कावळे

कावळे आणि पिंड यांचे काहीतरी अजब रिलेशन आहे असे मला वाटते. एरवी नको तिथे दिसणारे आणि रस्त्यावरील घाणीतली घाण खाणारे हे कावळे नेमका पिंड ठेवला कि गायब होतात आणि जे काही दोनतीन डोक्यावर उडत असतील त्यांचा रुबाब तर काय वर्णावा….?

पिंडदान करणारा बिचारा गोटा करून रणरणत्या उन्हात केव्हा एकदा हा शिवतोय आणि आपली सुटका होतेय असे भाव ठेवून उभा असतो. बरे तो दुःखी ..…त्यामुळे फार काही बोलता हि येत नाही. पण हाल होतात ते इतरांचे… काहीजणांना पिंडाला नमस्कार करून कामाला जायचे असते. तर काही जणांना दुसरीकडे अजून एखाद्या कार्याला जायचे असते. तर काही जण आजूबाजूला कोणी ओळखीचे आले तर परत वेळ फुकट जाईल याच्या भीतीत असतात. सगळेच या ना त्या प्रकारे कावळ्याची विनवणी करत असतात. पण हे महाशय मात्र पिंडाच्या आजूबाजूला फिरत असतात. जणू काही जेवणात काही कमी नाही ना ते चेक करत असतात.

काही वेळानी मग वेगवेगळ्या मार्गाने त्यांची विनवणी सुरु होते. पहिले अगदी जवळचे नातेवाईक. मग हळू हळू इतर जण आपापल्या परीने पिंडाजवळ जाऊन काहीतरी मनात पुतपुटतात. तर काही मृताच्या जवळचे पिंडाजवळ काही ठेवायला विसरलो नाही ना ते सारखे चेक करतात.

एकदा माझ्या जवळच्या नातेवाईकाच्या पिंडाला बराच वेळ कावळा शिवत नव्हता. मृत व्यक्तीला दारुचे व्यसन होते. शेवटी त्याच्या पिंडाजवळ दारू आणून ठेवली तेव्हाच जवळ असलेल्या कावळ्याने पिंडाला चोच मारली. बऱ्याच वेळ मृताच्या अतृप्त इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले कि कावळा शिवतोय हे मी अनुभवले आहे.

माझा एक मित्र गमतींने म्हणायचा कि आपण एक कावळा पाळून तो भाड्याने दिला पाहिजे म्हणजे लोकांचा वेळ वाचेल. पण खरेच अशा ठिकाणीच असे का होते.. ? आमच्या घरी खिडकीत रोज ठराविक वेळी कावळा येतो. त्याला ठराविक खाणेच द्यावे लागते त्याशिवाय तो जात नाही. जुन्या घरी तर एका कावळ्याच्या चोचीत भरवावे लागे, खाली ठेवलेले तो खात नसे, या मागची कारणे माहित नाही आणि मी कधी शोधायचा प्रयत्नही केला नाही. बघू पुढे कोणाच्या दशक्रिया विधीला गेलो कि काय घडते.

वाचण्यासारखे आणखी काही…..

मृत्यू
अंतिम इच्छा
आमचा हरी

माहिती उपयुक्त वाटल्यास वरती उजव्या कोपऱ्यात दिलेले बटन दाबून हा लेख व्हॉट्सऍप वर आपल्या मित्र मैत्रीणींना पाठवा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2023. All rights reserved!