रोजचेच तरीही थोडेसे वेगळे झटपट होणारे पदार्थ.

nashtyache prakar in marathi

‘रोज भाजी काय करायची?’ हा यक्ष प्रश्न रोजच गृहिणींना पडतो.

काही गृहिणी छान नियोजित करून वैविध्य आणायचा प्रयत्न करतात, मात्र तरीही काही वेगळा पदार्थ नाही का? असं घरातील प्रत्येक व्यक्ती विचारते.

याबद्दचा एक चटपटीत लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

आज आम्ही अशाच छोट्या छोट्या झटपट होणाऱ्या रेसिपी सांगणार आहोत. ज्यामुळे रोजच्या जेवणात वेगळेपणा येईल.

1) गोळा वरण

तुरीच्या डाळीचं वरण तर शक्यतो प्रत्येक घरात केलं जातंच. या वरणातलं जास्तीचं पाणी काढून घट्ट वरण घ्या. एकजीव करा. त्यात बारीक चिरलेला कांदा, थोडसं तिखट, चवीपुरतं मीठ, थोडासा गोडा मसाला किंवा गरम मसाला घाला. झटपट कालवण तयार. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

घरातली भाजी संपली असेल किंवा थोडं वेगळेपण हवं असेल तर हे ‘गोळा वरण’ नक्की ट्राय करा.

2) शिळ्या भाताचं थालीपीठ

रात्रीचा भात उरला तर फोडणीचा भात हा एकच पर्याय आपल्याकडे असतो. पण आता त्याचं मस्त थालीपीठ लावा.

उरलेल्या भातात कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची, मीठ, चाट मसाला, 1 चमचा धण्याजिराची पूड, 2 चमचे तांदळाचं पीठ, थोडे पोहे आणि जरासं दही घाला.

नीट कालवून तासभर भिजू द्या. तासाभरानं हाताने गोळे करून छान थालीपीठ लावा.

3) दोडक्याची चटणी

दोडक्याची भाजी म्हटलं की सगळे नाराज होतात. पण दोडक्याच्या भाजीत खसखशीचे वाटण घातलंत तर भाजी मस्त लागते, सगळे आवडीने खातील.

पण त्याच बरोबर भाजी करताना ज्या शिरा काढलेल्या असतात त्यांची खमंग चटणी सगळयांना आवडेल.

तर दोडक्याच्या साली स्वच्छ धुवून घ्या. पसरट अशा तव्यावर तेल टाका मोहरी, चिमुटभर हळद, आणि हिंग टाका. एक टेबलस्पून तीळ टाका. तीळ फुलून आले की लगेचच त्यामध्ये दोडक्याच्या साली टाकून परतून घ्या.

चवीनुसार मीठ आणि तिखट टाका. दोडक्याची सालं लालसर आणि आणि कुरकुरीत झाली की गॅस बंद करा.थोडा वेळ चटणी तशीच तापलेल्या तव्यावर राहू द्या. मिक्सरमध्ये एकजीव करून घ्या. ही चटणी खूपच खमंग लागते.

4) फोडणीचा भात

उरलेल्या भाताला फोडणी घालता तेंव्हा त्यात मेतकूट घाला. चवीत वेगळेपणा येईल. फोडणीत काजू, किंवा राजमा, मटार, गाजराचे तुकडे, फरसबी, फ्लॉवर अशा भाज्या घालूनही भाताला वेगळी चव आणता येईल.

5) केळीचं शिकरण

मामी आमची सुगरण… रोज रोज पोळी शिक्रण

हे बालगीत म्हणून दुर्लक्ष करू नका. आयत्या वेळी केळीचं शिकरणं पटकन होतं. आणि सगळ्यांना आवडतं.

आता शिकरणाची रेसिपी देण्याची गरज नाही. पण काही टिप्स नक्की फॉलो करा.

केळ्याचं शिकरण करताना एखादं केळं मिक्सर मध्ये पेस्ट करुन घ्या आणि आवडत असेल तर नारळाच्या दुधात शिकरण करा.

त्यात जायफळ, वेलची, केशर सिरप, बदाम काप किंवा बदामाची पूड, पिस्ता काप करून टाकलं की झालं शाही शिकरण !

अशा पद्धतीने अगदी कमी वेळात नेहमीच्याच साहित्यातून तुम्ही वेगळे पदार्थ करू शकता.

तुमच्या कडेही अशी झटपट होणारी, रेसिपी असेल तर आम्हांला कमेंट मध्ये नक्की कळवा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा/ टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठीयेथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!