नॉमिनी हाच संपत्तीचा कायदेशीर वारस असतो का? कायदेशीर वारस आणि नॉमिनी ह्यांच्यामध्ये फरक काय?

hindu varsa hakka kayda in marathi

संपत्तीचा कायदेशीर वारस आणि नॉमिनी ह्यांच्यामध्ये नेमका फरक काय?

 

कोविडकाळात मोठ्या प्रमाणात अकस्मात मृ_त्यू झाल्याने संपत्तीचे योग्य व्यवस्थापन करणे हे किती गरजेचे असते याचा अनुभव बऱ्याच लोकांनी घेतला.

असं म्हणतात की मृ_त्यु हे जीवनाचे अंतिम सत्य आहे. सर्वांच्याच मनात आपण आयुष्यभर कष्ट करून जमविलेल्या संपत्तीचं पुढे काय होणार हा प्रश्न असतो.

आपल्या मृ_त्यूनंतर आपल्या संपत्तीचे वाटप नेमक्या कशा प्रकारे होईल याबद्दल माणसे अनभिज्ञ असतात. त्यादृष्टीने कराव्या लागणाऱ्या काही कायदेशीर बाबी लोक पूर्ण करत नाही. आणि मग अशा संपत्तीबाबत वाद निर्माण होतात.

हे सगळे नेमके काय प्रकरण आहे हे जाणून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहूया. सुरक्षेच्या कारणासाठी या उदाहरणातील व्यक्तींची नावे बदलली आहेत.

श्री. विनायकराव पाटील हे गावातील एक मोठे प्रस्थ. आयुष्यभर अतिशय सचोटीने आणि मेहनतीने व्यवसाय करून त्यांनी पुष्कळ संपत्ती कमावली. विनायकरावांना दोन मुलगे आणि एक मुलगी. मुलगी लग्न होऊन सासरी गेली आणि एक मुलगा त्याच्या नोकरीनिमित्त दुसर्‍या शहरात स्थायिक झाला. धाकटा मुलगा मात्र विनायकरावांच्या जवळ राहून त्यांच्या व्यवसायात मदत करत होता.

विनायकरावांनी वेळोवेळी केलेल्या गुंतवणुकीमध्ये नॉमिनी म्हणून धाकट्या मुलाचे नाव घातले होते. तो त्यांच्या जवळ असल्यामुळे तसे करणे त्यांना सोयीचे वाटत असे.

वृद्धापकाळाने विनायकरावांचे नि_धन झाले. त्यांच्या बहुतांश संपत्तीवर नॉमिनी म्हणून त्यांच्या धाकट्या मुलाचे नाव होते. त्यांच्या धाकट्या मुलाची अशी समजूत झाली की आपण नॉमिनी असल्यामुळे आता आपणच वडिलांच्या सगळ्या संपत्तीचे मालक झालो आहोत. परंतु या गोष्टींमध्ये तथ्य आहे का?

केवळ नॉमिनी केल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा त्या संपत्तीवर अधिकार निर्माण होतो का? नॉमिनी हाच एखाद्या व्यक्तीचा कायदेशीर वारस

असू शकतो का?

 

वरील उदाहरणातील विनायकरावांचा मोठा मुलगा आणि मुलगी हे देखील त्यांचे कायदेशीर वारस आहेत ना? मग केवळ नॉमिनेशन नाही म्हणून त्यांना संपत्तीत वाटा मिळणार नाही का?

नॉमिनी आणि कायदेशीर वारस यामध्ये नेमका फरक काय? एखाद्या व्यक्तीचा नॉमिनी कोण बनू शकतो आणि त्या व्यक्तीचे कायदेशीर वारस नेमके कोण असतात?

या सर्व बाबी आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

सर्वप्रथम आपण नॉमिनी म्हणजे कोण हे जाणून घेऊया.

एखाद्या व्यक्तीने आपल्या संपत्तीसाठी जर कुणाला नॉमिनी म्हणून अपॉईंट केले तर अशी नॉमिनी व्यक्ती ही त्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्या संपत्तीची व्यवस्थापक बनते. नॉमिनी अपॉईंट केले म्हणून कोणी लगेच त्या संपत्तीचा मालक बनत नाही.

मृत व्यक्तीने केलेल्या मृत्युपत्रात सांगितल्याप्रमाणे त्यांचे कायदेशीर वारस ठरवले जातात. असे कायदेशीर वारस मृत व्यक्तीच्या संपत्तीचे मालक असतात. जर मृत्युपत्र केले नसेल तर कायद्यानुसार जितके लोक मृत व्यक्तीचे कायदेशीर वारस बनवू शकत असतील ते सर्वजण त्यांच्या संपत्तीचे अधिकृत मालक बनतात.

जर कायदेशीर वारसांमध्ये काही वाद निर्माण झाला तर तो वाद कायदेशीररित्या मिटेपर्यंत संपत्तीचा ताबा नॉमिनी व्यक्तीकडे असतो.

परंतु नॉमिनी हा संपत्तीचा थेट मालक कधीच बनू शकत नाही. तो केवळ व्यवस्थापक असतो.

 

जर नॉमिनी हा कायदेशीर वारस नसेल तर एखाद्या व्यक्तीचे कायदेशीर वारस नेमके असतात तरी कोण?

प्रत्येक व्यक्तीला स्वतःची कमावलेली संपत्ती कोणाला द्यायची हे ठरवण्याचा अधिकार असतो. जर त्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी अधिकृत मृत्युपत्र केले असेल तर त्याने मृत्युपत्रात सांगितल्याप्रमाणे मृत व्यक्तीचे कायदेशीर वारस ठरवले जातात.

परंतु जर मृत व्यक्तीने मृत्युपत्र केले नसेल तर या व्यक्तीची पती अथवा पत्नी,  सर्व मुले आणि मुली, हयात असतील तर आई-वडील हे सगळेजण त्याचे कायदेशीर वारस बनतात. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर या सर्वांचा त्या व्यक्तीच्या संपत्तीवर समान अधिकार असतो.

याचाच अर्थ असा की वरील उदाहरणातील श्री. विनायकरावांनी स्वतःचे मृत्यूपत्र केलेले नसल्यामुळे त्यांचे दोन्ही मुलगे आणि मुलगी हे सर्व त्यांचे कायदेशीर वारस आहेत.

केवळ नॉमिनी बनल्यामुळे फक्त धाकटा मुलगा त्यांचा कायदेशीर वारस ठरेल असे होऊ शकत नाही. सर्व संपत्तीचे योग्य वाटप होईपर्यंत नॉमिनी हा केवळ त्या संपत्तीचा व्यवस्थापक असतो.

तरीदेखील असे सांगितले जाते की प्रत्येकाने आपल्या सर्व संपत्तीसाठी नॉमिनी अपॉईंट करणे आवश्यक असते.

काय असतील याची नेमकी कारणे?

१. प्रत्येक संपत्तीसाठी नॉमिनी अपॉईंट केल्यास संपत्तीधारकाच्या मृत्यूनंतर संपत्तीचे हस्तांतरण करणे अतिशय सोपे जाते. संपत्तीचे हस्तांतरण सुरुवातीला नॉमिनीच्या नावाने केले जाते आणि नॉमिनी असणाऱ्या व्यक्तीने सर्व संपत्तीचे कायदेशीर वारसांमध्ये योग्य रीतीने वाटप करणे अपेक्षित असते.

बहुतांश वेळा कुटुंबातील एखादी व्यक्ती नॉमिनी असल्यामुळे याबाबत फारसे वाद निर्माण होत नाहीत.

२.  जर एखाद्या व्यक्तीने आपल्या संपत्तीसाठी नॉमिनी अपॉईंट केला नाही  तर त्या संपत्तीचे हस्तांतरण करणे अवघड होऊन बसते. मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांना सर्वप्रथम ते कायदेशीर वारस आहेत असे सर्टीफिकीट कोर्टातून मिळवावे लागते आणि ते सादर केल्यानंतरच संपूर्ण प्रोसीजर पार पडून संपत्तीचे हस्तांतरण होऊ शकते. हे काम वेळखाऊ तर असतेच शिवाय किचकट देखील असते. त्याऐवजी संपत्तीचे नॉमिनेशन सुरवातीपासूनच केल्यास सर्व बाबी अतिशय सोप्या होतात.

आता आपण  वेगवेगळ्या संपत्तीसाठी नॉमिनी  नेमक्या कशा प्रकारे  काम करतात ते  पाहूया.

१. एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड

एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंडात गुंतवणूक करणाऱ्या सर्व व्यक्तींना सुरुवातीलाच नॉमिनी अपॉईंट करणे बंधनकारक असते. तसेच हा नॉमिनी कुटुंबातील सदस्य असणे देखील आवश्यक असते. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचा सर्व एम्प्लॉयी प्रॉव्हिडंट फंड नॉमिनीकडे सोपवला जातो. (इथे नॉमिनी हाच कायदेशीर वारस आहे हे गृहीत धरले जाते. कायदेशीर वारसालाच नॉमिनी केले जाते.)

२. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड

एखाद्या व्यक्तीच्या पब्लिक प्रॉव्हिडंट फंडातील रक्कमेवर त्या व्यक्तीच्या कायदेशीर वारसांचा पूर्ण अधिकार असतो. इथे देखील गुंतवणूक करताना नॉमिनी अपॉईंट करणे अपेक्षित असते आणि मृत्यूनंतर सर्व रक्कम नॉमिनीला हस्तांतरीत केली जाते परंतु नॉमिनीने ती रक्कम कायदेशीर वारसांना योग्य प्रमाणात सुपूर्त करणे अपेक्षित असते.

पब्लिक प्रॉव्हिडंट फंडावर जर काही कर्ज घेतले असेल तर ते आधी फेडणे ही नॉमिनी आणि कायदेशीर वारस या दोघांचीही जबाबदारी असते. त्यानंतर उर्वरित रक्कम नॉमिनीकडे हस्तांतरित केली जाते.

३. फिक्स डिपॉझिट (बँकेतील एफडी)

बँकेतील एफडीवर मृत व्यक्तीच्या कायदेशीर वारसांचा अधिकार असतो. नॉमिनी असणे एकूण व्यवहाराच्या दृष्टीने फायदेशीर ठरते परंतु नॉमिनी हा केवळ व्यवस्थापक असतो.

४. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक

म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना देखील नॉमिनी अपॉईंट करणे आवश्यक असते  परंतु हा नॉमिनी केवळ व्यवस्थापक असून म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीवर  कायदेशीर वारसांचाच हक्क असतो.

५. शेअर्समधील गुंतवणूक

शेअर्समध्ये गुंतवणूक करताना सुद्धा नॉमिनी अपॉईंट करणे बंधनकारक असते. जर शेअर्समधील गुंतवणूक एकापेक्षा जास्त व्यक्तींच्या नावावर गेलेली असेल तर मृत व्यक्ती सोडून उरलेले इतर जण त्या गुंतवणुकीचे थेट वारसदार आणि मालक बनतात. परंतु मृत व्यक्तीच्या एकट्याच्याच नावावर शेअर्समधील गुंतवणूक असेल तर मात्र सर्व कायदेशीर वारस सदर संपत्तीचे मालक बनतात. नॉमिनी हा केवळ व्यवस्थापक असतो.

६.  स्थावर मालमत्ता

स्थावर मालमत्तेवर मालकाच्या मृत्युनंतर त्याच्या कायदेशीर वारसांचा संपूर्ण अधिकार असतो. स्थावर मालमत्तेचे हस्तांतरण होईपर्यंत नॉमिनी व्यक्ती सदर मालमत्तेचे व्यवस्थापन आणि सांभाळ करू शकते. परंतु स्वतः नॉमिनी व्यक्ती जर कायदेशीर वारस नसेल तर तो त्या मालमत्तेचा मालक बनू शकत नाही.

७. विम्याची रक्कम

विमा काढतानाच अतिशय जवळची कुटुंबातील व्यक्ती नॉमिनी म्हणून अपॉईंट करावी असा सल्ला दिला जातो. सहसा पती अथवा पत्नी, मुले, आई-वडील यापैकी कोणीतरी आयुर्विम्याचे नॉमिनी अपॉईंट केले जातात. विमाधारकाच्या मृत्यूनंतर विम्याची संपूर्ण रक्कम नॉमिनीकडे हस्तांतरित केली जाते.

यावरून आपल्या असे लक्षात येते की कोणत्याही प्रकारची संपत्ती असली तरी त्यावर सर्वाधिकार सदर व्यक्तीच्या कायदेशीर वारसांचा असतो. परंतु एकूण कायदेशीर बाबी हाताळणे आणि संपत्तीचे हस्तांतरण सुलभ होण्यासाठी नॉमिनी असणे आवश्यक असते.

अर्थातच अतिशय विश्वासू आणि हुशार व्यक्तीची नॉमिनी म्हणून नोंद करणे योग्य ठरते.

तर मित्र-मैत्रिणींनो तुम्हीही तुमच्या सर्व गुंतवणुकी आणि मालमत्तांवर योग्य व्यक्तीला नॉमिनी म्हणून अपॉईंट करा आणि आपल्या कुटुंबियांचे भविष्य सुरक्षित करा.

थोडक्यात जी व्यक्ती कुटुंबातील सर्वांच्या हिताचा विचार आणि तुमच्या आयुष्यभराच्या कष्टांचा आदर ठेवेल अशा व्यक्तीला नॉमिनी ठेवणे कधीही श्रेयस्कर ठरेल.

या लेखातील माहिती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तसेच ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून हा लेख नक्की शेअर करा.

Manachetalks

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

या आणि अशा वैविध्यपूर्ण लेखांचे अपडेट्स मिळविण्यासाठी आमचे फेसबुक पेज मनाचेTalks ला नक्की लाईक करा. आणि लेखांचे अपडेट्स व्हाट्स ऍप वर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा  / टेलिग्रामवर संवाद साधण्यासाठी येथे क्लिक करा

You may also like...

1 Response

  1. Very essential and important information required by every individual. Thanks.

Leave a Reply

Your email address will not be published.

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.

error: © Copyrights 2022. All rights reserved!