आयुष्यातील चार कटू सत्य, ‘जी’ स्वीकारली तर तुम्ही एक ‘कणखर व्यक्ती’ बनू शकाल

आयुष्यातील चार कटू सत्य 'जी' स्वीकारली तर तुम्ही एक 'कणखर व्यक्ती' बनू शकाल

मित्रांनो सत्य हे नेहमी कडवट असतं, पण सत्याची बाजू ही स्वच्छ निर्भीड आणि स्वावलंबी असते. जर तुम्ही स्वावलंबी बनला तर तुम्ही स्वतंत्र आणि कणखर होऊ शकता.

आयुष्यात अनेकदा अशी वेळ येते जिथे सत्य किंवा असत्य यामधून एकाचीच निवड करावी लागते.

जितक्या लवकर सत्याचा हात धरून तुम्ही प्रवासाला निघाल तितका तुमचा प्रवास हा स्वच्छंदी आणि तणावविरहित असेल.

चला तर मग आज आपण अशा काही गोष्टी जाणून घेऊया की ज्या खूप कठीण आणि कटू वाटतील पण तरीही त्या गोष्टी तुमच्या व्यक्तिमत्वाला मजबूत बनवतील, त्याचबरोबर तुमची एक आनंदी व्यक्ती अशी ओळख निर्माण करतील.

१) परिवर्तन – परिवर्तन म्हणजेच ‘बदल’ हा निसर्गाचाच नियम आहे. आपल्या आयुष्यातल्या घटना आपल्या इच्छेप्रमाणे घडत नसतात. आपल्या मनाविरुद्ध गोष्टी घडत गेल्या तर आपला तणाव वाढतो.

त्यामुळे हट्ट सोडून, आहे त्या परिस्थितीला लवकरात लवकर स्वीकारणं हाच अचूक पर्याय असतो.

आपल्या मनासारख्या गोष्टी घडाव्यात हा एकच विचार पकडून ठेवून दु:खी होण्यापेक्षा, जर आपण घडलेल्या गोष्टींच्या इतर पैलूंचा विचार केला तर आपल्याला आयुष्य सोपं वाटायला लागेल.

तेव्हा आयुष्यातील नको असलेले बदलसुद्धा वेळीच लवकरात लवकर स्वीकारा.

समजा तुमच्या ऑफिसच्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला डावललं गेलं, तर रागराग करण्यापेक्षा आपल्या मध्ये काय कमी आहे याचा विचार करून ते स्किल डेव्हलप करण्याचा प्रयत्न करा.

किंवा ऑफिस पॉलिटिक्स मुळे तुम्हाला डावललं गेलं, असा तुमचा समज असेल तर, ही एक संधी आहे अशा नजरेनं या घटनेकडे पहा, आणि स्वतःत बदल घडवा.

तुम्ही स्वतःमध्ये चांगले बदल घडवून आणू शकत असाल तर लक्षात घ्या तुमच्यासाठी यशाच्या अनेक संधी वारंवार चालून येतील.

बदल हा निसर्गाचा अस्थायी नियम आहे तो मनापासून स्वीकारा

2) भूतकाळ

तणावाचं किंवा चिंतेचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपण भूतकाळात गुंतून पडणं.

भूतकाळातल्या चुकांना उगाळत बसून काहीही फायदा होत नाही, उलट वर्तमानातल्या अनेक संधी आपल्या हातातून निसटून जातात.

भूतकाळाच्या दुःखांमध्ये, चुकांमध्ये अडकून पडल्यामुळे वर्तमानामध्ये मिळालेल्या आनंदाच्या अनेक क्षणांकडे आपण दुर्लक्ष करत असतो.

भूतकाळ विसरू नका, पण भूतकाळामध्ये जखडून मात्र घेऊ नका.

भूतकाळामध्ये राहणं म्हणजे आपल्या प्रगतीचा मार्ग आपल्याच हातानं बंद करणं.

घडून गेलेलं भलं बुर त्याच वळणावरती सोडून आपण नव्या उमेदीने नव्या आयुष्याकडे वाटचाल करायला तयार राहा.

3) नियंत्रण (Control) 

प्रत्येक घटनेवर प्रत्येक व्यक्तीवर आपलं नियंत्रण असलं पाहिजे असा अट्टाहास सोडून द्या.

अशा अनेक गोष्टी आहेत ज्या अमुक एका पद्धतीने व्हायला हव्यात असा आपला आग्रह असतो.

कधी तरी हा आग्रह सोडून दिला तर गोष्टी अगदी आश्चर्यकारक पद्धतीने घडून आपल्याला सुखद धक्काच देतील.

कशाचाही पूर्वग्रह न बाळगता सामोरं येईल त्याला मनापासून स्वीकारा. कधीतरी एक पाऊल मागे येऊन, तर कधी जे घडतं आहे त्या पद्धतीने घडू देऊन शांत राहून फक्त निरीक्षण करा.

त्यामुळे काय होईल तर अनावश्यक ताण आणि तणाव पळून जातील. उर भरून श्वास घ्या, आणि आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जा.

4) वेळ

असं म्हणतात गेलेले वैभव परत मिळवता येतं पण वेळ काही परत मिळवता येत नाही. लोकल्सनी प्रवास करणारे तुम्हाला सांगू शकतील की एखादा मिनिट सुद्धा किती महत्त्वाचा असतो.

तर या अमूल्य वेळेचा योग्य सन्मान राखा.

“जिंदगी फिर ना मिलेगी दोबारा” हे लक्षात ठेवा आणि योग्य वेळ, योग्य क्षण याची वाट बघण्यात वेळ न दवडता आलेल्या क्षणाचा आनंद घ्या.

एखादं छानसं गाणं म्हणायचं आहे, छान चित्र रेखाटायचं आहे तर ते काम पुढे कशाला ढकलायचं?

छोट्या छोट्या गोष्टी ज्यातून आपल्याला आनंद मिळतो त्या करण्यासाठी मुहूर्ताची का वाट बघायची? जे आवडेल ते करून मोकळं व्हायचं.

मनामध्ये खंत ठेवून कशासाठी जगायचं?अरे अरे ! मला गिटार शिकायची होती पण वेळच काढता आला नाही. ट्रेकिंग करायचं होतं राहुनच गेलं. एक छानशी फॅमिली ट्रिप अरेंज करायची होती पण आता सगळेजण वेगवेगळ्या दिशेला विखुरले

मनामध्ये अशी खंत घेऊन खुरडत खुरडत चालत राहण्यापेक्षा योग्य वेळी छोट्या-छोट्या आशाआकांक्षा पूर्ण करत पुढं जाणं हेच तर खरं आयुष्य.

आजचा दिवस आयुष्यातला शेवटचा दिवस या भावनेनं भरभरून आयुष्य जगण्याचा प्रयत्न केला तर आपण एक उत्तम आयुष्याचा उपभोग घेऊ शकतो.

अहो! आयुष्य एवढसं, छोटुकलं आहे. बघता बघता कधी The End चा बोर्ड समोर येऊन उभा ठाकेल कळणार नाही. पण त्यावेळी मन मात्र समाधानानं ओतप्रोत भरलेलं असावं.

कडू औषध चवीसाठी नकोसं असतं पण आरोग्यासाठी ते लाभदायी ठरतं.

आयुष्यातही या चार कटू गोष्टी ज्या कठीण, कडवट आहेत पण आपण त्या स्वीकारल्या तर आपलं आयुष्य समाधानानं आनंदानं फुलून येऊ शकतं.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / Instagram वर मनाचेTalks ला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!