सरोज खानचा जीवन प्रवास

सामान्यत: या परंपरेत गुरू आपल्या शिष्याला मनगटावर गंडा बांधतात पण एक दिवस गुरू सोहनलाल यांनी सरोजच्या गळ्यात काळा धागा बांधला. सरोजला वाटले आपले लग्न गुरूशी झाले. गुरूचे वय होते ४१ वर्षे तर शिष्या होती १३ वर्षांची शिवाय गुरूला चार मुलेही होती. पण सरोजला मात्र याचा थांगपत्ता नव्हता.

फाळणीच्या वेळी कराची मधील एक पंजाबी सिंधी कुटूंब भारतात आलं. किशनचंद्र साधू व नोनी साधू सिंह नागपाल हे त्यांचे नाव. इथे येण्यापूर्वी किशनचंद श्रीमंत होते.

फळणीने त्यांच्या हातात दोन चटाया देऊन भारतात पाठवले. फाळणीने कुणाचा कसा व किती फायदा झाला हे फक्त विचारवंतच सांगू शकतात. मात्र दोन्हीकडचे विस्थापित रस्त्यावर आले हे एक कटू सत्य आहे. मुंबईत आल्यावर ते आपल्या पत्नीसोबत माहिमच्या एका चाळीत राहू लागले.

त्याचं पूर्वीचं मोठे विश्व आकसून एका रूम पर्यंत येऊन पोहचलं. पहिली मुलगी झाली. निर्मला तिचं नाव. ही मुलगी जेव्हा तीन-साडेतीन वर्षांची झाली तेव्हा तिच्या आईला तिचे वागणे विक्षिप्त वाटू लागले. आईने तिला उचलले आणि थेट डॉक्टरकडे घेऊन गेली.

“काय झालं पोरीला ?”

“माहित नाही डॉक्टर साहेब, विक्षिप्त वागते.”

“म्हणजे नेमकी कशी वागते?”

“भिंतींवरील स्वत:ची सावली बघून शरीराच्या हालचाली करते”

डॉक्टरांच्या लक्षात आले. पोरीला नाचायची आवड दिसते. लहानपणी अनेक मुलं स्वत:च्या सावलीकडे बघून विविध हातवारे करत असतात. निर्मला शांतपणे दोघांचा संवाद ऐकत होती. तिच्याकडे बघत डॉक्टर म्हणाले-

“आहो तिला नृत्य करायला आवडतं. यात काय चुकीचं आहे.”

“पण आमच्या सात पिढ्यात असे कोणीच नव्हते. गाणे, नृत्य, चित्र काढणे, संगीत असे आमच्याकडे कोणीच काही नाही केले” निर्मलाच्या आईला असे वाटत होते की आपल्या मुलीवर कुणी तरी छूमंतर केले किंवा तिच्या मेंदूत काही तरी बिघाड आहे. डॉक्टरांच्या लक्षात सर्व काही आले. ते म्हणाले-

“तुमच्या मुलीला काहीही झाले नाही. उलट चित्रपट क्षेत्रात तिला बाल कलाकार म्हणून काम मिळेल. शिवाय तुमची अर्थिक स्थिती पण बेताची आहे, थोडे फार पैसेही मिळतील.”

पण चित्रपट क्षेत्राची ना तिला माहिती होती ना तिच्या पतीला. डॉक्टराची या क्षेत्रात ओळख होती. त्यांनी काहीजणांकडे शिफारस केली.

saroj khanनिर्मलाचे नृत्य वेड वया बरोबर समातंर वाढत होते. तिला एका चित्रपटात श्यामा या अभिनेत्रीच्या लहानपणाची भूमिका मिळाली. हे तिचे पडद्यावरील पहिले पदार्पण.

नंतर १९५३ मध्ये तिला “आगोश” या चित्रपटात एक भूमिका मिळाली. या चित्रपटात ती आणि बेबी नाज या दोघीवर एक गाणे चित्रीत झाले. “बासुरिया काहे बजाए…” या गाण्यात बेबी नाज कृष्ण झाली आणि निर्मला राधा.

या चित्रपटाचे दिग्दर्शक होते आर.डी. माथूर जे नंतर भारतीय चित्रपटसृष्टीतले खूप मोठे सिनेमाटोग्राफर झाले.

मुगल-ए-आझम, संघर्ष, गंगा की सौगंध, रजिया सुल्तान हे त्यांचे गाजलले चित्रपट. “आगोश” मध्ये निर्मला फक्त पाच वर्षांची होती पण तिचे नृत्याचे कसब आजही या चित्रपटाची क्लीप बघताना जाणवते. पडद्यावर तिचे नाव निर्मला नाही तर बेबी सरोज असे होते.

ही बेबी खऱ्या अर्थाने प्रकाश झोतात आली ती १९८९ मध्ये. अर्थात १९७५ पासूनच ती एक प्रोफेशनल कोरीयोग्राफर म्हणून प्रस्थापित झाली होती पण ती पडद्या मागे.

चित्रपटसृष्टीला ती माहित झाली होती पण प्रेक्षकाना माहिती झाली ती १९८९ मध्ये. त्यावेळी आताच्या इतकी प्रसार माध्यमे नव्हती.

१९८९ मधील एन.चंद्राच्या “तेजाब”च्या एक दो तीन, चार पाँच…या गाण्याने सगळीकडे धूम केली होती. सरोजला तिच्या आयुष्यातला पहिला फिल्म फेअर पुरस्कार या गाण्याने मिळवून दिला.

म्हणजे १९८९ मध्ये पहिल्यांदाच फिल्म फेअरतर्फे नृत्य दिग्दर्शनासाठी पुरस्कार जाहीर केला. सरोजला सरोज खान Choreographer Saroj Khan बनण्यासाठी ३८ वर्षे संघर्ष करावा लागला. तिच्या संघर्षाला तोड नाही…………….

१९८८ मध्ये मुंबईतील चित्रपट नगरीत एका मराठी चित्रपटासाठी काम करत असताना एका स्टुडिओत मी डोकावलो. बिजोन दास गुप्ता नावाच्या त्यावेळच्या प्रसिद्ध कला दिग्दर्शकाने एक भव्य सेट लावला होता.

ग्रीक काळातील फॅरोह, सिंफ्क्स याचे भव्य शिल्प असलेला हॉटेलच्या आतील भव्य हॉलचा हा सेट होता. नर्तिकेचा एक ग्रुप तेथे रिहर्सल करत होता.

एक बऱ्यापैकी गोलमटोल बाई समोर बसून त्या ग्रूपला सूचना देत होती. मग एकदम ती जाड बाई उठली. वाकून जमिनीला नमस्कार केला आणि त्यांच्यामध्ये जाऊन उभी राहिली.

म्युझिक सुरू झाले आणि ती तुफान वेगाने नृत्याच्या स्टेप्स करू लागली. खरे तर तिचा स्थूल देह बघता ती असे काही करू शकेल यावर माझाही विश्वास बसला नसता जर त्या दिवशी मी तो शॉट पाहिला नसता.

कोरीओग्राफर सरोज खानला मी पहिल्यांदा आणि शेवटचे पाहिले ते “रूप की रानी चोरों का राजा” च्या या सेटवर. बऱ्यापैकी जवळून बघतानां एक गोष्ट लक्षात आली की ही बाई खरोखरच नृत्यासाठीच जन्मलेली होती.

भितींवरील स्वत:च्या काळ्या सावलीतुन झगमगत्या प्रकाशाच्या दुनियेतील प्रवास मात्र प्रचंड खडतर ठरला.

बालपण, तरूणपण आणि वृद्धत्व असे सामान्यपणे आपल्या आयुष्याचे तीन कालखंड मानले जातात. मात्र सरोजला पहिला कालखंड उपभोगताच आला नाही.

चार बहिणी व एक भाऊ अशा कुटूंबाला दारीद्र्याने आपल्या विळख्यात घेतले होते भर म्हणून की काय वडीलानां कॅन्सरने आपल्या जवळ ओढून घेतले. शेवटी सर्व पसारा मागे ठेवून वडील अनंताच्या प्रवासाला निघून गेले तेव्हा सरोज १० वर्षांची होती. ती कुटूंबात सर्वात मोठी म्हणजे कुटूंबाचे पालन पोषण करण्याची नैतिक जबाबदारी आई नतंर तिचीच होती.

तिच्यातले नैसर्गिक बालपण तिथेच खुरटले. हा काळ अत्यंत वाईट होता. तिची आई पातेल्यात पाणी ठेवून वर झाकणी ठेवे व म्हणे – “पोरानों जेवण तयार होई पर्यंत जरा झोपा. मी उठवेल तुम्हाला जेवायला.” त्यांच्या शेजारी एक मलबारी भजीवाला राहत असे. दिवसभर भजी विकून उरलेले भजे तो तिच्या आईकडे देई.. आई खूप संकोच करायची.

मग विचार करायची स्वत: एकवेळ उपाशी राहणे ठिक, पण पोरानां कसे उपाशी ठेवणार? त्या भज्यात ब्रेडचे तुकडे मिसळून शिजवून ते पोरानां खाऊ घालत असे. हे सर्व सरोज बघत असे.

वयाची १० वर्षे म्हणजे ना धड बालपण ना तरूणपण. लहान मुलानां ती मोठी वाटू लागली तर मोठ्याना ती लहान. काही तरी काम करणे गरजेचे होते. काही चांगल्या मित्रांनी सुचविले की चित्रपटातल्या ग्रूप डान्स मध्ये काम मिळू शकेल. म्हणजे मुख्य अभिनेता वा अभिनेत्रीच्या पाठी मागे जो नाचणारा ग्रूप असतो त्यापैकी एक.

सरोजला पहिला चित्रपट मिळाला तो तिच्या आवडत्या अभिनेत्रीचा म्हणजे मधूबालाचा. १९५८ चा तो चित्रपट होता “हावडा ब्रीज”. शक्ती सामंताच्या या चित्रपटात अशोक कुमार मधूबाला मूख्य भूमिकेत होते. यात ओ.पी.नय्यरचे बहारदार संगीत होते. यातील “आईए मेहरबाँ..बैठीए जाने जाँ……” या गाण्यात सरोज खान हॅट घातलेल्या मुलाच्या वेषभूषेत नाचताना स्पष्ट दिसते.

पहा “आईए मेहरबाँ..बैठीए जाने जाँ……

शीला विज ही ग्रूप डान्सर सरोज खानची लहानपाणा पासनूची मैत्रीण. (शीला म्हणजे श्री ४२० या चित्रपटातील “रमैया वस्तावया” या गाण्यातील मूख्य डान्सर) दोघींनी अनेक चित्रपटातुन एकत्र ग्रूप डान्स केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार सरोज लहानपणा पासून मॉड रहात असे. तिला वेणी घातलेली मी कधी बघितलेच नाही.

स्कर्ट, जीन पँट तिला खूप आवडत असे. पण तिच्या नसानसात नृत्य भिनलेले होते. नृत्य मास्टरचे अत्यंत सुक्ष्म निरिक्षण ती करीत असे आणि बिनचूक त्या सर्व हालचाली स्वत: करून दाखवित असे. ग्रूप डान्सरला त्याकाळी पैसे ते किती मिळत असणार? पण नृत्या शिवाय सरोज खान दुसरे करणार तरी काय?

एकदा शशी कपूरच्या चित्रपटासाठी त्या शुटींग करत होत्या. शुटींग संपले पण पैसे आठ दिवसानी मिळणार होते. दुसऱ्या दिवशी दिवाळीचा सण. घरात पैसे नाहीत.

त्या शशी कपूर जवळ गेल्या आणि अडचण सांगितली. शशी कपूर यांनी जवळ असलेले २०० रू. काढून त्यांच्या हाती ठेवले व म्हणाले- “माझ्याकडे इतकेच आहेत.” सरोज खानचे डोळे आजही हा प्रसंग सांगताना पाणावतात. त्यावेळी हे पैसे त्यांच्या कुटूंबासाठी किती अनमोल होते हे सांगताना त्या म्हणतात- “मी आजही ते पैसे परत केले नाहीत, हे ऋण मी आयुष्यभर असेच वाहून नेईल.”

संगीत नृत्य गायन वादन यातील महत्वाची घराणी उत्तर भारतातील आहेत. वाराणशी किंवा बनारस घराणे हे संगीत नृत्य क्षेत्रातील सर्वात मोठे व महत्वाचे घराणे. मूळचे जयपूर येथे जन्मलेले बी. सोहनलाल हे या घराण्याचे कथक नर्तक. बी.हिरालाल, बी.चिनीलाल आणि बी.राधेशाम हे त्यांचे धाकटे तीनही भाऊ कथक शैलीचे नर्तक होते.

बी. हीरालाल आपल्या सर्व कुटूंबाला घेऊन दक्षिणेत स्थलातंरीत झाले. नंतर तेथेच त्यांनी कांथा या तरूणी बरोबर लग्न केले आणि चेन्नईत (तेव्हाचे मद्रास) स्थायिक झाले. त्यानां ४ मुलेही झाली.

Subhash-Ghai-with-Saroj-Khan-चित्रपटातील नृत्य आणि आपण प्रत्यक्षात बघत असलेले एखादे सोलो नृत्य यात बराच फरक असतो.

चित्रपटातील कॅमेरा नावाचे उपकरण आपल्या कल्पनेपेक्षा आपल्या अधिक जवळ येऊ शकते. “क्लोज-अप” ही या कॅमेऱ्याची अशी विशेषता आहे ज्यामुळे चेहऱ्यावरील अगदी सुक्ष्म मुद्राभाव देखील आपण बघू शकतो. प्रत्यक्ष नृत्य कार्यक्रमात समोरच्या काही रांगा सोडल्या तर हे मुद्राभाव बघता येत नाहीत.

चेहराच नाही तर नर्तकाच्या प्रत्येक देहाचे बारकावे कॅमेरा टिपत असतो. म्हणून चित्रपटातील नृत्य दिग्दर्शन वाटते तितके सहज सोपे नसते. बी. सोहनलाल यानी लवकरच हे मर्म जाणून घेतले आणि ते त्याकाळचे आघाडीचे चित्रपट नृत्य दिग्दर्शक बनले.

१९५८ ते १९७८ या काळातील जवळपास सर्व महत्वाच्या चित्रपटात हे नाव तुम्हाला हमखास दिसेल. मधूमती, कल्पना, दिल अपना और प्रित पराई, चौदहवी का चाँद, साहब बिबी और गुलाम, पारसमणी, मेरे मेहबूब, गाईड, आरजू, मेरा साया,ज्वेल थीप या चित्रपटातील अविस्मरण्य नृत्य दिग्दर्शन त्यांचेच आहे.

एकदा मुंबईत बी. सोहनलाल आले असताना त्यांचे ग्रूप मधील सरोजकडे लक्ष गेले. त्यांनी बहूदा तिच्यातील क्षमता जोखली असावी. सरोजला त्यांनी आपले सहाय्यक केले.

यावेळी सरोज अवघी १२-१३ वर्षांची होती. त्यानां खरोखरच नेमके काय दिसले असेल सरोजमध्ये? सोहनलाल भेटे पर्यंत सरोज ने कुठेही नृत्य शिकले नव्हते. ती न शिकताच जर इतके चांगले नृत्य करू शकते तर शिकल्यावर पारंगंत होईल असा विश्वास त्यानां वाटला असावा.

सोहनलाल जेव्हा नृत्याच्या स्टेप्स शिकवत असत त्यावेळी सरोज अत्यंत बारकाईने त्या बघत असे. एकदा हेलन सोहनलाल स्टेप्स सांगत असतानां त्यांचे लक्ष सरोजकडे गेले. ते म्हणाले-

“तू माझी कॉपी करत आहेस का?”

“नाही मास्टर. मला हेलनच्या सर्व स्टेप्स खूप आवडल्या.”

“तू त्या सर्व स्टेप्स करून दाखवशिल?”

“हो मी करेन” आणि खरोखरच सरोजने सर्व स्टेप्स बिनचूक करून दाखविल्या. सोहनलाल आश्चर्य चकित झाले. तिची निपूणता बघून त्यांनी तिला आपली सहाय्यक केले. आणि लवकरच तिने एका नामवंत अभिनेत्रीला स्टेप्स पण शिकवल्या.

१९६२ मध्ये प्रदर्शीत झालेल्या “डॉ. विद्या” या चित्रपटात वैजयंतीमाला मूख्य भूमिकेत होती. स्वत: वैजयंतीमाला भरतनाट्यम शिकलेली अभिनेत्री त्यामुळे नृत्या बाबतच्या अधिक अपेक्षा असणे स्वाभाविक असे.

यातील एका क्लासिकल नृत्याच्या वेळी सोहनलाल वैजयंतीमालास म्हणाले की माझी सहाय्यक तुम्हाला नृत्याच्या स्टेप्स सांगेल. गाणे होते “पवन दिवानी न मानी उडाये घुंगटा” सरोज पेक्षा १२ वर्षांनी मोठ्या असलेल्या वैजंयतीमालाला आश्चर्य वाटले की एवढीशी मुलगी काय करून दाविणार.

पण सरोजने चेहऱ्या वरील सर्व हावभाव, डोळ्यांच्या हातांच्या हालचाली अगदी सुक्ष्म बारकावे इतके अप्रतिम करून दाखविले की वैजयंती माला पण अवाक झाली.

या गाण्यासाठी वैजयंती मालाला २२ रिटेकस् द्यावे लागले. तिने सरोजची तोंड भरून स्तुती केली आणि वर रक्कम बक्षिसही दिले. आजही जेव्हा तुम्ही हा चित्रपट बघाल तेव्हा लक्षात येईल की गाण्यातील प्रत्येक शब्दांवर वेगळी मुव्हमेंट आहे आणि ती रिपीट झालेली नाही.

नृत्य म्हणजे फक्त शरीराच्या विविध हालचाली नव्हेत. नृत्यात अभिनय देखिल अत्यंत महत्वाचा असतो. गाण्यातील सर्व भाव नृत्य करताना अभिनयानेही समृद्ध करावे लागतात तर ते कथेला पूढे सरकवतात.

चित्रपटाच्या तंत्रामुळे नृत्याचे सर्व पैलू पडद्यावर दाखवता येतात. पूर्वी नृत्य शूट करतानां खूप रिहसल करावी लागे कारण एक पूर्ण दृष्य एकाच रिटेकमध्ये पार पाडावे लागत असे. हल्ली असे होत नाही. शिवाय ग्रूप मध्ये अनेक नर्तक असत त्यातला एक जरी चुकला तर पुन्हा रिटेक घ्यावा लागे त्यामुळे खूपच मेहनत करावी लागे.

त्यात समोर कोण अभिनेते –अभिनेत्री आहेत याचाही विचार करावा लागे कारण सर्वांनाच नृत्य करता येत नसे. ते काय करू शकतील याचा विचार करूनच नृत्य कंपोज केले जाई.१९६२ ते १९७२ या १० वर्षांत सरोज खान सोहनलाल यांची सहाय्यक होती.

हे सर्व करीत असताना सरोजने सहा महिन्याचा एक नर्सिंगचा कोर्सही पूर्ण केला. आणि केईएम हॉस्पिटल मध्ये कामही केले. नंतर जेव्हा टायपरायटिंग आणि शॉर्ट हँडचा कोर्स पूर्ण केला तेव्हा वरळीच्या ग्लॅक्सो कंपनीत नोकरी मिळाली.

याच वेळी ती मेकअपचे कामही शिकली. चरितार्थासाठी नृत्यातुन मिळणारे २६ रूपये ४ आणे कसे पूरणार? त्यामुळे उत्पन्नाचे विविध स्त्रोत शोधण्या शिवाय पर्याय नव्हता.

ग्रूप डान्समध्ये नाचणारे मुले किंवा मुली या निवडून घेतल्या जात असत उगीचच कोणालाही समाविष्ट करून घेतले जात नसे. १९६३ मध्ये प्रदीपकुमार बिना रॉय यांचा “ताज महल” चित्रपट गाजला तो त्यातील रोशन यांच्या संगीतामुळे.या चित्रपटात रफी-आशा यांची एक कव्वाली आहे “चाँदी का बदन सोने की नजर…..”

यात मुख्य नर्तिका मिनू मुमताज आहे (मेहमूदची बहिण) आणि तिच्या उजविकडे पाठीमागे सरोज खान आहे. या चित्रपटाचे मेकअपमन होते जेष्ठ्य रंगभूषाकार पंढरी जुकर या गाण्याच्या वेळी ते तेथे हजर होते. सरोज खानचे चेहऱ्यावरील आणि डोळ्यांच्या हालचाली खूपच मोहक होत्या.

ते दिग्दर्शक सादिक साहेबानां म्हणाले की या मुलीला समोर घ्या यावर सादिक साब म्हणाले की तिला समोर घेतले तर मिनू मुमताज जी मुख्य डान्सर आहे तिच्या समोर फिकी पडू शकेल. म्हणजे सरोज त्या वयात कुणालही भारी पडू शकत होती.

१९६२ पासून मास्टर सोहनलाल यांच्या प्रत्येक चित्रपटात सरोज सहाय्यक होती आणि स्वत:ही अनेक गोष्टी बारकाईने शिकतही होती. ती त्यांची पट्टशिष्या झाली.

सामान्यत: या परंपरेत गुरू आपल्या शिष्याला मनगटावर गंडा बांधतात पण एक दिवस गुरू सोहनलाल यांनी सरोजच्या गळ्यात काळा धागा बांधला. सरोजला वाटले आपले लग्न गुरूशी झाले.

गुरूचे वय होते ४१ वर्षे तर शिष्या होती १३ वर्षांची शिवाय गुरूला चार मुलेही होती. पण सरोजला मात्र याचा थांगपत्ता नव्हता. १४ व्या वर्षी सरोजने आपल्या पहिल्या मुलाला हमीदला जन्म दिला. आज हा मुलगा देखिल प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक राजू खान या नावाने ओळखला जातो.

पण जेव्हा सोहनलाल यांनी आपले नाव या मुलाला देण्यास मनाई केली तेव्हा सरोजला मोठा धक्का बसला. तिला तेव्हा समजले की ते चार मुलाचे पिता आहेत.

सरोज एखाद्या सवाष्णी सारखी श्रृगांर करीत असे मात्र हा घाव तिच्या जिव्हारी लागला. तिने सर्वाचाच त्याग केला. १९६५ मध्ये ते दोघे पती पत्नी म्हणून विभक्त झाले.

मात्र सहाय्यक म्हणून सरोज ७२ पर्यंत त्यांच्या सोबतच होती. मला वाटतं कलेसाठी ही फार मोठी किंमत सरोज यांनी चुकवली.

१९६३ मध्ये सोहनलाल युरोपला गेले. तेथे राज कपूर यांच्या संगम या चित्रपटील गाण्याचे शुटींग करावयाचे होते. गाणे होते “ ये मेरा प्रेम पत्र पढकर….” हे गाणे राजेंद्र कूमार आणि वैजयंतीमालावर चित्रीत करायचे होते.

मात्र स्वत: राजकपूर मात्र तिथे जाऊ शकले नाही कारण मुंबईत “दिल ही तो है” या चित्रपटाचे शुटींग सुरू होते अणि त्यात ते नायक होते. या चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शक देखिल सोहनलालच होते.

या चित्रपटातील एक कव्वाली “निगाहे मिलाने को जी चाहता है…..”चे जेव्हा चित्रीकरण सुरू झाले तेव्हा अडचण अशी आली की सोहनलाल इथे नाहीत मग नृत्य कंपोज कोण करणार ? निर्माते सरोज खानला म्हणाले की सोहनलाल नाहीत तुम्ही त्यांच्या सहाय्यक आहात तेव्हा तुम्हीच कंपोज करा.

पण नृत्य कसे कंपोज करायचे ते सरोजला माहित नव्हते. सरोज म्हणाली मी स्वत: नृत्य करून दाखवेन या गाण्यावर हवे तर…. आणि त्यांनी सर्व हावभाव कव्वाली सोबत करून दाखविले आणि ते गाणे पिक्चराईज झाले. वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी त्यांनी स्वतंत्रपणे हे नृत्य कंपोज करून दाखविले….नुतनने या कव्वालीत चार चाँद लावले.

Saroj-Khanअभिनेत्री साधना ही सरोजची पूर्वी पासूनच फॅन होती. १९७५ मध्ये साधनाने आपल्या पती आर.के. नैय्यर “सोबत गीता मेरा नाम” या चित्रपटाची निर्मिती केली.

या चित्रपटात पहिल्यांदा सरोज खान स्वतंत्र नृत्य दिग्दर्शक बनली. ग्रपू डान्सर म्हणून सुरूवात केल्या नंतर स्वतंत्रपणे काम करण्याची संधी मिळवायला सरोज खानला १७ वर्षे लागली.

मात्र ही १७ वर्षे प्रचंड कष्ट आणि समस्येने भरलेली होती. “गीता मेरा नाम” मधील त्यांचे काम सुभाष घई यानां खूप आवडले आणि त्यांनी “विधाता” या चित्रपटात संधी दिली. १९८३ मध्ये प्रदर्शीत झालेल्या त्यांच्या हिरो या चित्रपटाने मात्र खऱ्या अर्थाने चित्रपटसृष्टीला त्यांच्या क्षमतेची ओळख पटली. आणि नंतर त्यांनी केलेला प्रत्येक चित्रपट त्यानां यशो शिखराकडे घेऊन गेला. नगीना(१९८६) “मधील मै तेरी दुश्मन, दुश्मन तू मेरा……” मिस्टर इंडिया (१९८७) मधील…हवा हवाई……, तेजाब (१९८८)…..चांदणी(१९८९)….बेटा(१९९२)…..डर, बाजीगर खलनायक(१९९३)….मोहरा (१९९४)….याराना, दिलवाले दुल्हनिया(१९९५)…. परदेस(१९९७)…. हम दिल दे चुके सनम…ताल(१९९९)…..लगान(२००१)… देवदास(२००२)…. देवदास(२००२)…. स्वदेस, वीर जारा(२००४)…. फना(२००६)…. गुरू(२००७)…. गुरू, तारे जमी पर, जब वूई मेट(२००७)…. खट्टा मिठा(२०१०)…. राऊडी राठोड, अग्नीपथ(२०१२)…. गुलाब गँग(२०१४)…. अशा एकाहून एक सरस चित्रपटाचे नृत्य दिग्दर्शन त्यांनी केले.

सामान्यत: चित्रपटातील गीत वा नृत्य गीत ३ ते ६ मिनीटांचे असते. मात्र त्याचे कंपोजिशन ते शूट हे कित्येक दिवसांचे असते. सरोज खान नृत्य दिग्दर्शक म्हणून प्रचंड यशस्वी का झाल्या?

तर त्या फक्त अभिनेत्री/अभिनेत्यानां फक्त नाचवत नसत तर जे गाणे चित्रीत होणार त्यावर खूप विचार करत. गाण्यातली प्रत्येक ओळ आणि त्यातील प्रत्येक शब्दांवर पटकथेच्या दृष्टीनेही विचार करत. प्रत्येक शब्दाला अभिनयाची जोड कशी द्यायची हे तंत्र त्यांनी अचूक ओळखले होते.

भारतीय संस्कृतील नृत्याचा अविष्कार आणि पाश्चिमात्य शैली याचा सुंदर मिलाफ त्यांच्या नृत्य संयोजनात बघायला मिळतो. २००७ मध्ये डॉ. शारदा रामनाथन या दिग्दर्शीकेचा “श्रीगांरम्” हा चित्रपट आला. पूर्णत: भारतीय नृत्यकलेचा अविष्कार असणारा या चित्रपटासाठी सरोज खान यांना बोलवण्यात आले होते.

यात पूर्ण शास्त्रीय पद्धतीचे भारतीय नृत्ये त्यांनी कंपोज केली. यातील एका नृत्यात “पदम” या प्रकारात गाण्यातील फक्त एका ओळीत सरोज खान यांनी १६ विविध प्रकारच्या भावमुद्रा करून दाखविल्या……. डॉ. शारदा रामनाथन म्हणतात मी त्यांचे वर्णन “स्पिचलेस” असे करेन. त्यांनी स्वत: या भावमुद्रा मोजल्या आहेत.

झगमगत्या चंदेरी दुनियेतले जब वुई मेट, देवदास आणि श्रीगांरम् या तिन चित्रपटांसाठी ३ राष्ट्रीय पुरस्कार तर तेजाब, चालबाज, सैलाब,बेटा, खल नायक, हम दिल दे चुके सनम, देवदास आणि गुरू असे सात फिल्म फेअर पुरस्कार त्यानां मिळाले पण वैयक्तिक वेदनांनी त्यांची पाठ सोडली नाही.

प्रसिद्ध शोमन सुभाष घई एके ठिकाणी म्हणतात- “ सरोज मधील ही अफाट प्रतिभा कित्येक वर्षे डावलली गेली. तिच्या खाजगी आयुष्यातील सर्व कष्ट, दु:ख, वेदना या सर्वांना तिने आपल्या नृत्याद्वारे मोळी वाट करून दिली म्हणूनच ती असे यश संपादन करू शकली.” तर एन. चंद्र म्हणतात- “ जेव्हा सरोज खानयांनी एक दो तीन चार….. हे गाणे कंपोज केले आणि मला फोन केला की तुम्ही एकदा येऊन बघा मग मी फायनल करते.

आणि मी जेव्हा जाऊन फक्त सिग्नेचर ट्युन बघितली तेव्हा लक्षात आले की हे गाणे लोक डोक्यावर घेणार” संजय लिला भन्साळी म्हणतात- “ देवदासच्या वेळी ही बाई खूप आजारी होती. अक्षरश: टॅबलेटस खात ती १०-१० तास काम करायची. तिच्या हातात गाणे दिले की ती झपाटून जाई.

तिला कॅमेरा मुव्हमेंटचे देखिल उत्तम ज्ञान आहे. जो सेट लावलेला आहे जे कलाकार त्यात भाग घेत आहेत त्या सर्वांचे ती बारकाईने निरीक्षण करत असे.

अनेकदा तर मी सांगितलेल्या कॅमेऱ्याच्या मुव्हमेंट ती बदलायला सांगे, जणू काही या चित्रपटाची ती निर्माती आहे आणि त्च्यावर ही सर्व जबाबदारी आहे….जेव्हा देवदासचा प्रमियर झाला तेव्हा ती दवाखन्यात बेडवर होती.

आम्ही जेव्हा भेटायला गेलो तेव्हा आगोदर तिने विचारलेत्र सिटी बजी या नही हॉल मे….लोगोंने सिक्के उछाले या नही……अर्धवट कॉन्शस असलेली ही बाई फक्त आणि फक्त नृत्यच जगणारी आहे.”

सोहनलाल पासून झालेली दोन मुले राजू खान आणि हिना खान तर नंतर सरदार रोशन खान पासूनची मुलगी सुकैन्या खान अशी तिन मुले. मात्र २०१२ मध्ये हिना खान मृत्यू पावली.

आपल्याकडे सर्व काही असताना आपल्या मुलीला वाचवू शकलो नाही याची त्यानां आजही खंत आहे. दुसऱ्या लग्नाच्या खूप पूर्वीच त्यांनी इस्लाम धर्म स्विकारला होता. दुसरी मुलगी दुबईला डान्स क्लास चालवते. चित्रपटा नंतर टीव्ही वरील नृत्याच्या अनेक रियालटी शो मध्ये त्या जज होत्या.

सध्या त्या चित्रपटा पासून काहीशा लांब गेल्या आहेत. आताच्या नृत्य शैलीबाबत आणि गाण्या बाबत त्या फारशा समाधानी नाहीत. मुंबईत त्यांची नृत्य शाळा आहे जिथे अनेक तरूण तरूणी नृत्याचे धडे गिरावल्या त्यांच्याकडे येतात. स्वत:पेक्षी ही अधिक आपल्या गुरूवर आणि नृत्यावर प्रेम करणाऱ्या सरोज स्वभावाने कडक आहेत.

अर्थात हा कडकपणा नृत्य गुरू म्हणून. त्यांच्या स्वत:चे अनेक वर्षां पासूनचे असे १८ शिष्य आहेत ज्यावर त्या मुलां सारखे प्रेम करतात. सेटवर येण्या पूर्वी जर कोणी रंगभूमिला नमस्कार केला नाही तर प्रचंड रागावतात. असे एकदा एका अभिनेत्रीने केले तर अख्खा चित्रपटच त्यांनी सोडून दिला……

जुन्या काळातील प्रत्येक आठवण आजही त्यांच्या स्मृतीत दरवळत असते. सन २०१२ मध्ये फिल्मस् डिव्हीजनने तयांच्यावर एक सुंदर डॉक्युमेंटरी तयार केली ती बघण्या सारखी आहे. १९५८ मध्ये सुरू झालेला नृत्याचा प्रवास आजही थांबलेला नाही.

शरीर स्थूल झाले असले तरी सेटवर जाताच आजही शरीर चपळ होते, डोळे, चेहऱ्यावरील भावमुद्रा, पदन्यास त्याच गतीने होऊ लागतात जितके ५९ वर्षापूर्वी होते. ….त्यांच्या भाषेत सांगायचे तर- “ मेरे गुरू हर वक्त मेरे सामने होते है. जब भी मै काम करने लगती हूँ तो वह मेरे अदंर प्रवेश करते है औरा मेरा काम पुरी शिद्दतसे पूरा हो जाता है. आज मै जो भी हूँ वह मेरे गुरू की वजहसे……”

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेजमनाचेTalksला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठीयेथे क्लिक करा.

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय