बॅरिकेड्स – भयकथा

ढेरपोट्या रमेश पार्किंग लॉट मध्ये उभ्या असलेल्या आपल्या कार मध्ये जाऊन बसला.

“हॅलो आई, निघतोय आता मी इथून…. नाही, नाही, नाही जमणार, आत्ताच निघत आहे मी, उद्या लगेच तिथून निघणार मी… प्लिज उगीच मला फोर्स करू नकोस… मला नाही आवडत तिकडे… मी नाही मानत असलं काही… बास्स्स… मी निघतोय आता इथून अँड दॅट्स फायनल.”

“काय वैताग आहे राव हा.” रमेश वैतागून फोन ठेवत बोलला. त्याने घड्याळात पहिले, रात्रीचे दहा वाजले होते.

“घरी पोहचेपर्यंत रात्रीचे ३ वाजतील. चला, करूया सुरवात.” मनाशी बोलत रमेशने कार सुरु केली आणि हायवे गाठून गावाच्या दिशेने सुरवात केली.

गाडीमध्ये इंग्लिश गाणी लावून रमेश आपल्याच धुंदीत चालला होता.

“म्हणे अमावस्या आहे, एवढ्या रात्रीचं नको येउस.” काहीतरीच असतं आईच. मनाशीच बोलत आणि गाणी ऐकत रमेशचा प्रवास सुरु झाला होता. बाहेर एवढा थंड वारा वाहत असताना तो गाडीच्या काचा बंद करून AC सुरु करून बसला होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजतो.

“हेय विकी व्हाट्स अप मॅन…?? काही नाही रे… गावी चाललोय… जत्रा आहे… माय वीकेंड प्लॅन जस्ट गॉट फकड् अप… नो, नो, नो, नो… यु गाईस कॅरी ऑन… एन्जॉय बडी… बाय.”

‘रमेश’…. पुण्यातील IT कंपनीमधला सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर. दोन वर्षांपासून तो या कंपनीमध्ये काम करत होता. एक्सट्रीमली टॅलेंटेड… कॉलेज झाल्यावर तो कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून जॉईन झाला होता, पण सहा महिन्यातच कंपनीने त्याचा परफॉर्मन्स पाहून त्याला प्रोमोट करून सिनियर सॉफ्टवेअर इंजिनियर बनवलं होतं. थोड्याच दिवसात त्याने नवी कोरी ‘स्कोडा’ गाडी पण घेतली होती. बक्कळ पगार, हाई प्रोफाइल लाईफ स्टाईल यामुळे रमेश ऍरोगंट, अग्ग्रेसिव्ह आणि उर्मट बनला होता.

आई वडिलांशी तसंही त्याचं आधीपासूनच जास्त पटत नव्हतं, त्यामुळे तो घरी कधीतरी जायचा. यावर्षी गावच्या जत्रेला मात्र आईने त्याच्या मागे लागून – लागून त्याला यायला भाग पाडलं होतं. अर्थातच रमेश नाखुशीने का होईना गावी जायला तयार झाला. आज अमावास्या असल्यामुळे त्याची आई त्याला आज, तेही एवढ्या रात्री नको येऊस म्हणून विनवणी करत होती. पण ऐकेल तो रमेश कसला. त्याने काहीही ऐकलं नाही आणि गावी जाण्याचा त्याचा प्रवास सुरु झाला.

‘आय एम, इन अ लव्ह विथ अ शेप ऑफ यु’ गाणं सुरु होतं. रमेश जवळपास तीन तासापासून कार चालवत होता. त्याला आता सिगारेटची तलप झाली होती. तो सिगारेटचं पाकीट शोधू लागला.

“शीट यार, सिगारेट पण आणायचं विसरलो आपण” तो फ्रस्ट्रेटेड होऊन स्वतःवरच ओरडला. पण आता काही ईलाज नव्हता. तो गाडी चालवता – चालवता आजूबाजूला पाहू लागला, कि कुठे कोणती टपरी उघडी दिसतेय का म्हणून. सुदैवाने त्याला एका ठिकाणी पेट्रोल पम्प दिसला, त्याच्याशेजारी छोटंसं दुकान होतं. रमेशने गाडी पेट्रोल पंपापाशी उभी केली आणि हजार रुपयांचं पेट्रोल टाकायला सांगितलं.

“सायेब गाडी लय झकास हाय तुमची.” पेट्रोल भरणारा मुलगा रमेशला म्हणाला.

“ह्म्म्म” म्हणून फक्त रमेशने रिऍक्शन दिली.

“सायेब टाकी फुल करून घ्या” तो मुलगा रमेशला बोलला.

“का??” रमेश प्रश्नार्थक नजरेने पाहून बोलला.

“आज अमावास्या आहे, आणि आता कुंभार्ली घाट सुरु होईल. लय माणसांना इकडे चकवा लागलेला हाये.” तो मुलगा काळजीच्या स्वरात सांगत होतं.

“व्हॉट नॉन्सेन्स, तुला टाकी भरायचीय तर पूर्ण भर, पण उगीच हे असले फालतू करणे सांगून लोकांना मूर्ख बनवू नकोस.” रमेश चिडलेल्या स्वरात बोलला.

“आवं सायेब पण…”

“शट अप” रमेश त्याचं बोलणं मधेच तोडून सिगारेट ओढायला दुकानापाशी गेला.

“एवढ्या रात्री पेट्रोल पम्प आणि तुमचं दुकान कसं काय सुरु” रमेशने सिगारेट ओढत दुकान मालकाला विचारलं.

“पूर्ण चाळीस किलोमीटर एरियामध्ये फकस्त हाच पम्प हाये, त्यामुळं सरकारनंच परमिट दिलंय चूविस तास सुरु ठिवायचा” तो मालक रमेशला सांगत होतं.

“बरं” असं म्हणून रमेश सिगारेट ओढू लागला.

सिगारेट संपवून, पैसे देऊन रमेशने परत प्रवासाला सुरवात केली.

रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्ण अंधार होतं. गाडीच्या हेड लाईटच्या प्रकाशा व्यतिरिक्त दुसरं काहीच दिसत नव्हतं. क्वचित एखादी गाडी किंवा ट्रक रमेशला क्रॉस करायचा तेवढाच फक्त काय तो उजेड दिसायचा. थोड्याच वेळात कुंभार्ली घाटाला सुरवात झाली. वेडी वाकडी वळणे पार करत रमेशची गाडी सुसाट चालली होती. गाडी पळवत असताना रमेशला समोर ‘महाराष्ट्र पोलीस’ लिहिलेले पिवळे बॅरिकेड्स आणि एक हवालदार उभा असलेला दिसला. रमेशने जवळ जाऊन गाडी थांबवली. त्याने टाइम चेक केला तर रात्रीचे दोन वाजले होते.

“ड्रायविंग लायसन्स आणि गाडीची कागदपत्रे दाखवा साहेब” हवालदार रमेशच्या जवळ आला आणि त्याला बोलला.

गोंधळून रमेशने कार मधील लाईट लावली. रात्रीच्या अंधारात त्याला हवालदाराचा चेहरा थोडा अंधुक-अंधुक दिसला. रमेशने त्याला ड्रायविंग लायसन्स आणि गाडीची कागदपत्रे दाखवली आणि विचारलं, “आज एवढ्या रात्री नाकाबंदी?”

“साहेब, एक कोडं विचारू का?” हवालदार त्याच्याकडे न पाहता बोलला.

“एवढ्या रात्री काय कोडी खेळात बसू काय मी…!” रमेशला अपेक्षित उत्तरा ऐवजी त्याला भलतंच काही ऐकायला मिळाल्यामुळे रमेश चिडून बोलला.

हवालदाराने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि त्याने रस्त्यावरचे बॅरिकेड्स बाजूला सारून रमेशला जायला वाट मोकळी करून दिली.

रमेशने रागाने हवालदाराकडे कटाक्ष टाकला आणि तो निघून गेला.

“युसलेस मामू लोक, आत्ता जर माझ्याकडे डॉक्युमेंट्स नसते तर दोन – तीन हजाराला फाडले असते मला आणि आत्ता कोडी विचारतोय, नॉन्सेन्स.” रमेश स्वतःशीच बोलत होता आणि घाटातील वळणा-वळणाचे रोड पार करत होता. अचानक त्याच्या कार मध्ये सुरु असणारी गाणी वाजायची थांबली. रमेशने मीडिया प्लेयर ऑफ करून ऑन केला, पेन ड्राईव्ह इजेक्ट करून परत इन्सर्ट केला पण काहीच फायदा झाला नाही. मग रमेशने पण त्याचा नाद सोडला आणि घाट पार करू लागला.

जवळपास २०-२५ मिनिटे झाली, घाट काही संपायचं नाव घेत नव्हता. रमेशला पण काही समजत नव्हते. अचानक त्याला समोर पुन्हा ‘महाराष्ट्र शासन’ लिहिलेले पिवळे बॅरिकेड्स दिसले. अजून एक नाकाबंदी आहे कि काय म्हणून रमेशने गाडी थांबवली.

“ड्रायविंग लायसन्स आणि गाडीची कागदपत्रे दाखवा साहेब.” हवालदार त्याच्या जवळ आला आणि बोलला. रमेशने लाईट लावून निरखून पाहायचा प्रयत्न केला, पण त्याला त्या हवालदाराच्या फक्त अंधूकच चेहरा दिसला.

“आत्ताच तर मागे डॉक्युमेंट्स दाखवली.” रमेश चिडलेल्या स्वरात बोलला.

“ड्रायविंग लायसन्स आणि गाडीची कागदपत्रे दाखवा साहेब” हवालदार परत निर्विकार चेहऱ्याने बोलला.

“हे घ्या.” रमेशने चिडीं कागदपत्रे हवालदारासमोर धरली.

“साहेब, एक कोडं विचारू का?” हवालदार त्याच्याकडे न पाहता बोलला….

आता मात्र रमेशला आवाज ओळखीचा वाटला.

“हम्म, विचारा.” इच्छा नसतानाही रमेशने संमती दर्शवली.

“लाख मोलाचा दागिना हा,
सर्वांकडेच असतो याचा ठेवा.
जेवढी मेहनत घेशील तू दादा,
आयुष्याची श्रीमंती वाढेल तुझी सदा.” सांगा काय…?? हवालदाराने विचारले.

“मला नाही माहिती” रमेशने गोंधळून उत्तर दिले.

हवालदाराने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि जाऊन त्याने बॅरिकेड्स बाजूला सारून रमेशला वाट मोकळी करून दिली.

नक्की काय झाले, हे रमेशला समजलेच नव्हते. त्याने घड्याळात पहिले तर रात्रीचे ‘दोन’ वाजले होते.

“कसं शक्य आहे??” रमेश मनाशीच बोलला. त्याने कॉल लावण्यासाठी मोबाईल घेतला तर नेटवर्क अजिबातच नव्हते. आता तो मनातल्या मानत घाबरला आणि त्या कोड्याबद्दल विचार करू लागला.

“पैसा…!! हेच बरोबर उत्तर होतं. आजकाल पैशाशिवाय काहीच होत नाही. पैसा है तो सब कुछ है बॉस. पैसा हाच आजच्या जगातला दागिना आहे आणि मेहनतीशिवाय तर पैसे मिळूच शकत नाहीत.”

स्वतःच्या हुशारीवर खुश होऊन रमेश मनाशीच बोलला, “पुढच्या वेळेस जर हवालदार पुन्हा भेटला तर त्याला उत्तर सांगेन मी, पण हा आधी घाट तरी संपूदे साला.”

खूप वेळ झाला रमेश गाडी चालवत होता, पण घाट काही संपायचं नाव घेत नव्हता. आणि रस्त्यात त्याच्याशिवाय त्याला कोणी दिसत पण नव्हते. चोहोबाजूला गिर्द झाडी आणि जीवावर उठलेला काळोख. समोर पुन्हा त्याला बॅरिगेटे दिसते आणि तिथे उभा असलेला तो ट्राफिक हवालदार.

“ड्रायविंग लायसन्स आणि गाडीची कागदपत्रे दाखवा साहेब” हवालदार परत निर्विकार चेहऱ्याने बोलला. आता मात्र रमेशला घाम फुटला, त्याला पेट्रोलपंपावर बोलत असलेला तो मुलगा आठवला. रमेशला कळून चुकले होते कि त्याला ‘चकवा’ लागलेला आहे.

“हे घ्या.” रमेशने कागदपत्रे हवालदारासमोर धरली.

“साहेब, एक कोडं विचारू का?” हवालदार त्याच्याकडे न पाहता बोलला.

.”हो, विचारा.” इच्छा नसतानाही रमेशने संमती दर्शवली.

“लाख मोलाचा दागिना हा,
सर्वांकडेच असतो याचा ठेवा.
जेवढी मेहनत घेशील तू दादा,
आयुष्याची श्रीमंती वाढेल तुझी सदा.” सांगा काय…?? हवालदाराने विचारले.

“पैसा” रमेशनने पटकन उत्तर दिले.

हवालदाराने पुन्हा निर्विकारपणे बॅरीगेट्स बाजूला सारले आणि रमेशला जायला वाट मोकळी करून दिली.

रमेश आता पुरता घाबरला होता. त्याला माहिती नव्हते त्याचं उत्तर बरोबर होता कि चूक. त्याला माहिती नव्हतं कि त्याला चकवा सुटला होता कि नव्हता. तो तसाच गाडी चालवत होता. काही वेळाने त्याने घड्याळात पहिले तर अजून ‘दोन’ च वाजले होते, मोबाईल चेक केला तर नेटवर्क नव्हते आणि मोबाईल पण वेळ रात्रीचे दोन च सांगत होता. रमेशला आता समजून चुकले होते कि तो या चक्रातून तेव्हाच सुटणार होता जेव्हा तो त्या कोड्याचे बरोबर उत्तर देऊ शकणार होता. रमेश आता त्या कोड्याबद्दल विचार करू लागला आणि त्याचे विचारचक्र जोरात चालवू लागला.

लहानपणी रमेशला फुटबॉल खेळण्याची प्रचंड आवड होती. शाळेत असताना तो अंडर १७ मध्ये महाराष्ट्राच्या टीम मध्ये पण खेळाला होता. त्याचं देशातला महान फुटबॉलपटू होण्याचं स्वप्न होतं. पण घरातली हलाखीची परिस्थिती आणि रमेशची शैक्षणिक गुणवत्ता दिवसेंदिवस ढासळत चालल्यामुळे रमेशच्या वडिलांनी त्याचं फुटबॉल खेळणं बंद केलं. आईने त्याला फुटबॉल न खळण्याची शप्पत घातली आणि चांगला अभ्यास करून चांगले करियर घडवण्याचे वचन त्याच्याकडून घेतले. यामुळे रमेशचे खुप मानसिक खच्चीकरण झालं आणि त्याने फुटबॉलला कायमचा रामराम ठोकला आणि आई वडिलांपासून पण जरा जास्तच दुरावा ठेऊ लागला. पैसा कमवून जग विकत घेणे हेच आता त्याचे धेय्य बनले होते.

पण आत्ता रमेशला आई वडिलांची राहून राहून आठवण येत होती. आईने लावलेली माया आणि वडिलांनी केलेले कष्ट त्याच्या डोळ्यासमोर तरळत होते. तो आई वडिलांना आत्तापर्यंत जे काही घालून पडून बोलला होता ते त्याला आठवत होते आणि त्याला या गोष्टीचा खूप पश्चाताप होत होता. अचानक त्याला ते कोडे आठवते आणि तो ओरडतो….”आई-वडील…!”

हेच माझ्या आयुष्याचा खरा दागिना आहे. असे म्हणून तो गाडी अजून दामटतो.

समोर त्याला हवालदार भेटतो डॉक्युमेंट्स पाहिल्यानंतर हवालदार त्याला कोडे विचारतो आणि रमेश त्याचं उत्तर आई-वडील देतो. बॅरीगेट्स ओलांडल्यानंतर रमेशला आई वडिलांना कधी भेटतोय असा झाला होतं. तो गाडी चालवत राहतो, पण त्याला रोड ओळखीचाच वाटतो. तो घड्याळ चेक करतो तर अजून काटा दोन वरच होता. रमेश समजून जातो कि त्याचं उत्तर चुकलेलं आहे.

रमेश पुन्हा कोडे घोळत राहतो ‘दागिना’, ‘श्रीमंती’, ‘आयुष्य’, हे शब्द घोळत असताना रमेशला काहीतरी आठवते…

‘सरिता’ रमेशची कॉलेजमधली गर्लफ्रेंड. अहं, एक्स गर्लफ्रेंड. खूप प्रेम करायची ती रमेशवर. रमेशचं पण तिच्यावर प्रेम होतं, परंतु पैसा हि रमेशची पहिली प्रायोरिटी होती. त्यामुळे साहजिकच जॉबला लागल्यापासून रमेश तिला टाळू लागला लागला आणि पैशांच्या मागे असा धावू लागला कि सरिताने त्याचा हात कधी सोडला ते त्याला समजलेच नाही. मागे वळून जेव्हा त्याने पहिल तेव्हा सरिताने बोललेलं एकंच वाक्य त्याला आठवलं,
“रमेश, पैसा हा तुला आयुष्यभर पुरणार नाही. आयुष्य जगण्यासाठी लागतं ते प्रेम…!!!”

रमेशला त्याचं उत्तर सापडलं होतं. तो बॅरीगेट्स पाशी जातो आणि हवालदाराने कोडं विचारल्यावर उत्तर देतो, “प्रेम.”

बॅरीगेट्स बाजूला सारून रमेश पुढे जातो, त्याला वाटते तो जिंकला. पण तसाच पुढे जाता-जाता त्याला समजतं कि चकवा अजून सुटलेला नाही. घड्याळात ‘दोन’ वाजले आहेत. एकही गाडी दिसत नाहीये आणि मोबाईलला रेंज नाहीये.

परत रमेश फिरून बॅरीगेट्स पाशी येतो. हवालदार कोडं विचारतो, रमेश उत्तरतो ‘आदर’.

परत रमेश फिरून बॅरीगेट्स पाशी येतो. हवालदार कोडं विचारतो, रमेश उत्तरतो ‘स्वाभिमान’.

परत रमेश फिरून बॅरीगेट्स पाशी येतो. हवालदार कोडं विचारतो, रमेश उत्तरतो ‘सोने-चांदी’.

परत रमेश फिरून बॅरीगेट्स पाशी येतो. हवालदार कोडं विचारतो, रमेश उत्तरतो ‘शेती’.

आता रमेश जाम खचतो. त्याला सुचत नाही आता काय करावे. त्याला आता चक्कर येऊ लागली होती. त्याच्या अंगातली ‘अकड’ पूर्णतः नाहीशी झाली होती. त्याच्या कारचे पेट्रोल पण आता रिजर्वला येण्याच्या मार्गावर होते.

फिरून पुन्हा एकदा तो त्या बॅरीगेट्स पाशी येतो. हवालदारासमोर गयावया करू लागतो. कारचे दरवाजे उघडून बाहेर येण्याचा प्रयत्न करू लागतो पण कारचे दरवाजे उघडत नाहीत. रमेश हवालदारासमोर खूप विनवण्या करतो, हवालदाराच्या निर्विकार चेहऱ्यावर कोणतेच भाव दिसत नाहीत. शेवटी न राहवून रमेश उतरतो ‘ज्ञान’. नेहमीप्रमाणे बॅरीगेट्स बाजूला सरतात आणि रमेश गाडी पुढे नेतो.

काहीच बदलत नाही. तोच रोड, तीच वेळ आणि तोच जीवघेणा काळोख. गाडीसुद्धा आता रिजर्व्हला लागली होती. रमेशला आता त्याचा शेवट समोर दिसत होता. हि आता त्याची शेवटची फेरी होती. तो मोबाईल पाहतो, तर मोबाईलची पण बॅटरी आता खूप कमी राहिली होती. रमेश मनाशी विचार करतो आणि आपल्या आयुष्याचा शेवटचा व्हिडीओ बनवावा असे त्याला वाटते. यामध्ये आपल्या प्रिय व्यक्तींचे आभार आणि ज्यांची मने त्याने दुखावली आहेत त्यांची माफी मागावी असा विचार करून तो मोबाईलचा सेल्फी कॅमेरा खोलतो आणि त्यामध्ये आपले चरबी सुटलेले तोंड पाहून त्याच्या डोक्यामध्ये लक्ख प्रकाश पडतो.

रमेश फुटबॉल सोडून देतो आणि उदास राहतो. या काळामध्ये त्याचं व्यायाम संपतो आणि आहार वाढतो. अनियमित आहार वरचेवर खाणे, त्यात गिर्ल्फ्रेन्ड सोडून गेल्यामुळे अजून निराश होणे, बैठे काम, वाढणारा आहार, बदलती जीवनशैली आणि दारू-सिगारेटचं व्यसन. या सगळ्यांमुळे रमेशचं शरीर बाहेरून वाढत होतं आणि आतून खंगत चाललं होतं.

रमेशला त्याचा हा ‘अलंकार’ आता जपायची खूप गरज आहे. यावर मेहनत घेऊन त्याला त्याच्या आयुष्याची श्रीमंती वाढवायची आहे. रमेशला आता त्याचा सर्व फ्लॅशबॅक डोळ्यासमोरून फिरून जातो. मनाशी निश्चय करून तो हवालदाराकडे जातो आणि त्याला उत्तर देतो… “शरीर”.

हवालदाराच्या चेहऱ्यावर किंचीतसं स्मितहास्य येतं आणि तो बॅरीगेट्स बाजूला सारून रोड खुला करतो.

रमेश घाट संपवून पुढे जातो. त्याच्या कारची टाकी आता फुल झालेले इंडिकेटर डॅशबोर्ड वर दिसत होते. कार मधील गाणी सुरु होतात. मोबाईलला नेटवर्क येते, आजूबाजूला गाड्या दिसू लागतात. सगळं आहे तसं सुरु होतं. बदललेला असतो तो रमेश…!! एकदम पूर्णपणे.

कारण आता त्याच्या जीवनातले सगळे बॅरीगेट्स बाजूला झालेले असतात…!!!

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

2 thoughts on “बॅरिकेड्स – भयकथा”

Leave a Comment

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय
मलेशियाची राजधानी क्वाला लंपूर ची सफर!शरीरावरील अनावश्यक चरबी कमी करण्यासाठी ५ योगासनेस्वतःला हे ५ प्रश्न विचारा आणि प्रगतीचे मार्ग खुले करा?नियमितपणे हि २ आसने केली तर किडनीचे विकार जडणार नाहीत।व्हिटॅमिन बी १२ च्या कमतरतेची कारणे, लक्षणे व उपाय