सकारात्मक विरूद्ध नकारात्मक विचार करणा-या व्यक्तींमधले 15 फरक

सकारात्मक विचार मराठीत

जगात दोन प्रकारच्या व्यक्ती आपल्याला बघायला मिळतात.

काही लोक चांगल्या किंवा वाईट, दोन्ही सिच्युएशन मध्ये सकारात्मक विचार करतात.

तर काही व्यक्ती नकारात्मक विचारांचं एव्हढं ओझं घेऊन फिरत असतात की त्यांना मीठ सुद्धा अळणी लागतं.

आपल्यामध्ये सकारात्मक विचार रूजवायचे असतील तर मुळात सकारात्मक आणि नकारात्मक विचारसरणीतील फरक समजून घेऊया.

1) अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.

शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन यांनी बल्बचा शोध लावण्यासाठी अनेक प्रयोग केले होते. पण ते सगळे अयशस्वी ठरले.

एका व्यक्तीने त्यांना असं विचारलं की “तुमचे बल्ब बनवण्याचे 1000 प्रयोग फेल गेले याचं तुम्हाला वाईट वाटत असेल ना?”

एडिसन यांनी पटकन उत्तर दिलं “माझे प्रयोग कुठे फेल गेले? या 1000 प्रकारातून बल्ब ची निर्मिती होत नाही हे मला शिकायला मिळालं”.

मित्र हो आपल्या आयुष्यात छोट्याशा पराभवाने हरणारे, मोडून पडणारे नकारात्मक असतात.

तर मोठ्यात मोठं अपयश पचवून त्यातून धडा घेत वाटचाल करणारी व्यक्ती सकारात्मक मनोवृत्तीची असते.

2) अवघड गोष्टींचा स्वीकार

लहरों से डर कर नौका पार नही होती
कोशिश करने वालों की हार नही होती

हरिवंशराय बच्चन यांच्या या ओळी तुम्हाला माहिती असतीलच?

बघाना, आपण प्रवासाला निघतो. एखादा घाट आहे, अवघड वळणं आहेत म्हणून आपण प्रवास सोडून घरी परत फिरत नाही.

तर या घाटामध्ये अधिक सावधानतेने ड्रायव्हिंग करतो आणि प्रवास पूर्ण करतो.

तसंच आयुष्यात येणाऱ्या अनेक संकटांना घाबरून आपलं पाऊल मागं घेण्यापेक्षा त्या संकटांशी दोन हात करणं केंव्हाही चांगलं.

संकटांचा, अवघड परिस्थितीचा स्वीकार हीच तर सकारात्मक लोकांची खासियत असते.

3) पूर्ण क्षमतेने काम करणे

एखादं काम जेव्हा सकारात्मक विचार करणाऱ्या व्यक्तीच्या हातात येतं तेव्हा ती व्यक्ती त्या कामासाठी उपलब्ध असणाऱ्या सगळ्यात चांगल्या पर्यायावरती आपलं मन एकाग्र करते.

काही अडचणी अशा असतात की ज्यावर आपलं नियंत्रण असू शकत नाही, अशा गोष्टींवर ती व्यक्ती विचार करत एनर्जी खर्च करण्यापेक्षा आपल्याला जे शक्य आहे ते करुन मोकळी होते. हीच तर खरी सकारात्मकता.

नकारात्मक वृत्तीचे लोक मात्र नाचता येईना अंगण वाकडे अशा पद्धतीने प्रतिक्रिया देत बसतात.

4) प्रेरणादायी गोष्टींचा स्वीकार.

सकारात्मक लोक एखाद्या यशस्वी व्यक्तीच प्रवास जाणून घेतल्यानंतर त्यातून प्रेरणा घेऊन आपला मार्ग आखतात.

तर नकारात्मक वृत्तीचे लोक मात्र दुसऱ्याचं यश किती सोपं आहे आणि माझ्या अडचणी किती मोठ्या आहेत याचे दाखले देत बसतात.

5) चांगल्या कामासाठी स्पर्धा

सकारात्मक वृत्तीचे लोक स्वतःशीच स्पर्धा करतात.

मी काल जसा होतो त्यापेक्षा आज अधिक चांगला कसा होईन आणि उद्या यापेक्षा अधिक चांगलं काम कसं करता येईल यावर आपलं लक्ष केंद्रित करतात.

नकारात्मक लोकांना रडगाणं गाण्याशिवाय दुसरं कामच नसतं.

6) पुर्ण लक्ष कामावर

सकारात्मक व्यक्ती आपल्या कामाच्या नियोजनाकडे लक्ष ठेवून ते काम व्यवस्थित कसं पुर्ण होईल याकडे लक्ष केंद्रित करतात.

त्यासाठीच आपली ऊर्जा खर्च करतात.

नकारात्मक प्रवृत्तीच्या व्यक्ती मात्र भूतकाळात “मी असं केलं आणि तसं केलं होतं” याच गोष्टीत रंगतात आणि वर्तमानातल्या कामाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात.

समजा सकारात्मक व्यक्तीला नृत्य सादर करायचं असेल तर ती आत्ता जास्तीत जास्त रियाजावरती भर देईल, तर नकारात्मक वृत्तीची व्यक्ती मात्र कोणे एके काळी मी कसं बहारदार नृत्य केलं होतं ते सांगण्यात रमेल.

7) बदलांवर ठाम विश्वास.

जगात एकच गोष्ट कधीच बदलत नाही ती म्हणजे “बदल”

त्यामुळे सकारात्मक व्यक्तींचा गाढ विश्वास असतो, की त्यांना त्रास देणारी व्यक्ती किंवा परिस्थिती एक ना एक दिवस नक्की बदलेल.

नकारात्मक लोक मात्र सतत त्रागा करत राहतात की
मला त्रास देणारी व्यक्ती कधी बदलणार नाही आणि माझी परिस्थिती ही कधीच पालटणार नाही.

8) कौशल्य विकास

मला सगळं येतं किंवा मला सगळं माहिती आहे असं म्हणणाऱ्या व्यक्ती पासून चार हात लांबच रहा.

जी व्यक्ती म्हणते की माझ्या मध्ये अजून काही त्रुटी आहेत आणि मला त्या जाणीवपूर्वक दूर करायच्या आहे तीच व्यक्ती सकारात्मक वाटेनं यशाकडे वाटचाल करत असते.

आजकाल प्रत्येक क्षेत्रात सॉफ्ट स्किलला जे महत्त्व आलेले आहे, तो ही याच सकारात्मक वृत्तीचा एक भाग आहे.

9) उत्तम संधीचा स्वीकार

आपल्याला आपल्या क्षमतांच्या अंदाज असतो आणि म्हणूनच आपण आपल्या आवाक्यातल्याच गोष्टी करत राहतो.

पण सकारात्मक वृतीचे लोक मात्र एखादी संधी आपल्या कंफर्टस झोनबाहेरील असली तरीही ती स्वीकारण्याचा प्रयत्न करतात, त्यासाठी कष्ट करतात

ट्रेकिंग सारख्या गोष्टी आपण रोज करत नसतो

पण उत्तम ट्रेकर रोजच्या रोज व्यायाम करून स्वतः ला फिट ठेवतात.

आणि ट्रेकींगची संधी मिळाली की थोडासा धोका स्वीकारून ट्रेकिंगचा आनंद ही लुटतात.

तसंच आयुष्यातही नियमित अभ्यास करून काही गोष्टींचा धोका स्वीकारून जाणीवपूर्वक मोठ्या संधी स्वीकारता येणारी व्यक्ती ही सकारात्मक असते.

10) अफवांना, गप्पाटप्पांना पूर्णविराम.

सकारात्मक लोक उपस्थित नसलेल्या व्यक्तीविषयी वाईट बोलणं टाळतात.

त्याऐवजी आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकांमध्ये सुधारणा घडवायचा प्रयत्न करतात.

याउलट नकारात्मक वृत्तीचे लोक दुसऱ्यां व्यक्तीच्या अनुपस्थित अफवा पसरवण्याची संधी शोधत राहतात.

11) माझं आयुष्यं, माझी जबाबदारी

समाजात आपण नेहमी बघत असतो की यशाचे श्रेय घेण्यासाठी अनेक व्यक्ती पुढे येतात अपयश मात्र कुण्या एका व्यक्तीच्या माथी मारलं जातं.

पण जी व्यक्ती सकारात्मक असते ती आपल्या चुका स्वीकारण्याचा मोठेपणा नेहमी दाखवते.

तर नकारात्मक व्यक्ती मात्र स्वतःच अपयश लपवून ठेवण्याची धडपड करत राहतात.

12) देहबोली

सकारात्मक वृत्ती असणाऱ्या व्यक्तीच्या देहबोलीतून सुद्धा सकारात्मकताच डोकावते.

दुसऱ्यांविषयी आदर विश्वास हा त्यांच्या हालचालीतून जाणवतो.

शिवाय स्वतःवरती असणाऱ्या ठाम विश्वास त्यांच्या प्रत्येक कृतीतून लक्षात येतो.

याउलट नकारात्मक वृत्तीचे लोक मात्र नजर टाळतात.

आणि वागण्या-बोलण्यातून स्वतःविषयी आणि इतरांविषयी अविश्वास व्यक्त करतात.

13) संघभावना

आपल्या बरोबर असणाऱ्या व्यक्तींचं मत जाणून घेऊन त्यांच्या मताचा आदर राखण्याचं काम सकारात्मक वृत्तीचे लोक करतात.

फुटबॉल टीमचा किंवा क्रिकेट टीमचा कॅप्टन विजयश्री तेंव्हाच खेचून आणतो जेंव्हा तो संघभावना प्रत्येकाच्या मनात रुजवू शकतो.

एखाद्याच्या कल्पनेची खिल्ली उडवून ती कल्पना प्रत्यक्षात साकारल्यानंतर मात्र स्वतः श्रेय लाटण्याच्या हास्यास्पद गोष्टी नकारात्मक वृत्तीच्या व्यक्ती करू शकतात.

14) चांगल्या पैलूंची निवड

कोवीड काळात आपण पाहिलं या जागतिक संकटातही काही जणांनी संधी निर्माण केली तर काहीजण मात्र नशिबाच्या नावाने खडे फोडत बसले.

यातले सकारात्मक आणि नकारात्मक कोण हे सांगायची गरज आहे का?

15) प्रशंसा

आपण सगळ्यात जास्त कंजुषी कुठे करतो माहिती आहे का?

एखाद्या व्यक्तीची प्रशंसा करण्यामध्ये.!

एखादा छान ड्रेस घातलेल्या व्यक्तीला आपण तू छान दिसतेस किंवा दिसतो आहेस असं म्हणायला कचरतो.

एखादं काम उत्तम पद्धतीने केल्यास आपण खुल्या मनाने कौतुक करत नाही.

छोट्या-छोट्या कॉम्प्लिमेंटस देणं हे निरोगी मनाचं लक्षण तर आहे, पण सकारात्मकता प्रवाही ठेवण्याचा तो एक उत्तम उपाय आहे.

हे सगळं वाचल्यानंतर आपल्यात काय बदल करायला पाहिजे हे तुमच्या नक्की लक्षात आलं असेल. हो ना ?

चला मग शेअर करा पटापटा, आणि पसरवा सकारात्मकता!!!

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!