लेखाचे शीर्षक चक्रावून टाकणारे आहे ना..
सहसा डेंग्यू किंवा तत्सम आजारात रुग्णाच्या प्लेटलेट्सची संख्या कमी होते आणि ती वाढवण्यासाठी काय उपाय करावे ह्याची चर्चा होत असते.
परंतु हे देखील खरे आहे की अतिशय दुर्मिळ प्रमाणात का होईना पण काही लोकांना शरीरात जास्त प्रमाणात प्लेटलेट्स तयार होण्याचा त्रास असतो आणि ते प्लेटलेट्स कमी कसे करता येतील ह्यासाठी त्यांना उपचार घ्यावे लागतात.
आज आपण रुग्णांच्या ह्याच समस्येबद्दल संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत तसेच प्लेटलेट्स कमी करण्यासाठी आहार आणि औषधे काय घ्यावीत ह्याची माहिती करून घेणार आहोत.
प्लेटलेट्स म्हणजे काय ?
प्लेटलेट्स हे रक्तातील अगदी लहान घटक असतात. शरीरावर एखाद्या ठिकाणी जखम झाली आणि रक्तस्त्राव सुरू झाला तर तेथील रक्तात गुठळी (blood clot ) निर्माण करून तो रक्तस्त्राव थांबवणे हे प्लेटलेट्सचे प्रमुख कार्य असते. असे करण्यामुळे शरीरातून जास्त रक्तस्त्राव होणे टाळले जाते.
अशा या प्लेटलेट्सचे शरीरातील प्रमाण योग्य असणे आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक असते.
परंतु काही लोकांमध्ये शरीर खूप जास्त प्रमाणात प्लेटलेट्सची निर्मिती करते.
या आजाराला थ्रोम्बोसायटोसिस असे म्हणतात. जर शरीरात खूप जास्त प्रमाणात प्लेटलेट्सची निर्मिती झाली तर त्यामुळे रक्तात खूप मोठमोठ्या गुठळ्या निर्माण होतात ज्यामुळे स्ट्रोक किंवा हार्ट डिसीज होण्याची शक्यता निर्माण होते.
रक्तात निर्माण होणाऱ्या गुठळ्यांमुळे रक्त प्रवाहामध्ये अडथळा निर्माण होऊन मेंदूला किंवा हृदयाला पुरेसा रक्तपुरवठा न होणे हा गंभीर आजार होऊ शकतो. त्यामुळे शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण नियंत्रणात असणे अतिशय आवश्यक असते.
शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी योग्य आहार, दिनचर्या आणि औषधोपचार यांची मदत घ्यावी लागते. ते कसे ते आपण पाहूया.
पद्धत पहिली : योग्य आहार आणि दिनचर्या
१. कच्चा लसूण
कच्चा लसूण ठेचून किंवा चिरून खाणे प्लेटलेट्सची संख्या कमी करण्यासाठी उपयोगी आहे कारण कच्चा लसूणामध्ये असणारे “ऍलिसिन” नावाचे द्रव्य शरीराची प्लेटलेट्स तयार करण्याची शक्ती कमी करू शकते.
त्यामुळे प्लेटलेट्सची निर्मिती कमी होऊन शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढते.
२. ginko biloba चे सेवन करणे
ginko biloba ह्या द्रव्याचे नियमित सेवन करण्यामुळे देखील प्लेटलेट्सची निर्मिती कमी होते. हे द्रव्य कॅप्सुल किंवा लिक्विड स्वरूपात औषधांच्या दुकानात मिळू शकते. (यात वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे.)
३. ginseng चे सेवन करणे
ginseng ह्या द्रव्याचे नियमित सेवन करण्यामुळे देखील प्लेटलेट्सची निर्मिती कमी होते.
हे द्रव्य कॅप्सुल स्वरूपात औषधांच्या दुकानात मिळू शकते. तसेच ते काही प्रमाणात एनर्जि ड्रिंक्समध्येही मिसळलेले असते. काही लोकांना ह्याच्या सेवनाने निद्रनाश किंवा मळमळणे असे साइड ईफेक्टस होऊ शकतात. अशा वेळी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
४. डाळिंब खावे
डाळींबाचे दाणे नियमित खाण्यामुळे शरीराची प्लेटलेट्स तयार करण्याची शक्ती कमी होते.
तसेच रक्तात गुठळ्या होण्याचे प्रमाण देखील कमी होते. डाळिंब नुसते सोलून, ज्यूस करून किंवा सॅलड मध्ये मिक्स करून असे कोणत्याही स्वरूपात खाल्ले जाऊ शकते.
५. ओमेगा ३ फॅटी ऍसिड असणारे मासे खावे
ओमेगा ३ फॅटी ऍसिडमुळे शरीरात प्लेटलेट्सची निर्मिती कमी होते, रक्तातील गुठळ्या कमी होतात तसेच रक्त पातळ राहते.
त्यामुळे टयूना, सामन असे ओमेगा ३ भरपूर प्रमाणात असणारे मासे आहारात अवश्य सामील करून घ्यावेत.
ओमेगा-3 फॅटी ऍसिड कोणत्या पदार्थात मिळते या माहितीसाठी येथे क्लिक करा.
६. रेड वाईनचे सेवन करावे
माफक प्रमाणात रेड वाईनचे सेवन करण्याचा ह्या आजारात फायदा होताना दिसतो.
रेड वाईनमुळे रक्तवाहिन्यांच्या कडा पातळ राहून रक्तप्रवाह सुरळीत राहतो, तसेच रक्तात गुठळ्या देखील होत नाहीत.
परंतु स्त्रिया व पुरुष दोघांनीही वाईनचे सेवन योग्य प्रमाणात करण्याचे भान ठेवले पाहिजे. अन्यथा उपचार होण्यापेक्षा दुष्परिणामच जास्त होऊ शकतात.
७. दालचीनीचे सेवन करावे
शरीरातील प्लेटलेट्सचे प्रमाण संतुलित ठेवण्यासाठी आहारात दालचीनीचा समावेश अवश्य करावा. दालचीनीची पाऊडर पदार्थात मिसळून खावी किंवा पदार्थ शिजवताना दालचीनीचा तुकडा त्यात घालावा.
तसेच चहा करताना देखील दालचीनीचा तुकडा घालता येऊ शकेल. मध आणि दालचीनी पावडरचे सेवनदेखील उपयोगी असते.
८. धूम्रपान करू नये
सिगरेटमध्ये असणाऱ्या घातक पदार्थांमुळे रक्तात गुठळ्या निर्माण होण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे तुम्ही जर धूम्रपान करत असाल तर ते त्वरित बंद करणे गरजेचे आहे.
पद्धत दुसरी : औषधोपचार
१. रक्त पातळ राहण्याच्या गोळ्यांचे सेवन तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने करावे
जर तुम्हाला ही समस्या असेल तर तुमचे डॉक्टर रक्त पातळ राहून रक्तातील गुठळ्या कमी होण्याचे तसेच प्लेटलेट्स नियंत्रणात राहण्यासाठीचे औषध घेण्याचा सल्ला तुम्हाला देऊ शकतात.
सहसा एस्प्रिन असणाऱ्या गोळ्या घेण्याचा सल्ला दिला जातो, परंतु अर्थातच हे तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानेच करावे. स्वतःच्या मनाने कोणतीही औषधे घेऊ नयेत.
२. प्लेटलेटफेरेसिस नावाची प्रोसीजर करून घेणे
जर शरीरातील प्लेटलेट्सची संख्या खूप जास्त प्रमाणात वाढून काही गंभीर परिस्थिती निर्माण झाली, तर प्लेटलेटफेरेसिस नावाची प्रोसीजर करून घेण्याचा सल्ला तज्ञ डॉक्टर देतात.
ह्या प्रोसीजरमुळे रक्तातील प्लेटलेटसचे प्रमाण एकदम कमी होते.
ही प्रोसीजर करताना रुग्णाच्या शरीरातील रक्त एका नळीद्वारे बाहेर काढून एका मशिनमध्ये घातले जाते.
तेथे त्यातील प्लेटलेट्सची संख्या कमी करून ते शुद्ध रक्त पुन्हा पेशंटच्या शरीरात सोडले जाते.
अतिशय स्लो आणि काळजीपूर्वक केली जाणारी ही प्रोसीजर आहे. अर्थातच ही तज्ञ डॉक्टरांनी करायची प्रोसीजर असून त्याबाबतचा निर्णय देखील तेच घेतात.
तर मित्र मैत्रिणींनो, रक्तात जास्त प्रमाणात प्लेटलेट्स निर्माण होत असतील तर काय करता येईल हे आपण आज पाहिले. ही महत्वाची माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवण्यासाठी हा लेख जरूर शेयर करा.
लेखात दिलेली माहिती हि डॉक्टरी इलाजांचा पर्याय म्हणून दिली नसल्याची नोंद घ्यावी./ The information is not a substitute for professional medical advice, diagnosis, or treatment.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा