आपल्या घराचे वॉटरप्रूफिंग करणे शिका, स्टेप बाय स्टेप

वॉटरप्रूफिंग म्हणजे काय

आपल्या घराच्या भिंतींचे वॉटरप्रूफिंग करून घेण्याआधी आपल्याला ही माहिती असणे आवश्यक आहे.

घर हा प्रत्येकाच्या आयुष्यातला एक खूप महत्वाचा भाग असतो. कुटुंब जरी प्रेमाने जोडलेले असले तरी कुटुंबातील सदस्यांना एकत्र राहण्यासाठी, जीवन व्यतीत करण्यासाठी एका छोटाश्या का असेना पण हक्काच्या घरकुलाची गरज असते.

त्यासाठी आपण मेहनत करून, काटकसर करून पै पै जोडतो आणि घरासाठी एक रक्कम उभी करतो. घर घेतले की आपल्या आयुष्यातील जणू एक स्वप्नच पूर्ण होते.

डोक्यावर हक्काचे छत असले की आयुष्यातली एक महत्वाची जबाबदारी पूर्ण होते.

एवढे कष्ट करून, संघर्षाचे चटके सोसून आपण ज्या घराची पायाभरणी करतो त्याच घराच्या भिंती आपल्याला ऊन, वारा आणि पाऊस यांच्यापासून संरक्षण देतात. मग याच सुरक्षा देणाऱ्या भिंतींची योग्य काळजी घेणे ही आपलीच जबाबदारी आहे ना?

घराच्या भिंतीना तडे जाऊन ओल येणे, घरात पाणी गळणे ही फार कॉमन समस्या आहे. पावसाळ्यात हा प्रश्न प्रामुख्याने उद्भवलेला दिसतो.

घर नवीन असेल तर काही वर्ष ही समस्या येत नाही. पण जसजसे घर जुने होत जाते तसतसे त्याच्या भिंतींमध्ये वॉटर लीकेजच्या समस्या उद्भवू लागतात. ज्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाऊस पडतो तेथील लोकांना या समस्येची चांगलीच कल्पना असेल.

मुंबईसारख्या ठिकाणी जिथे फ्लॅट संस्कृतीमध्ये लोक वास्तव्यास आहेत त्यांना या गोष्टींचा अनुभव अधिक असतो. याचे प्रमुख कारण म्हणजे मुंबईचे दमट वातावरण आणि पावसाळ्यात सर्वाधिक होणारा पाऊस.

फ्लॅट जर लिफ्टच्या डक्ट जवळ असेल तर त्याही भिंतीला आतल्या बाजूने ओलावा येतो आणि भिंतीमध्ये पाणी शिरून भिंत खराब होते.

या वॉटर लिकेजमुळे घर खराब होऊ नये यासाठी वॉटर प्रूफिंगची संकल्पना अस्तित्वात आली. आपल्या घराच्या भिंतींचे वॉटरप्रूफिंग करून घेण्या अगोदर त्याविषयी बेसिक माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे.

चला तर मग जाणून घेऊया घराच्या वॉटरप्रूफिंग बद्दल.

वॉटरप्रूफिंग म्हणजे काय?

वॉटरप्रूफिंग म्हणजे एखादी वास्तू किंवा संरचना जल-प्रतिरोधक बनवण्याची प्रक्रिया आहे. जेणेकरून तिच्यावर पाण्याचा दुष्परिणाम होत नाही किंवा कोणत्याही परिस्थितीत पाण्याच्या प्रवेशास प्रतिकार करते.

आधुनिक वस्तूंना, इमारतींना आणि घरांना वॉटर-रेपेलेंट लेप लावून किंवा गास्केट किंवा ओ-रिंग्ससह सील करून वॉटरप्रूफ केले जाऊ शकते.

वॉटरप्रूफिंग का आवश्यक आहे?

वातावरणात असलेल्या ओलसरपणामुळे घराच्या भिंतींमध्ये ओलावा मुरून राहतो. भारतीय घरांमध्ये पावसाळ्यात घराचे छत गळू लागते. बऱ्याच घरांमध्ये माडीवर पाण्याची टाकी लावण्याने त्याखाली असलेल्या खोलीला ओलसरपणा आल्याचे दिसून येते.

स्वयंपाकघरात सतत होणाऱ्या पाण्याच्या वापरामुळे ओट्याखालची आणि बेसिन खालची भिंत ओली होऊन त्याचे पोपडे निघून येतात.

काहीवेळा भिंतींवर ओलसरपणाचे गडद ठिपके दिसून येतात. त्यावर बुरशी येऊन भिंतींना दिलेला रंग निघून जातो.

ते घरात राहणाऱ्याला तर त्रासदायक ठरतेच सोबत दिसायला अजिबात चांगले दिसत नाही.

घराच्या भिंती आतून खराब होऊ नये म्हणून त्यांना बाहेरील बाजूने वॉटरप्रुफिंग करणे गरजेचे असते.

नेमक्या कोणत्या ठिकाणी वॉटरप्रूफिंग करणे आवश्यक आहे?

सर्वात आधी स्नानगृहाच्या (बाथरूमच्या) भिंतींना वॉटरप्रूफिंग करणे आवश्यक असते. कारण त्याठिकाणी जास्तीत जास्त पाण्याचा वापर होत असतो.

त्यामुळे वर्षभरात सर्वाधिक पाणी या ठिकाणी मुरलेले असते. स्नानगृहालगतच्या भिंती यामुळेच ओलसर होऊन खराब होऊ लागतात.

त्याचबरोबर या खराब झालेल्या भिंतींमुळे त्या भिंतींच्या जवळच्या इतर भिंतीही ओल्या होऊन खराब होऊ शकतात.

त्यामुळे पावसाळ्याच्या आधी आणि नुकसान होण्यापूर्वीच अशा समस्येचा बंदोबस्त करणे चांगले.

याव्यतिरिक्त घराचे छत गळू लागले तर ते छत, स्वयंपाकघरातील बेसिन, ओटा आणि पाणी साठवून ठेवण्याची जागा इत्यादी वॉटरप्रूफ करणे आवश्यक असते.

घराच्या भिंतींना संरक्षण देण्यासाठी सर्वात जलद आणि सोयीस्कर मार्ग कोणता आहे?

वॉटरप्रूफिंगचं काम खूप किचकट आणि जबाबदारीचे काम आहे. त्यासाठी योग्य माणसाची निवड करणे हे त्याहून कठीण. त्यासाठी जो वॉटर प्रुफींगचे काम अगदी व्यवस्थित करून देईल अश्या अत्यंत विश्वासू मनुष्याचा शोध घेणे अतिशय आवश्यक असते.

हे काम करताना अनेक लोक जास्त नफा कमावण्यासाठी दुय्यम प्रतीचे सामान वापरून तात्पुरती सोय म्हणून सेवा देतात.

त्यानंतर आपल्याला जाणवतं की काम योग्य पद्धतीने केले गेले नाही. वॉटर प्रूफिंगच्या कामाचा अनुभव पावसाळा सुरु झाल्यावर लगेच मिळतो.

काही विश्वासार्ह वॉटर प्रूफिंगच्या कंपन्या आज मार्केटमध्ये आहेत ज्या सर्वोत्तम सेवा देऊ करतात. त्या कंपन्या टप्प्याटप्प्याने हे काम नीट पूर्ण करून या कामाला पुरेपूर न्याय देतात.

त्यामुळे इतर कुणाकडे जाण्याआधी अशा कंपन्यांची चौकशी करावी. तसेच आपल्या आजूबाजूला राहणाऱ्या कुणाकडे असे काम केले गेले असेल तर त्यांचा अनुभव देखील जरूर विचारात घ्यावा.

वॉटरप्रूफिंग नेमके कसे केले जाते ?

घरच्या पेंटिंगचे काम करणारे प्रोफेशनल लोक हे काम अत्यंत सफाईदारपणे करतात. वॉटरपृफिंगची एक कठीण प्रक्रिया असते. ह्या प्रक्रियेमध्ये आधी तुमच्या घरच्या भिंतींवरील आधीपासून असलेली पूट्टी योग्य रीतीने घासून काढून टाकली जाते आणि धातूच्या ब्रशने भिंतीचा पृष्ठभाग गुळगुळीत केला जातो.

त्यानंतर त्यावर वॉटरप्रूफिंग सोल्यूशनचे किमान २ कोट (थर) लावले जातात ज्यामुळे भिंतीतील भेगा, तडे निघून जाण्यास मदत होते तसेच भिंतीवर पाण्याच्या ओलसरपणाला आणि कोणत्याही शेवाळे किंवा इतर फंगसच्या वाढीला प्रतिकार करणारा खूप जाड थर तयार होतो.

यानंतर भिंतीवर पुट्टीचा एक थर, प्राइमरचा एक थर आणि शेवटी तुम्ही निवडलेल्या रंगाचे दोन कोट लावले जातात. इतक्या थरांमुळे भिंतीवर एक सुरक्षित आणि जाड असे आवरण तयार होते ज्यामुळे बाहेरील पाणी भिंतीच्या आतमध्ये शिरण्यास अडथळा निर्माण होऊन घराच्या भिंती दीर्घकाळ सुरक्षित राहू शकतात.

अशा प्रकारे आपल्या घरकुलाचे संरक्षण करण्याकरिता वॉटरप्रूफिंगचं काम करणे योग्य ठरते. कारण घर म्हणजे नुसत्या चार भिंती नाहीत तर ती एक वास्तू देवता आहे आणि वास्तू नेहमी तथास्तु म्हणत असते. म्हणूनच वास्तूला नेहेमी स्वच्छ ठेवून तिची योग्य ती काळजी घेतली तर घरात राहणाऱ्यांचे आरोग्य चांगले राहते आणि त्यांचा जगण्याचा उत्साह टिकून राहतो.

आज आपण घराचे वॉटरपृफिंग म्हणजे काय आणि ते का करणे आवश्यक आहे, तसेच असे वॉटरपृफिंग नक्की कसे करावे ते पाहिले. ह्या माहितीचा वापर अवश्य करा आणि आपले घर ओल येण्यापासून वाचवा.

तसेच ही माहिती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख शेयर करायला विसरू नका.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!