आपला मेडिक्लेम पोर्ट करून त्यापासून जास्तीत जास्त फायदा कसा घ्यावा?

mediclaim policy portability

तुमचा सध्याचा वैद्यकीय विमा पुरेसा लाभदायक नाही का? तुम्हाला तुमचा वैद्यकीय विमा बदलण्याची इच्छा आहे का? तसे असेल तर हा लेख तुमच्यासाठी खूप महत्वाचा आहे.

तुम्ही आधी काढलेला वैद्यकीय विमा (मेडिकल इन्शुरन्स) पुरेसा लाभदायक नाही असे तुम्हाला वाटत आहे का?

बाजारात नवीन आलेल्या विमा पॉलिसीपैकी एखादी पॉलिसी तुमच्यासाठी जास्त योग्य आहे असे तुम्हाला वाटत आहे का?

तुम्हाला नवीन पॉलिसी घ्यावीशी वाटते आहे परंतु आधीच्या पॉलिसीचे फायदे त्यामुळे जातील असे तुम्हाला वाटते आहे का? असे असेल तर हा लेख संपूर्ण वाचा. तुमच्या सगळ्या शंकांची उत्तरे ह्या लेखात मिळतील.

हा विषय समजून घेण्यासाठी सर्वप्रथम आपण एक उदाहरण घेऊया. (सुरक्षेच्या कारणासाठी या उदाहरणातील व्यक्तीचे नाव बदलले आहे.)

अनिशा गुप्ता हिने गेल्या पाच वर्षापासून एक हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी म्हणजेच वैद्यकीय विमा काढलेला आहे.

पाच वर्ष जुनी विमा पॉलिसी असल्यामुळे आता अनिशाला त्या पॉलिसीचे सर्व फायदे मिळतात.

वैद्यकीय विमा काढताना काही आजारांसाठी सुरुवातीला असणारा दोन ते तीन वर्षाचा वेटिंग पिरियड देखील अनिशाने पूर्ण केला आहे. तसेच दरवर्षी जर इन्शुरन्स पॉलिसीच्या बाबतीत काहीही क्लेम केला नाही तर मिळणारा ‘नो क्लेम बोनस’ सुद्धा तिला मिळत आहे.

परंतु आता नव्याने जाहीर झालेल्या काही विमा पॉलिसी अनिशाला जास्त फायदेशीर वाटत आहेत. परंतु तिच्या मनात अशी शंका आहे, कि जर तिने सध्याची पॉलिसी बंद करून नवीन पॉलिसी घेतली तर जुन्या पॉलिसीवर मिळणारे वेटिंग पिरियड संपल्याचे फायदे आणि नो क्लेम बोनसचे फायदे तिला मिळणार की नाही?

त्यामुळे नवीन पॉलिसी फायदेशीर असूनही ती घेण्याबद्दल अनिशा साशंक आहे.

परंतु अनिशाने काळजी करण्याची गरज नाही. इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथोरिटी ऑफ इंडिया ( IRDAI ) ने आता जुन्या वैद्यकीय विमा पॉलिसीला नवीन वैद्यकीय विमा पॉलिसी मध्ये पोर्ट करण्याची म्हणजेच जोडून घेण्याची सुविधा आणली आहे. त्यामुळे सध्या सुरू असणाऱ्या पॉलिसीचे सर्व फायदे विमाधारकाला नवीन पॉलिसी मध्ये देखील मिळू शकतील.

हा मुद्दा आपण जरा सविस्तरपणे पाहूया

सहसा कोणत्याही वैद्यकीय विमा पॉलिसीमध्ये आधीपासून असणाऱ्या आजारांवरील उपचार कव्हर होण्यासाठी दोन ते तीन वर्षाचा कालावधी लागतो.

म्हणजेच पॉलिसी काढल्यापासून सुरुवातीची किमान दोन ते तीन वर्षे प्री एक्झीस्टींग डिसीजेस साठी विमा संरक्षण मिळत नाही.

परंतु अशावेळी जर एका पॉलिसीमध्ये अशी दोन-तीन वर्षे पूर्ण केली आणि त्यानंतर पॉलिसी बदलली तर पुन्हा आधीपासून असणाऱ्या आजारांसाठीचा दोन ते तीन वर्षाचा कालावधी द्यावा लागेल का असा प्रश्न ग्राहकाच्या मनात असतो.

परंतु आता शक्य असणाऱ्या पॉलिसी पोर्टेबिलिटी म्हणजेच जुनी पॉलिसी नव्या पॉलिसीला जोडून घेणे यामुळे जुन्या पॉलिसीचा वेटिंग पिरीयड आणि नो क्लेम बोनस नवीन पॉलिसीला देखील लागू होऊ शकेल. त्यासाठीचे सर्व नियम नवीन विमा कंपनीकडून समजून घेणे आवश्यक आहे.

काय आहेत या बाबतीतले नियम?

१. नवीन वैद्यकीय विमा पॉलिसी जर जास्त प्रीमियम भरून जास्त रकमेची काढली असेल, तर मात्र आधीच्या पॉलिसी इतक्या विमा रकमेचा वेटिंग पिरियड संपला असे गृहीत धरले जाईल.

जास्तीच्या रकमेचा वेटिंग पिरियड सदर पॉलिसीधारकाला पूर्ण करावा लागेल. उदाहरणार्थ, वर दिलेल्या उदाहरणातील अनिशाची जर आधी पाच लाखाची वैद्यकीय विमा पॉलिसी असेल आणि पॉलिसी पोर्ट करताना तिने दहा लाखाची पॉलिसी घेतली. तर तिला वेटिंग पिरियड संपणे आणि नो क्लेम बोनस या सुविधा फक्त पाच लाखावर मिळतील.

उरलेल्या पाच लाखांसाठी तिला वेटिंग पिरियड आणि नो क्लेम बोनसचे नव्या विमा कंपनीचे नियम पाळावे लागतील.

२. त्याच प्रमाणे जर नवी विमा पॉलिसी कमी रकमेची असेल तर मात्र नो क्लेम बोनसचे फायदे मिळणार नाही.

उदाहरणार्थ, जर अनिशाने पाच लाखांऐवजी दोन लाखांची नवी विमा पॉलिसी काढली तर तिचे आधीच्या पॉलिसी वरील नो क्लेम बोनसचे फायदे रद्द होतील.

३. नव्या विमा कंपनीला देखील तुम्हाला आधीपासून असणाऱ्या सर्व आजारांची संपूर्ण माहिती देणे क्लेम सेटलमेंटच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे. जर एखादा आजार लपवला गेला असेल तर त्यासंबंधीचा विमा क्लेम रिजेक्ट करण्याचा संपूर्ण अधिकार विमा कंपनीला असतो.

जुनी इन्शुरन्स पॉलिसी बदलून नवी इन्शुरन्स पॉलिसी पोर्ट केव्हा करावी (केव्हा बदलावी)?

जर एखाद्या नव्या वैद्यकीय विमा पॉलिसी मध्ये आधीच्या पॉलिसीपेक्षा खूप जास्त फायदे असतील तरच विमाधारक पॉलिसी बदलण्याचा विचार करतात.

जर तुम्हाला तुमची जुनी इन्शुरन्स पॉलिसी बदलून नवी घ्यायची असेल तर, जुन्या पॉलिसीच्या नूतनीकरण तारखेच्या पंचेचाळीस दिवस आधी तुम्ही नवीन विमा कंपनीकडे पॉलिसीसाठी अर्ज केला पाहिजे. त्यासाठी नूतनीकरण किंवा पोर्टेबिलिटीचा अर्ज भरून देणे आवश्यक आहे.

नवीन विमा कंपनीने तुमच्याशी १५ दिवसाच्या आत पत्रव्यवहार करून तुम्हाला नवी पॉलिसी मिळू शकते अथवा नाही हे सांगितले पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला नवीन पॉलिसी मिळू शकणार नसेल तर तुम्ही तुमची जुनीच पॉलिसी योग्य वेळेत रिन्यू करू शकाल. कोणताही खंड न पडता वैद्यकीय विमा मिळत राहण्याच्या दृष्टीने ही गोष्ट महत्त्वाची आहे.

जुनी पॉलिसी नव्या पॉलिसीमध्ये बदलण्यासाठी काही चार्जेस आहेत का ?

नवीन विमा कंपनी जुनी पॉलिसी बदलून नवी देण्यासाठी कोणतेही वेगळे चार्जेस आकारत नाही. परंतु विमाधारकाचे वय आधीच्या पॉलिसीवेळी होते त्यापेक्षा वाढलेले असणे, काही आजारांमध्ये झालेली वाढ किंवा जास्त रकमेचा विमा या कारणांमुळे प्रीमियमची रक्कम वाढू शकते.

परंतु जुनी पॉलिसी नव्या पॉलिसीमध्ये बदलण्याआधी तुम्ही घेत असणारी नवी पॉलिसी जुन्या पॉलिसीपेक्षा नक्की फायदेशीर आहे ना याची खात्री करून घ्या. जास्त फायदेशीर असेल तरच पॉलिसी बदलण्याचा उपयोग होतो. अन्यथा आधीपासून सुरू असणारी पॉलिसी तशीच चालू ठेवणे जास्त फायदेशीर असू शकते.

तर मित्र-मैत्रिणींनो आज आपण पाहिले की जास्त फायदेशीर असेल तर आपण आपली जुनी वैद्यकीय विमा पॉलिसी बदलून एखादी नवी पॉलिसी जुन्या पॉलिसीच्या सर्व फायद्यांसह घेऊ शकतो.

तुम्हाला जर असे करायचे असेल तर लेखात दिलेल्या बाबींचा विचार करून तसे जरूर करा. याबाबत तुमच्या काही शंका असतील तर त्या आम्हाला कॉमेंट करून विचारा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा लेख शेयर करायला विसरु नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “आपला मेडिक्लेम पोर्ट करून त्यापासून जास्तीत जास्त फायदा कसा घ्यावा?”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.