अंतिम इच्छा

antim echha

सोसायटीच्या गेटमधून आत शिरलो आणि A विंग जवळून जाताना तळमजल्यावरील मोहनकाकांची हाक ऐकू आली. ” काय रे भाऊ ….आता आलास का कामावरून.. ??

त्यांची हाक ऐकताच मी ओशाळलो. खूप दिवसांनी आमची भेट होत होती. खरेतर ते खिडकीतच बसून असायचे नेहमी. जाता-येता सर्वांना हाक मारायचे. हल्ली त्यांची तब्बेत बरी नव्हती असे ऐकून होतो. त्यामुळे बरेच दिवस त्यांची हाक ऐकू आली नाही तरीही मी चौकशी केली नाही आणि आता त्यांची हाक ऐकू येताच थोडे वाईट वाटले. घरी उशीर झाला तरी चालेल पण त्यांना भेटूनच जाऊ असा विचार करीतच त्यांच्या घरात शिरलो.

आत शिरताच सोनलने म्हणजे त्यांच्या सुनेने पाणी देऊन स्वागत केले. मोहनकाका थोडे थकलेले दिसले. ” कसे आहात काका…??? मी आस्थेने विचारले. तसा त्यांनी प्रेमाने माझा हात हाती घेतला “बरा आहे … मध्येच थोडा त्रास झाला पोटाचा. म्हणून एक छोटेसे ऑपरेशन केले.आता ठीक आहे “.

पण ते ठीक नाहीत हे त्यांच्या तब्बेतीवरून कळत होते  “अतुल कुठे आहे …?? मी आजूबाजूला पाहत विचारले. अतुल त्यांचा एकुलता एक मुलगा. मार्केटिंगमध्ये असल्यामुळे देशभर फिरत असतो.

“बाहेर गेलेत ते. येतील आता …” आतून सोनलने आवाज दिला.

” हो ….तो आहे ना इथेच. माझ्यासाठी कुठे बाहेर जात नाही ऑपरेशन झाल्यापासून. पण रोज ऑफिसला जावे लागतेच ना… ?? किती दिवस घरी राहील…” काका हसत म्हणाले.

“काही गरज नाही घरी राहायची बाबा….मी आहे ना इथे पाहायला तुमच्याकडे ” माझ्या हातात चहाचा कप ठेवत सोनल हसत म्हणाली.

“हो तर तूच तर सर्व करतेस. मुलाची सर्व कामे तूच करतेस. माझी औषधे, पथ्यपाणी, डॉक्टरची अपॉइंटमेंट घेणे, त्यांच्याकडे घेऊन जाणे. आजाराची चर्चा करणे. टेस्टसाठी घेऊन जाणे. हे सर्व तूच तर करतेस. अतुलला माहीत नाही तितकी माहिती तुला आहे माझ्या आजाराची ..” काका तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले.

“हो पहातोना आम्ही … त्यादिवशी कशी तुमच्या हाताला धरून घेऊन येत होती आणि सौ ही म्हणते काकांना मुलगा नाही तर मुलगी आहे. सोसायटीमध्ये हिची चर्चा आहे. मी तर म्हणतो आता हिने सल्लागार बनावे आजारी माणसाला कसे हँडल करावे या विषयात” मी हसून म्हणालो.

“काहीही काय बोलता भाऊ …असे म्हणत सोनल लाजून आत पळाली.

मी हसत मोहन काकांकडे पाहिले. काका हसता हसता गंभीर झाले. ” भाऊ ..तुझ्याकडे एक काम आहे माझे … करशील.. ?? माझी अंतिम इच्छा म्हण” आणि त्यांनी आत पाहिले.

“काहीतरी काय काका .. ..अंतिम इच्छा काय ..??? तुम्ही फक्त बोला काय पाहिजे …ते पूर्ण करायची जबाबदारी माझी …” मी त्यांचा हात गच्च दाबीत म्हणालो.

“भाऊ मला माहित आहे माझा आजार गंभीर आहे आणि यातून मी काही वाचत नाही. पण मी खूप आनंदात आह . मला मरण चांगले यावे हीच माझी इच्छा आहे. मुलगा आणि सुनेने खूप काही केले माझ्यासाठी. शेवटपर्यंत करतील याची खात्री आहे. पण माझ्या मृत्यूनंतर माझे अंत्यसंस्कार सोनलने करावे अशी माझी इच्छा आहे …” बोलता बोलता त्यांचा कंठ दाटून आला.

“काका हे कसे शक्य आहे ….?? लोक काय म्हणतील..?? भावकी काय म्हणेल..?? मुख्य म्हणजे अतुल काय म्हणेल ..”?? मी गंभीरपणे विचारले.

“कोणी काही म्हणू नये म्हणून तुला सांगतोय. मी मेल्यावर माझ्यामागे काय चालू आहे हे मला कळणार नाही. पण केवळ अतुल मुलगा आहे म्हणून त्याला अंत्यसंस्काराचे अधिकार का ??? मी त्याला वाढविले मोठा केला ही माझी जबाबदारी आणि कर्तव्य तसेच तो उत्तमपणे माझा सांभाळ करतोय तेही त्याची जबाबदारी आणि कर्तव्य असेल. पण एक सून असून सोनल जे माझ्यासाठी करतेय त्याला तोड नाही. आज ती एका मुलाचे कर्तव्य बजावतेय. तिने माझी जबाबदारी घेऊन अतुलला बाहेरच्या गोष्टी पाहायला सांगितल्या. मग तिच्या ह्या कामाची जाण ठेवून माझे अंत्यसंस्कारही तिने करावे असे वाटते. माझी खात्री आहे अतुलला या गोष्टीचा आनंदच होईल आणि तोही पाठिंबाच देईल. पण त्यावेळी त्याला बोलता येणार नाही आणि भावकी बोलुही देणार नाही म्हणून मी तुला सांगतोय. तू तेव्हा माझी ही अंतिम इच्छा तिथे जाहीर कर. इतके काम कर भाऊ … बोलता बोलता काकांचा कंठ दाटून आला त्यांचे अश्रू माझ्या हातावर पडले तसा मी भानावर आलो.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!