जाणून घेऊया गृहकर्ज (होम लोन) आणि तारण कर्ज (मॉर्टगेज लोन) यातील फरक?

गृहकर्ज (होम लोन) आणि तारण कर्ज (मॉर्टगेज लोन) यातील फरक समजून ओळखा तुमची गरज काय आहे?

जाणून घेऊया गृहकर्ज (होम लोन) आणि तारण कर्ज (मॉर्टगेज लोन) म्हणजे नक्की काय? नक्की काय फरक आहे या दोन्ही मध्ये?

मनाचेTalks वरील लेखांमधून आम्ही तुम्हाला वेळोवेळी गृहकर्जाबद्दल माहिती देत असतोच. परंतु बरेच वेळा लोकांकडून गृहकर्ज आणि तारण कर्ज म्हणजे नक्की काय याबाबत गल्लत होते. म्हणून आज आम्ही गृहकर्ज आणि तारण कर्ज यामध्ये नक्की काय फरक आहे हे सविस्तरपणे सांगणारा हा लेख घेऊन आलो आहोत.

गृहकर्ज आणि तारण कर्ज हे, दोन्ही एकच असल्याची बऱ्याच जणांची समजूत असते. परंतु तसे नाही. या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत.

सर्वप्रथम आपण होम लोन म्हणजेच गृह कर्ज म्हणजे काय ते पाहूया…

जेव्हा एखादी व्यक्ती बँकेकडून नवीन घर घेण्यासाठी किंवा नवीन घर बांधण्यासाठी कर्जाऊ रक्कम घेते तेव्हा त्यास होम लोन किंवा गृहकर्ज असे म्हटले जाते.

राहत्या घराचे रिनोवेशन करण्यासाठी म्हणजेच घरांमध्ये दुरुस्ती करण्यासाठी सुद्धा गृहकर्ज घेतले जाऊ शकते. त्याच प्रमाणे जमीन खरेदी करण्यासाठी सुद्धा गृहकर्ज घेतले जाऊ शकते. अशा पद्धतीच्या कर्जामध्ये कर्ज फिटेपर्यंत सदर मालमत्तेची मालकी बँकेकडे असते. संपूर्ण कर्ज फेडल्यानंतर मालमत्तेची मालकी मूळ मालकास हस्तांतरित केली जाते.

कर्ज फेडण्यासाठी दरमहा काही ठराविक रक्कम म्हणजेच इ. एम. आय. निश्चित केलेला असतो. जर असा ई. एम. आय. भरण्यास कर्जदार व्यक्ती असमर्थ ठरला तर ती मालमत्ता ताब्यात घेऊन त्यातून कर्ज वसुली करण्याचा अधिकार कर्ज देणाऱ्या बँकेला असतो.

मालमत्तेच्या किमती पैकी ८० ते ९० % रक्कम कर्जाऊ स्वरूपात मिळू शकते. तसेच गृह कर्ज फेडण्याचा व्याजदर हा फिक्स आणि फ्लोटिंग अशा दोन्ही स्वरूपाचा असतो. तसेच कर्जाच्या परतफेडीची मुदत जास्तीत जास्त ३० वर्षा पर्यंत असू शकते. गृहकर्जावर ०.५ ते १ टक्का इतकी प्रोसेसिंग फी देखील लागू शकते.

ही झाली गृह कर्जाबाबतची माहिती.

आता आपण तारण कर्ज म्हणजेच मॉर्टगेज लोन म्हणजे काय ते पाहूया…

गृहकर्ज हे जरी नवीन घर बांधण्यासाठी किंवा विकत घेण्यासाठी घेता येत असले तरी तारण कर्ज मात्र कोणत्याही गरजेसाठी घेतले जाऊ शकते. याचा थोडक्यात अर्थ असा की आपल्या कोणत्याही गरजेसाठी (उदाहरणार्थ मुलांचे उच्च शिक्षण, लग्न किंवा एखाद्याचे आजारपण) यासाठी आपले राहते घर तारण ठेवून कर्ज घेता येऊ शकते. दोन्ही प्रकारच्या कर्जामध्ये सारखी गोष्ट अशी की कर्ज फिटेपर्यंत मालमत्तेची मालकी कर्ज देणाऱ्या बँकेकडे असते.

तारण कर्जामध्ये मालमत्तेच्या म्हणजेच घराच्या किमतीच्या जास्तीत जास्त ७० % इतकीच रक्कम कर्जाऊ मिळू शकते. तारण कर्जाची प्रोसेसिंग फी साधारणपणे १.५ टक्के इतकी असते.

तारण कर्जाचा मुदतफेडीचा कालावधी साधारणपणे १५ वर्षे इतका असतो. तसेच तारण कर्जाचा परतफेडीचा व्याजदर गृहकर्जापेक्षा १ ते ४ टक्के इतका जास्त असू शकतो.

यावरून आपल्या असे लक्षात आले आहे की गृहकर्ज आणि तारण कर्ज दोन्हीही घर गहाण ठेवूनच मिळत असले, तरी गृहकर्ज हे नवीन घर बांधण्यासाठी किंवा आहे ते घर दुरुस्त करण्यासाठी मिळते तर तारण कर्ज हे त्या व्यक्तीच्या कोणत्याही गरजेसाठी मिळू शकते.

भारतामध्ये तारण कर्ज मिळवण्यासाठी नक्की काय नियम आहेत आणि कोण कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते ते आता आपण पाहूया…

तारण कर्जासाठी सुद्धा गृह कर्जासाठी लागणारीच कागदपत्रे लागतात. कर्ज मागण्यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीची ते कर्ज फेडण्याची क्षमता आहे हे सिद्ध करावे लागते. तसेच गहाण ठेवली जाणारी मालमत्ता अर्जदाराच्याच मालकीची आहे हे सिद्ध करणारी कागदपत्रे देखील सादर करावी लागतात.

आवश्यक कागदपत्रांची यादी खालील प्रमाणे आहे 

१. अर्जदाराचे आयडी प्रूफ (पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वोटर आयडी कार्ड)

२. अर्जदाराचे ऍड्रेस प्रूफ (लाईट बिल, प्रोपर्टी टॅक्स, पाणी बिल, पासपोर्ट किंवा राहत्या घराचा पत्ता दाखवणारे कोणतेही ओळखपत्र)

३. अर्जदार व्यक्तीच्या उत्पन्नाचा दाखला आणि नियमित उत्पन्न मिळत असण्याचे प्रूफ उदाहरणार्थ सॅलरी स्लिप.

४. अर्जदार व्यक्तीच्या बँक अकाउंटचे स्टेटमेंट.

५. जी मालमत्ता गहाण ठेवून कर्ज घ्यायचे त्या मालमत्तेचे प्रॉपर्टी डॉक्युमेंट, खरेदीखत इत्यादि

६. अर्जदार व्यक्तीचे मागील तीन वर्षाचे इन्कम टॅक्स रिटर्न.

तर मित्रांनो, आज आपण पाहिले की आपले राहते घर तारण ठेवून आपण काही रक्कम कर्जाऊ घेऊ शकतो. अर्थातच ती रक्कम संपूर्णपणे फिटेपर्यंत आपले घर आपल्याला कर्ज देणाऱ्या बँकेकडे गहाण पडलेले असते. कर्जाची रक्कम संपूर्ण फेडल्यावरच ते आपल्याला परत मिळू शकते.

आज आपण गृहकर्ज आणि तारण कर्ज यातील फरक देखील पाहिला आणि आपल्या असे देखील लक्षात येते की गृह कर्ज हे तुलनेने कमी खर्चिक असून मिळणारी कर्जाऊ रक्कम देखील जास्त असते याउलट तारण कर्जात कर्जाऊ मिळणारी रक्कम कमी असते आणि व्याजाचा दर देखील जास्त असतो. परंतु तारण कर्जाचा फायदा असा की ते कोणत्याही अडीअडचणीला उपलब्ध होऊ शकते.

मित्र-मैत्रिणींनो, याबाबतचे तुमचे काही अनुभव असतील तर ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि या लेखातील माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!