जांभळाच्या बियांचे फायदे आणि त्याचा उपयोग कसा करावा?

jambhlachya biyanche fayde

मधुमेहींसाठी संजीवनी असणारे जांभूळ इतरही कित्येक फायदे देऊन जातं, पण त्यासाठी त्याची उपयोग कसा करावा, हे महत्त्वाचे आहे.

जांभूळ ज्याला, ब्लॅक प्लम किंवा इंडियन ब्लॅकबेरी म्हणूनही ओळखलं जातं.

उन्हाळा संपता संपता आणि पावसाळ्यात सुरवातीच्या दिवसात मिळणारी जाभंळं सगळ्यांनाच आवडतात.

जांभळाला औषधी वनस्पतीच म्हणावी लागेल, याचं कारण त्यातले विविध औषधी गुण.

जांभूळ हे उन्हाळी फळ आहे जे उष्माघातापासून तुमचं संरक्षण करतं.
.
कॅन्सर, तोंडातले व्रण, ऍनिमिया, संधिवात, यकृताच्या समस्या अशा अनेक आजारांवर जांभूळ फायदेशीर आहे.

जांभळाला पोषक तत्वांचं भांडार म्हणायला हवं कारण त्यात व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, कॅल्शियम, लोह, फायबर, मॅग्नेशियम, पोटॅशियम, प्रथिने आणि कार्बोहायड्रेट्स भरपूर प्रमाणात असतात.

तुम्ही जांभळाचं फळ नक्की खाल्लं असेल आणि खाताना फक्त त्याचं जांभळ्या रंगाचा गर खाऊन तपकिरी रंगाच्या बिया फेकल्या असतील.

पण आज आम्ही तुम्हाला जांभळाच्या बियांचे असे काही फायदे सांगणार आहोत,की यानंतर तुम्ही जांभळाच्या बिया कधीच फेकणार नाही.

जांभळाच्या बियाच काय, पण पानं, साल आणि फळं या सर्वांमध्ये औषधी गुणधर्म आहेत.

आयुर्वेदीय औषधात, युनानी औषधात आणि चायनीज औषधांमध्येही जांभळाच्या बियांचा वापर केला जातो.

विशेषत: मधुमेह आणि पाचक रोग यामध्ये जांभळाच्या बियांचा वापर करतात.

आरोग्य तज्ज्ञांच्या मते जांभळाच्या बिया बारीक करून त्याची पावडर केली आणि त्याचा नियमित वापर केला तर मधुमेहाच्या रुग्णांना खूप फायदा होतो.

मधुमेहाशिवाय आणखीही काही रोगात जांभळाच्या बियांची पावडर वापरता येते.

जांभळाच्या बियाचे फायदे

1) साखरेचे प्रमाण कमी करते

मधुमेहींसाठी जांभळाच्या बिया प्रभावशाली ठरतात.

डायबेटिसच्या पेशंटना कोणतं ही फळ खाताना दहा वेळा विचार करावा लागतो.

मात्र जांभूळ खाण्यासाठी फारसा विचार करावा लागत नाही.

आयुर्वेदानुसार जांभळाच्या तुरट चवीमुळं वारंवार लघवी होण्याची समस्या कमी होते.

जांभळात हायपोग्लायसेमिक गुणधर्म असतात शिवाय त्यात अँटिऑक्सिडंट्स ही असतात ज्यामुळे जांभूळ मधुमेहाच्या रुग्णांसाठी उत्तम फळ ठरतं.

जांभळाचे सगळे गुणधर्म जांभळाच्या गरामध्ये आणि बियामध्ये ही सापडतात.

जांभळाच्या बिया रक्तातील ग्लुकोजची पातळी लक्षणीयरीत्या कमी करतात आणि इन्सुलिनची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात.

संशोधनात असं लक्षात आलं आहे की जांभळाच्या बियांमध्ये रोगप्रतिबंधक गुणधर्म आहेत, जे हायपरग्लायसेमिया म्हणजेच रक्तातील ग्लुकोजचे जास्त प्रमाण या समस्येवर मात करण्यासाठी उपयुक्त ठरतात.

याशिवाय, जांभळाच्या बियांमध्ये 2 सक्रिय घटक आढळतात, जॅम्बोलिन आणि जॅम्बोसिन.

जे रक्तातील साखर सोडण्याचं प्रमाण कमी करतात आणि शरीरातील इन्सुलिनची पातळी वाढवतात.

जांभळाच्या बिया स्टार्चचं ऊर्जेत रूपांतर करून जास्त तहान लागणं आणि वारंवार लघवी होणं यासारखी मधुमेहाची लक्षणे कमी करण्यास मदत करतात.

2) रक्तदाब नियंत्रित करणे

केवळ मधुमेहच नाही तर उच्च रक्तदाबाच्या समस्येने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठीही जांभळाच्या बिया वरदान आहेत.

जांभळाच्या बियांमध्ये ‘लिकोरिस ऍसिड’ नावाचं अँटीऑक्सिडंट असते, जे रक्तदाब पातळीमध्ये वारंवार होणारे चढ-उतार रोखायला मदत करतं.

याचबरोबर जांभळाच्या बिया उच्च रक्तदाबाच्या समस्येवर नियंत्रण ठेवायला ही मदत करतात.

3) पचनाच्या समस्यांत प्रभावी

जांभळाच्या बिया थंड प्रवृत्तीच्या असतात, त्यामुळे त्या थंडाव्याचं काम करतात.

पचनाशी संबंधित अनेक समस्यांवर मात करायला ही या बिया मदत करतात.

जांभळाच्या बियांच्या पावडरमध्येही भरपूर फायबर असतं.

त्यामुळं नियमित ही पावडर खाल्ली तर पोट साफ राहतं, बद्धकोष्ठता होत नाही.

जुलाब, आमांश, तोंडाचे व्रण, जळजळ आणि आतड्यांतील व्रण या समस्यांवर ही जांभळाच्या बिया उपयुक्त ठरतात.

4) अँनिमियापासून बचाव

जांभळाच्या बियांमध्ये फ्लैवनॉयड्स असतात ज्यामुळं रक्त साफ होतच त्याचबरोबर संपूर्ण शरीरातले टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात, शरीर डिटॉक्स होतं.

जांभळाच्या बियांमध्ये लोहही मुबलक प्रमाणात आढळतं, त्यामुळं ऍनिमिया च्या समस्येपासूनही बचाव करण्यास या बिया मदत करतात.

जांभळाच्या बियांचे आणखी काही फायदे

जांभळाचंं बी लिव्हर आणि ह्दयाला हेल्दी बनवतं, हाडांना मजबुती देतं.

मुली आणि महिलांच्या पीसीओएस किंवा पीसीओडी या तक्रारीं दूर करायला जांभळाच्या बियांचा उपयोग होतो.

जांभळाच्या बिया वापरायच्या कशा?

जांभळाच्या बिया बारीक पावडर करून वापरता येतात.

यासाठी पहिल्यांदा, जांभळाच्या बिया गरापासून वेगळ्या करा. गराचा थोडासा भाग ही बियांवर राहणार नाही याची काळजी घ्या.

यानंतर बिया व्यवस्थित धुवून स्वच्छ करा. आता जांभळाच्या या बिया एका स्वच्छ कपड्यावर पसरवून उन्हात वाळवायला ठेवा.

या बिया कोरड्या व्हायला 3-4 दिवस लागतात. बिया सुकल्यावर त्यांची बाहेरची तपकिरी त्वचा आणि आतून बाहेर आलेले हिरव्या रंगाचे बी काढून पुन्हा १-२ दिवस उन्हात चांगले वाळवा.

या उन्हात वाळलेल्या जांभळाच्या बिया मिक्सर ग्राइंडरमध्ये ठेवून त्यांची बारीक पावडर करा.

तुम्हांला हवं असेल तर तुम्ही ही पावडर चाळा नको असेल तर चाळली नाही तरी चालतं.

आता तयार झालेली ही पावडर हवा बंद डब्यात ठेवा.

सकाळी उठल्यानंतर, एक चमचा जांभळाच्या बियांची पावडर एक ग्लास पाण्यात घालून रिकाम्या पोटी प्या.

जांभळाच्या बी चे फायदे तुम्हांला नक्कीच जाणवतील.

 

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!