द्यावा लागणारा अडव्हान्स मेंटेनन्स

• प्रॉपर्टीच्या इन्शुरन्सचा प्रीमियम

• जर कोणी मध्यस्त असेल तर त्याचे ब्रोकरेज

हे सर्व खर्च धरून प्रॉपर्टीची एकूण किंमत काढावी आणि ती प्रॉपर्टी आपल्या बजेटमध्ये बसते की नाही हे ठरवावे.

२. प्रॉपर्टीचे संपूर्ण रेकॉर्ड चेक न करणे 

कोणतीही प्रॉपर्टी मग ती नवी असो अथवा रिसेलची त्या प्रॉपर्टीचे आधीचे रेकॉर्ड क्लीअर आहे ना हे चेक करून घेणे अतिशय आवश्यक असते. रिअल इस्टेट व्यवहारांमध्ये काहीतरी घोळ असण्याची, फसवले जाण्याची खूप जास्त शक्यता असते. तसेच प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीवर व्यवहारांमध्ये बऱ्याच प्रमाणात काळ्या पैशाचा देखील वापर होतो. त्यामुळे जमीन असो अथवा फ्लॅट खरेदीचा व्यवहार करण्यापूर्वी सदर मालमत्तेचे सर्व रेकॉर्ड क्लियर आहेत ना हे तपासून पहाणे फार आवश्यक असते. सरकारी वेबसाईट वर असे रेकॉर्ड ऑनलाईन तपासणे देखील आता सहज शक्य झाले आहे.

जाणून घ्या घरच्या घरी कसे चेक करायचे प्रोपर्टी रेकॉर्ड 

३. सदर मालमत्तेचे योग्य व्हॅल्युएशन न करणे 

कोणतीही स्थावर मालमत्ता खरेदी करताना त्या मालमत्तेचे जुने रेकॉर्ड तपासून पाहण्याबरोबरच तिचे टायटल क्लिअर आहे ना आणि सध्याच्या बाजारभावाप्रमाणे त्या मालमत्तेची नक्की वॅल्यू म्हणजेच किंमत किती आहे हे व्हॅल्युएशन करणे फार आवश्यक असते. जर आपल्या स्वतःला असे व्हॅल्युएशन करून घेणे शक्य नसेल तर असे व्हॅल्युएशन एखाद्या तज्ञ वकिलाकडून करून घ्यावे. मालमत्तेची कमीत कमी तीस वर्षांपूर्वी पर्यंतची रेकॉर्डस् तपासणे आवश्यक असते. या कामी तज्ञ वकिलाची नेमणूक करणे योग्य ठरते.

४. एखाद्या मालमत्तेची इतर मालमत्तांबरोबर तुलना न करणे 

कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना त्या प्रॉपर्टीची तशाच प्रकारच्या इतर प्रॉपर्टीजशी जरूर तुलना करावी. अशी तुलना करताना केवळ प्रॉपर्टीची किंमत हा मुद्दा असू नये. तर प्रॉपर्टी नक्की कुठे आहे, तिथे कोणकोणत्या सुविधा दिलेल्या आहेत, मुख्य रस्त्यापासून प्रॉपर्टी किती लांब आहे, भविष्यात सदर प्रॉपर्टीची किंमत किती वाढू शकेल आणि होम लोन मिळण्याची सुविधा आहे का या सर्व बाबींचा देखील विचार करून मग तुलना केलेल्या प्रॉपर्टीज मधली सर्वोत्तम प्रॉपर्टी निवडावी. असे केल्यामुळे योग्य किमतीत जास्तीत जास्त सुविधा मिळणारी प्रॉपर्टी आपल्याला मिळू शकेल.

५. एजंटची मदत न घेणे 

बरेचदा एजंटला ब्रोकरेजचे पैसे द्यावे लागतील असे वाटून ते पैसे वाचवण्यासाठी लोक प्रॉपर्टीच्या खरेदी-विक्रीवर व्यवहारात एजंटची मदत घेत नाहीत. परंतु अशा व्यवहारांचा जर आपल्याला पूर्वानुभव नसेल तर एखाद्या अनुभवी एजंटची मदत घेणे आपल्या दृष्टीने जास्त फायदेशीर ठरते. प्रॉपर्टीची योग्य किंमत ठरवणे, त्यासाठी करावी लागणारी घासाघिस, सर्व आर्थिक व्यवहार, होम लोन मिळवून देणे, सर्व कायदेशीर बाबी पार पाडणे या सर्व कामांमध्ये अनुभवी एजंटची आपल्याला मदतच होते. एजंटला सर्व ठिकाणची सर्व माहिती असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा आपल्याला फायदा होऊ शकतो. आपण जर पहिल्यांदाच अशा पद्धतीचा व्यवहार करणार असू तर एजंटची मदत जरूर घ्यावी.

६. आपल्या आर्थिक कुवतीबाहेरची प्रॉपर्टी खरेदी करणे 

बरेचदा चांगल्या प्रॉपर्टी च्या मोहात पडून लोक आपल्याला आर्थिक दृष्ट्या शक्य नसणाऱ्या किमतीची प्रॉपर्टी घेतात. परंतु एकदा प्रॉपर्टी घेतल्यानंतर ती मेंटेन करणे, त्या प्रॉपर्टीचा लोन वरचे ई एम आय भरणे हे सर्व अवघड होऊन बसते. त्यामुळे प्रॉपर्टी खरेदी करताना आपले जास्तीत जास्त बजेट ठरवून त्यामध्ये बसणारी प्रॉपर्टीच खरेदी करा.

७. प्रॉपर्टी खरेदी करताना होम लोन न घेणे 

काही लोकांचा डोक्यावर कर्ज नको होम लोन न घेण्याकडे कल असतो. परंतु एखादी प्रॉपर्टी खरेदी करताना त्यावर लोन घेण्याचे अनेक फायदे आहेत. आपल्या जवळची संपूर्ण रक्कम एकदम भरून न टाकता आपल्याला आर्थिक मदत तर मिळतेच शिवाय अशी आर्थिक मदत कमी व्याज दराने मिळते. त्याव्यतिरिक्त होम लोनचा इन्कम टॅक्सच्या रकमेत सूट मिळण्यासाठी सुद्धा उपयोग होतो.

८. प्रॉपर्टीचे योग्य इन्स्पेक्शन न करणे 

योग्य व्यावसायिक इन्स्पेक्शन टीमकडून आपल्याला जी प्रॉपर्टी खरेदी करायची आहे तिचे इन्स्पेक्शन करून घेणे आवश्यक असते. त्यासाठी फी म्हणून आपल्याला काही खर्च येतो हे जरी खरे असले तरी भविष्यात होणाऱ्या त्रासापासून सून मुक्तता मिळवण्यासाठी हा खर्च करणे योग्य ठरते.

९. भविष्यात प्रॉपर्टीची किंमत वाढेल की नाही याचा विचार न करता प्रॉपर्टी खरेदी करणे 

कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना तिची किंमत भविष्यात वाढत असणारी असायला हवी. त्यासाठी प्रॉपर्टी चांगल्या गजबजलेल्या ठिकाणी, सर्व सोयीसुविधा असणारी अशी असावी. प्रॉपर्टीमध्ये गुंतवलेली रक्कम योग्य परतावा देईल येईल याची काळजी घेऊनच प्रॉपर्टीची खरेदी करावी. गुंतवणूक म्हणून खरेदी केलेली प्रॉपर्टी भविष्यात नफा मिळवून देईल याची खात्री असेल तरच प्रॉपर्टीची खरेदी करावी.

१०. प्रॉपर्टी खरेदी करून झाल्यानंतर होऊ शकणाऱ्या खर्चाचा विचार न करणे 

फक्त प्रॉपर्टी घेतली म्हणजे झाले असे बरेचदा नसते. समजा आपण फ्लॅट खरेदी केला तर नंतर राहण्यासाठी त्या फ्लॅटमध्ये फर्निचर, इंटिरियर डेकोरेशन, काही मॉडिफिकेशन करणे असे खर्च होऊ शकतात. त्याचबरोबर राहायला जाण्याआधी पूजा करण्यात येते त्याचा देखील खर्च असतो. ह्या सर्व भविष्यात येणाऱ्या खर्चाचा विचार प्रॉपर्टी खरेदी करण्या आधीच करावा आणि त्याची स्वतंत्र तरतूद करून ठेवावी.

तर हे आहेत असे दहा मुद्दे जे आपण कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना विचारात घेणे अतिशय आवश्यक आहे. तर मित्र-मैत्रिणींनो तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करत असताना ह्या दहा चुका करणे टाळा आणि आणि योग्य प्रकारे व्यवहार करून तुमच्या स्वप्नातील मालमत्तेचे मालक व्हा. ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!