पगाराव्यतिरिक्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या मालमत्ता (Assets)

पगाराव्यतिरिक्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या मालमत्ता (Assets)

जाणून घ्या तुमच्या पगाराव्यतिरिक्त तुम्हाला उत्पन्न मिळवून देणाऱ्या मालमत्ता (assets)

नोकरदार माणसे सहसा आपल्याला किती पगार मिळतो आणि आपला पगार कसा वाढू शकेल याचाच विचार करतात. परंतु अशी माणसे ही गोष्ट लक्षात घेत नाहीत की जोपर्यंत ते नोकरी करत आहेत तोवरच त्यांना पगाराच्या स्वरूपात उत्पन्न मिळू शकेल.

ज्या दिवशी कोणत्याही कारणाने त्यांचे नोकरी करणे थांबेल किंवा रिटायरमेंट घेतली जाईल तेव्हापासून त्यांना कोणतेही उत्पन्न मिळू शकणार नाही.

त्यामुळे अशा नोकरदार माणसांनी वेळीच पगाराव्यतिरिक्त उत्पन्न मिळवून देणाऱ्या मालमत्तांचा विचार केला पाहिजे.

अशा मालमत्ता किंवा असेट्स म्हणजे नेमके काय आणि नेमक्या कोणत्या मालमत्ता तुम्हाला उत्पन्न मिळवून देऊ शकतात हे आज आम्ही तुम्हाला सविस्तरपणे सांगणार आहोत.

या माहितीचा लाभ घेण्यासाठी हा लेख शेवटपर्यंत वाचा.

१. साइड बिझनेस

अनेक नोकरदार मंडळी नोकरी करत असतानाच पार्टटाइम स्वरूपात कोणता ना कोणता साइड बिझनेस करत असतात. अशा प्रकारच्या साईड बिजनेसमध्ये नेटवर्क मार्केटिंग, एखाद्या वस्तूची विक्री, फ्रीलान्सिंग, कंटेंट राइटिंग, केटरिंग, तंत्रज्ञान किंवा एखादी कला शिकवण्या संबंधीचे क्लासेस अशा व्यवसायांचा समावेश होतो.

एकीकडे नोकरी करत असताना अशा साईड बिजनेस मधून नोकरदार व्यक्तींना हमखास काही उत्पन्न मिळू शकते.

२. घर किंवा जमीन यातील गुंतवणूक

लॉन्ग टर्म इन्वेस्टमेंट म्हणजेच जास्त काळासाठी केलेली गुंतवणूक या प्रकारामध्ये घर अथवा जमीन यामध्ये गुंतवणूक करणे अतिशय फायदेशीर असते.

वाढत्या लोकसंख्येबरोबर जमिनींचे अथवा घरांचे भाव वाढतच जाणार हे तर नक्कीच.

एखाद्या विकसित होत असणाऱ्या एरियात घरांच्या अथवा जमिनींच्या किमती कमी असतानाच जर गुंतवणूक केली तर भविष्यात अशा मालमत्तेपासून भरपूर उत्पन्न मिळू शकेल हे निश्चित.

तसेच व्यावसायिक जागा बांधकाम सुरू असतानाच कमी किमतीत विकत घेऊन भाड्याने दिली असता त्यातून भरपूर उत्पन्न मिळू शकते.

एखाद्या मॉल मधील दुकान किंवा शहराच्या मध्यवर्ती बाजारपेठेतील दुकान ही अशी भरपूर उत्पन्न मिळवून देणारी मालमत्ता ठरू शकते.

३. आर्थिक गुंतवणूक

मिळणाऱ्या पगारातील काही भाग वेगवेगळ्या आर्थिक योजनांमध्ये गुंतवल्यास काही काळानंतर अशा योजनांमधून भरपूर प्रमाणात उत्पन्न मिळू शकते.

या योजनांमध्ये रिकरिंग डिपॉझिट, फिक्स डिपॉझिट, म्युचल फंड इन्व्हेस्टमेंट, सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन, निरनिराळ्या इन्शुरन्स योजना, पब्लिक प्रोविडेंट फंड, नॅशनल पेन्शन स्कीम अशा सारख्या योजनांचा समावेश होतो.

अशा योजनांमध्ये लहान वयात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली तर चक्रवाढ व्याज पद्धतीने व्याज मिळून भरपूर प्रमाणात उत्पन्न मिळवता येऊ शकते.

४. शेअर मार्केटमधील गुंतवणूक 

शेअर मार्केटमधील गुंतवणूक हा असाच एक पगाराव्यतिरिक्त उत्पन्न मिळवून देणारा पर्याय होऊ शकतो. शेअर मार्केटचा योग्य तो अभ्यास करून चांगल्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास ती चांगल्या प्रकारची ऍसेट ठरू शकते.

मात्र यासाठी शेअर बाजारातील चढ-उतारांचा योग्य तो अभ्यास करणे आणि आपल्या क्षमतेनुसार गुंतवणूक करून चांगला परतावा मिळवणे आवश्यक असते.

शेअर बाजाराच्या संदर्भात जोखीम पत्करून अथवा चुकीच्या व्यक्तीवर विश्वास टाकून गुंतवणूक करू नये.

५. सोने-नाणे आणि जडजवाहीर

भारतीय बाजारपेठेत सोन्याला नेहेमीच उत्तम मागणी असते. त्यामुळे भारतात सोन्याचे भाव नेहमी वाढतच असतात. याच कारणामुळे सोन्यात केलेली गुंतवणूक ही निश्चितपणे भरपूर उत्पन्न देऊ करणारी गुंतवणूक होऊ शकते.

दागिने अथवा बिस्किटे या स्वरूपात खरेदी केलेले सोने थोड्या काळानंतर भरपूर प्रमाणात परतावा देऊ शकते. दागिने ही तर अनेक पिढ्यांपर्यंत आर्थिक सुरक्षितता देऊ शकणारी मालमत्ता असते.

अनेक पिढीजात श्रीमंत लोकांकडे पूर्वापार चालत आलेले सोने, हिरे, मोती यांचे दागिने असतात. अशीच मालमत्ता आपण देखील निर्माण करू शकतो आणि आपल्या पुढील पिढ्यांकडे ती सोपवू शकतो.

आर्थिक अडचणीच्या वेळी सोने विकून मोठी रक्कम उभी करता येऊ शकते हा या मालमत्तेचा मोठाच फायदा आहे.

६. रोख रक्कम

रोख रक्कम ही तर आपल्याजवळील सर्वात सुरक्षित आणि आवश्यक तेव्हा ताबडतोब उपलब्ध होऊ शकणारी मालमत्ता असते.

अगदी गर्भश्रीमंत माणसांपासून ते सर्वसामान्य माणसापर्यंत सर्वजण थोड्या प्रमाणात का होईना रोख रक्कम आर्थिक सुरक्षिततेसाठी जवळ बाळगतात, कारण अशी रोख रक्कम आवश्यक तेव्हा ताबडतोब उपलब्ध तर असतेच शिवाय अडीअडचणीला इतरांनाही देता येऊ शकते.

अशा रोख रकमेच्या जोरावर व्याजापोटी उत्पन्न मिळवणे हादेखील आर्थिक उत्पन्नाचा एक स्रोत असू शकेल.

तर या आहेत सहा दृश्य स्वरूपातील मालमत्ता. या मालमत्तांच्या आधारे आपल्याला आपल्या पगाराव्यतिरिक्त आर्थिक उत्पन्न निश्चितपणे मिळू शकेल याची खात्री असते.

पण या मालमत्तांबरोबरच काही अदृश्य स्वरूपातील मालमत्तादेखील आपल्यासमवेत असतात. त्या कोणत्या ते आता आपण पाहूया

१. आपल्या जवळची माणसे

आपल्या जवळची, प्रेमाची, कुटुंबातील माणसे, आपली जवळची मित्रमंडळी हे आपले एक प्रकारचे असेट असते. कोणत्याही अडचणीच्या वेळेला ही माणसे आपल्या पाठीशी उभी राहतात.

संकट काळात आपल्याला साथ देतात. कोणत्याही शारीरिक, मानसिक किंवा आर्थिक अडचणीतून आपल्याला सोडवतात. म्हणजे ही एक प्रकारची आपली मालमत्ताच असते, बरोबर ना?

२. उत्तम शिक्षण

आपण जर उत्तम शिक्षण घेतलेले असेल तर ते देखील आपले एक ऍसेट ठरू शकते. उत्तम शिक्षणाच्या जोरावर आपण आयुष्यात कधीही कोणत्याही अडचणीच्या वेळी चांगली नोकरी अथवा व्यवसाय करुन आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो.

याचे उत्तम उदाहरण म्हणजे आधी केवळ घर सांभाळण्याचे काम करणाऱ्या अनेक गृहिणी लॉक डाऊनच्या काळात मात्र आपल्या शिक्षणाच्या जोरावर संसाराला साथ देण्यासाठी नोकऱ्या अथवा व्यवसाय करू लागल्या.

३. व्यावसायिक किंवा कले संदर्भातील प्रशिक्षण 

जर आपण एखादे व्यावसायिक प्रशिक्षण घेतलेले असेल किंवा आपल्याला एखादी कला येत असेल तर ते देखील आपले एक मोठे ऍसेट ठरू शकते.

अशा कलेच्या किंवा व्यावसायिक प्रशिक्षणाच्या जोरावर आपण निश्चितपणे आर्थिक उत्पन्न मिळवू शकतो. आपल्याला येत असलेली कला इतरांना शिकवणे किंवा आपले व्यावसायिक स्किल इतरांना शिकवणे या पद्धतीने असे उत्पन्न मिळवता येऊ शकेल.

तर हे आहेत असे ऍसेटस जे अदृश्य स्वरूपात सतत आपल्याबरोबर असतात.

यावरून आपल्या असे लक्षात येते की केवळ नोकरी एके नोकरी करत न बसता आपण आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळवून देऊ शकणाऱ्या मालमत्ता जमवणे याकडे लक्ष पुरवले पाहिजे.

असे करण्यामुळे आपली आर्थिक बाजू बळकट तर होईलच, शिवाय नवनवीन गोष्टी शिकण्यासाठी आपल्याला प्रोत्साहन मिळू शकेल.

लेखात सांगितलेल्या या सर्व बाबींचा जरूर विचार करा आणि यावरील तुमची मते आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख नक्की शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

1 Response

  1. Ashwini Vijay Panpatil says:

    खूप छान माहिती मिळाली
    धन्यवाद

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!