फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा गर्भवती स्त्रिया आणि त्यांच्या पोटातील बाळावर काय परिणाम होतो?

दिवाळीच्या वेळी फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा गर्भवती स्त्रिया आणि त्यांच्या पोटातील बाळावर काय परिणाम होतो

जाणून घ्या दिवाळीच्या वेळी फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा गर्भवती स्त्रिया आणि त्यांच्या पोटातील बाळावर काय परिणाम होतो?

दिवाळी म्हटले की आनंद, उत्साह, आकाश कंदील, निरनिराळ्या रांगोळ्या आणि फराळाचे पदार्थ यांबरोबरच महत्त्वाचे असतात ते फटाके. लहान मुलांची तर दिवाळी फटाक्यांमुळेच विशेष आवडीची असते.

गोडाधोडाचे पदार्थ आणि नव्या कपड्यांबरोबरच आबालवृद्ध आनंद घेतात तो फटाके उडवण्याचा. परंतु खूप मोठ्या प्रमाणात फटाके उडवण्यामुळे हवेतील प्रदूषणात वाढ होते हे तर आपल्या सर्वांना माहीत झालेच आहे .

फटाके उडवण्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचा श्वसनाचे विकार असणाऱ्या लोकांना खूप त्रास होतो. त्याचबरोबरीने अशा प्रदूषणाचा खूप जास्त त्रास होतो तो गर्भवती असणाऱ्या स्त्रियांना.

गर्भवती असणाऱ्या स्त्रिया आणि त्यांच्या पोटात असणारे बाळ यांच्या आरोग्यावर फटाक्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाचा थेट परिणाम होतो.

गर्भामध्ये असणाऱ्या भ्रूण अथवा शिशूचे संपूर्ण पोषण माते द्वारा होत असते. गर्भवती स्त्री जे अन्न खाईल, त्याप्रमाणे गर्भाचे पोषण होते, ती ज्या वातावरणात असेल त्या वातावरणाचा थेट प्रभाव गर्भावर पडतो. त्यामुळेच फटाक्यांच्या प्रदूषणाचा थेट प्रभाव गर्भवती स्त्री आणि गर्भातील शिशु यांच्यावर पडतो.

आज आपण गर्भवती स्त्री आणि पोटातील शीशुवर या प्रदूषणाचा काय प्रभाव पडतो ते जाणून घेऊया 

१. गर्भवती स्त्री वर होणारा परिणाम 

या विषयावर झालेल्या संशोधनातून असे वारंवार सिद्ध झाले आहे की वातावरणातील प्रदूषणाचा गर्भवती स्त्रियांवर थेट परिणाम होतो. खूप जास्त काळ प्रदूषित वातावरणात श्वास घेतल्यामुळे गर्भपात होण्याचा देखील धोका असतो. मुळात सतत प्रदूषित वातावरणात राहिल्यामुळे पुरुष आणि स्त्रीयांमधील प्रजननाचा दर देखील कमी होताना दिसतो. गर्भवती स्त्री सतत प्रदूषित वातावरणात राहिल्यास खालील परिणाम दिसतात –

१. इंट्रा युटेराइन ग्रोथ रिडक्शन

२. जन्माच्या वेळी होणाऱ्या बाळाचे वजन कमी असणे

३. दिवस पूर्ण भरण्याआधी प्रसूती होऊन बाळ जन्माला येणे ( प्री मॅच्युअर बेबी)

४. बाळाला ऑक्सिजन आणि पोषणाचा पुरवठा करणाऱ्या नाळेची नीट वाढ न होणे

५. होणाऱ्या बाळामध्ये हृदयाशी संबंधित विकार असणे.

२०१९ मध्ये झालेल्या संशोधनाच्या अहवालानुसार वायू प्रदूषणामुळे बाळांमध्ये अस्थमा, अशक्तपणा, कमी वजन याच बरोबर न्यूरोलॉजिकल डिसॉर्डर म्हणजे मेंदू विकार देखील असू शकतात. तीव्र वायू प्रदूषणात राहून जन्माला आलेल्या बाळांचे आयुष्यमान कमी असू शकते. म्हणजेच वायु प्रदूषणाचा माणसांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे हे निश्चित.

फटाक्यांमुळे होणार्‍या कणयुक्त प्रदूषणाचा काय परिणाम होतो ?

फटाके उडवण्यामुळे हवेत निरनिराळे हानीकारक गॅस तर पसरतात पण त्याशिवाय फटाक्यातील दारूचे बारीक कण देखील उडून हवेत मिसळतात. असे कण मिसळलेली प्रदूषित हवा सर्वांसाठीच हानीकारक आहे परंतु गर्भवती स्त्रिया आणि त्यांच्या पोटातील बाळाला याचा धोका सर्वात जास्त असतो. असे कण श्वसनाद्वारे थेट फुफ्फुसात जाऊ शकतात. त्याच बरोबर डोळ्यात किंवा घशात जाऊन डोळ्यांची आग होणे आणि खोकला येणे असे परिणाम दिसतात. श्वास घेण्यास त्रास देखील होऊ शकतो. बारीक बारीक कण शरीरात असेच राहिल्यास ते रक्तात प्रवेश करतात आणि गर्भवती मातेच्या रक्ताकडून ते भ्रुणाच्या शरीरात देखील प्रवेश करतात. अशा पद्धतीने हे प्रदूषण गर्भवती माता आणि भ्रूणांना हानीकारक असते.

गर्भवती स्त्रियांनी दिवाळीच्या दरम्यान काय काळजी घ्यावी ?

प्रदूषणापासून स्वतःचे आणि आपल्या बाळाचे रक्षण करण्यासाठी गर्भवती स्त्रिया खालील प्रकारे काळजी घेऊ शकतात.

१. स्वतः फटाके उडवू नका 

फटाक्यांच्या थेट संपर्कात येणे हे निश्चितपणे चांगले नाही. त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी स्वतःला तर फटाके उडवू नयेतच परंतु बाहेर फटाके उडवले जात असताना घराबाहेर देखील पडू नये.

२. घराच्या दरवाजे आणि खिडक्या बंद ठेवा 

बाहेर फटाके उडवले जात असताना आपल्या घराचे दरवाजे आणि खिडक्या शक्य तितका वेळ बंद ठेवा. त्यामुळे फटाक्यांचा धूर आणि उडालेले कण थेट घरात येणार नाहीत.

३. घराबाहेर पडताना फेस मास्क वापरा 

गर्भवती स्त्रियांनी दिवाळीच्या दिवसात शक्यतो घराबाहेर पडू नये. परंतु बाहेर जाणे अतिशय आवश्यक असल्यास फेस मास्क लावूनच बाहेर पडावे. फेस मास्क किंवा फेसशील्ड वापरल्यामुळे वायू प्रदूषणा बरोबरच कोविड १९ पासून देखील संरक्षण मिळेल.

दिवाळीदरम्यान जर खालील स्वास्थ समस्या उद्भवल्या तर त्वरित आपल्या डॉक्टरांशी संपर्क करा 

१. श्वास घेण्यास अडचण होणे, दम लागणे.

२. डोके गरगरणे.

३. उलटी होणे, पोटात डचमळणे.

४. डोकेदुखी.

५. चक्कर येणे

तर अशाप्रकारे गर्भवती स्त्रिया दिवाळीदरम्यान आपली आणि आपल्या बाळाची काळजी घेऊन सुरक्षित राहू शकतात. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख जरुर शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.