संगीत विश्वातील अज्ञात प्रतिभावंत

माझ्या लहानपणाच्या बहूतेक आठवणी रेडिओशी निगडीत आहेत. रेडिओ हा फक्त सुंदर सुंदर गाणी ऐकता यावी म्हणून तयार केलेले एक उपकरण आहे अशी माझी ठाम श्रद्धा असण्याचा तो काळ होता. रेडिओ ऐकत असताना जेव्हा गाणे सुरू होई तत्पूर्वी एखादे म्युझिक किंवा एखादा ताल किंवा कुठल्या तरी वाद्याचा मेळ आगोदर वाजत असे आणि मग गाणे सुरू होत असे. मग हळूहळू या गाण्याच्या पूर्वी वाजणाऱ्या सुरावटी ओळखीच्या झाल्या आणि आत्ता गाणे कोणते वाजणार? हे ओळखता येऊ लागले. मी असे गाणे ओळखले की मित्रानां आश्चर्य वाटायचे. ते म्हणायचे- “तू अगदी बरोब्बर कसे ओळखतोस?”…..हा…हा….हा…ते मी का सांगू?

काही नमूना गाणी मी येथे उदाहरण म्हणून देतोय. लेख पूर्ण वाचून झाला की ही गाणी पुन्हा एकदा वाजवून बघा. मग तुम्हाला अशी डझनभर गाणी सापडतील जी तुम्हाला या पूर्व सुरावटीमुळे सहज ओळखता येतील……..उषा उत्थुप, आशा भोसले यांचे “हरे रामा हरे कृष्णा” या गाण्याचा सुरूवातीचा वाद्यमेळ…….”बोल राधा बोल संगम होगा की नही” या गाण्याच्या सुरूवातीला राज कपूरने बॅग पाईपर या वाद्यावर वाजवलेली धून…….. “दम मारो दम” या गाण्यापूर्वी चेलो, इलेक्ट्रीक गिटार, ड्रम्स या वाद्यांची धून…..”होठों पे ऐसी बात मैं” मधील गाण्याच्या पूर्वीचा विविध तालवाद्यांचा ग्रॅजंर वाद्यमेळ…..”मधूबन मे राधिका नाचे रे” या गाण्यापूर्वीचे सतारीचे तुकडे………”रमैया वस्तावैया” या गाण्यापूर्वीची लयदार धून………..”ना तो कारवाँ की तलाश है” या कव्वालीपूर्वीचे हार्मोनियम, ढोलक, काचेचे तुकडे यांचा सुंदर मिलाप……..”आजा सनम मधूर चाँदनी मे हम” या गाण्यापूर्वीचे अकॉर्डियन……..”मन डोले तन डोले” या गाण्यापूर्वी इलेक्ट्रिक सिंथेसाईजर वर वाजवलेली नागीन धून……..”घर आया मेरा परदेसी” या गाण्यापूर्वीची बँजो आणि ढोलक वरील धून…….”ये मेरा दिल प्यार का दिवाना” गाण्यापूर्वी इलेक्ट्रॉनिक गिटार व सिंथेसायझर वर वाजवलेली धून…. वगैरे वगेरे. तुम्हालाही अशी शेकडो गाणी आठवतील यात शंका नाही.

सबंध गाणे रेकॉर्ड होऊन आपल्या पर्यंत येण्याची एक लांबलचक प्रक्रिया ही अत्यंत जटील अशी असते. संगीतकाराकडे गीतकार आपले गीत देतो. या गीताला एक चाल लावण्याची जबाबदारी संगीतकारावर असते. गाण्यातले मुखडे व अंतऱ्यानां चाल लावली की गायकां कडून तालीम करून घेतली जाते. या सर्व प्रक्रियेत एक हार्मोनियम, तबला किंवा ढोलक एवढी वाद्ये पूरेसी असतात. पण या गाण्याला नितांत श्रवणीय बनविण्याची प्रक्रिया मात्र म्युझिक अरेजंर करत असतो. गाण्याच्या सुरूवातीला आणि दोन अंतऱ्याच्या मध्ये नेमके कोणते म्युझिक बसवायचे व यासाठी कुठली वाद्ये वापरायची, या सर्वांचे नोटेशन कसे तयार करायचे, प्रत्येक वाद्य कलावंताने नेमके आपले वाद्य कसे वाजवायचे व केंव्हा वाजवायचे हे सर्व काम वाटते तितके सोपे कधीच असत नाही. पूर्वी एकेका गाण्याच्या रेकॉर्डडिंगसाठी अक्षरश: आठ आठ दिवस ही कसरत करावी लागते. (अर्थात हल्ली तंत्रज्ञान खूप पूढे गेले असल्यामुळे बरीच मेहनत कमीही झाली आहे.) एकावेळी शेकडो लोकानां आपल्या हाताच्या इशाऱ्याने नियंत्रित करणारे हे संगीत संयोजक व आपल्या वाद्याने आमचे कान तृप्त करणारे मुझिशियन मात्र गुमनाम राहिले व आजही गुमनाम आहेत. झगमगत्या चंदेरी पडद्यामागे हे सर्व कलावंत अत्यंत निष्ठेने आपली कामगिरी चोखपणे पार पाडत असतात.

गंमत म्हणजे भारतीय संगीतकार देशातील सर्वच प्रांतातुन आलेले आढळतात मात्र बहूतेक म्युझिक अरेन्जर गोव्याचे कलाकार आहेत. असे का बरे झाले असावे? यासाठी थोडे मागे इतिहासात जावे लागेल. ब्रिटीश आपल्या बरोबर अनेक गोष्टी घेऊन् आले आणि जाताना येथेच सोडूनही गेले. त्यांच्या लष्काराचा एक महत्वपूर्ण घटक म्हणजे लष्करी बॅन्ड. आजही हा बॅन्ड भारतीय लष्कर पोलिस दल आणि लग्नातील बॅन्डवाले बनून आपली भूमिका पार पाडत आहे. या बॅन्डमध्ये विविध वाद्ये वाजविली जातात. तुम्ही या लष्करी बॅन्डचे काळजीपूर्वक निरिक्षण केले तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक वाद्य वाजविणाऱ्या समोर कागदावर काही लिहलेले असते. याला नोटेशन असे म्हटले जाते. प्रत्येक कलावंत समोरचे नोटेशन आपल्या वाद्यावर वाजवित असतो. याच लष्करी बॅन्ड मधले ए.बी. अल्बुकर्क, राम सिंह व पीटर डोरॅडो या त्रिकूटानी आपली ए.आर.पी. नावाची बॅन्ड पार्टी तयार केली. भारतीय चित्रपटसृष्टीले आद्य म्युझिशियन असे याना म्हटले तर वावगे ठरू नये.

अमर अकबर एथँनी या चित्रपटात एक गाणे आहे- “माय नेम इज एंथनी गोन्साल्वेस” यातील एंथनी गोन्साल्वेस हे खरोखरचे म्युझिक एरेजंर होते. जे या प्रवाहात सामिल झाले. नतंर ट्रम्पेट वादक चिक चॉकलेट, सॅक्सोफोन वादक जॉनी गोम्स, एरेजंर सेबेस्टियन डिसुजा, फ्रॅन्क फर्नाडिंस, मार्टन पिंटो, चिक कोरिया, सी फ्रान्को, अल्बर्ट डिकोस्टा, आर्थर परेरा, क्रिस पॅरी या सारखे म्युझिशियन व एरेजंर या भारतीय चित्रपट संगीताच्या मूख्य प्रवाहात येऊन मिसळून गेले. ही सर्व मंडळी पारशी,ख्रिश्चन व पोर्तुगिज अशा समाजातुन आलेली असल्यामुळे पाश्चिमात्य वाद्यही आपल्या सोबत घेऊन् आले. ५०च्या दशकात प्रथम शंकर जयकिशन या जोडीने आणि नंतर नौशाद यांनी आपल्या भव्य ऑर्केस्ट्रात या सर्व कलावंताचा पुरेपूर वापर करून घेतला.

लक्ष्मीकांत प्यारेलाल या जोडीतील प्यारेलाल यांचे वडील राम प्रसाद शर्मा हे ४०-५० च्या दशकातील उत्कृष्ट ट्रम्पेटवादक व म्युझिक एरेजंर होते. पण असे अपवाद वगळता अधिकांश वाद्यमेळ संयोजक हे गोवेकरीच होते. वनराज भाटीया हे सुप्रसिद्ध संगीतकार व एरेजंर म्हणतात की चित्रपटातील हॉटेल डान्सचे म्युझिक हे पूर्णपणे गोवन कलाकारांची भारतीय चित्रपटसृष्टीला देन आहे. यात भारतीय शास्त्रीय संगीताचा कोणताच सहयोग नाही आणि ते खरेही आहे. कारण मुळात हॉटेल, बार, रेस्टारेन्टस्, मोटेल्स या संकल्पनाच पाश्चिमात्य आहेत. त्यामुळे तेथील नृत्याचा बाजही तसाच असणार. हिंदी चित्रपटातील हॉटेल डान्स वरील गाणी लोकप्रिय करण्याचे श्रेय निश्चीतपणे या गोवन कलावंताकडे जाते. “मेरा नाम चिनचिन चू” ते “पिया तू अब तो आजा” अशी एक खूप मोठी यादी या गाण्यांची आहे. चित्रपटातील गाण्यात जाझ आणि ब्रास सोलो वाद्यांचा वापर याच कलावंतानी केला. गोव्याला चर्च संस्कृतीची एक मोठी परंपंरा आहे. त्यामुळे चर्च मधून संगीताचे नोटेशन कसे लिहावे व वाजवावे याचे प्रशिक्षण मिळत असे. त्यामुळे गोवन म्युझिशीयन जितके हवे तितके परफेक्टपणे वाजवू शकत होते. उलट भारतीय म्युझिशीयनची ही एक मोठी समस्या होती त्यासाठी त्याना आगोदर हे नोटेशन शिकावे लागत असे.

ट्रम्पेट वादक चिक चॉकलेट, सॅक्सोफोन वादक जॉनी गोम्स, एरेजंर सेबेस्टियन डिसुजा, तालवाद्याचे मास्टर दत्ताराम हे सर्व या भूमितील रत्ने होत. ज्यांनी नंतर मुंबईतील चित्रपटसृष्टीतील संगीताला मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले. दक्षिण गोव्यातील माजोर्दा या गावात जन्मलेले एंथनी गोन्साल्वेस हे ४० ते ६० च्या दशकातील महत्वाचे अरेजंर. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी त्यांचे संगीतातील टॅलेन्ट संगीतकार नौशाद यांनी हेरले आणि त्यांच्याकडे त्यांनी कामास सुरूवात केली. पूढे ते एक अत्यंत महत्वाचे संयोजक म्हणून प्रसित्द्ध झाले. संगीतकार लक्ष्मीप्यारे त्यांना आपले गुरू मानत असत. प्यारेलाल यानां त्यांनी तीन वर्षे व्हायोलिन शिकवले होते. “एक प्यार का नगमा है”….या गाण्यातील व्हायोलिन व इतर अनेक गाण्यातील व्हायोलिन स्वत: प्यारेलाल यांनी वाजविले आहे. लक्ष्मीप्यारे नेहमी म्हणत की या आमच्या गुरूने आम्हाला फक्त संगीतच नाही तर एक चांगला माणूस कसा असावा हेही शिकवले. या गुरूला संगीतमय श्रद्धाजंली म्हणून त्यांनी “माय नेम इज एंथनी गोन्साल्वेस” हे गाणे तयार केले. एंथनी गोन्साल्वेस” यानी पाश्चात्य शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतलेले होतेच पण मुंबईला गेल्या नंतर ते भारतीय शास्त्रीय संगीतही तितक्याच तन्मयेते शिकले. “हकिकत” या सिनेमातील मंहमद रफी यांनी गायलेले खालील अजरामर गाणे आठवा-

मै ये सोचकर उसके दर से उठा था
के वो रोक लेगी मना लेगी मुझको……..

या संपूर्ण गाण्याचे संगीत नियोजन एंथनी गोन्साल्वेस यांनी तयार केले होते. यातील व्हायोलिनचे सर्व तुकडे त्यांनीच वाजवले आहेत. मदन मोहन यांच्या संगीत कारकिर्दीतील यशस्वी गाण्यापैकी हे एक आहे.

गोव्यातील अल्दोना या छोट्या गावात जन्मलेले अन्टोनियो झेवियर वाझ उर्फ चिक चॉकलेट हे भारतीय चित्रपटसृष्टीतील नामवंत ट्रम्पेट वादक. अत्यंत वळणा-वळणाचे आयुष्य लाभलेला हा म्युझिशियन लुईस आर्मस्ट्राँग या प्रसिद्ध ट्रम्पेट वादकाला आपला गुरू मानत असे. ट्रम्पेट या वाद्यावर चिक चॉकलेट यांनी अनेक प्रयोग केले. मास्टर भगवान यांच्या अलबेला या चित्रपटाचे संगीतकार सी.रामचंद्र यांच्याकडचे ते महत्वाचे म्युझिशियन होते. शोला जो भडके, ओ बेटाजी किस्मत की हवा कभी गरम, दिवाना ये परवाना (या गाण्यात स्वत: चिक चॉकलेट आपल्या वाद्यासह नाचताना दिसतात) इत्यादी सर्वच गाण्यात ट्रम्पेट या वाद्याची जादू लक्षात येईल. “जाने कहाँ गये वो दिन”… या गाण्यात हे वाद्य मनाला किती स्पर्शुन जाऊ शकते याचा नक्कीच प्रत्यय येईल.

गोव्यातच जन्मलेले आणखी एक महान म्युझिशियन म्हणजे सॅबेस्टियन डी’सुझा. भारतीय आणि युरोपियन शास्त्रीय संगीत शिकलेल्या या संगीतकाराने भारतीय चित्रपट संगीताचे हर्मनी स्ट्रक्चरच बदलून टाकले. हर्मनी म्हणजे विविध वाद्यांचा एकत्रित गुंफलेला स्वरमेळ. ओ.पी.नय्यर आणि शंकर जयकिशन या दोन संगीतकाराचे संगीत नियोजन सॅबेस्टियन करीत असत. खरे तर हे दोन्ही संगीतकार वेगवेगळ्या प्रकृतीचे पण या दोन्ही संगीतकाराच्या चालीनां सॅबेस्टियन यांनी वेगवेगळा संगीत साज चढवला. मेरा नाम चीन चीन चूं, सुन सुन सुन जालिमा, आपके हसीन रूखपर आज नया रंग है, बंदा परवर थाम लो जिगर, रात के हमसफर या ओ.पी नय्यरच्या सर्व गाण्यातील संगीत आजही मनाला मोहून टाकते. शंकर जयकिशन यांच्या चाली एकदम वेगळ्या प्रकारच्या असत. अकार्डियन हे वाद्य जयकिशन यानां खूप आवडत असे. स्वत: सॅबेस्टियन हे उत्कृष्ट अकार्डियन वाजवत. आजा सनम मधूर चाँदनी मे हम व ये रात भिगी भिगी या गाण्यातील सुरूवातीचे अकार्डियनचे सूर वजा करून बघा….सगळी मजाच निघून जाईल. या शिवाय शंकर जयकिशनची ही गाणी बघा-तेरा जाना, अजीब दास्ताँ है ये, ये मेरे दिल कही और चल, जीना यहाँ मरना यहाँ, ये मेरा प्रेम पत्र है, तुझे जीवन की डोर मे बांध लिया है, तेरा मेरा प्यार अमर इत्यादी. ही सर्व गाणी मेलडीमुळे आजही आम्हाला श्रवणीय वाटतात. मेलडी किंग हे बिरूद खऱ्या अर्थाने शंकर जयकिशन यानां दिले जाते त्यात फक्त आणि फक्त सॅबेस्टियन डी’सुझा याचां निम्मा वाटा आहे. वसंत देसाई ऐ मालिक तेरे बंदे हम या गाण्यातील कोरस आणि बंगाली मृदुंग आठवून बघा..सर्व किमया सॅबेस्टियन यांची. पार्श्व सगीतासाठी एकाच वेळी ५० ते १०० व्हायोलिनचा किंवा बास सेलोचा वापर त्यांच्या इतके प्रभावीपणे कुणाला जमत नसे. चर्चमध्ये जे ऑरगन आजही वाजविले जातात त्याचाही अत्यंत सुंदर वापर सॅबेस्टियन यांनी केला आहे. संगम या चित्रपटातील पार्श्व संगीत आजही मनाला मोहून टाकते. कोरसचा समर्पक वापर ऐकायचा असेल तर फक्त त्यांचे “दिलके झारोके मे तुझको बसाकर…हे गाणे ऐका किंवा “जीना यहाँ मरना यहाँ” ऐका….कोरस मनाचा ठाव घेतो तर संगम मधील “ओ मेरे ओ मेरे सनम” या शिवरंजनी रागात बांधलेल्या गाण्यातील सतारीचे बोल कानातुन थेट हृदयात उतरतात. त्यांची सून मर्लिन डिसूझा स्वत: देखिल चांगली म्युझिक कंपोजर आहे ती आजही आपल्या सासऱ्याच्या कामा समोर नतमस्तक होते.

संगीतकाराच्या यशामध्ये हे अरेजंर आपली सर्व प्रतिभा पणाला लावतात. सर्व वाद्याचे नोटेशन त्या त्या कलावंताना दिल्या नंतर ते तसे वाजवितात की नाही यावर अरेजंर बारीक लक्ष ठेवून असतात. समजा त्यातील कुणी एखाद्याने चुकीचे वाजवले तर त्या कलावंताला सर्वा समोर त्याचा अपमान होईल म्हणून त्या कलावंताला न बोलता ते संगीत दिग्दर्शकाला सांगत असत.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय