जमीन खरेदी करताना ‘अशा’ ४ प्रकारे तुमची फसवणूक होऊ शकते

जमीन खरेदी विक्री नियम

जमीन खरेदी करणार आहात? फसवणूक टाळण्यासाठी अशी घ्या काळजी

सोशल मीडिया वरती एक पोस्ट वाचनात आली पुण्यातल्या एका दांपत्याला कोकणात थोडीशी जमीन विकत घ्यायची होती.
त्यासाठी त्यांनी बरीच बचत ही केलेली होती.

कोकणातल्या एका गावात एका व्यक्तीशी त्यांची ओळख झाली.

मात्र या व्यक्तीने भलतीच जमीन या दांपत्याला विकायचा प्रयत्न केला. नंतर दमदाटी ही केली.

सुदैवानं गावकर्‍यांच्या सतर्कतेमुळे दांपत्याची फसवणूक टळली.

अशी फसवणूक तुमची सुद्धा होऊ शकते.

तुम्ही जर जमीन खरेदी करणार असाल तर फसवणूक कशी होऊ शकते याची तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे.

1) एकच जमीन दोन, तीन जणांना विकणे.

असे प्रकार सर्रास आपण पाहतो किंवा वाचतो.

जमीन एकच असते पण ती दोन-तीन वेगवेगळ्या लोकांनी विकत घेतल्याचा दावा ते लोक करत असतात.

असं खरंच होऊ शकतं का? आणि असं का होतं?

जेव्हा एखादी व्यक्ती आपली जमीन विकायला काढते तेव्हा ती ग्राहक शोधते.

एखाद्या ग्राहकाकडून चांगली किंमत मिळाली की त्या व्यक्तीला जमीन विकली जाते.

पैशाचा व्यवहार पूर्ण झाल्यानंतर सातबा-यावरून मूळ मालकाचं नाव लगेचच कमी होत नाही.

नवीन मालकाचं नाव सातबा-यावरती यायला काही वेळ लागतो.

या प्रोसेस साठी साधारण दोन ते तीन महिन्याचा कालावधी लागू शकतो.

तुम्ही जमीन विकत घेतली तर ती जमीन आपल्या नावावर करण्यासाठी सातबाऱ्यावर तुमचं नाव लागलं पाहिजे.

त्यासाठी तलाठ्याकडे जाऊन अर्ज करावा लागतो. सातबारा आणि खरेदीखताचा सूची क्रमांक दोन म्हणजे इंडेक्स टू (Index ii) जोडावा लागतो.

बदल होण्यासाठी दोन तीन महिने सहज जातात.

या कालावधीत जमिनीचा मूळ मालक दुस-या ग्राहकाला रजिस्टर खरेदीखत वापरून पुन्हा जमीन विकू शकतो.

फसवणूक करू पाहणारी व्यक्ती असे दोन-तीन व्यवहार सहज करून ठेवते.

कारण पूर्वी हा प्रकार उघडकीला यायला दोन ते तीन महिने लागायचे.

प्रकरण कोर्टात गेला की रजिस्टर खरेदी खताची पहिली तारीख ज्याची तो त्या जमिनीचा नवा मालक ठरतो. म्हणजे पहिलं खरेदीखत कायदेशीर ठरतं.

त्यामुळे पुढच्या दोन ते तीन व्यक्तींची फसवणूक होते.

मात्र या प्रकाराला आता थोडासा आळा बसलेला आहे तो तंत्रज्ञानामुळे.

महसूल खात्यानं खरेदीचा व्यवहार आता ऑनलाईन सर्व्हरशी इंटरलींक केला आहे.

त्यामुळे खरेदीखत रजिस्टर झाल्यावर एक किंवा दोन दिवसात ऑनलाईन सातबारावरती वरच्या बाजूला डावीकडं फेरफार प्रलंबित नंबर लाल अक्षरांमध्ये दिसतो.

त्यामुळे जमीन खरेदी करण्यापुर्वी सातबा-याची काळजीपूर्वक खात्री करुन घेणं गरजेचं असतं.

2) व्हिसार पावती एकाची जमीन व्यवहार दुसऱ्याशी

एखाद्या व्यक्तीने जमीन विक्रीला काढल्यानंतर ग्राहकाला जमीन पसंत पडते.

मात्र जमिनीची किंमत ही बऱ्यापैकी जास्त असते.

इतकी रक्कम पटकन उभी करणं ग्राहकाला जरा अवघड जातं. ग्राहकाला थोडा वेळ हवा असतो.

पण जमीन विकत घेतो असं नुसतं सांगून ग्राहक परत फिरकलाच नाही तर जमीन विकणा-या व्यक्तीचं नुकसान होऊ शकतं.

किंवा तुम्ही पैसे जमा करेपर्यंत पर्यंत दुसरी व्यक्ती जमीन खरेदी करू शकते.

त्यासाठी व्हिसार म्हणून काही रक्कम आधी देऊन नंतर पूर्ण पैसे द्यायचे आणि जमिनीचा व्यवहार पूर्ण करायचा अशी एक पद्धत असते.

थोडक्यात ऍडव्हान्स रक्कम देऊन पूर्ण पैसे दिल्यानंतर व्यवहार पूर्ण करायचा.

मात्र या बाबतीत असं होतं की एखाद्या व्यक्तीने व्हिसार दिल्यानंतर सुद्धा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीने जास्त पैशांची ऑफर दिली तर मूळ मालक दुसऱ्या व्यक्तिबरोबर व्यवहार रजिस्टर खरेदीखत द्वारे पूर्ण करून टाकतो.

यामध्ये व्हिसार दिलेल्या व्यक्तीची फसवणूक होते. आणि व्हिसार म्हणून बऱ्यापैकी रक्कम दिलेली असते.

पण खरेदीखत मात्र दुसऱ्या व्यक्तीच्या पदरात पडतं.

त्यामुळे ही फसवणूक टाळण्यासाठी व्हिसार पावती झाल्यानंतर निश्चिंत न राहता लवकरात लवकर पैसे भरून रजिस्टर खरेदीखतने व्यवहार लवकरात लवकर पूर्ण करावा.

3) गहाण जमिनीची विक्री

जमीन मालक आपल्या जमिनीला गहाण ठेवून बँकेकडून कर्ज काढू शकतो.

या कर्जाची सातबाऱ्यावर नोंद होण्यापूर्वी जर त्यांनं जमिनीची विक्री केली तर ग्राहकाची फसवणूक होते हे उघड आहे.

ही फसवणूक तलाठ्याकडे सातबा-याची नोंद करायला गेल्यानंतरच लक्षात येते.

त्यासाठी जमिनीच्या मालकाची त्या गावातील विश्वासू व्यक्तींकडे चौकशी करावी.

संशयास्पद वाटलं तर बँकेतही चौकशी करावी. म्हणजे तुमची मोठी फसवणूक टळू शकते.

4) वारसाची किंवा कुळाची हरकत

जमिनीची खरेदी जर तुम्ही घाईघाईनं केली तर ती तुमची मोठी चूक ठरू शकते.

खरेदी करण्यापूर्वी तुम्ही काही वर्ष पैशांचं नियोजन केलेलं असतं. ही रक्कम मोठी असते.

त्यामुळे जमिनीची खरेदी करताना शांतपणे अनेक गोष्टी क्लिअर करून, व्यवस्थित चौकशी करून मगच जमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण करावा.

बऱ्याच वेळेला जमीन ही वडिलोपार्जित इस्टेट असते. समजा या जमिनीचा मूळ मालक जिवंत नसेल तर सातबाऱ्यावर वारस म्हणून त्याच्या मुलाचं नाव तुम्ही पाहता.

पण या वारसांमध्ये मुलींची नावं जोडली नसतील आणि त्याबद्दल तुम्ही चौकशी केलेली नसेल तर ही जमीन खरेदी करून तुम्हाला काहीही उपयोग होणार नाही.

एकदा जमीन खरेदी केल्यानंतर त्या जमिनीच्या कुळांनी किंवा वारसांनी आपल्या हक्काचा दावा लावला तर ही केस कोर्टामध्ये बरीच वर्ष चालू राहते.

मूळ मालकाचं तर नुकसान होतंच पण तुम्हाला ही त्रास होतो.

जमीन ही एक मालमत्ता आहे आणि ती खरेदी करताना अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्या जिथे जमीन खरेदी करणार आहात तिथल्या गावांमध्ये नीट चौकशी करा.

मगच जमीनीचा व्यवहार पूर्ण करा. तरच तुम्ही तुमची फसवणूक टाळू शकाल.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.