कुपोषणाची लक्षणे, कारणे आणि त्यावरील उपाय

causes of malnutrition in marathi

कुपोषण म्हणजे नेमके काय? जाणून घ्या कुपोषणाची लक्षणे, कारणे आणि त्यावरील उपाय 

कुपोषण ही एक गंभीर स्थिती आहे. एखाद्या व्यक्तीला आहारातून पोषकतत्वे योग्य प्रमाणात मिळाली नाहीत तर त्या व्यक्तीचे कुपोषण होत आहे असे समजले जाते.

आपले आरोग्य चांगले राखण्यासाठी चांगला, पोषक आहार असणे सर्वात महत्त्वाचे असते. शरीराला काम करण्यासाठी ऊर्जा पोषक आहारातूनच मिळते.

जर एखाद्या व्यक्तीला आहारातून प्रोटीन, कार्बोहायड्रेट्स, फायबर, फॅट्स, विटामिन्स आणि खनिजे योग्य प्रमाणात मिळत नसतील तर अशी व्यक्ती कुपोषित आहे असे समजले जाते.

१. अल्पपोषण – जेव्हा कुपोषणामुळे एखाद्या व्यक्तीची उंची, वजन योग्य त्या प्रमाणात वाढत नाही, तसेच वजन कमी होत जाते तेव्हा ती व्यक्ती कुपोषणाच्या “अल्पपोषण“ या प्रकाराने ग्रस्त आहे असे समजले जाते.

२. अतिपोषण – कुपोषण म्हणजे केवळ पोषक अन्नाची कमतरताच नव्हे तर अति प्रमाणात अन्न सेवन केल्यामुळे देखील “अतिपोषण“ या प्रकारचे कुपोषण होऊ शकते. या समस्येने ग्रस्त असणाऱ्या व्यक्तींमध्ये स्थूलता, उंचीच्या मानाने वजन खूप जास्त असणे आणि लठ्ठपणाच्या अनुषंगाने होणारे रोग जसे की हृदय विकार, उच्च रक्तदाब, पक्षाघात होताना दिसून येतात.

कुपोषणाचे हे दोन्हीही प्रकार सारखेच घातक आहेत. संपूर्ण जगभरात जवळजवळ प्रत्येक देशात कुपोषणाने ग्रस्त लोक आहेत. त्यापैकी काही लोक वजन वाढीच्या समस्येने ग्रस्त आहेत तर काही कमी वजन असण्याच्या समस्येने ग्रस्त आहेत.

आज आपण कुपोषणाच्या अल्पपोषण या प्रकाराबद्दल अधिक जाणून घेणार आहोत.

कुपोषणाची लक्षणे

१. शरीरातील मांसपेशी आणि स्नायू अतिशय कमकुवत होणे.

२. श्वासोच्छ्वास घेण्यास त्रास होणे.

३. डिप्रेशन (नैराश्य)

४. हायपरथायरॉईडीझम

५. हायपोथरमिया (शरीराचे तापमान अतिशय कमी असणे)

६. सतत खूप थंडी वाजणे

७. कोणतीही जखम भरून येण्यास नेहमीपेक्षा जास्त वेळ लागणे.

१०. प्रजननक्षमता कमी होणे

सर्वसामान्यपणे कुपोषण असेल तर वरील लक्षणे दिसून येतात. परंतु यापेक्षा गंभीर प्रकरणांमध्ये मात्र आणखीही काही लक्षणे आढळून येतात ती खालील प्रमाणे…

१. त्वचेचा रंग पिवळसर दिसणे, शरीर गार पडलेले असणे, त्वचा कोरडी पडलेली असणे.

२. चेहऱ्यावरील तेज कमी होऊन गाल खपाटीला गेलेले आणि डोळे खोल गेलेले दिसणे.

३. केस अतिशय कोरडे आणि विरळ होणे.

४. छातीत धडधड होणे.

५. खूप जास्त कालावधी पर्यंत जर पोषण मिळू शकले नाही तर हृदय, फुफ्फुसे किंवा लिव्हर काम करणे बंद करू शकते.

६. लहान मुलांमध्ये कुपोषण असेल तर त्यांची शारीरिक आणि बौद्धिक वाढ अतिशय हळू होते.

काही मुले शारीरिक दृष्ट्या तर काही मुले मानसिक दृष्ट्या विकलांग बनवू शकतात.

लहान वयात कुपोषण होणे जास्त घातक असते. मोठ्या वयात झालेले कुपोषण औषधांनी भरून काढता येऊ शकते.

कुपोषणाची कारणे

कुपोषण ही संपूर्ण जगभरातील लोकांना भेडसावणारी समस्या आहे. या समस्येची आर्थिक, सामाजिक आणि वैद्यकीय कारणे असू शकतात.

१. आत्यंतिक गरिबी – विकसनशील किंवा अविकसित देशांमध्ये बऱ्याच मोठ्या लोकसंख्येला गरिबीचा सामना करावा लागतो.

अशा लोकांमध्ये कुपोषण ही एक कॉमन समस्या आढळून येते. स्वस्त दरामध्ये अन्नधान्य उपलब्ध न होऊ शकणे हे याचे प्रमुख कारण आहे.

२. विशिष्ट आजार – काही व्यक्ती अशा विशिष्ट आजारांनी ग्रस्त असतात की त्यामुळे शरीरातील अन्नाचे योग्य प्रकारे विघटन होऊन पोषक पदार्थ शरीरात शोषले जाऊ शकत नाहीत. अशा वेळी पोषक अन्न घेऊन सुद्धा सदर व्यक्ती कुपोषणाची शिकार बनते.

३. अति प्रमाणात मद्यपान – खूप जास्त प्रमाणात मद्यपान करणाऱ्या व्यक्तींच्या शरीराची अन्न पचवण्याची क्षमता हळूहळू नष्ट होऊ लागते. त्यामुळे खाल्लेल्या अन्नातील प्रोटीन, कॅलरीज आणि अन्य पोषकतत्वे शरीरात शोषली जाऊ शकत नाहीत.

४. मनोविकार – डिप्रेशन किंवा इतर मनोविकार कुपोषणाची समस्या वाढवू शकतात. डिप्रेशन किंवा इतर मानसिक आजारांचा सामना करणारे लोक आपल्या खाण्यापिण्याकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे ते कुपोषणाची शिकार बनतात.

कुपोषण होऊ नये म्हणून काय करावे ?

कुपोषण होऊ नये म्हणून संतुलित आहार घ्यावा. आहारामध्ये खालील पदार्थांचा समावेश असावा.

१. भात, पोळी, बटाटे आणि अन्य स्टार्चयुक्त पदार्थांचा आहारात समावेश असावा. या पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणात कार्बोहाइड्रेट असल्यामुळे ते शरीराला ऊर्जा प्रदान करतात.

२. दूध, दही आणि इतर डेअरी प्रोडक्टचा देखील आहारात समावेश असावा. त्यामुळे शरीराला कॅल्शियम आणि इतर खनिजांचे पोषण मिळते.

३. फळे आणि भाज्या विटामिन आणि मिनरल्स पुरविण्याबरोबरच शरीराला मोठ्या प्रमाणात फायबर देखील पुरवतात. त्यामुळे अन्नपचन व्यवस्थित होऊन शरीराला योग्य पोषण मिळते.

४. मांसाहार, अंडी आणि डाळी यांच्या सेवनाने शरीराला प्रोटीन मिळते. स्नायू बळकट होण्यासाठी प्रोटीनची आवश्यकता असते.

तर अशा रीतीने सर्व खनिजे आणि पोषक द्रव्य असणारे पदार्थ आहारात असावेत. आपले घरगुती भारतीय जेवण हा खरेतर एक परिपूर्ण आहार आहे. दररोज घरी तयार केलेले ताजे व सकस अन्न घ्यावे.

कुपोषणाचे निदान कसे केले जाते ?

एखादी व्यक्ती कुपोषित आहे की नाही हे कसे ठरवले जाते?

१. कुपोषणाचे निदान करण्यासाठी रुग्णाचा बॉडी मास इंडेक्स म्हणजेच उंचीच्या प्रमाणात वजन योग्य आहे की नाही ते पाहिले जाते. जर वजन खूपच कमी असेल तर सदर व्यक्ती कुपोषित आहे असे सांगितले जाते.

२. कुपोषणाचे निदान करण्यासाठी वेगवेगळ्या रक्त तपासण्या देखील उपलब्ध आहेत. यामध्ये थायरॉईड ग्रंथींची टेस्ट, शरीरातील कॅल्शियम, विटामिन्स आणि इतर खनिजांच्या प्रमाणाची टेस्ट, कोलेस्ट्रॉलची टेस्ट यांचा समावेश होतो.

३. लहान मुलांमधील कुपोषणाचे निदान करण्यासाठी त्यांच्या वजन आणि उंचीचा तक्ता बनवला जातो. तसेच त्यांच्या वाढीवर लक्ष ठेवले जाते. धीम्या गतीने होणारी वाढ असेल तर ते मूल कुपोषित आहे असे समजून डॉक्टर त्यावर उपचार करतात.

कुपोषणा वरील उपचार

एखादी व्यक्ती किती प्रमाणात कुपोषित आहे यावर त्या व्यक्तीवर करण्याचे उपचार ठरतात.

जर कुपोषणाचे प्रमाण कमी असेल तर सदर व्यक्तीला घरीच राहून सुयोग्य आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. त्यासाठी तज्ञ डायटीशियनची मदत घेणे योग्य ठरते.

परंतु जर गंभीर प्रमाणात कुपोषण असेल तर हॉस्पिटल मध्ये राहून उपचार घेण्याची गरज भासू शकते. अशावेळी आहाराबरोबरच काही सप्लीमेंट दिली जातात.

लहान मुलांमधील कुपोषणासाठी योग्य प्रमाणात टॉनिक, उत्तम आहार आणि वेळोवेळी शारीरिक तपासणी असे उपचार केले जातात. गंभीर स्वरूपाचे कुपोषण असेल तर लहान मुलांना देखील हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागू शकते.

तर मित्र मैत्रिणींनो, आज आपण कुपोषण म्हणजे नेमके काय, ते कसे टाळता येऊ शकेल या विषयीची सविस्तर माहिती पाहिली.

या माहितीचा उपयोग अवश्य करून घ्या आणि आपल्याला व आपल्या कुटुंबाला कुपोषणापासून वाचवा. स्वस्थ राहा आनंदी राहा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Manachetalks

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!