तुझ्या विना……

हाहा…सकाळ झाली… किती बरं वाटतं ना हो..!!

कसलं बरं??

अहो, बघा ना कोवळी कोवळी सूर्यकिरणं सरळ येऊन आपल्या चेहऱ्यावर स्थिरावली आहेत. आपलं घर अगदी प्रकाशाच्या मध्यभागी आहे ना!

अग हो, शेवटी तूच माझं सगळं काही आहेस. जिथे संसार रचू तिथेच तू सुख मानतेस.

तुम्ही सोबत असलात ना की मग कोणी तोडलं, दुखावलं तरी काहीच नाही वाटत. अहो, ते जाउद्यात. समोर बघा ना, आले पहा रोजचे जोडपे..!!

कोण गं??

अहो ते बघा ना समोर….. रोज येतात आणि आपल्या घरासमोरच यांचं प्रेम उतू जात असतं! काय मेली आताची पोरं, लोक बघत नाही की आजूबाजूचं जग, हे आपले यांच्याच विश्वास तुडुंब बुडलेले असतात.

राहुदेत गं, वयच ते त्यांचं, चालायचंच की तेवढं!

बरं, तुम्हाला त्रास नाही ना जास्त होतंय उन्हाचा? सकाळी कोवळं वाटणारं ऊन आता अगदी अंग अंग जाळून काढतय हो. थंड पाण्यात डुबकी मारावीशी वाटतीये!

हो गरम तर होतयच!

अहो, ते जाऊदेत. ते बघा समोरून आजी आजोबा आलेत आता मात्र नक्की पाणी मिळणार आपल्याला! सकाळपासून उन्हाने जाळून निघालेलं अंग आता शांत होईल.

अग हो. जरा धीराने, किती पटापट विषय बद्दलतेस ग तू!

आता तुम्हीच सांगा, दुसरं करू तरी काय?? आपण मोजून दोघे इथं. त्यात काही कामं नाही. त्यापेक्षा ही वेगवेगळ्या प्रवृत्तीची लोकं तरी अनुभवायला मिळतायत, हेच आपलं भाग्य!

हो तुझं बरोबर आहे. इच्छा असूनही आपण उठू शकतो ना चालू शकतो. दुसऱ्याच्या जीवावर जगण्यावाचून पर्यायच नाहीये ग आपल्याकडे!

अहो. नका उदास होऊत. आपणच एकमेकांच वैभव, शांतता, सुख, समाधान आहोत. फक्त देवाने आता मात्र आपल्याला वेगळं करू नये.

हा…हु…अंगावर शहारे आलेत हो! मी बोलली ना की आजी-आजोबांशिवाय कोणी आपल्याला पाणी देऊन शांत नाही करणार, बरं वाटलं हो जरा!

ती कोपऱ्यात खेळतायत ना आपल्या बागेच्या, ती मुलं बघा ना. किती गोड आहेत हो, पण कचरा करतात खूप!

पण ठीक आहे. आता सवय झालीये मला त्याची. डोळ्यांना सुख मिळतं काही वेळ आई बनल्याचं. मी तर आई होऊ शकत नाही.

अग असं का बोलतेस. होशील गं… तू पण आई होशील. तुझी पण एक नव्हे तर खूप सारी मुलं असतील!

तुमच्या तोंडात गुलकंद पडो!

वेडी ग माझी बाई ती!

अहो, ते बघा ते कोण हो येतायत? चेहऱ्यावरून तर साधी वाटत नाहीत आणि ते पण आपल्याकडेच येतायत मी तर यांना आज पहिल्यांदा आपल्या बागेत बघतीये. तुम्ही ओळखता का हो?

नाही, मी पण नाही पाहिलं कधी यापूर्वी इथे यांना!

आले बघा ते आपल्याच जवळ. मला खूप भीती वाटतीतेय. आपल्याला काही करणार तर नाहीत ना. मला तुमच्यापासून वेगळं तर करणार नाहीत ना. एकतर बघा ना त्यांच्या हातात काहीतरी धारधार दिसतंय. मला सोडून जाऊ नका कधी प्लीज!

नको ग इतकी पॅनिक होऊस, कशावरून ते लोक आपल्याला वेगळं करणार ?

इतक्यात जोरदार वार होतो..

मला खूप लागतंय, मला त्रास होतोय हे लोक का खेचतायत मला असं? आणि कुठे घेऊन चालले आहेत? मला वाचवा….वाचवा

इतक्यात परत सपासप वार होतात…

अरे हे लोक तर माझ्या सौभाग्याच्या जीवावर उठलेत. मी सोडणार नाही यांना. तुम्हाला काही केलं तर!

अग काही नाही होतं थोडं दुःखेल काही वेळ मग बरं वाटेल!

अर्ध्या तासानंतर..

अहो, हा तर बंगला वाटतोय मोठा आणि इथे का आणलंय आपल्याला? पण बंगला तर आपल्या घरापेक्षा पण सुंदर आहे हो!

आज इथे पार्टी आहे वाटतं, सजवलाय बघा ना कसा आणि तो बघा ऐकलंत का, तो माणूस कसा बोलतोय, आज रात्री खूप पाहुणे येतायत म्हणे! आज काहीतरी रोजच्यापेक्षा वेगळ अनुभवायला मिळणार वाटतं!

हो अग. बघू पुढे काय होतंय रात्री पर्यंत वाट बघू!

संध्याकाळी ७.०० वाजता…. (बंगल्यात कसलीशी लगबग चाललेली)

हे शामला, तो ट्रे ठेवलाय बघ तिथे. त्यात मार्केट मधून गुलाबांचे गुच्छ आणलेत त्यातला एक एक गुलाब काढून दे बघू सर्वांना केसात माळायला आणि ते २ स्पेशल गुलाब आहेत ना त्यातलं एक नवीन नवीन लग्न झालेल्या नवरदेवाच्या कोटची शोभा वाढवणार आणि दुसरं नवरीच्या फ्रेंच रोल केलेल्या केसांत विराजमान होणार!

संपलं अहो सगळं संपलं!

अग धीर नको सोडूस, अजूनही आपण एकाच घरात आहोत आणि खूप जवळ आहोत काही वेळाकरता फक्त कामानिमित्त दूर जातोय इतकंच!

बरं, बघू कुठं घेऊन जातंय नशीब आपलं?

ठरल्याप्रमाणे दोघे वेगवेगळी झालीत..दोघे वेगवेगळ्या ठिकाणी आपापली कर्तव्य बजावायला गेली!

अहो तुम्ही ना खूप सुंदर दिसताय त्या कोटमध्ये!

आणि हो तू पण अगदी नववधूप्रमाणे खुलुन दिसतीयेस नवरीच्या केसांत, नवरीला शोभा नाही पण तुझ्यामुळे तिचं सौंदर्य एखाद्या परीप्रमाणे भासतंय ग!

इश्श…तुमचं आपलं काहीतरीच!

पार्टीमध्ये सर्व जण दारूच्या नशेत गुंग असताना हे दोघे मात्र एकमेकांना नजरेने घायाळ करत होते. पार्टी संपून रात्रीचे ११ वाजले. नवरा-नवरीला एकांतात पाठवण्यात आलं. बेड वर स्थानापन्न झालेलं नवविवाहित जोडपं भलतंच मूड मध्ये आलं आणि दोघांनी पण एकमेकांवरच्या गुलाबांच्या फुलांना दाराचा रस्ता दाखवला. त्या मुलाने नवरीचे केस मोकळे करताना फुलांना दारी फेकून दिलं आणि तिने नवऱ्याच्या कोटवरून हात फिरवताना मध्ये अडचण करणाऱ्या गुलाबाला लांब भिरकावून दिलं!

आई….आई ग…!! अहो खूप लागलं. कसं फेकलं पाहिलं का मेल्यांनी, आग लागो मेल्यांच्या हातांना!

अग, असं नको बोलुस. त्यांच्यामुळे आता पुन्हा एकदा आपण एकत्र, एकमेकांच्या जवळ, या एसीच्या थंडगार हवेत आणि रात्रीच्या चांदण्यात आहोत. नको त्यांना शिव्या देऊस!

तसंही आपलं जीवनच तितकं लहान आहे, आपल्याला व्यथा मांडायला तोंड नाही त्यात काय ग कोणाचा दोष?!

असो जगून घेऊ ही रात्र आपण….आपल्यासाठी….एकमेकांच्या जवळ!

उद्या पुन्हा आपल्याला परतीचा प्रवास करायचा आहे बरं का! जीवनाचा तोच संघर्ष….पुन्हा एकदा नव्या जागी….नव्या लोकांसोबत…..नवं जीवन….!!

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय