लाल भोपळ्याच्या बियांचे आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे

Pumpkin Seeds Health Benefits

भोपळा म्हटलं की आपल्याला ‘चल रे भोपळ्या टुणूक टुणूक‘ म्हणणाऱ्या आणि लेकीकडे जाऊन तूपरोटी खाऊन धष्टपुष्ट होणाऱ्या म्हातारीची गोष्ट आठवते.

पण तुपरोटी खाण्यापेक्षा त्या म्हातारीने भोपळ्यातल्या बिया खाल्ल्या असत्या तर ती जास्त धष्टपुष्ट झाली असती.

वाचून गंमत वाटतेय का? पण हे खरे आहे. लाल भोपळ्याच्या (pumpkin) बियांच्या सेवनाने आरोग्यविषयक आश्चर्यकारक फायदे मिळतात. आज आम्ही तुम्हाला त्याबद्दलच सविस्तरपणे सांगणार आहोत.

भोपळ्याच्या बियांच्या नियमित सेवनाने खालील फायदे होतात 

१. वजन कमी करण्यास उपयुक्त

भोपळ्याच्या बियांमध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण अगदी कमी असते आणि संतृप्त चरबी (Saturated Fats) अजिबात नसतात.

तसेच, भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते. त्यामुळे आहारातील फायबरचा एक उत्तम स्रोत त्या बनू शकतात.

भोपळ्याच्या बिया नियमितपणे सेवन केल्यास त्या आपल्याला आपण खालेले अन्न योग्य पद्धतीने पचवण्यास मदत करतात, आपले पोट भरलेले ठेवतात आणि सारखी भूक लागणे (Cravings) कमी करतात, त्यामुळे खाणे नियंत्रणात येऊन वजन कमी होण्यास मदत होते.

२. गर्भधारणा झाल्यावर उपयुक्त

भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात झिंक असते, जे बाळाच्या निरोगी वाढीस मदत करणारे एक आवश्यक खनिज आहे. त्याचप्रमाणे भोपळ्याच्या बियांमध्ये ओमेगा-३ फॅटी ऍसिड असतात, जे बाळाच्या मेंदू आणि डोळ्यांच्या विकासात मदत करतात. बाळाच्या योग्य वाढीसाठी फायदेशीर असतात.

३. पुरुषांची प्रजननशक्ती वाढवतात (Male Fertility Booster) 

भोपळ्याच्या बियांमध्ये असणारे झिंक पुरुषांच्या शुक्राणूंच्या उत्पादनाची गुणवत्ता आणि प्रमाण सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण कार्य करते. तसेच भोपळ्याच्या बिया नियमित खाल्ल्याने पुरुषांमधील होर्मोन टेस्टोस्टेरॉनची पातळी सुधारण्यास देखील मदत होते. ह्याचा पुरुषांची प्रजननशक्ती वाढण्यास फायदा होतो.

४. महिलांच्या बाबतीत पीसीओडी आणि थायरॉईडसाठी उपयुक्त

पीसीओडी (पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज) किंवा थायरॉइड ग्रंथीचे असंतुलन हे मुख्यतः होर्मोन्सच्या असंतुलनामुळे होते. ह्या समस्येने ग्रस्त असलेल्या महिलांमध्ये होर्मोन्सच्या संतुलनासाठी भोपळ्याच्या बिया उपयुक्त ठरतात. तसेच भोपळ्याच्या बिया इंसुलिन होर्मोनची पातळी देखील नियंत्रित करू शकतात, त्यामुळे वजन आटोक्यात राहून पीसीओडीचा त्रास होत नाही.

५. ताण-तणाव कमी करण्यासाठी आणि झोप सुधारण्यासाठी उपयुक्त

भोपळ्याच्या बियांमध्ये असणारे ट्रिप्टोफॅन हे द्रव्य चांगली झोप येण्यासाठी उपयोगी असते. तसेच भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते. चिंता, ताण तणाव आणि नैराश्याची लक्षणे कमी करण्यासाठी मॅग्नेशियम फायदेशीर असते. मॅग्नेशियम मुळे मूड स्विंग्स सुधारण्यास सुद्धा मदत होते.

६. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

रक्तातील खराब कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराइड्सची पातळी जर वाढली तर त्यामुळे रक्तवाहिन्या बंद होतात, रक्तवाहिन्या बंद झाल्यामुळे रक्तप्रवाहास अडथळा निर्माण होतो ज्यामुळे हृदयविकार, स्ट्रोक (पक्षाघात) आणि हृदयाशी संबंधित इतर समस्यांचा धोका निर्माण होऊ शकतो. भोपळ्याच्या बियांमध्ये अनसॅच्युरेटेड फॅट्स (अल्फा-लिनोलिक ऍसिड) जास्त प्रमाणात असतात.

अशा अनसॅच्युरेटेड फॅट्समुळे रक्तातील कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.

७. कर्करोगाचा धोका कमी होतो 

शरीरात फ्री रॅडिकल्स वाढले तर कर्करोग (कॅन्सर) होण्याचा धोका वाढतो. भोपळ्याच्या बियांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट असल्यामुळे फ्री रॅडिकल्समुळे शरीरात होणाऱ्या नुकसानाची भरपाई करण्यास मदत होते. ह्या विषयाच्या केलेल्या अभ्यासानुसार असे आढळून आले आहे की भोपळ्याच्या बिया या महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा तर पुरुषांमध्ये प्रोस्टेट ग्रंथींच्या कॅन्सरचा धोका कमी करू शकतात.

८. सांधेदुखीवर गुणकारी

वयानुसार हाडे ठिसूळ होणे किंवा सांधेदुखी होणे हा त्रास अगदी कॉमन आहे. विशेषतः स्त्रियांना पस्तीशीनंतर असा त्रास जाणवू लागतो.

अशा वेळी हाडांची घनता सुधारण्यासाठी आहारात मॅग्नेशियम युक्त भोपळ्याच्या बियांचा समावेश केल्यास निश्चित फायदा होतो. संधिवात आणि हाडांचे एकूण आरोग्य सुधारते. केवळ १०० ग्रॅम भोपळ्याच्या बियांमध्ये ६५ % मॅग्नेशियम असते.

यावरून आपल्या हे तर लक्षात आले की तांबड्या भोपळ्याच्या बिया आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी असतात. परंतु त्यांचे सेवन नेमके कसे करावे हे आपल्याला माहीत नसते.

भोपळ्याच्या भाजीबरोबर येणाऱ्या बिया सोलून, वाळवून वापरता येतात किंवा बाजारात चांगल्या प्रतिच्या भोपळ्याच्या बिया विकत मिळतात. अशा चांगल्या प्रतिच्या बियांचेच सेवन करावे.

भोपळ्याच्या बियांचे सेवन नेमके कसे करावे?

१. भोपळ्याच्या बिया कच्च्या, मीठ न लावता खाता येतात.

२. बिया भाजून खाणे देखील गुणकारी आहे.

३. भोपळ्याच्या बिया उकडून सुद्धा खाता येऊ शकतात.

४. भोपळ्याच्या बिया स्मूदी किंवा सॅलडमध्ये घालून खाता येतात.

५. भोपळ्याच्या बियांची चटणी करता येईल.

६. ह्या बिया दही घालून सेवन करता येतील. तसेच ओट्स बरोबर देखील खाता येतील. तसे करण्यामुळे त्यांच्यातील गुणधर्म अधिक वाढतील.

भोपळ्याच्या बियांचे सेवन करताना काय खबरदारी घ्यावी?

भोपळ्याच्या बिया आकाराने लहान असल्यामुळे त्या एका वेळी भरपूर खाल्ल्या जाण्याची शक्यता असते. परंतु या बियांमध्ये फायबर देखील जास्त प्रमाणात असल्यामुळे एकाच वेळी खूप जास्त प्रमाणात भोपळ्याच्या बिया खाल्ल्यास त्याचा शरीराला अपाय होऊ शकतो.

त्यामुळे दर दिवशी ३० ग्रॅम पेक्षा जास्त भोपळ्याच्या बिया खाऊ नयेत. प्रमाणात खाल्लेल्या भोपळ्याच्या बिया या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहेत. परंतु कोणतीही गोष्ट अतिरेक झाल्यास हानिकारक ठरते त्याच प्रमाणे भोपळ्याच्या बियांचे देखील आहे.

तर मित्र-मैत्रिणींनो आज आपण भोपळ्याच्या बियांचे आरोग्यासाठी गुणकारी असणारे फायदे जाणून घेतले. या फायद्यांचा लाभ करून घेण्यासाठी भोपळ्याच्या बियांचे नियमित सेवन अवश्य करा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख जरुर शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!