सांत्वन

डोळे उघडले आणि मलाच कळेना नक्की सकाळ आहे दुपार कि संध्याकाळ. आजूबाजूला बघितलं तर खूप साऱ्या बायका बसलेल्या होत्या.
नाटकीपणे रडवे चेहेरे करून एकमेकींकडे काय झालं, कसं झालं, आता पुढे कसं होणार, हि इकडे रहाणार कि माहेरी जाणार असल्या फालतू चौकश्या करणाऱ्या……
अरे देवा म्हणजे मी इथे भिंतीला टेकूनच झोपले होते की काय? झालं आता या सगळ्यांची एकच चर्चा असणार “हिचा नवरा मेला तरी ही खुशाल डाराडूर झोपा काढत होती, काय या आजकालच्या पोरी ” हे कानावर पडणार आता कधीतरी नक्कीच. खरंच माझा राजेश मला सोडून गेला आणि मला झोप कशी काय लागू शकते.
किती स्वप्न बघितली होती आम्ही दोघांनी मिळून……. ४ वर्ष लागली आम्हाला लग्न ठरवायलाच. दोन्ही घरचा विरोध होताच, मग समजावणे, रागावणे, रुसणे, चिडणे, भांडणे, धमक्या सगळं सगळं केलं आम्ही आणि शेवटी एकदाचे सगळे लग्नाला तयार झाले.
आम्ही बघितलेली सगळी स्वप्न पूर्ण करायच्या मागे लागलो होतो पण आज फक्त सहा महिन्यात राजेश मला एकटीला टाकून कायमचा निघून गेला.
काल सकाळी रोजच्यासारखा डबा त्याच्या हातात दिला आणि तो गेल्यावर मी माझं पटापट आवरत होते. मी बाहेर पडणारच एवढ्यात एकदम शेजारचे दामूकाका, काकू, सुरभी वाहिनी सगळे घरात आले.
मला काही कळेचना. मला धीर देत देत शेवटी त्यांनी मला सांगितल की सोसायटीच्या गेट समोरच राजेशला एका ट्रकने उडवलं….. पुढे काय झालं मला काहीच आठवत नाहीये.
हां!! कुणीतरी मला उचलून गाडीत ठेवलेलं अस्पष्टसं आठवतय.
राजेशच्या मूळघरी आल्यावर सुद्धा मी त्याच तंद्रीत होते. कानावर पडणारे फक्त काही शब्दच मेंदूपर्यंत पोचत होते. “आता कसं आयुष्य काढशील गं …”
“या मुलीचं नशीबच फुटक आहे बघ, लहानपणीच आई गेली बिचारीने सगळा त्रास सोसला आता जरा सुख येत होतं तर नवरा गेला, अजून काय काय नशिबात आहे हिच्या कोण जाणे” ….
“मी तर ऐकलय सगळ्या विमा पॉलीसी तिच्याच नावावर आहेत, सगळं घेऊन माहेरी पळून नाही गेली म्हणजे मिळवलं ” एकदा तर वाटलं सगळ्यांना जोरात ओरडून “चालते व्हा ” सांगावं….. पण मी तशीच गप्प बसून होते.
रडून रडून आता अश्रू सुद्धा येण बंद झाले होते. रात्री सुद्धा मी अशीच बसून होते, पूर्ण रात्रभर कारण मला राजेशच्या कुशित शिरल्याशिवाय झोपायची सवय कुठे होती.
पण आता जरा डोळा लागला होता माझा. भूक सुद्धा लागल्यासारखी वाटत होती. शेवटी शरीराला सुद्धा अस्तित्व आहेच ना. कालपासून मनाने त्याला त्याच्या गरजांपासून अडवून ठेवलं होत, पण आता हळूहळू मनाचा आवेग ओसरल्यावर त्या गरजा डोकं वर काढायला लागल्याच.
सकाळपासून या सांत्वन करायला येणाऱ्या बायकांनी खरच उच्छाद मांडलाय. कंटाळा आलाय त्यांच्या त्या हुकमी डोळयात पाणी आणण्याचा.
आपापसात गप्पा मारताना नीट बोलत असतात आणि माझ्या बाजूला येऊन बसल्या की अगदी हुकमी डोळयात पाणी आणून बोलायला सुरु करतात “धीर सोडू नकोस पोरी, तुलाच आता खंबीर राहायला हवं.
शेवटी तिकडे सुरभी वाहिनी हातात जेवणाचं ताट घेऊन आली आणि माझ्या बाजूला बसून मला बोलली “खाऊन घे थोडंतरी कालपासून उपाशी आहेस तू, अशाने तुला काहीतरी होईल ”मीही मुकाट्याने ताट समोर घेऊन बसले.
तेवढ्यात एक म्हातारीशी बाई माझ्याकडे येत होती. वाहिनीने तिला डोळ्यांनीच थांबवायचा प्रयत्न केला पण तरी ती पुढे आलीच मग मात्र वाहिनी बोलली “जरा थांबा,जेऊ द्या तिला” त्या बाई ने माझ्याकडे बघितलं आणि “जेवतेय का..बरं !!!!” बोलून ती बाजूला जावून बसली.
तिचं ते ‘बरं’ ऐकून मी हातात उचलेला घास परत ताटात ठेवला. ते बघून वहिनीने माझा हात तिच्या हातात घेतला. मी तिच्याकडे बघितलं तर तिच्या डोळयात पाणी नव्हत पण ते डोळे मला धीर देत होते , माझं खरं सांत्वन करत होते.
लेखक – सचिन अनिल मणेरीकर
याही कथा तुम्हाला खूप आवडतील ….🎁🎁
वेगवेगळ्या मराठी कथा/ कादंबऱ्या ऑनलाईन खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा.
या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी ८३०८२४७४८० या नम्बरवर ‘अपडेट्स’ असा व्हाट्स ऍप मेसेज करा.

'रहस्य जगण्याचे: समाधानी आयुष्याचे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
'रहस्य जगण्याचे: व्यक्तिमत्त्व विकासाचे अमूल्य नजराणे' हे पुस्तक खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा
सांत्वन ही कथा मला फारच जवळची वाटली खूप सुंदर कारण माझ्या ही पतीचे निधन झाल्यावर अशाच लोकांचा आजूबाजूला गलका होता आणि माझ्यासाठी त्यानं किती ठेवलय ह्याचे मोजमाप करत होते